01 June 2020

News Flash

क्षण एक पुरे! : तंदूर चहाचा जनक

 हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचा विद्यार्थी असल्याने अमोलला कस्टमर्स चॉइसचा योग्य अंदाज होता.

(संग्रहित छायाचित्र)

वेदवती चिपळूणकर

शेतकरी कुटुंबातला एक तरुण विज्ञान शाखेचा अभ्यास करतो आणि ध्यास मात्र आपण काही तरी सर्जनशील करावं याचा घेतो. वेगळं काही करण्याची ही धडपड, जिद्द यामुळे आज बारामतीचा एक तरुण अमोल राजदेव हा यशस्वी उद्योजक बनला आहे..

बारामतीतल्या शेतकरी कुटुंबातला तो मुलगा.. मुलाने इंजिनीअरिंग करावं आणि कुठे तरी नोकरी करावी असं घरच्यांचं साधं स्वप्न, पण त्याला स्वत:चा व्यवसायच करायची जबरदस्त इच्छा! इंजिनीअरिंग करायचं म्हणून दहावीनंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. मात्र त्याला स्वत:ची आवड माहिती होती. हुशारी असली तरी इंजिनीअरिंगमध्ये आपलं काहीच होऊ  शकणार नाही हे त्याला पक्कं ठाऊक होतं. त्यामुळे बीएस्सी करण्याचा मध्यममार्ग त्याने काढला. त्याच वेळी स्वत:ची आवड म्हणून त्याने संध्याकाळच्या कॉलेजला जाऊन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचंही शिक्षण घेतलं. अनेक चढउतार बघत असतानाही नवीन काही तरी देण्याची त्याची जिद्द कायम होती. याच जिद्दीतून निर्माण झालेल्या ‘तंदूर चहा’च्या लोकप्रियतेने अमोल राजदेव हे नावही प्रसिद्ध केलं आहे.

घरातल्या कोणी कधीच व्यवसाय केलेला नाही आणि कोणी त्यातलं शिक्षणही घेतलेलं नाही. अशा पार्श्वभूमीवर अमोलची व्यवसायाची हौस कोणाच्याही सहज पचनी पडणारी नव्हती. त्यामुळे त्याने काही काळ नोकरीही केली, मात्र ती नोकरीसुद्धा बीएस्सीच्या आधारावर न करता हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या माध्यमातून त्याने शोधली. त्या अनुभवाबद्दल अमोल सांगतो, ‘एका हॉटेलमध्ये मी हाऊसकीपिंगच्या सेक्शनमध्ये काही काळ नोकरी केली. अगदी लादीवर मॉप फिरवण्यापासून सगळी कामं केली. मात्र त्यात काहीच मजा येत नव्हती आणि ना त्यात काही भविष्य दिसत होतं. कोणाचं तरी ऐकून काम करायचं आणि त्यातही काहीच क्रिएटिव्ह नाही. नाईट शिफ्ट आणि कमी पगार या दोन्ही गोष्टींची जोड त्याला होतीच. काहीच माझ्या मनासारखं नसल्यामुळे मी ती नोकरी सोडली. नंतर मी दोन ठिकाणी मॉलमध्येही फ्लोअर मॅनेजर आणि ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम केलं. तिथे पगार चांगला मिळायला लागला होता, मात्र माझी व्यवसायाची इच्छा मागेच राहत होती. काही काळाने मी नोकरी पूर्णत: सोडून दिली आणि स्वत:चा बिझनेस म्हणजे नेमकं काय करायचं याचं प्लॅनिंग सुरू केलं.’

हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचा विद्यार्थी असल्याने अमोलला कस्टमर्स चॉइसचा योग्य अंदाज होता. शिक्षणाच्या वेळीच पुण्यात आलेल्या अमोलने पुण्याच्याच आसपास स्वत:चं हॉटेल सुरू करायचं ठरवलं. कुठे काय आवडेल याचा अंदाज घेत एका ऑफिस बिल्डिंगच्या समोर घरगुती आणि साधं दिसणारं हॉटेल सुरू करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याबद्दल बोलताना अमोल म्हणतो, ‘चकाचक ऑफिसमधून बाहेर पडलेल्या माणसाला घरासारखं जिव्हाळ्याचं वाटेल असं काही तरी करणं मला जास्त योग्य वाटलं. त्यामागे दोन कारणं, एक म्हणजे जो माणूस त्याच वातावरणातून बाहेर पडलाय तो परत त्याच वातावरणात का जाईल? आणि दुसरं म्हणजे अशी पॉश हॉटेल्स अनेक असतीलच की! म्हणून मला काही तरी वेगळं करायचं होतं’. साधं घरगुती हॉटेल सुरू करणं हे आमच्या खर्चाच्या दृष्टीनेही प्रॅक्टिकल होतं. यात माझ्यासोबत एक पार्टनरही होता. हॉटेलचं नाव आम्ही ‘बसा’ असं ठेवलं. पूर्ण थाळी एवढाच मेनू ठरवला. या हॉटेलमध्ये काम करण्यासाठी माणसं तर हवी होती, मात्र कोणतीही एजन्सी वगैरे आम्हाला परवडणारी नव्हती. मात्र काही तरी नवीन सुरू होतं आहे म्हटल्यावर समोरूनच आमच्याकडे अनेकांनी काम देण्याबद्दल विचारणा केली, असं अमोल सांगतो. समोरूनच विचारणा होत-होत आम्हाला सगळे लोक मिळाले. आमचं हॉटेल खूप व्यवस्थित चालायला लागलं. आम्ही घेतलेल्या मेहनतीला यश दिसायला लागलं होतं, असं तो म्हणतो.

अमोलचं सुरुवातीला व्यवस्थित चालणारं हॉटेल दोन वर्षांनी मात्र जरा मागे पडलं. त्यातून अपेक्षित नफा मिळेना, नावीन्य नसल्यामुळे व्यवसायही कमी झालेला आणि पार्टनरशीही थोडय़ा चकमकी झडलेल्या होत्या. या अनुभवाने आणि त्यावरून घेतलेल्या निर्णयाने अमोलला व्यवसायात सेटबॅक नक्कीच बसला. मात्र स्वत:च्या चुकांमधून शिकणाऱ्या अमोलने पुढचा निर्णय घेतेवेळी या अनुभवाचा भक्कम आधार घेतला. याबद्दल अमोल म्हणतो, ‘दोन वर्ष हॉटेल व्यवस्थित चालल्यामुळे मी आता नवीन काही तरी करून बघू या याच्या मागे लागलो आणि असलेल्या हॉटेलकडे माझं दुर्लक्ष व्हायला लागलं. माझं दुर्लक्ष होतंय म्हटल्यावर पार्टनरनेही तेच करायला सुरुवात केली. आम्हाला एकमेकांची गरज नाही, अशा भ्रमात आम्ही दोघेही आपापल्या नवीन कामाच्या मागे लागलो आणि हॉटेलकडे दोघांचंही लक्ष राहिलं नाही’. अर्थात, ही झालेली चूक नंतर लक्षात आली, पण तोवर व्यवसायाचं व्हायचं ते नुकसान झालेलं होतं. पुढच्या वेळी असं नव्याच्या मागे वाहवत जायचं नाही हा मोठा धडा मी या फसलेल्या निर्णयातून घेतला, असं अमोल विश्वासाने सांगतो.

या सगळ्या घडामोडींमध्ये तंदूर चहाचा शोध कसा लागला, याबद्दल अमोल सांगतो, ‘बहिणीच्या लग्नात गावी गेलो असताना मला सर्दी झाली. रात्री शेकोटीसमोर बसलेलो असताना आजीने हळद-दूध देते म्हटलं आणि शेकोटीतून मडकं  बाहेर काढलं. तिने शेकोटीत मडकं ठेवलेलं हे तोपर्यंत आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं. तिने हळद आणि दूध त्या गरम मडक्यात ओतल्यावर ते उकळलं आणि जो सुंदर वास आला त्याने आम्ही चकित झालो.’ शेकोटीतून काढलेल्या त्या हळद-दुधाची चवही नेहमीपेक्षा खूप वेगळी आणि छान होती. हे आपण आपल्या हॉटेलमध्ये विकावं असं मला तेव्हाच वाटलं. घरच्यांनी मला जरासं वेडय़ातच काढलं. कारण त्यांच्यासाठी ही वर्षांनुवर्ष चालत आलेली पद्धत होती. पण मी ठाम होतो की हे पुण्यात खूप चालेल आणि लोकांना खूप आवडेल, असं सांगणाऱ्या अमोलने मग बाबांच्या सल्ल्याने हळद-दूध विकण्याबरोबरच चहाही अशा पद्धतीने करून विकावा असा निर्णय घेतला. मात्र अनेकदा निर्णय घेणं सोपं असलं तरी त्यामागची प्रक्रियाही तितकीच वेळखाऊ असते. ‘आमचे कित्येक महिने चहासाठी योग्य मसाले, योग्य चवीसाठी योग्य चहापत्ती, असं सगळं शोधण्यात आणि काही मसाले तर चक्क बनवण्यात गेले’, असं अमोल सांगतो. त्यानंतर एक तंदूर विकत घेतला आणि माझ्या तेव्हा सुरू असलेल्या हॉटेलच्या बाहेर ठेवून तिथेच हा तंदूर चहा करायचं ठरवलं. साधारण हिशोब करून वीस रुपये किमतीवर आम्ही शिक्कामोर्तब केलं. त्या वेळी आम्हाला ही कल्पना नव्हती की आम्ही हा चहा शंभर रुपयाला विकला असता तरी लोकांनी तो घेतला असता. मात्र तो प्रकार हिट झाल्यावर आम्हालाही त्याची खरी व्हॅल्यू लक्षात आली, असं तो सांगतो.

अमोल राजदेवच्या ‘तंदूर चहा’च्या देशभर सध्या बावीस फ्रँचायझी आहेत. ‘chew- chew’ या नावाने त्याने स्वत:चा पानाचा ब्रॅण्डही एस्टॅब्लिश केला आहे. केवळ ग्राहकांच्या आवडीचा विचार केल्यानेच हे यश मिळालं आहे, असा अमोलचा ठाम विश्वास आहे. आणि या विश्वासावरच त्याची वाटचाल सुरू आहे.

आपल्या चुकांमधून शिकणं यासारखा दुसरा शहाणपणा नाही. पॉलिसी डिसिजन अनेकदा चुकू शकतात. मात्र त्यातून आपलं काम बंद करण्याच्या निर्णयाप्रत कधीच येऊ  नये. याउलट बिझनेसमध्ये आपल्या ग्राहकांना किंवा क्लाएंट्सना काय हवं आहे आणि काय आवडेल हे सर्वात महत्त्वाचं असून त्याचा विचार झाला पाहिजे.

– अमोल राजदेव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2019 3:58 am

Web Title: tandoor tea entrepreneurs amol rajdev abn 97
Next Stories
1 टेकजागर : कोसळणारा भारत संचार मनोरा..
2 जगाच्या पाटीवर : संशोधनाचं श्रेयस विचारमंथन
3 डिझायनर मंत्रा : तिकीट टू बॉलीवूड नीतू भारद्वाज
Just Now!
X