एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

शब्दांच्या मागे त्यांचा शोध घेत जाणं ही एक आनंददायी गोष्ट आहे. शब्दांच्या अर्थाच्या बाबतीत अनेक जण तसं करतातही. शब्द, त्याच्या अर्थच्छटा, त्यातून प्रसवणारे विविध अर्थ, मूळ अर्थ या सगळ्याचा आनंदाने शोध घेणारी अनेक मंडळी असतात. उच्चाराचाही प्रवास त्याच दिशेने होऊ लागला की, तीदेखील अशीच मन प्रसन्न करणारी, समाधान देणारी क्रिया होऊन जाते. एखाद्या शब्दाचा उच्चार बिलकूलच माहीत नसणे, माहीत असलेला उच्चार चुकीचा वाटणे वा चुकीचा उच्चार दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात असणे अशी ही सगळी प्रक्रिया असते.आजचा शब्द हा तर अगदी तळागाळापासून हायक्लास क्राऊडपर्यंत सगळे उच्चारतात. ‘त्याचं काय आहे ना? सिस्टीम बेकार आहे’. असा अगदी जवळपास रोज कानी पडणारा मध्यमवर्गीय संवाद असो वा you have to set system असा हायक्लास कॉर्पोरेट सल्ला असो. शब्दाचा वापर फारच सहज असतो. ‘शिस्टिम नाय हो काय! गोंधळ हाय सगळा’ हे वाक्य मंडईपासून स्टेशनपर्यंत व रस्त्यापासून घरापर्यंत कुठेही ऐकू येऊ शकतं. शिस्टिम, सिस्टीम यांच्या पसाऱ्यातून आपल्याला हवा तो उच्चार निवडताना अचूक उच्चार खरं तर असतो – ‘सिस्टम’. पण बहुतांशी कानावर सिस्टीम असाच उच्चार पडतो. अचूक उच्चार ज्ञात नसतो असं बिलकूलच नाही. पण बाकीच्यांच्या मुखी असणारी ‘सिस्टीम’ आपण उगाच का मोडा असा विचार करून आपण चुकीचाच उच्चार रेटून करतो.
आपले वाचक जयंत देशपांडे यांनी या ‘सिस्टीम’विरुद्ध आवाज उठवला असं गमतीने म्हणायला हरकत नाही. खरंच अगदी खास करून कुणी लक्ष वेधल्याशिवाय काही वेळा अशा हातसळीच्या शब्दांकडेही बारीक लक्ष जात नाही.
१७ व्या शतकापासून  French systeme या शब्दापासून system  या शब्दाची निर्मिती झाली आहे. तिथून इंग्रज व अमेरिकन या दोघांनी हा ‘सिस्टम’ शब्द उचलला. दोन्हीकडे उच्चार सारखाच आहे. आजकाल तर हा शब्द इतका आधिक्याने वापरला जातो. एज्युकेशन सिस्टमपासून ते कॉम्प्युटर सिस्टमपर्यंत आणि आपली इंडियन सिस्टम ते शरीराची सिस्टम.. इथपर्यंत असंख्यवेळा आपल्या तोंडी येणाऱ्या या शब्दाचा उच्चार चुकीचा असावा अशी तिळमात्रही शंका येत नाही किंवा आली तरी चार चौघांमुखीचा उच्चार नाकारायची आपण हिंमत करत नाही. यापुढे मात्र आपण किमान याबाबतीत विचार नक्की करू शकतो. एक तर या उच्चारातला हा बदल फारच सूक्ष्म आहे. ‘स्टी’चा ‘स्ट’ करणं तितकंसं अवघड नाही. ‘स्ट’चा उच्चार करताना ‘ट’वर फार जोर देत बसायचं नाही मात्र. करून तर बघू या. तितकंच समाधान मिळावं,  I changed the system.