News Flash

खाबुगिरी : सात्त्विक ‘आस्वाद’!

वरणभाताची मूद, त्यावर पळीतून पडणारं तूप, तळलेली कुर्डई, पिठलं भाकरी, भरलं वांगं हे अस्सल महाराष्ट्रीय पदार्थ अनेकदा जिव्हेची क्षुधा शांत करतात.

| August 29, 2014 01:03 am

वरणभाताची मूद, त्यावर पळीतून पडणारं तूप, तळलेली कुर्डई, पिठलं भाकरी, भरलं वांगं हे अस्सल महाराष्ट्रीय पदार्थ अनेकदा जिव्हेची क्षुधा शांत करतात. खाबू मोशायचा कल तसा चमचमीत खाण्याकडेच.. पण कधीकधी त्या वरणभाताचा गंध खाबू मोशायला आकर्षित करतो! दादर पश्चिमेकडे सेनाभवनच्या चौकात असलेल्या आस्वाद या अस्सल महाराष्ट्रीय खाद्यपदार्थाच्या हॉटेलमध्ये खाबू मोशाय याच गंधामुळे प्रवेश करता झाला..
वातावरणात एकंदरीतच व्रतवैकल्यांचा दरवळ सुरू झाला आहे. आता हा दरवळ भाद्रपद, अश्विन-कार्तिक असे तीन महिने सुरूच राहणार आहे. गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, दिवाळी असे एकामागोमाग एक सण सुरू होणार असल्याने खाबू मोशायही कपाळी चंदनाचा टिळा लावून खाबुगिरीसाठी निघाला. मंगळागौरीचे व्रत, सोळा सोमवारांचे व्रत, श्रावणी शुक्रवारचे व्रत, अशा या व्रतवैकल्यांच्या काळात खाबू मोशायच्या खाबुगिरीला सात्त्विकतेचे कोंब फुटले नसते, तरच नवल. तसा खाबू मोशाय श्रावण वगैरे पाळणाऱ्यातला नाही. पण श्रावणामुळे मिळणाऱ्या खाद्यपदार्थाचा भोक्ता मात्र नक्कीच आहे. (इथे खरंतर भोक्ताऐवजी ‘भुक्ता’ म्हणायलाही हरकत नाही. पण ते एक असो!)
पण असे सात्त्विक पदार्थ घरी खाण्याचे सोडून हाटेलात काय खायचे, असा प्रश्न साधारण कोणालाही पडू शकतो. मराठमोळ्या पदार्थाची हीच गोची झाली आहे, असं खाबू मोशायचं स्पष्ट मत आहे. एकतर एकजात सगळे मराठी पदार्थ अतिपरिचयामुळे अवज्ञेला गेले आहेत. त्यामुळे आमच्या घरच्या पोह्य़ांपुढे हाटेलातले पोहे झक्क मारतात किंवा वरणभात म्हणजे घरचाच हवा, हाटेलातल्या वरणाला ती चव येत नाही, वगैरे वाक्ये रूढ झाली आहेत. पण घरी कोणताही रगाडा न घालता हॉटेलात जाऊन आपल्या आवडीचे सगळे मराठमोळे पदार्थ त्याच चवीत खायला मिळाले, तर खाबू मोशाय जास्त खूश असतो. शेवटी काय, पदार्थ हातात आयता पडल्याशी मतलब!
तर अशीच दादर पश्चिमेकडील आस्वाद या हॉटेलची महाराष्ट्रीय पदार्थाच्या बाबतीतली कीर्ती ऐकून खाबू मोशाय त्या हॉटेलात रवाना झाला. मराठी माणूस आरसपानी असतो, हे त्याच्यापेक्षा त्याने चालवलेल्या हॉटेलांकडे बघून कळतं. अस्सल मराठमोळ्या हॉटेलांवर एक छाप आणि कळकटपणा असतो. पण आस्वाद हे त्याला अपवाद आहे, हे पहिलेच सांगावं लागेल. आत पाऊल ठेवणाऱ्या कोणालाही प्रसन्न वाटावं, अशी या हॉटेलची सजावट आहे.
खाबू मोशाय अस्सल मराठमोळे पदार्थ खायचे, असं ठरवून हॉटेलात गेला खरा, पण तिथे असलेल्या ‘सात्त्विकी थाळी’ या नव्या पदार्थाकडे पाहून त्याचे डोळे चमकले. त्याने तातडीने ही थाळी मागवली. त्याच्या समोर आलेल्या थाळीत उकडलेल्या भाज्या, कडधान्ये, दही आणि डाळिंबाचे दाणे टाकून केलेला रायता, खाकरा, व्हेजिटेबल स्टॉक आणि फळे होती. साधारणपणे हे खाद्य रुग्णांना खायला देतात. त्यामुळे काहीसा हिरमोड होऊन खाबू मोशायने व्हेजिटेबल स्टॉकची चव घेतली आणि खाबू मोशायचा भ्रमनिरास झाला. हे स्टॉक अप्रतिम आहे. त्याशिवाय दही रायताही खूपच छान. फक्त उकडलेल्या भाज्याही चवीला एवढय़ा छान असू शकतात, हे कळण्यासाठी खाबू मोशायला दादर स्थानकाबाहेरील गर्दी तुडवावी लागली.
त्यानंतर खाबू मोशायने पिठलं-भाजी-भाकरी मागवली. पिठलं-भाकरी हा पदार्थ खाबू मोशायच्या ऑलटाइम फेव्हरिट लिस्टमध्ये आहे. पण इथे पिठल्याबरोबर आलेल्या भरल्या वांग्याने खाबू मोशायला खूश केलं. इथे भाकरीही ज्वारी आणि तांदूळ अशा दोन देतात. पिठलं-भाकरी यांच्यासह थोडं लोणी आणि मिरचीचा ठेचा.. वा! पाहूनच खाबू मोशायच्या तोंडाला पाणी सुटलं आणि खाल्ल्यानंतर खाबू मोशाय सर्वस्व विसरला.
या सर्वानंतर खाबू मोशायने वरणभात मागवला. केळीच्या पानाच्या आकाराच्या ताटलीत भाताच्या दोन मुदी, त्यांवर पिवळेजर्द वरण, लिंबाची फोड, तुपाची बारीक धार असा सगळा थाट पाहून खाबू मोशायच्या तोंडून केवळ ‘गोविंद गोपाळ, हे दोघे बंधू.. जेवीत होते वरणभात लिंबू’ हा श्लोकच बाहेर पडला. हॉटेलमधला वरणभातही कधीकधी आईच्या किंवा आज्जीच्या हातच्या वरणाची आठवण करून देतो. पण त्यासाठी हे मानणारं मोठं मन मात्र हवं. खाबू मोशाय या बाबतीत तरी कद्रु नाही. खाण्याच्या दुनियेत पोटाइतकेच मन मोठे असणे गरजेचे आहे, हे खाबू मोशाय जाणतो. बरं, हे सगळेच पदार्थ १०० रुपयांच्या आतमधीलच आहेत. त्यामुळे बजेटचाही प्रश्न नाही. अस्सल मराठमोळ्या पदार्थाची चव घ्यायची असेल, तर दादर पश्चिमेला जाऊन ‘आस्वाद’ घ्यायलाच हवा!

कसे जाल
दादर स्टेशनवरून पश्चिमेला बाहेर पडलात की, प्लाझा उजवीकडे ठेवून सरळ चालत निघा. डाव्या बाजूला सेनाभवनची इमारत दिसली की त्यासमोर असलेल्या पेट्रोलपंपाच्या बाजूलाच ‘आस्वाद’ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:03 am

Web Title: taste of authentic maharashtrian food in aswad hotel
Next Stories
1 क्लिक : गायत्री उमर्ये,
2 व्हिवा दिवा : श्रद्धा नांदूर
3 इन अ रिलेशनशिप
Just Now!
X