फॅड डाएटचे प्रयोग करणे धोकादायक असते. सगळे अन्नघटक पोटात गेले नाहीत तर शक्तीहिन वाटणे, डोळ्याभोवती काळी वर्तुळे, चिडचिड अशी लक्षणे दिसू लागतात.
फिटनेसमध्ये संतुलित आहाराचे खूप महत्त्व आहे. पिष्टमय पदार्थ(काबरेहायड्रेट्स), स्निग्ध पदार्थ (फॅट्स), प्रथिने (प्रोटिन्स), क्षार (मिनरल्स) आणि जीवनसत्त्व (व्हिटॅमिन्स) हे अन्नाचे सर्वच्या सर्व पाच घटक आहारात असले म्हणजे तो संतुलित आहार झाला. वजन कमी करणे या एका उद्देशाने अनेक मुली आहार घेतात. तो संतुलित असतोच असे नाही. आजकाल संतुलित आहारापेक्षाही फॅड डाएटचे प्रमाण वाढले आहे. अनेक तरुण मुले अशा फॅड डाएटच्या आहारी जातात. म्हणजे कुणी फक्त कच्चा भाज्या आणि फळांवर राहतो तर कुणी आहारातून काबरेहाटड्रेट्स पूर्णत वगळतो आणि हाय प्रोटिनस फूड घेत राहतो. अशा फॅड डाएट्समुळे आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतो.
संतुलित आहार घेतला नाही, तर शक्तीहिन वाटणे, डोळ्याभोवती काळी वर्तुळे, चिडचिड अशी लक्षणे दिसू लागतात. वयाच्या १८ वर्षांपर्यंत सर्वसामान्यपणे वाढ होत असते. १८ वर्षांच्या आत असे फॅड डाएटचे प्रयोग करणे तर फार धोकादायक असते. कारण अशाप्रकारे फॅड डाएटमुळे नैसर्गिक वाढ खुंटू शकते. तरुणांमधल्या खाण्याच्या सवयी हेसुद्धा अशी अपुरी वाढ होण्याचे कारण आहे.
सर्व अन्नघटक पोटात जाण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने रोजच्या जेवणात काही ठराविक गोष्टींचा समावेश केलाच पाहिजे.

काय खाल?
पोळी- चपाती किंवा भाकरी, पालेभाजी, फळभाजी, फळे आणि फॅट्स यांचा समावेश जेवणात असला पाहिजे. आपल्या आहारात ६० टक्के भाग पिष्टमय पदार्थ, २५ टक्के प्रथिने आणि १५ टक्के फॅट्स असले पाहिजेत.

काय टाळाल?
जंक फूड, चीज, अति तेलकट पदार्थ, पाश्चिमात्य पदार्थातील फास्ट फूड (पिझ्झा, बर्गर, फ्राईड चिकन) आणि भारतीय फास्ट फूड म्हणजे पावभाजी शक्यतो टाळायला हवी. याशिवाय अतिरेकी प्रमाणात गोड खाणे, मिठाई हेही टाळावे.

सेलिब्रिटींचा आहार
पर्सनल ट्रेनर म्हणून मी अनेक सेलिब्रिटींची फिटनेससाठीची मेहनत जवळून बघत असते. ते आपल्या फिटनेससाठी, चांगले दिसण्यासाठी आणि आरोग्यासाठी बरीच मेहनत घेतात. पथ्य पाळतात. काहींना त्यासाठी आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल करावे लागतात तर काहींना आपले रुटीन बदलावे लागते. दररोजच्या आयुष्यात वर्कआऊटला अग्रक्रम द्यावा लागतो. त्यांना या गोष्टी अगदी आवर्जून कराव्याच लागतात. मी एका अभिनेत्रीची पर्सनल ट्रेनर म्हणून काम करत होते. तिच्याबरोबर बाजारात जाऊन काय घ्यावे, ते कसे बघून घ्यावे, लो फॅट्स म्हणजे काय? फूड प्रॉडक्टवरची लेबल्स आणि त्याचा अर्थ हे सगळे समजावून सांगितले. अशा प्रकारे तिने आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी जाणीव  तुम्ही शो बिझनेसमध्ये असाल तर इतक्या सावधपणाने तुम्हाला आपल्या खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागते.
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक टॉपचे अभिनेते आणि अभिनेत्री सेटवर असतानासुद्धा घरचा डबा आणणे पसंत करतात. एका प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर मी काम करीत होते तेव्हा तिला घरचे जेवण डब्यामध्ये आणणे फारसे रुचायचे नाही. तिच्यासाठी मी खरोखर घरचे जेवण एकदा घेऊन गेले आणि नंतर तिला कळले की, घरचा डबासुद्धा स्वादीष्ट आणि आरोग्यपूर्ण असू शकतो. लंचसाठी काय खावे म्हणजे दिवसभर उत्साह राहील हेही तिला सांगितले.
अभिनेत्यांसाठी तर फिटनेसची रोजची टारगेट ठरलेली असतात. ती पूर्ण करण्यासाठी नेमून दिलेले खाणे आणि न चुकता व्यायाम हे करावेच लागते. त्यांना पडद्यावर पघताना आपण खूप कौतुकाने बघतो आणि अगदी प्रभावित होतो. पण त्यामागे, त्या सुंदर दिसण्यामागे कठोर मेहनत आणि निश्चय असतो हे आपल्याला दिसत नाही.

क्विक टिप्स
ऋतू कुठलाही असला, तरी त्वचेची नित्यनेमानं काळजी घेणं आवश्यक आहे. त्वचेच्या प्रकारानुसार त्याची काळजी घ्यावी. पावसाळ्यातही भरपूर पाणी पिणं आणि थंड पाण्यानं चेहरा धुणं हेच सुंदर त्वचेमागचं रहस्य असू शकतं.
कोरडय़ा त्वचेसाठी : कोरडी त्वचा असणाऱ्यांनी पावसाळ्यातही त्वचेला मॉइश्चरायजर लावलं पाहिजे. विशेषत दिवसभर एअर कंडिशनरमध्ये बसून ज्या काम करतात,  त्यांची त्वचा या सीझनमध्येही ड्राय राहते. बाहेर एवढा दमटपणा असतानाही त्वचा कोरडी राहण्याचं ते मुख्य कारण आहे. ठराविक वेळाने दिवसातून ३ वेळा तरी हात -पाय आणि चेहऱ्याला मॉइश्चराईज करणं आवश्यक आहे. कोरडी त्वचा असणाऱ्यांनी भरपूर पाणी प्यावं. तहान लागली नाही, तरी दिवसातून सात ते आठ ग्लास पाणी प्यायलाच पाहिजे. साबणाचा वापर शक्यतो टाळावा.
तेलकट त्वचेसाठी : तेलकट त्वचा आहे, अशांनी या सीझनमध्ये जास्त काळजी घ्यायची आवश्यकता असतचे. त्वचेवरचं जास्तीचं तेल घालवण्यासाठी थंड पाण्यानं चेहरा धुणं आवश्यक असतं. दिवसातून तीन वेळा तरी चेहरा थंड पाण्यानं धुवावा. अशा मुलींनी ऑइल बेस्ड मेक-अप करणं टाळावं. ऑइली त्वचेमुळे पिंपल्स येतात, त्वचेवरच्या तेलकटपणामुळे बाहेरची धूळ चिकटून ब्लॅकहेड्स येतात. चेहरा स्वच्छ पाण्यानं धुतल्यानं हे प्रमाण कमी होऊ शकतं. ऑईली स्कीन आहे, अशांनी कुठलंही नैसर्गिक घटक असलेलं स्क्रब वापरावं.