News Flash

तुम्ही कुठल्या ‘पक्षात’?

डॉ. नरेंद्र दाभोलकर आपल्यातून जाऊन आता महिना होत आला. त्यांच्या विचारांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये आणि ‘आम्ही सारे दाभोलकर’ म्हणणाऱ्यांमध्ये तरुणाई मोठय़ा प्रमाणावर होती.

| September 20, 2013 01:06 am

डॉ. नरेंद्र दाभोलकर आपल्यातून जाऊन आता महिना होत आला. त्यांच्या विचारांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये आणि ‘आम्ही सारे दाभोलकर’ म्हणणाऱ्यांमध्ये तरुणाई मोठय़ा प्रमाणावर होती. गणपती विसर्जनाच्या घाटावर निर्माल्य, प्लॅस्टिक बाजूला करा असं आवाहन करणाऱ्यांतही तरुणाई होती. गणपतीपुढे बेभान नाचणारी, तल्लीन होऊन ढोल वाजवणारी आणि मोरयाचा जयघोष करणारीही तरुणाई होती आणि आता गणपती विसर्जनानंतर सुरू होणाऱ्या पितृ पंधरवडय़ात ‘नको उगाच शॉपिंग आता’ असं म्हणणारीही तीच तरुणाई आहे. आजच्या मेट्रो जनरेशनच्या मते श्रद्धा-अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय? देव म्हणजे नक्की काय?
याविषयी तरुणांना बोलतं केलं असता, संमिश्र भावना व्यक्त झाल्या. बरीचशी तरुणाई देवाबाबतच्या विचारांबाबत कन्फ्युज्ड वाटली. काहींच्या मते धर्माच्या नावावर पसे कमावण्यासाठी या रूढी नि परंपरा निर्माण केल्यात. त्यामुळे ते वडीलधाऱ्यांच्या नावे विविध सामाजिक संस्थांना देणगी स्वरूपात मदत करतात. अजूनही अनेक धार्मिक रूढी आणि परंपरांचा पगडा आपल्यावर आहे. आज समाज पुढारलाय, विज्ञान-तंत्रज्ञानानं मोठी झेप घेतलेय. काळानुरूप काही बदल होऊ लागले आहेत. तरीही शुभ-अशुभ, भावना-ताíककता,  श्रद्धा-अंधश्रद्धा यांचं अस्तित्व जाणवण्याजोगं आहे, त्यातली सीमारेषा पुसटशी आहे. याविषयीच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया.
सौरभ वैशंपायन
आताच्या काळात प्रॅक्टिकल होणं गरजेचं आहे, संस्कृती धरून ठेवण्यापेक्षा. त्या काळात निसर्गाजवळ जाण्याच्या उद्देशानं आपल्या बऱ्याच सणांचं उपयोजन झालं होतं. ते फॉलो करावं म्हणून त्याला देवधर्माची जोड दिली गेली होती. त्यानुसार वागायला लोकांना वेळही होता. आजच्या तरुणाईच्या हातात एवढा वेळ कुठं? पितृ पंधरवडा फॉलो करण्यापेक्षा वडीलधाऱ्यांचा जिवंतपणी करावा. त्यांच्या आजारपणात त्यांची मन:पूर्वक काळजी घ्यावी. त्यांना वेळ द्यावा. वडीलधाऱ्यांच्या मागं त्यांनी सुरू केलेले चांगले उपक्रम सुरूच ठेवावेत.
मंगेश दिवेकर
पहिला मोबाइल घेताना मोबाइल घ्यायची जाम क्रेझ होती. कधी एकदा तो घेतोय, असं झालं होतं. घरच्यांनी पितृ पंधरवडय़ात मोबाइल घेऊ नको असं परोपरीनं सांगूनही मी तो हट्टानं घेतला. पण फारसा न वापरता तो हरवलादेखील. त्यामुळं हे दिवस अशुभ आहेत, अशी माझी समजूत झाली. त्यामुळं आता या काळात महत्त्वाच्या गोष्टी करणं मी टाळतोच.
 अर्चिता लिमये
माझा वाढदिवस पितृ पंधरवडय़ात येतो. वर्षभरात श्राद्धादी प्रथा केल्या नाहीत तर ते या काळात करतात, एवढंच मला माहीत आहे. या काळात एखादी गोष्ट अशुभ झाली तर तो योगायोग समजावा. त्यात शुभ-अशुभ नाही. कुणाला याविषयी माहीतच नसेल तर त्यांचं डेली रुटीन नेहमीप्रमाणं सुरूच असतं. इतर दिवसांसारखेच हेही दिवस. त्यात मला काही या काळात वाईट अनुभव आलेला नाही. मी हे काही फॉलो करत नाही.
किमया नागराणे
पितृ पंधरवडा म्हणजे काय? तर आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याचा पंधरवडा. याच काळात त्यांचं स्मरण का करावं? इतर काळात आपण केलेलं स्मरण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही का? या काळात आपल्या मृत पूर्वजांना आवडणारं भोजन करून त्यांच्या नावे केलेल्या पानावर ठेवून काकस्पर्श झाल्यावर त्यांच्यापर्यंत ते पोहोचले, असा समज आपण आजही करून घेतो. त्यापेक्षा अन्नाअभावी मृत्युमुखी पडणाऱ्या आदिवासी पाडय़ांतील बालकांना किंवा त्यांच्या मातांना हेच भोजन पूर्वजांच्या नावानं दिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरील तृप्त भाव नि उमटलेलं हसू आपल्याला नक्कीच समाधान देईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 1:06 am

Web Title: superstition or anti superstition
Next Stories
1 फॅशन पॅशन : रंगांचा विभ्रम
2 विष्णूज् मेन्यू कार्ड : मकापुराण
3 खाऊचा कट्टा : स्वस्त आणि मस्त
Just Now!
X