|| राधिका कुंटे

गोष्ट, नाट्यकला आणि शिक्षण या त्रयीची सांगड घालत मुलांपर्यंत गोष्टी, शब्द आणि चित्रांची दुनिया पोहचवण्याचं काम कल्पेश समेळ आणि त्याची ‘टायनी टेल्स’ संस्था करते. जाणून घेऊ या ‘गोष्टींच्या गोष्टी’विषयीचं काम.

Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
Trigrahi Yog in Meen Rashi
३ ग्रहांची महायुती होताच घडणार त्रिग्रही योग; ‘या’ राशींचे चमकणार भाग्य? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

लहानपणापासून कधीच पुस्तक वाचलं नव्हतं, तो लहान मुलांपर्यंत गोष्टींची, शब्दांची दुनिया उलगडतो आहे, ही गोष्टच त्याचं वेगळेपण अधोरेखित करणारी. कल्पेश समेळ तेव्हा ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयात ‘बँकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स’ शिकत होता. त्याचा अभ्यासाकडे फार ओढा होता असं नाही. वाचन संस्कृती वगैरे माहिती नव्हती. वाचली होती ती फक्त अभ्यासाची पुस्तकं. मुलुंडच्या मॅकडोनाल्डमध्ये नोकरी करत तो शिकतही होता. पण त्या शिकण्यात आपल्याला रस वाटत नाही हे त्याला कळायला लागलं होतं. दरम्यान, वर्गात ‘नाट्यमय’ या ग्रुपची एकांकिकेसाठीची नोटीस आली. एकांकिकेचा ‘ए’ माहिती नसताना लेक्चर बुडवून जाता येतंय म्हटल्यावर तो तिथे गेला. हळूहळू ‘नाट्यरंगा’च्या छटा कळू लागल्या नि तो एकांकिकामय झाला. अभ्यासात अजूनच मागे पडायला लागला. घरच्यांना वाटत होतं तो तिसऱ्या वर्षाला आहे, पण तो पहिल्याच वर्षाला होता. कारण एकांकिका स्पर्धांमधला सहभाग वाढतच होता. त्या सुमारास ‘बायोस्कोप’ या चित्रपटात त्याने काम केलं होतं. तेव्हा स्पृहा जोशीने त्याला ललित कला केंद्रातल्या नाट्यशास्त्राच्या पदवीविषयी सुचवलं. घरी न सांगता पुण्यात ऑडिशन दिली. तरीही त्याने जोशी-बेडेकरमध्ये बीएला प्रवेश घेऊन ठेवला होता, कारण बँकिंग जमेल असं वाटत नव्हतं. ललित कला केंद्रात निवड झाल्यावर त्याने खरी परिस्थिती घरी सांगितली. ‘मला हे आवडतं आहे. हॉस्टेलची सोय आहे नि मी ज़ॉबही बघेन’, असं तो म्हणाला. घरच्यांचा विरोध नव्हता. मग तीन वर्षं तो नाटकांच्या दुनियेत होता. अनेक गोष्टी शिकत गेला. तिथे पूर्णपणे वैचारिक नाटक बघायला मिळालं. मोजक्या साहित्यात किंवा कधी काहीच नसलं, तरीही सगळं उभं करता येतं हे त्याला जाणवलं.

कल्पेशला तिसऱ्या वर्षी वाटलं की कमी साधनांत उभं राहणारं नाटक आपण केलं पाहिजे. तेव्हा त्याला ‘गोष्टरंग’बद्दल समजलं. ‘क्वेस्ट’ संस्थेतर्फे ही वर्षभराची फेलोशिप दिली जाते. तो सांगतो की, ‘या निमित्ताने मी लहान मुलांच्या विश्वात डोकावलो. तिथली लहान मुलांची पुस्तकं बघून आपण कधीच न वाचल्याची हळहळ मला वाटली. पुढे मुलांसमोर गोष्ट सांगायला लागलो, तेव्हा मुलांच्या बोलक्या डोळ्यांनी मला बरंच काही सांगितलं. मग ठरवलं की आपण मुलांपर्यंत पुस्तक, गोष्टीचं पुस्तक, चित्रं पोहोचवायचं काम करावं. तेव्हा पालघरमधल्या आदिवासी पाड्यांतील शाळांमध्ये दोनदा सहा महिन्यांच्या अंतराने जायचो. सुरुवातीला गोष्ट सांगून त्यावर अ‍ॅक्टिव्हिटी घ्यायचो. त्यायोगे ते पुस्तक त्यांच्यापर्यंत जास्ती चांगल्या पद्धतीनं जावं हा उद्देश. त्यांची भाषा वेगळी असते. लिपी नसते. मराठी भाषेचं पुस्तक पहिल्यांदा त्यांच्यासमोर येतं तेही थेट अभ्यासाचं. त्यामुळं त्यांना तो शब्द समजायला हवा. हे फक्त गाव-शहर नव्हे तर सगळ्याच ठिकाणच्या मुलांसाठी महत्त्वाचं आहे. मग गोष्ट, क्वेस्टमधलं शिक्षणसाहित्य आणि ललित कला केंद्रात शिकलेलं नाटक यांचा मिलाफ करून ‘टायनी टेल्स’च्या अंतर्गत काही उपक्रम आखले.’ सध्या मी आणि प्रतीक्षा खासनीस पूर्णवेळ काम करत असून इतर आठ जण त्यांची कामं सांभाळून मदत करतात. आम्ही गोष्टीचं नाट्यरूपांतर करतो. हळूहळू आम्हाला लोक वेगवेगळ्या ठिकाणांहून बोलवायला लागली आणि जवळपास १८० प्रयोग झाले. ५४,००० मुलांपर्यंत पोहचलो. तेव्हा आपण योग्य दिशेनं चाललो आहोत हे कळल्याने ‘टायनी टेल्स’ची संस्था म्हणून नोंदणी केली, अशी माहिती त्याने दिली.

नाटक म्हटलं तरी ‘टायनी टेल्स’चा फापटपसारा काहीच नाही. हम तो झोला उठा के चले… शाळा-शाळांतून जातात… सध्या कोव्हिडमुळे मोठ्ठा अल्पविराम घ्यावा लागला आहे. त्याआधीच्या चिकार आठवणी आहेत. एकदा एका गावात मुलांसमोर सादरीकरण सुरू होतं. तितक्यात एक चाचा येऊन ते बघायला लागले. काही वेळाने ते पळत पळत गेले. टीमचं सादरीकरण सुरूच होतं. ते चाचा अख्खं गाव गोळा करून आले. सगळे मिळेल ती जागा पकडून बसले नि मग टीमने पुन्हा पहिल्यापासून नागडधुय्या राजा हे नाटक सादर केलं. एका शाळेत तर टीम डोंगरावरच्या शाळेतून खाली जाईपर्यंत १५-२० मिनिटं मुलं जोरजोरात टाटा करत ओरडत होती. ‘टायनी टेल्स’ने १२ नाटकं बसवलेली आहेत. मुलांच्या वयोगटानुसार त्यांचे प्रयोग केले जातात, असं कल्पेश सांगतो.

प्रयोगाच्या निमित्ताने विविध ठिकाणी फिरताना कल्पेशला जाणवलं की, प्रत्येक भागातल्या मुलाची आकलनक्षमता वेगळी आहे. प्रत्येकाची व्यक्त व्हायची पद्धत विभिन्न असते. त्या त्या भागानुसारही हे बदल जाणवतात. यासाठी या मुलांचा अभ्यास करायला हवा. तो सांगतो की, ‘आपण मुलांना दिलेलं गोष्टीचं पुस्तक कोणत्या पद्धतीचं हवं, वयोगटाखेरीज भागांनुसारही पुस्तकं वेगवेगळी द्यायची का, त्याची भाषा कोणती असावी, यावर विचार केला. मग आदिवासी पाडे, तिथली वेगवेगळ्या भाषेची पण मराठीत शिकणारी मुलं कुठे आहेत याचा शोध घेतला. कोल्हापूर, सांगली आणि मावळजवळ अशी काही गावं कळली. दरम्यान, जाणवलं की मुलांची भाषा वेगळी आणि शिक्षकांची मराठीच भाषा आहे सगळीकडे. आवाजाचा हेल प्रांतीय असला तरी ते पूर्णपणे मराठीतच बोलत आहेत. त्यामुळे शिक्षक-विद्यार्थी अंतर राहणारच. ते मिटवायचं असेल तर शिक्षकांसोबतही काम केलं पाहिजे. मग शिक्षकांसाठी काही श्वासानुसारच्या एक्सरसाइज, एखादा पाठ गोष्टीत कसा रूपांतरित करता येईल, असा आराखडा तयार करून त्याने त्यावर कामाला सुरुवात केली. या ‘गोष्टीमागची गोष्ट’साठी ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’तर्फे मिळालेल्या ‘रंगसेतू’ अभ्यासवृत्तीच्या दरम्यान हे काम अधिकाधिक बहरत गेलं. ‘पहिली ते सातवी या वयोगटातल्या मुलांना गोष्टीरूप शिक्षण द्यायचं निश्चित केलं. सुरुवात केली तेव्हा कोव्हिड इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्हता. आधी शिक्षकांसोबत गोष्टीवर काम करायचं. त्यांना गोष्टीची पुस्तकं द्यायची. ती मुलांना सांगताना रेकॉर्ड करून पाठवायचं म्हणजे त्यात काही बदल हवे असतील तर ते सांगता येतात. शिवाय मुलांचे प्रतिसादही कळतात. एका ठिकाणच्या शिक्षकांसोबत पाच महिने काम करायचो, प्रत्येक महिन्याला एक पुस्तक पाठवायचो. त्याचं रेकॉर्डिंग आल्यावर फीडबॅक द्यायचो. त्यातून शिक्षकांमधले बदल, मुलांच्या प्रतिक्रिया कळत गेल्या. मग पुढच्या ठिकाणचं काम सुरू  होतं. हे सगळं ऑनलाइन करावं लागलं. फायदा असा झाला की वेगवेगळ्या भागांतले अनुभव पटकन माझ्यासमोर येऊ लागले. ऑनलाइन कामामुळे केवळ आवाजापेक्षा मी प्रगटीकरणावरही भर देऊन तशा एक्सरसाइज तयार केल्या. मला मुलांसोबत ऑनलाइन काम करायचंच नव्हतं. ते स्वत: जाऊन करायचं ठरवलं. योग्य ती काळजी, वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक कागदपत्रांनिशी कोव्हिड नसणाऱ्या भागात जायचं ठरवलं,’ असं त्याने सांगितलं.

दरम्यानच्या काळात कल्पेशचे बाबा गेले. मूळचा डोंबिवलीकर कल्पेश गेले सहा महिने कोल्हापूरजवळच्या गावातच राहतो आहे, कारण तिथून अनेक ठिकाणी जाणं सोयीचं आहे. जायच्या ठिकाणच्या ओळखीच्या स्थानिकांशी संवाद साधला. त्यांनी आपापल्या गावात सांगितल्याने फारशी काही अडचण आली नाही. हातात असलेल्या पैशांनी हा प्रकल्प होणं कठीण आहे हे कळत होतं तरी अनेकांच्या प्रोत्साहनामुळे पुढे जायचं बळ मिळत होतं. त्यामुळे मुलांपर्यंत पोहोचता आलं नि काम चालू ठेवता आलं. तसं झालं नसतं तर तो कदाचित नैराश्याच्या गर्तेत गेला असता. या कामामुळे ओळखी होऊन त्याला आणखी कामं मिळाली.

शिक्षकांसाठी काम करायला लागल्यावर त्यांना वाटलं हा लहान मुलगा आम्हाला काय शिकवणार? पण कार्यशाळेचा पहिला दिवस झाल्यावर त्यांनी त्यांच्या या वाटण्याबद्दल प्रांजळपणे दिलगिरी व्यक्त केली. सकारात्मक प्रतिक्रिया दिली. श्वास, आवाजाच्या एक्सरसाइज केल्यानंतर अनेकांच्या शारीरिक तक्रारी बऱ्याच अंशी थांबल्या. मानसिक स्वास्थ्य लाभलं. शिक्षकांनी स्वत:चे प्रयोग करायला सुरुवात केली. कल्पेश सांगतो की, ‘या गोष्टी करताना पटकन निष्कर्ष मिळेल असं नाही, म्हणूनच याला ‘रियाज’ म्हटलं. कारण त्या सतत करत राहणं गरजेचं आहे. काही काळाने बदल होईल हे निश्चित असल्याने तो करत राहणं गरजेचं आहे. त्यासाठी शिक्षकांना वेळापत्रक आखून दिलेलं आहे. एक शिक्षक श्वासाचे व्यायाम मुलांसोबत करतात. कधी आवाजाचे एक्सरसाइजही घेतात. सगळे शिक्षक खूप उत्साही आहेत. त्यांना खूप काही करायचं आहे. काही वयस्कर शिक्षकांना हे उशिरा कळल्याने खूप हळहळ वाटली. तू कितीही मोठा झालास तरी गोष्ट सांगणं सोडू नकोस, हा एका ताईंचा अभिप्राय किंवा दादा, तू म्हातारा होईपर्यंत आमच्याकडे गोष्ट सांगायला ये, ही मुलांची मागणी बरंच काही सांगून जाते.’

‘रंगसेतू’ अभ्यासवृत्तीतील शेवटच्या टप्प्यातलं त्याचं डॉक्युमेंटेशनचं काम सुरू आहे. त्यानंतरही हे काम सुरू  ठेवण्यासाठी अर्थसाहाय्याचा शोध घेणं सुरू आहे. कारण टीम आणि सेटअपसाठी आर्थिक बाजू बरी असणं आवश्यक आहे. सध्याच्या उपक्रमात थिएटर आणि फिरतं ग्रंथालय यांची भर घालून ‘कवय्या’ हा उपक्रम त्याला सुरू  करायचा आहे. ‘कवैया’ या राजस्थानी शब्दाचा अर्थ आहे- आपल्या भागातली गोष्ट दुसरीकडं जाऊन सांगणारे. गावा-गावातल्या वाद्यांचा वापर गोष्टीत केल्याने ते लगेच कनेक्ट होतं. नाटकाला पुढे घेऊन जाण्यासाठी गाणी खूप महत्त्वाची असतात. कल्पेश स्वत: दिमडी, डफ, पेटी वाजवतो. फक्त मराठीसोबत अन्य भाषिकही गाणी वापरली जातात. गोष्टीच्या माध्यमातून वेगळी संस्कृती मुलांपर्यंत पोहोचवायचा त्याचा प्रयत्न आहे. शिवाय लोककथांचाही समावेश यात केला जातो.

टायनी टेल्सच्या तीन वर्षांतल्या प्रयोगांतील निरीक्षणं कल्पेश नोंदवतो. प्रयोगाची सुरुवात ‘रगा रगा रावा’ या सरिता पत्कींनी लिहिलेल्या उलट्या गाण्याने करतो. त्यातली मजा मुलांना कळून ते लगेच स्वत:च्या नावाचा प्रयोग करतात. राजा नागडधुय्या ही गोष्ट मुलांना खूप आवडते. अगदी लोटपोट होतात. माझ्या आईची साडी ही गोष्ट ऐकल्यावर पहिलीतली दोन-तीन मुलं शांत बसली होती. मग त्यांना भरून आलं… नंतर कळलं की, ती आश्रमशाळेत राहात होती आणि आईला भेटली नव्हती. त्यांच्या बॅगेत आईची साडी होती पांघरायला… तेव्हा मला कळलं की आपण त्यांचा विषय त्यांच्यापर्यंत नीट पोहोचवला. मुलांना आवडलं नाही तर तेही स्पष्टपणे सांगतात की, दादा, आज तुझा आवाज जरा कमी पडला का रे?  एकदा तिसरीतल्या शहरी मुलीचा अभिप्राय होता – तुझा कायिक अभिनय मस्त होता, पण वाचिकवर थोडं काम करायला हवं असं वाटतं… अर्थात आतापर्यंतचं प्रोत्साहन आणि प्रतिक्रियांमुळे काम करायला अधिक हुरूप येतो. आता आम्ही मुलांसाठीचा रेडिओ किंवा यूट्यूबवर काही करता येईल का याचा विचार करतो आहोत. तो ऑडिओ पालक आणि पाल्य एकत्र ऐकून नंतर काही अ‍ॅक्टिव्हिटी करतील, असं डोक्यात असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं तो सांगतो. कल्पेश आणि त्याच्या टीमला त्यांच्या पुढील उपक्रमांसाठी अनेक शुभेच्छा.

viva@expressindia.com