लेडी गागापासून अनेक सेलिब्रिटीज तिने बनवलेल्या हॅटचे फॅन आहेत. लंडन, पॅरिसचे फॅशन शो तिच्या डिझाइन्सनं गाजलेत. तिची डिझाइन्स एखाद्या अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंगसारखी असतात. डिझाईन्समागची ‘ती’.. एक ठेंगणी ठुसकी मूर्ती.. शिल्पा चव्हाण अशा मराठमोळ्या नावाची. हेअर स्टाइलिंग आणि फॅशनच्या क्षेत्रात आज ‘लिटिल शिल्पा’ नावानं ती सर्वपरिचित आहे. एका वेगळ्या क्षेत्रातल्या या मनस्वी कलाकाराशी बातचीत.
फॅशनचं सगळं जग ट्रेंड्स, फॅड्स यांच्यावर चालत असलं, तरी हे सगळे या लिटिल शिल्पाच्या खिजगणतीतही नसतात, आणि ते ती अभिमानानं सांगते. ‘दर सहा महिन्यांनी डिझायनर्स नवं कलेक्शन काढत असतात, त्यामागे अभ्यास असतो. अर्थात तो आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असल्यामुळे डिझायनर्सच्या कलेक्शनमध्ये कमीअधिक फरकाने साधम्र्य आढळू शकतं. त्यामुळे बाजारातसुद्धा विशिष्ट काळासाठी तो दिसून येतो. हे बाजाराचं चक्र आहे हे मान्य; पण माझ्या मते, फॅशनला कोणत्याही प्रकारची बंधने किंवा नियम नसतात. एखाद्याच्या क्रिएटिव्ह कौशल्यावर त्याच्या कलेक्शनची भिस्त अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही नक्की कधी काय लोकांसमोर सादर कराल, हे केवळ तुमच्यावर अवलंबून असतं,’ ती सांगते.
चित्रपट, साहित्य यांना ज्याप्रमाणे ग्लोबल हे बिरुद लागले आहे, त्याचप्रमाणे फॅशनच्या बाबतीतही देशोदेशीच्या सीमा पुसल्या जाऊन त्याकडे ‘ग्लोबल फॅशन’ म्हणून पाहण्याकडे लोकांनी सुरुवात केल्याचं ती आता सांगते. ‘डिझायनर्स किंवा त्यांच्या कलेक्शनबद्दल तुम्ही बोलता तेव्हा अमुक एका देशाचा डिझायनर म्हणून त्याकडे पाहत नाही, तर केवळ एक स्वतंत्र विचारांचा डिझायनर म्हणून त्याचं मूल्यमापन केलं जातं. देश-भाषा-संस्कृती ओलांडून तुमच्या कलेला लोक जास्त महत्त्व देतात. त्यामुळे भारताचे डिझायनर्स काय करत आहेत, जगभरात त्यांना कसं बघितलं जातं याचा विचार या टप्प्यावर करणं गरजेचं नाही,’ असं शिल्पाचं म्हणणं आहे. या लिटिल शिल्पाच्या उंचीला पोचायचा प्रयत्न करणं येरागबाळ्याचं काम नाही, हे तिनं तिच्या कामातूनच सिद्ध केलंय.