01 October 2020

News Flash

क्षण एक पुरे!  तेजसचा सॅफ्रन प्रवास

एकदा निर्णय घेतल्यानंतर त्यावर फेरविचार करण्याची तिला गरजच वाटली नाही.

वेदवती चिपळूणकर

प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण असे येतात, की त्यात आपण दोन टोकं गाठतो. आशा-निराशा, कधी सकारात्मकता तर कधी पार नकारार्थी विचार. या दोन्हींतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला पुरतो एखादा क्षण. आपल्याला स्वत:च किंवा कुणाच्या मदतीने त्या क्षणाच्या भोवऱ्यातून बाहेर पडायचं असतं. काय असते ही प्रक्रिया तावून सुलाखून बाहेर पडण्याची? आज विविध क्षेत्रांत भरारी घेतलेल्या मान्यवरांच्या आयुष्यातील हा एक क्षण कसा होता..

सी.ए.ची परीक्षा कधीच सोपी नव्हती. त्याचे सगळे टप्पे पार करत सीए होणं म्हणजे खायचं काम नव्हतं. मात्र तिने ते पूर्ण केलं आणि चांगल्या बँकेत नोकरीही सुरू केली. दहा वर्ष तिने तिथे काम केलं. स्वत:चं एक स्थान पक्कं केलं, स्वत:ची ओळख निर्माण केली. प्रगतीची एक एक पायरी ती चढत होती. मात्र एका क्षणी तिने निर्णय बदलला आणि सरळ नोकरी सोडून दिली. स्वत:चा व्यवसाय करण्याची तिची इच्छा होती. त्यासाठी काही कल्पनाही तिच्या डोक्यात होत्या. त्यांना अजून हवा तसा आकार आलेला नव्हता; पण एक थीम तिच्या डोक्यात होती आणि त्याच्या दिशेने तिने पहिलं पाऊल उचललं. कधीकाळी युरोपला फिरायला गेली असताना तिथे पाहिलेली ‘बेड-अ‍ॅण्ड-ब्रेकफास्ट रूम्स’ ही कल्पना तिला आवडली होती आणि असं काही तरी भारतातही असावं अशी तिची इच्छा होती. नोकरीतून बाहेर पडून तिने स्वत:ची एक फर्म सुरू केली आणि हॉटेल्स किंवा हॉलिडे होम्सचं ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग करायला सुरुवात केली. मात्र भविष्यात एक प्रचंड मोठा व्यवसाय आपली वाट बघतो आहे याची तिला त्या वेळी कल्पनाही नव्हती.

गोष्टीची सुरुवात एखाद्या चित्रपटासारखी वाटत असली तरी तो चित्रपट नाही आणि चित्रपटाची नायिकाही काल्पनिक नाही. अशी रिस्क घेऊन व्यवसायात आलेली ती म्हणजे ‘सॅफ्रॉन स्टेज’ची फाऊंडर आणि सर्वेसर्वा ‘तेजस परुळेकर’. स्टार्टअप ही कल्पना आता आपल्यात रुळलेली आहे. सामान्यत: स्टार्टअप सुरू करणारी मंडळी ही वयाच्या अलीकडच्या टप्प्यावर ही ‘रिस्क’ घेत असतात. मात्र तेजसने ही रिस्क घ्यायचा निर्णय घेतला तेव्हा तिच्यावर आधीच खूप जबाबदाऱ्या होत्या. आपलं आयुष्य पुढे जात असतं तशा आपल्यावरच्या जबाबदाऱ्या वाढत जातात याचीही तिला कल्पना होती. दहा वर्षांच्या कामातून तयार झालेली एक इमेज होती, गुडविल होतं. आयुष्याला स्थैर्य मिळालेलं होतं; पण या सगळ्याच्या वरचढ असलेली गोष्ट म्हणजे आत्मविश्वास आणि नव्याने आयुष्याकडे बघण्याची इच्छा!

हॉटेल शोधणं, बुकिंग करणं किंवा कॅन्सलेशन करणं, हॉटेल्सची माहिती देणं अशा सेवा ज्या सध्या ऑनलाइन वेबसाइट्स देतात त्या सेवा तेजसच्या या फर्मने द्यायला सुरुवात केली होती. हॉलिडे होम्सचं ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग करताना तिच्या हे लक्षात आलं, की आपण फक्त बुकिंग्ज करून देण्याची व्यवस्था करू शकतो, मात्र तिथे मिळणाऱ्या सव्‍‌र्हिसवर आपलं नियंत्रण नाही. आम्ही दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात असलेली स्थिती यात तफावत असू शकते; पण यावर काही ठाम उपाय त्या क्षणी तरी मला दिसत नव्हता, असं तेजस सांगते. एक दिवस एका माणसाचा तिला फोन आला. माथेरानमध्ये त्या माणसाचा एक बंगला होता आणि त्याची काळजी घेणं त्याला स्वत:ला शक्य नव्हतं. या टर्निग पॉइंटबद्दल तेजस म्हणते, ‘‘आम्ही त्याला सांगितलं की, आम्ही फक्त लिस्टिंग करतो; पण एकदा बंगला बघा तरी म्हणून त्याने आग्रह केला आणि मी बंगला बघायला गेले. तो बंगला बघणं हीच माझ्यासाठी ‘आहा मोमेंट’ होती. तो बंगला बघितल्यावर असं वाटलं की, हे आपण करायला पाहिजे, याला नाही म्हणता कामा नये. तो बंगला बघून मला स्वत:ला जो आनंद झाला तसाच आनंद आपण इतरांना दिला पाहिजे, असं माझ्या मनात आलं आणि तो बंगला बघणं हाच माझ्यासाठी निर्णायक क्षण ठरला.’’

एकदा निर्णय घेतल्यानंतर त्यावर फेरविचार करण्याची तिला गरजच वाटली नाही. एका रात्रीत तिने लिस्टिंग-मार्केटिंगचा व्यवसाय बंद केला आणि या हॉलिडे होम्सची तयारी सुरू केली. शून्यातून सुरुवात करावी लागणार होती याची मला पूर्ण कल्पना होती. हॉस्पिटॅलिटी, ब्रॅण्डिंग, क्युरेशन अशा अनेक गोष्टी होत्या ज्यांची या व्यवसायाला गरज होती आणि त्या मला पहिल्यापासून शिकाव्या लागणार होत्या, असं तिने सांगितलं; पण त्या एका क्षणी घेतलेल्या निर्णयापासून मागे हटणं तिला मान्य नव्हतं. त्यामुळे ज्या उत्साहात तिने तो निर्णय घेतला त्याच उत्साहात तिने या सगळ्या गोष्टी शिकायला सुरुवात केली. दोनेक वर्षांपूर्वी आपल्या डोक्यात आलेल्या कल्पनेला असं प्रत्यक्ष साकारायची संधी ती अजिबात सोडणार नव्हती. तेजस म्हणते, ‘‘घरच्यांचा पाठिंबा होता आणि माझी प्रबळ इच्छाही होती. मात्र कधीकधी सेल्फ डाऊट हा प्रकार उद्भवायचाच! जबाबदारीच्या टप्प्यावर आपण नवीन रिस्क घेतो आहोत. मिळवलेली स्टेबिलिटी सोडून चूक केली का, नोकरी तर सोडलीय, पण या नवीन गोष्टी शिकून घेऊन प्रत्यक्षात आणणं जमेल का, अशा अनेक शंकांनी मनात घर केलं होतं; पण या सगळ्यापेक्षा माझी करियरच्या सेकंड इनिंगची इच्छा मोठी ठरली आणि हे विचार आले तसेच निघूनही गेले.’’ हा क्षण गोंधळात टाकणारा होता. मात्र त्यामुळे धीर न सोडता जे ठरवलंय त्यावर ठाम राहून तिने ‘सॅफ्रॉन स्टेज’ या हॉलिडे होम्सची सुरुवात केली आणि याच स्पिरिटच्या जोरावर आज ती तिच्या व्यवसायात देशभरातल्या ९० हॉलिडे होम्ससह घट्ट पाय रोवून उभी आहे.

स्टार्टअपमध्ये किंवा नव्याने व्यवसायात उतरल्यावर आपली टीम लहान असताना आपल्याला प्रयोग करून बघायची संधी असते. नवे असल्याने फारसं नाव झालेलं नसतं आणि म्हणून चुका करायलाही याच काळात परवडू शकतं. वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळे सल्ले मिळत असतात, त्यातले काही उपयोगी ठरतात, तर काही फसतात; मात्र प्रत्येक गोष्ट ‘करून बघण्याची’ आपल्याला त्या काळात मुभा असते, असं ती सांगते. एकदा टीम वाढली, नाव मोठं झालं, की मग चुका, प्रयोग या सगळ्याचे परिणामही मोठे होतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कोणत्याही कल्पनेला ‘नाही’ न म्हणता ओपन माइंडने सगळ्या गोष्टी ऐकून घेण्याची आणि स्वीकारायची तयारी असावी लागते, हेच तिने या क्षणांमधून अनुभवलंय आणि इतरांनाही ती याच सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्याचा यशमंत्रही देते. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला नव्याने सुरुवात करतो किंवा आयुष्यात पहिल्यांदाच एखादी गोष्ट करत असतो तेव्हा मनात धाकधूक ही असतेच. त्या वेळी ‘इंग्लिश विंग्लिश’मधलं अमिताभ बच्चन यांचं साधंसं वाक्य आठवतं, ‘पहली बार सिर्फ एक ही बार आती है और वो बहुत खास होती है’!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2019 4:31 am

Web Title: success story of co founder of saffron stays tejas parulekar
Next Stories
1 टेकजागर : तंत्रजागराला या!
2 फिट-नट : चिन्मय उद्गीरकर
3 जगाच्या पाटीवर : कालसुसंगत अर्थशास्त्र
Just Now!
X