शाहरुख खानचा ‘फॅन’ चित्रपट आल्यानंतर ‘फॅन’मंडळींना उधाण आलं. सचिनच्या एका ‘जबरा फॅन’नं त्याच्या वाढदिवसानिमित्त बनवलेलं व्हिडीओ साँगही तसंच इन्स्टंट हिट झालंय. अभिषेक साटमच्या फॅनहूडची ही कहाणी..
‘मै तेरा हाय रे जबरा.. फॅन हो गया’, असं म्हणत #फॅन.. असा हॅशटॅग सध्या इतका वापरला जातो की, विचारता सोय नाही. खेळाडू, अभिनेते, लेखक, संगीतकार, गायक यांची फॅनमंडळी आपापल्या ‘दैवतां’चे बॅनर मिरवत, डीपी स्टेटस ठेवत, पूजा करत, टॅटू मिरवत असतात आणि त्यांच्या छायाचित्रांचा, सहय़ांचा संग्रह करून ही सारी फॅन मंडळी आपला खजिना वाढवत ‘फॅन’पणा गाजवत असतात. अशीच काहीशी फॅनगिरी गेले काही दिवस ‘यूटय़ूब’वर गाजत आहे. अभिषेक नंदकिशोर नीलम साटम, हे या सचिन फॅनचं नाव. सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने (२४ एप्रिलला) त्याला शुभेच्छा देण्यासाठी अभिषेक आणि त्याच्या मित्रांनी त्याचा हा ‘आयला फॅन..’ असं म्हणत अभिषेकमधला कट्टर फॅन फॅक्टर नेटकऱ्यांच्या समोर ठेवलाय. या मित्रमंडळींनी एक व्हिडीओ साँग तयार केलंय आणि तेच सध्या गाजतंय.
अभिषेक लहानपणापासून सचिनचा फॅन. त्याची छोटीशी खोली सचिनच्या फोटोंनी भरलेली. आपली फॅनस्टोरी ‘व्हिवा’बरोबर शेअर करताना अभिषेक म्हणाला, ‘‘हे माझं सचिन तेंडुलकरबद्दलचं वेड वयाच्या सहा-सात वर्षांपासूनचं आहे. वयाच्या विविध टप्प्यांवर अपेक्षेपेक्षाही जास्त प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या ‘आपल्या’ सचिनला मी माझा आदर्शच मानतो. म्हणूनच सचिनने आपल्याला दिलेल्या अनेक क्षणांचा मी संग्रह करायला सुरुवात केली. दिवसाला सहा पेपर घरी यायचे, त्यातली कात्रणं कापून उरलेली रद्दी विकून जे पैसे यायचे त्यातून इतर पुस्तकं आणि साप्ताहिकं मी विकत घेऊ लागलो. गंमत म्हणजे मुंबईतल्या कानाकोपऱ्यातले पुस्तक विक्रेते आणि रद्दीवाले असा माझा नवा मित्रपरिवार हा संग्रह करताना मला भेटला. सचिनशी निगडित काही नवं बाजारात आलं, की ही मंडळी आजही न विसरता मला फोन करतात.’’
अभिषेकच्या संग्रहात केवळ सचिनसंदर्भातली कात्रणं आणि फोटोच नाही, तर इतर अनेक गोष्टी आहेत. या संग्रहात १५ वर्षांपासूनच्या वर्तमानपत्रातील लेख, ३० हून अधिक पुस्तकं, २०० हून जास्त साप्ताहिकं, मासिकं आहेत. यात तीस हजारांहून अधिक छायाचित्रं, पंधरा हजारांहून अधिक लेख आहेत. सचिनचे फोटो असणारे बॉलपेन, कोलाचे टिन अशा वस्तूही या संग्रहात आहेत. सचिनची स्वाक्षरी असणारी एक सोन्याच्या मुलाम्याची बॅटही अभिषेककडे आहे.
अभिषेक सांगतो, ‘‘सचिनचं ते बॅट उचलून आभाळाकडे पाहत अभिवादन करणं, ऐटीत पिचवर येणं मला फार भावतं. आयुष्य कधी कोणतं वळण घेईल याचा काही नेम नसतो, हे मला १४ एप्रिल २०१६ ला गवसलं. मला ताज लँड्स एण्ड हॉटेलमध्ये एका कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळाली आणि त्याहीपेक्षा खूप जवळून सचिन तेंडुलकरला पाहता आलं. त्या ठिकाणी माझ्या कॅमेराच्या लेन्सनेही सचिनला त्यात कैद केलं. सचिनशी प्रत्यक्ष गळाभेट घेण्याची माझी इच्छा मात्र अजूनही अपूर्णच आहे.’’ सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी हे असं व्हिडीओ साँग ‘आयला फॅन’ बनवण्याची भारी संकल्पना मला व माझ्या मित्रांना सुचली. ही संकल्पना सरस होती. गुरुप्रसाद जाधवचं लेखन, पराग सावंत व अभी करंगुटकर, गुरू यांची सगळी संकल्पना, गुरू आणि अभीचं दिग्दर्शन, परागचं छायाचित्रण, अशी व्हिडीओ बनवण्यासाठी माझ्या मित्रांची मोलाची मदत झाली. त्याला साथ लाभली प्रथमेश अवसरे आणि संकल्प नलावडेच्या कॅलिग्राफीची.. असं अभिषेक कृतज्ञतापूर्वक सांगतो. या व्हिडीओच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा ‘सचिनमय’ झालो होतो. त्यातच ‘चेरी ऑन द टॉप’ म्हणजे सचिनकडून मला मिळालेली अनोखी भेट. लालबागचे प्रसिद्ध मूर्तिकार रत्नाकर कांबळी यांचा मुलगा साईश कांबळी याने आपल्या कामानिमित्ताने सचिनला माझ्या संग्रहाबद्दल सांगितलं आणि माझ्या संग्रहाचे फोटो दाखवले. सचिनकडून माझ्या नावासह त्याची स्वाक्षरी असलेली बॅट मला भेट मिळाली. आय लव माय फॅनहूड.. मीच आहे ‘आयला फॅन’.

व्हिडीओ

Businessman pushes man off terrace of five-star hotel
..आणि व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन ढकलून दिलं, सीसीटीव्हीत कैद झाली घटना
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?