रश्मि वारंग

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
Keep the onion in in hot water before chopping it
Video : कोमट पाण्यात कांदा ठेवा अन् पाहा कमाल! भन्नाट किचन टिप्स वापरून बघा
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?

नवनवी उत्पादने ब्रॅण्ड म्हणून समोर आणणं जितकं कठीण, तितकंच रोजच्या वापरातील एखाद्या गोष्टीचं ब्रॅण्डिंगही कठीण. ती गोष्ट इतकी सहज असते की नव्याने काय बरं सांगून हे उत्पादन विकता येईल याचा विचार करावा लागतो. असाच अगदी सहजपणे निर्माण झालेला आणि तितकाच लोकप्रिय झालेला ब्रॅण्ड इनो. एक पाचक मिश्रण म्हणून इनो जगभर लोकप्रिय आहे. त्याच ब्रॅण्डची ही कहाणी!

पचनाचे आजार जगभरात सारखेच आहेत. अति खाल्ल्यामुळे, पित्तामुळे जळजळ होणे आणि त्यासाठी घरगुती उपाय केले जाणं सहज आहे. पण त्या उपायाचं मार्केटिंग ज्याला सुचलं तो जे. सी. इनो या ब्रॉण्डचा कर्ता.

इंग्लंडमधील जेम्स क्रोसली इनो एका औषधगृहात कामाला होता. त्याच भागातील सुप्रसिद्ध डॉक्टर डेनिस एम्बल्टन लोकांना सोडियम बायकाबरेनेट आणि सायट्रिक अ‍ॅसिड यांच्या वापरासह एक पाचक मिश्रण अपचनावर उपाय म्हणून देत असे. इनोने हाच फॉम्र्युला एम्बल्टनकडून अवगत केला. १८५२ मध्ये त्याने स्वत:चं दुकान थाटलं. तो इंग्लंडमधील असा भाग होता जिथे समुद्र सान्निध्यामुळे खलाशांची खूप ये-जा असे. याचा जे. सी. इनोच्या व्यवसायाला फायदा झाला. खलाशी मंडळी खूप दिवसांनी बंदरात उतरली की, त्यांना काय खाऊ  न् काय नको होऊन जाई. परिणामी पित्त, अपचनाचे त्रास होत. अशा वेळी इनोचं हे वैशिष्टय़पूर्ण मिश्रण अगदी काही क्षणात या पोटाच्या तक्रारींपासून त्यांची सुटका करत असे. खलाशी मंडळींसाठी इनोचं हे मिश्रण म्हणजे वरदान होतं वरदान! बोटीतून प्रवासाला निघताना सोबत न्यायच्या अत्यावश्यक सामानात इनोच्या मिश्रणाचा समावेश अगदी आवर्जून होऊ  लागला आणि खलाशांच्या मार्फत विविध बंदरात आणि जगभरातील शहरात इनोचा प्रसार झाला.

यापलीकडे इनोला आपलं उत्पादन विकण्यासाठी जाहिरातीचा आधार घ्यावा लागलाच. इनोची जुनी जाहिरात त्या काळातील कोणत्याही औषधाच्या जाहिरातीसारखीच होती. इनो प्यायल्याचे फायदे सांगताना त्यात पोटदुखी, जळजळ, ताप, डायरिया अशा अनेक बऱ्या होणाऱ्या व न होणाऱ्या सगळ्या आजारांचा उल्लेख होता.

हळूहळू इंग्लंडसोबत अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, स्पेन अशा विविध देशांत इनो पोहोचलं. १९३८ पर्यंत बऱ्याच विस्तारलेल्या इनो फ्रूट सॉल्टचा ताबा बीकेम ग्रुपकडे आला आणि त्यानंतर ग्लॅक्सोस्मिथक्लाईनकडे. आज याच कंपनीमार्फत एक झटपट पाचक म्हणून जगभरात इनो पोहोचलं आहे. पण या उत्पादनाची सर्वात मोठी बाजारपेठ भारतच आहे.

भारतात ब्रिटिशांमुळे इनो फार आधीपासून प्रचलित होतं. पूर्वीची ती वैशिष्टय़पूर्ण काचेची बाटली जाऊन तिची जागा सॅशेने घेतली आणि इनो अधिक सहज उपलब्ध होत गेलं. अनेकांच्या फ्रिजमध्ये किंवा पाकिटात इनोचं एखादं पाकीट आढळणं खूपच सहज आहे. ‘काम सुरू फक्त ६ सेकंदात’ या इनोमंत्राने भारतीयांना दिलासा दिला तर जगभरात ‘प्लॉप प्लॉप फिझ फिझ ओह व्हॉट अ रिलीज इट इज’ असं म्हणत अनेकांचे अडकलेले अस्वस्थ हुंकार मोकळे केले.

हा १५० वर्षे जुना असा हा ब्रॅण्ड नवनव्या स्वादासह आजही लोकप्रिय आहे. त्याला टक्कर देणारे अनेक आले पण इनोचा विश्वास कमावणं कुणाला जमलं नाही. अर्थात इनो काही औषध नाही. पण तात्पुरता उपाय म्हणून त्यावर भिस्त ठेवता येते.

अनेकविध कारणांनी होणारी शारीरिक अस्वस्थता, अपचन यावर ‘आधी इनो घेऊन बघ’ असा सल्ला मिळतोच. ग्लासभर पाण्यामध्ये इनो मिसळल्यावर निर्माण होणारे बुडबुडे, फेसाळपणा, आवाज यातून नकळत एक उत्फुल्ल अवस्था तयार होते. तो तसाच फसफसलेला ग्लास ओठी लावताना त्या बुडबुडय़ांची अवखळ दांडगाई क्वचित नाक, ओठांवर तुषार उडवते. ही प्रक्रियाच इतक्या गडबडगुंत्यातून जाते की, ग्लासात ओतलं रे ओतलं म्हणताना कधीकधी ते बुडबुडय़ांचं साम्राज्य पोटात जाऊन राज्य करू लागतं ते कळतंच नाही. काही मिनिटांतच ‘आम्ही पोहोचलो’चा हुंकार ओठावर येतो आणि पोटातली अस्वस्थता लयाला जाते. ही स्वस्थता हेच इनोचं यश आणि म्हणूनच सहा सेकंदाचा हा जादुगार जितका सर्वसामान्य तितकाच खास!

viva@expressindia.com