गायत्री हसबनीस

आज जगभरात बहुतांश ठिकाणी एक पाऊल पुढे.. या अर्थाने ‘स्ट्रीट मॉल्स’ सगळीकडे पसरले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने शहरातील आणि शहराबाहेरील लोकांना सोयीचे असणारे स्ट्रीट मॉल्स आणि तिथले शॉपिंग हे जगभरात लोकप्रिय आहे. आपल्या देशाची आर्थिक गणितं वेगळी, वातावरण भिन्न, जीवनमूल्यं आणि जीवनशैलीही वेगळी. त्यातून भारतात मॉल, मल्टिप्लेक्समधील शॉपिंग आणि स्ट्रीट शॉपिंग करण्याची पद्धत वेगवेगळी आहे, तिन्ही ठिकाणची मानसिकताही वेगळी आहे. फॅशन स्टोअर्स आणि ऑनलाइन शॉपिंग ही संकल्पना अस्तित्वात येईपर्यंत भारतीयांनी स्ट्रीट शॉपिंगलाच जवळ केलं होतं. स्ट्रीट शॉपिंगचा फं डाच अजूनही लोकल आणि सोशल आहे. त्यामुळे ही संकल्पना सर्वात जास्त प्रमाणात ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. त्याचं कारण इथे आपण बार्गेनिंग करू शकतो, हव्या त्या गोष्टी जोडीने घेऊ  शकतो, सर्व तऱ्हेचे प्रकार आपल्याला मिळतात. त्यामुळे सर्वसामान्य ते उच्चभ्रू मंडळींसाठीही हा एक सोपा मार्ग आणि क्वचितप्रसंगी विरंगुळा देणाराही ठरला आहे. या स्ट्रीट शॉपिंगमुळे पुढे स्ट्रीट फॅशन लोकप्रिय होत गेली, त्यातून स्ट्रीट मॉल्स उभे राहिले. स्ट्रीट फॅशनमधील ट्रेण्ड्स, बदल लक्षात घ्यायचे तर स्ट्रीट शॉपिंगच्या इतिहासात डोकावायलाच हवं.

सगळीकडे हल्ली आठवडाभर शॉपिंग, विन्डो शॉपिंग, स्ट्रीट शॉपिंगची लगबग ही घडय़ाळाच्या काटय़ावर सतत धावतच असते. भारतीय बाजारहाट संकल्पनेत आठवडी बाजार ही संकल्पना रूढ होती. स्ट्रीट शॉपिंग हे पाश्चात्त्य लोकांकडून आल्यानंतरच लोकप्रिय झाले. त्यातून शॉपिंग ही प्रक्रिया अशी आहे की जी एका विशिष्ट पद्धतीने आणि चातुर्याने करावी लागते. आणि त्यात आपण सगळेच एक्स्पर्ट आहोत. हाऊसवेअर, आऊटवेअर आणि नानाविध अ‍ॅक्सेसरीजची पर्वणी ही सगळीकडेच पाहायला मिळते. जगभरात या स्ट्रीट किंवा लोकल फॅशनचा एक वेगळा परीघ आहे आणि त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जेव्हा स्ट्रीट शॉपिंग ही संकल्पना आली तेव्हा ती एकतर कपडय़ांपुरतीच आणि तेही घरात-कामाच्या ठिकाणी वापरण्यासाठी आणि शहरातल्या शहरात फिरण्यासाठीच्या कपडे खरेदीपुरतीच मर्यादित होती. पाश्चात्त्य देशात तर स्ट्रीटवर मिळणारी भांडीकुंडी, फळं-भाज्या, कपडेलत्ते उशा-अभ्रे, खेळणी, फर्निचर, औषधं यांना ‘मार्केट’ संबोधलं जात नसे. त्यांच्यासाठी रस्त्यावर मिळणारी कोणतीही वस्तू मग ती लक्झरीयस असू दे, दैनंदिन जीवनातील उपयुक्त वस्तू असू दे.. हा प्रकार स्ट्रीट शॉपिंगमध्येच मोडत होता. मोठमोठे करोडो रुपयांचे मॉल, शॉपिंग सेंटर्स या गोष्टी पर्यटन आणि त्या शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या क्षेत्राच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण होत्या. मात्र त्याचा विकास बऱ्याच उशिराने झाला.

आपल्याकडे स्ट्रीट शॉपिंग ही एकाअर्थी पारंपरिक आणि दुसरीकडे आधुनिकही आहे. बाहेरील देशात शॉपिंग हे रूटिन मानलं जातं. त्यांचं अर्ध्याहून अधिक आयुष्य हे शॉपिंगशीच जोडलं गेलं आहे. आपल्याकडेही शॉपिंग आता काही अंशी रूटीन होत चाललं आहे. त्यातही ‘युज अ‍ॅण्ड थ्रो’चा फंडा आल्याने तर शॉपिंगचे प्रमाण जास्त वाढले आहे. पहिल्यांदा जेव्हा स्ट्रीट शॉपिंग सुरू झालं, तेव्हा त्याचं स्वरूप हे अगदी साधं होतं. त्यानंतर त्याला ग्लॅमरचा साज चढला. अगदी तंबूतल्या विक्रेत्याचं रूपांतर छोटय़ा आर्के ड्समध्ये झालं. परदेशात पूर्वी खूप देशांमध्ये दगडी बांधकाम आणि तशा प्राचीन इमारती, त्यांची वास्तुरचना लक्षात घेता इमारतीच्या खालच्या भागात मोठे, भक्कम खांब असायचे. याच खांबांच्या आडोशाने स्ट्रीट शॉपिंगची दुनिया आकाराला आली. त्या लहानशा जागेत अनेक विक्रेते तत्सम फॅशनेबल आणि उपयोगी वस्तू विकायला बसायचे. हळूहळू त्या जागीच छोटी दुकाने आणि मग मोठी दुकाने उभी राहिली. दुकानातल्या इंटिरिअरपासून नावाच्या स्टाईलिश होìडगपर्यंत सगळं ग्लॅमरस होत गेलं. रात्री भरगच्च लाइट्स आणि डेकोरेशनमुळे लुकलुकणारे ‘स्ट्रीट’ अधिकच लखलखते झाले. पन्नास आणि साठच्या दशकातील अमेरिकेच्या रस्त्यांवरचा सेट-अप चित्रपटातून अथवा छायाचित्रातून पाहिला तर तेव्हाची ही स्ट्रीट शॉपिंगची झगमगती दुनिया पाहायला मिळते.

लंडनमधील ‘कार्नाबाय स्ट्रीट’ हे जगातील सर्वात मोठे शॉपिंग स्ट्रीट आहे. याचा इतिहास हा ६० च्या दशकापासून सुरू होतो. आजही शॉपिंगचे हे स्ट्रीट विश्व तसेच उभे आहे. इथूनच खरं तर स्ट्रीट शॉपिंगला एक लक्झरीयस, महागडं आणि वाढीव महत्त्व प्राप्त झालं. जपान, चीन, सिंगापूर, मलेशिया वगैरे दक्षिण आशियाई भाग पाहिला तर त्या लोकांना स्ट्रीट शॉपिंगचं महत्त्व केव्हाच कळलं होतं हे लक्षात येईल. त्यामुळे त्या देशात आजही गेलात तरी स्ट्रीट शॉपिंग म्हणजे एक पर्वणी असते. जगभरात कपडे खरेदीला इतर गोष्टींपेक्षा अधिक महत्त्व आहे आणि अशा शॉपिंग स्ट्रीटवर जागोजागी कपडय़ांची खरेदी एक नंबर अशीच असते. किंबहुना, हाय फॅशन ब्रॅण्ड स्टोअरची फॅशन ही पहिल्यांदा स्ट्रीटवरच पाहायला मिळते, असं म्हटलं जातं.स्ट्रीट शॉपिंग ही अधिक लोकप्रिय व्हावी, त्याला आर्थिक उत्पन्नाची जोड आणि पर्यटकांची ओळख मिळवून देण्यात दक्षिण-पूर्व अशियाई देशांचा वाटा अधिक आहे. त्यांनी सर्वप्रथम स्ट्रीट फॅशनला लक्झरीयस लुक देत बाजार कें द्र म्हणून विकसित केले. जगभरात अशा शॉपिंग स्ट्रीटची नावं अधिक आहेत, परंतु त्यातून सिंगापूरमध्ये ‘ऑर्चड रोड’, जपानमध्ये ‘हाराजाकू ’, मिलानमध्ये ‘विया मॉनटे-नापोलेओने’, न्यूयॉर्क मध्ये ‘फिफ्थ अ‍ॅवेन्यू’, ‘ब्रॉडवे’, ‘टाइम्स स्क्वेअर’ आणि रोममध्ये ‘विया डेल कोर्सो’ अशी काही महत्त्वाची आणि सुबत्तापूर्ण शॉपिंग स्ट्रीट्स सेंटर विकसित झाली. त्यांना त्या त्या देशातील फॅशन डिस्ट्रिक्ट्स या नावाने ओळखलं जातं. इकडचे कपडे हे सर्वाधिक महाग असतात. या फॅशन डिस्ट्रिक्ट्सकडे अजून पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षित करण्यासाठी येथे म्युझियम, सिनेमागृह, कॅफे टेरिआ, पब्स,क्लब्स, फूड पार्लर्स अशा सर्व गोष्टींचे पर्याय उभे करण्यात आले.

शॉपिंग ही गोष्ट अधिक कंटाळवाणी न होता, तो एक आनंददायी अनुभव असावा, असा मुख्य उद्देश यामागे आहे. आज तरुणच नव्हे तर कुठल्याही वयाची हौशी मंडळी आपल्या परीने फॅशनच्या बाबतीत संपूर्णपणे सुखी आणि समाधानी असण्यासाठी धडपडताना दिसतात. स्ट्रीट शॉपिंग ही गोष्ट लोकांना अधिक जवळ आणते. त्यांच्यात संवादाची, आवडीनिवडीची देवाणघेवाण होते. त्यामुळे आपल्या रूपाचं कौतुक सर्वसामान्य लोकांना त्यांच्या कपडय़ांतून आणि खरेदीमुळे करावंसं वाटतं. म्हणूनच शॉपिंगचं स्वरूप अधिकच व्यापक होतं गेलं. यातून होम शॉपिंग, नेबरहूड शॉपिंग, स्टोअर्स आणि हब्ज असे वेगवेगळे पर्याय ग्राहकांच्या बाजारात म्हणजेच कन्झ्युमर मार्के टमध्ये स्थान निर्माण करते झाले. होम शॉपिंग म्हणजे सगळ्या जीवनाश्यक वस्तू यात आल्या. नेबरहूड शॉपिंगमुळे जीवनातील छोटय़ा-मोठय़ा आरामदायी सुखांमध्ये भर म्हणून ब्यूटिपार्लर, आइसक्रीम शॉप, कॅ फे, गिफ्ट शॉप इत्यादी गोष्टी रुजू लागल्या. त्यातून विविध ओकेजन, सणासुदीच्या दिवसात या स्ट्रीट शॉपिंगला रंग चढत गेला. स्ट्रीट शॉपिंग, तिथली खरेदी-विक्री, त्याचा जागतिक विस्तार, त्यांची कारणे आणि जीवनाची खरीखुरी

वाटचाल म्हणून त्याची माहिती जाणून घेतली. आता स्ट्रीट फॅशन, स्ट्रीट लुक, स्ट्रीट स्टाइल्स जगभरात कशा पद्धतीने लोकप्रिय होत गेले, याची माहिती आपल्या सदरातील पुढच्या लेखात करून घेऊ!

viva@expressindia.com