20 September 2018

News Flash

ब्रॅण्डनामा : डव

नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

(संग्रहित छायाचित्र)

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

एखादी कंपनी एकाच पद्धतीची अनेक उत्पादनं ग्राहकाला जेव्हा विकते तेव्हा आपल्या प्रत्येक उत्पादनात वेगळेपण कसं राखता येईल याचा त्या कंपनीला सखोल अभ्यास करावा लागतो. अशा प्रकारच्या ब्रॅण्डिंगमध्ये युनिलिव्हर कंपनीचा हातखंडा आहे. ही एकच कंपनी अनेकविध उत्पादनं विकते. त्यात एक साबण म्हटला तरी अनेक ब्रॅण्ड्स येतात; पण प्रत्येक साबण वेगळ्या वैशिष्टय़ांसह कंपनीकडून विकला जातो. त्यापकीच एक म्हणजे ‘डव’.

युनिलिव्हर कंपनीचे अनेक साबण बाजारात असताना हा आणखी एक का? तर नाही. कंपनीकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या प्रयोगाचा तो भाग होता. १९५५-५७च्या दरम्यान डव बाजारात आला. तेव्हाच्या लिव्हर ब्रदर्सच्या कंपनीतील अत्यंत हुशार रसायनतज्ज्ञ व्हिसेंट लिबर्टी यांनी तो आणला. व्हिसेंट मूळचे इटालियन. अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. १९४९ साली लिव्हर ब्रदर्सच्या कंपनीत ते नोकरीला लागले. पेटंट समन्वयक आणि नवनवीन उत्पादनांसाठी प्रयत्न करणे हा त्यांच्या कामाचा भाग होता. ४० वर्षांच्या नोकरीत ११८ उत्पादनांची पेटंट त्यांनी लिव्हरबंधूंना मिळवून दिली. १९५० च्या दरम्यान साबणातील फॅटी अ‍ॅसिड्स काढून तुलनेने कमी खर्चात आणि सोप्या पद्धतीने सिंथेटिक साबणवडी बनवण्याची पद्धत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने विकसित केली. साबणाच्या विश्वात ही मोठीच सुधारणा होती. त्याचाच एक भाग म्हणजे डव साबणाची निर्मिती. हा साबण त्याआधीच्या साबणांपेक्षा त्वचेसाठी मृदू- मुलायम होता. उत्पादनांसाठी प्राण्यांचा गिनिपिग म्हणून  वापर करायला संवेदनशील मनाच्या व्हिसेंट यांचा विरोध होता. तीच संवेदनशीलता या उत्पादनातही आलेली दिसते. साबणाच्या वापराने खरखरीत होणाऱ्या त्वचेवर त्यांनी डवसारखा हळुवार पर्याय शोधला.

HOT DEALS
  • Honor 7X 64 GB Blue
    ₹ 15590 MRP ₹ 17990 -13%
  • Apple iPhone 7 128 GB Jet Black
    ₹ 52190 MRP ₹ 65200 -20%
    ₹1000 Cashback

युनिलिव्हर कंपनीने सुरुवातीपासून या साबणाची जाहिरात तशाच प्रकारे केली. हा साबण मुलायम, त्वचेची योग्य काळजी घेणारा, चेहऱ्याची स्वच्छता जपणारा, नसíगक सौंदर्य देणारा अशा प्रकारे अधोरेखित केला गेला. १९३३ साली डव भारतात आला. त्याआधी या साबणाच्या ज्या जाहिराती पाश्चात्त्य जगात गाजल्या होत्या त्याच भारतीय रूपात आपण पाहिल्या. युनिलिव्हर कंपनीने सुरुवातीपासून ते आतापर्यंत या जाहिरातीचा चेहरा सर्वसामान्य स्त्री असेल याची खात्री बाळगली; पण सर्वसामान्य म्हणताना ती उच्चमध्यमवर्गातीलच राहील याचीही काळजी घेतली. अध्र्या चेहऱ्यावर डव आणि अध्र्या चेहऱ्यावर अन्य साबण लावून फरक पाहा किंवा स्ट्रिप्सचा वापर करून कोणता साबण त्वचेसाठी जास्त मुलायम आहे हे तुम्हीच अनुभवा अशा जाहिरातींतून ग्राहकवर्गालाच या साबणाने प्रयोग करून पाहायची मुभा दिली. डवच्या सुरुवातीच्या काही जाहिराती वर्णविषयक टिप्पणीमुळे वादग्रस्त ठरल्या; पण त्यानंतर ‘रिअल वुमन’, गोरेपणाऐवजी सुंदर त्वचा हाच धागा पकडून डव ग्राहकांसमोर येत राहिला. त्यातही ‘इज दॅट लव्ह ऑर डव’ ही जाहिरात विलक्षण गाजली. उजळ त्वचा वा गोरेपणापेक्षा चेहरा तेजस्वी किंवा आधीपेक्षा अधिक छान दिसण्यावर दिलेला हा भर निश्चितच सुखद होता.

आज डव ८० देशांत पोहोचलेला आहे. डव साबणासोबतच बॉडी लोशन, फेसवॉश, शाम्पू तितकेच लोकप्रिय आहेत. डवचा लोगो म्हणजे या वर्गातील उत्पादनांतला सर्वात लोकप्रिय लोगो. डव म्हणजे कबुतराचीच विशिष्ट प्रजाती; पण डवचा हा लोगो उत्पादनानुसार कधी पिवळ्या, तर कधी निळ्या रंगात दिसतो. कबुतर हे शांतता, प्रेमळपणा, पावित्र्याचं प्रतीक. पिवळा डव लोगो आनंद आणि समृद्धी व्यक्त करतो, तर निळा डव लोगो सर्वोत्तमतेचं आणि विश्वासार्हतेचं प्रतीक ठरतो.

तब्बल ६० वर्षांहून अधिक जुना असा हा ब्रॅण्ड संमिश्र लोकप्रियता अनुभवतो. ज्यांना उग्र सुगंध, भरपूर फेस याऐवजी त्वचेचे कोमल लाड करणं भावतं त्यांना डव आवडतो. याउलट डव कितीही लावला तरी चेहरा धुतल्यासारखे वाटत नाही, असं मानणाराही एक वर्ग आहे.

अनेक वर्ष उत्पादनांच्या मांदियाळीत टिकून राहण्यासाठी दर वेळी उंचच उंच भरारी गरजेची नसते. काही वेळा पंख पसरून संथ पण आल्हाददायी विहार करत राहणंही गरजेचं असतं. डवच्या लोगोवरचं ते कबुतर नेमकं तेच करत राहातं आणि तेच गरजेचं असतं. डव ऑर लव्ह या रोमँटिक प्रश्नाचं उत्तर मिळो वा न मिळो..पण डवच्या यशाच्या रहस्याचं उत्तर इथं मिळतं!

viva@expressindia.com

First Published on September 7, 2018 3:29 am

Web Title: story behind the making of dove