|| केतन वैद्य

नमस्कार. मी मूळचा गुहागरचा. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीमधून दहावी झालो. स.प. महाविद्यालयातून बारावी सायन्स केलं. तर ‘वेल्लोर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून बी. टेक.(मेकॅनिकल इंजिनीअर – एनर्जी इंजिनीअरिंग) केलं. आमच्या शाळेतील व्याख्यानमालेत संतोष गोंधळेकर यांचं जैवइंधनावर व्याख्यान ऐकल्यापासून या कामात रस वाटायला लागला होता. या विषयाची सध्याच्या परिस्थितीत असणारी आत्यंतिक निकड जाणवत होती. आपण आपल्या नैसर्गिक स्रोतांचा वापर करून घेऊ  शकतो, असं वाटत होतं. दरम्यानच्या काळात ऊर्जास्रोतांशी संबंधित काही छोटे अभ्यासक्रम केले. हे सगळं करताना आपल्या शिक्षणाचा देशाला उपयोग व्हायला हवा,  हे डोक्यात होतं. शेवटच्या वर्षांला असताना पुढचे अभ्यासक्रम शोधायला सुरुवात केली आणि युरोपमधील विद्यापीठांत- स्वीडन,  डेन्मार्क,  नेदरलॅण्ड,  जर्मनीत अर्ज करायला सुरुवात केली. माझं विद्यापीठ वगळून सगळ्या ठिकाणांहून अर्ज स्वीकारल्याचं कळलं होतं. इथल्या प्रवेशाबद्दल सगळ्यात शेवटी कळलं.

घरच्यांनी आम्हा भावंडांच्या शिक्षणासाठी नेहमीच पाठिंबा दिला. माझा मोठा भाऊ  इथेच असतो. अभ्यासक्रमांचा शोध घेण्याचं काम मी स्वत:च केलं. त्यासाठी सिनिअर्सशी संपर्क साधला. या अभ्यासक्रमांच्या शोधात असलेल्या इतर विद्यार्थ्यांशी समाजमाध्यमांद्वारे ओळख करून घेतली, कारण अशा वेळीच आपल्या नेटवर्किंगचा अप्रत्यक्षपणे कस लागतो. दादाची मदत तर होत होतीच. शेवटी माहिती काढली, सल्ला घेतला तरी त्यावर सारासार विचार करून आपल्याला आपला निर्णय ठामपणे घ्यावा लागतो. पदवी घेतल्यावर मी लगेचच पदव्युत्तर शिक्षण घ्यायचा निर्णय घेतला. मात्र शिक्षणाला वयाचा अडसर नसतो, हे म्हटलं जातं ते प्रत्यक्ष अनुभवतो आहे. कारण आमच्या क्लासमध्ये ३ ते ४ वर्षांचा अनुभव गाठीशी असलेले काहीजण शिकत आहेत. पॉवर प्लॅण्टमधल्या कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी असतो. माझ्याकडे अनुभव नाही, पण माझी अभ्यासासाठी अधिकाधिक मेहनत करायची तयारी आहे.

प्रवेशप्रक्रियेबद्दल एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की यूएसएमधली प्रवेशप्रक्रिया आणि अभ्यासक्रमाचं वर्ष लवकर सुरू होतं. तर स्कॅनडेव्हियन कंट्रीजची प्रवेशप्रक्रिया आणि वर्ष हे थोडं त्यानंतर आणि त्याहीनंतर जर्मनीमधील प्रवेशप्रक्रिया-वर्ष सुरू होतं. अशा वेळी पीअर प्रेशर येऊ  शकतं. या प्रक्रियेत आपण अगदी शेवटच्या तारखेपर्यंत थांबून प्रवेश घ्यावा, हे अपेक्षित नसतं. ती चूक माझ्याकडून झाली होती. मला वेटलिस्ट १ दिली गेली. त्या वेळी खूपच ताण आला होता, मात्र घरच्यांनी सतत धीर दिला. मीही मग प्रयत्नांत सातत्य ठेवलं. इथे प्रवेशासाठी दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात पदवीचे गुण, प्रवेशासाठीचा अर्ज आदींवरून पॉइंट्स दिले जातात. एरवी अशा अभ्यासक्रमांना मुलाखत वगैरे घेतली जात नाही, पण माझी वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीत अकॅडमिक आणि नॉनअकॅडमिक अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातात.

शिक्षणासाठी लहानपणापासूनच बाहेरगावी राहिल्यामुळे घरापासून दूर राहणं ही नवीन गोष्ट नव्हती. आता सहा महिन्यांनी नाही, पण वर्षभरानंतर घरी जायला मिळणार आहे, इतकाच काय तो बदल. परदेशातला हा पहिलाच विमानप्रवास होता. मी सगळ्या गोष्टींची माहिती करून घेतली होती आणि लक्षपूर्वक निरीक्षण केलं तर काहीच अवघड वाटत नाही, असं मला वाटतं. विद्यार्थीसंख्या वाढती असल्याने म्युनिकमध्ये राहायला पटकन जागा मिळत नाही. सुरुवातीचे चार-पाच दिवस दादाकडे राहून नंतर माझ्या जागेत राहायला गेलो. इथे आल्यावर काही दिवस सगळ्या गोष्टी रुपयाच्या हिशोबाने गणल्या गेल्याने खूप फरक जाणवायचा.

पॉवर इंजिनीअरिंगचा माझा हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा आहे. तो शिकायला इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या दोन्ही शाखांचे विद्यार्थी येतात. ऐच्छिक विषय घेऊन मुख्य विषयावर लक्ष केंद्रित करता येतं. यामुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यात मूळ संकल्पना सुस्पष्ट होतात. तर आपल्याकडचे बहुतांशी अभ्यासक्रम ठरलेले असतात. अलीकडच्या काळात काही मोजक्याच विद्यापीठांत विषय निवडीचं स्वातंत्र्य असतं. इथे जर्मन भाषाच प्रामुख्याने बोलली जाते. त्यांचा भाषाभिमान प्रकर्षांने जाणवतो. मात्र आमचा अभ्यासक्रम इंग्रजीत असल्याने भाषेचा प्रश्न येत नाही. त्यामुळे अभ्यासक्रमाची माहिती काढताना त्याची भाषा तपासणं आवश्यक असतं. जर्मन भाषेतील व्यावहारिक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी दादाची खूपच मदत झाली. शिवाय गुगल ट्रान्सलेटचा बराच उपयोग झाला. मीही जर्मनमध्ये जुजबी संवाद साधू शकतो. पुण्यात जर्मन भाषेचं एक-दोन कमी कालावधीचं प्रशिक्षण घेतलं होतं. मात्र भारतात जर्मन शिकणं आणि थेट जर्मनीत जर्मन ऐकणं-बोलणं यात जमीनअस्मानाचा फरक आहे. आपण ठरावीक प्रश्नोत्तरांचा साचा शिकतो तर इथे मोठ्ठी शब्दसंपदा पुढय़ात उभी ठाकते. त्यामुळे इथे पुन्हा जर्मन भाषा शिकलो. आमच्या अभ्यासक्रमामध्ये आम्ही दोघं मराठी असून भारतीय विद्यार्थी बरेच आहेत. आधीही बाहेर राहिल्यामुळे ठरावीकच लोकांमध्ये राहायचं नाही, यावर कटाक्ष होता. त्यामुळे मित्रपरिवार वाढला. इथे ब्राझील, मेक्सिको, तैवान, ऑस्ट्रिया, सर्बिया, स्पेन, इजिप्त, पाकिस्तान आदी देशांमधील विद्यार्थी शिकायला येतात. एकमेकांच्या देशांबद्दल, संस्कृती आणि चालू घडामोडींसंबंधी अनेकदा गप्पा होतात. काही वेळा त्यांना चुकीची माहिती मिळते किंवा काही वेळा एकच बाजू समजलेली असते. त्यामुळे त्यांना योग्य ती माहिती सांगावी लागते.

आपल्याकडच्या परीक्षा भरपूर वेळ आणि कॅल्क्युलेटरचा वापर कमी करावा लागणं, अशा असत. त्यामुळे दुसरा कुणी माझ्यापेक्षा वेगाने कॅ ल्क्युलेटर वापरतो आहे तर त्याचा पेपर पूर्ण होईल आणि माझा होणार नाही असं कधी झालं नाही. पण इथे असं होऊ  शकतं. एक-दीड तासाची परीक्षा असते आणि कॅ ल्क्युलेटरचा वापर अधिकाधिक वेळा करावा लागतो. त्यामुळे दुसरा कुणी माझ्यापेक्षा वेगाने कॅ ल्क्युलेटर वापरतो आहे तर तो त्याचा पेपर माझ्याहून अधिक सोडवेल. बहुतांशी हा पेपर पूर्ण होतच नाही. त्यामुळे माहिती असलेले प्रश्न आधी सोडवून घ्यायचे. याआधी कधी अशी सवय नव्हती. जवळपास सगळ्या प्राध्यापकांना खरोखरच शिकवायचं असतं. काहीच प्राध्यापक फक्त स्लाइड्स वाचून दाखवतात. इथे हजेरीचं महत्त्व नाही. तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत तुम्ही पुरेसे जबाबदार आहात, असं गृहीत धरलं जातं. मुळात अनेक प्राध्यापकांचं शिकवणं चांगलं असल्याने त्यांच्या लेक्चर्सना विद्यार्थी येतात.

आपल्याकडे कॅ ण्टीन किंवा मेसची सोय चांगली असते. इथे घरी केलेले पदार्थ स्वस्त पडतात. आईने स्वयंपाक शिकवल्याने भात, भाजी वगैरे पदार्थ करतो. पोळीला पर्याय ब्रेडचा. मुळात मला खायच्या आवडीनिवडी नाहीत. गेल्या सहा महिन्यांत इथली जीवनशैली बऱ्यापैकी अंगवळणी पडली आहे. इतक्या कडाक्याच्या थंडीची अजिबात सवय नव्हती. थंडीत तहान लागत नाही फारशी; पण पाणी पिणं आवश्यक असल्याने मी अ‍ॅपचा वापर केला. मला मुळात व्यायामाची आवड असल्यामुळे आवश्यक तेवढाच आहार घेतला जातो. विद्यापीठामधील जिमला जायला वेळ लागत असल्याने तेवढा वेळ देणं शक्य नव्हतं. त्यामुळे व्यायाम कमी झाला. सुट्टीत ही कसर भरून काढायचं ठरवलं आहे. त्या त्या वेळच्या मागणीनुसार आपल्या ध्येयांचा प्राधान्यक्रम बदलत राहतो, हाही वेळेच्या व्यवस्थापनाचा एक भागच आहे. दिवसभरात काय केलं, याची मनाशी उजळणी करून आपला प्रत्येक दिवस अधिकाधिक प्रॉडक्टिव्ह व्हायला हवा, याची दक्षता घ्यायला इथे आल्यावर शिकलो. इथे राहणं आणि शिक्षण घेणं यावर झालेला खर्च आणि आपण मिळवलेलं ज्ञान या अस्पष्टशा तराजूची पारडी अनेकदा डोळ्यांसमोर येतात. मग खर्चाचा ताळमेळ साधला जातो. नुकत्याच झालेल्या पहिल्या सेमिस्टरच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी जॉब सोडला होता. आता पुन्हा दुसरा जॉब करणार आहे. इथे प्रवासात फार वेळ जातो. मात्र प्रवास करताना पुस्तक वाचणं,  झालेल्या अभ्यासाचा सराव करणं,  जर्मन भाषेचे ऑनलाइन कोर्स ऐकत राहणं आदी गोष्टी करता येतात. आल्प्स पर्वतराजीत हायकिंगला गेलो आहे. शिवाय बर्लिन, कोपेनहेगन, स्टॉकहोम या ठिकाणी फिरलो आहे.

हे विद्यापीठ खूपच मोठं असून वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये अनेक अ‍ॅक्टिव्हिटीज सतत होत असतात. मात्र या अ‍ॅक्टिव्हिटीजची माहिती असावी लागते. अनेकदा ही पत्रकं जर्मनमध्ये असतात. अशा वेळी फेसबुक ग्रूप किंवा मित्रमंडळींकडून ते कळतं. अशा महत्त्वाच्या बाबी एकमेकांना सांगून मदतीचा हात दिल्याने गोष्टी सुकर होतात. शिक्षण संपल्यावर पहिली काही र्वष नोकरी करेन, पण स्थायिक व्हायचा विचार नाही. पीएचडीचा विचार अद्याप केला नाही. ऊर्जेच्या संदर्भातील मनातले प्रश्न, त्यांची मी शोधलेली उत्तरं आणि शिल्लक राहिलेल्या काही शंकांच्या निरसनासाठी लेक्चरनंतर प्राध्यापकांशी चर्चा करतो. अगदी विभागाच्या प्रमुखांशीही मोकळेपणाने बोलू शकतो. या चर्चेमुळे अधिकाधिक संदर्भ मिळतात आणि विचारांना आणखी गती मिळते. इथल्या शिक्षणाचा उपयोग देशासाठी कसा करता येईल,  हे कायम कुठेतरी डोक्यात असतंच. भारताला सध्या ऊर्जेची खूप गरज असून तिचा वापर योग्य पद्धतीने व्हायला हवा. त्यात खारीचा वाटा उचलता येण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे.

कानमंत्र

  • विद्यापीठाची माहिती काढताना व्यवस्थित समजूनउमजून घ्यावी. शिक्षणक्षेत्रात मिळालेल्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न करणं आपल्या हातात आहे.
  • आपल्या ध्येयाकडे आपली वाटचाल ठरवल्याप्रमाणे होते आहे ना, याची पडताळणी स्वत:शीच करायला हवी.

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com