या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

हरयाणाची भूमिका अरोरा आणि अहमदाबादची पूजा मोर दोघीही गेल्यावर्षी व्होगच्या कव्हरवर झळकल्या होत्या. पाश्चिमात्य देशांत फॅशन शोज करणाऱ्या प्रसिध्द भारतीय मॉडेल्समध्ये भूमिका, पूजा आणि नीलम गील या अवघ्या वीस वर्षांच्या तरूणीची गणना होते. 

कपडे, दागिने, चप्पला, फॅशन, फोटोज हे शब्द ऐकले की सहजच आपल्या डोक्यात मॉडेल किंवा मॉडलिंग ही संकल्पना सहजपणे येते. मॉडेल म्हणजे सुंदर, परफेक्ट बॉडी असणारी, परफेक्ट लूक असणारी, उंच, चकचकीत फॅशनेबल तरूणतरुणी आपल्या डोळ्यासमोर येतात. पण ‘लॅक्मे फॅशन’सह अन्य फॅशन शोजवरही नजर टाकली तर मॉडेल्सचीही समीकरणे आता पूर्णपणे बदललेली दिसून येताहेत. गौर वर्ण, बारीक बांधा वगैरे जुन्या चौकटींना फाटा देत देशभरातील दूरगामी खेडय़ातील वेगवेगळ्या रंगरूपाच्या मॉडेल्सना फॅशनविश्वाची दारं जाणीवपूर्वक खुली केली जात आहेत.

फॅशन म्हटलं की जसं कपडे महत्वाचे अगदी तसंच ती परिधान करून तुमच्यासमोर सादर करणारी मॉडेलही तितकीच किंबहून त्यापेक्षा जास्त महत्वाची ठरते. साधारणत: एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी मॉडेलिंग ही संकल्पना रुजू झाली. डिझायनरने बनवलेले कपडे घालून दाखवणे, फोटो काढणे असं करत करत  मॉडेलिंग आणि त्याच बरोबरीने फॅशन फोटोग्राफरचं विश्व मोठं झालं आहे. जशी या संकल्पनेची सुरवात झाली तेव्हापासूनच त्यामध्ये गरजेनुसार अमूलाग्र बदल होण्यास सुरूवात झाली. सुरूवातीच्या काळात गोऱ्या, सुंदर दिसणाऱ्या, उंच, सडपातळ, लांब केस असणाऱ्या तरूणीच मॉडेल म्हणून दिसत होत्या. पण आता मॉडेलिंगची समीकरणे बदली आहे. मॉडेल कशी दिसते यापेक्षा आता जास्त लक्ष मॉडेल स्वत:ला कसं प्रेझेंट करतात हे बघितलं जातं. याबद्दल लॅक्मे फॅशन वीकच्या सिलेक्शन कमिटीमधील लुईस डॉमिंगो सांगतात,‘आम्ही मॉडेल सिलेक्ट करताना इंटरेस्टीग व्यक्तिमत्वाच्या शोधात असतो. मॉडेल म्हणून कॅट वॉक महत्वाचं असतंच. पण तरीही आम्ही मॉडेलच्या फक्त कॅट वॉकवरून त्यांना अजिबात जज करत नाही’. मॉडेलच्या चेहऱ्यापेक्षा आता त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व, त्यांच्यातील इतर कलागुण जास्त महत्वाचे ठरतात. कारण रॅम्पवर वॉक करताना किंवा फॅशनसाठी छायाचित्र काढून घेताना मॉडेलचा अ‍ॅटिय़टय़ुड लक्षात घेतला जातो. जे कपडे, दागिने ते घालतील ते त्यांच्या व्यक्तिमत्वाला सूट झाले पाहिजेत. सध्या फॅशन वर्तुळामध्ये सावळ्या रंगाच्या मॉडेल तुम्हाला सहज दिसतील.

या वर्षीच्या ‘लक्मे फॅशन’मध्ये एक मॉडेल फ्रेश न्यू फेस म्हणून सिलेक्ट झाली आहे. कियारा नावाची ही १८ वर्षीय तरुणी आपल्या भारताला मॉडेलिंग विश्वात रिप्रेझेंट करणार आहे. तिला बघितल्यावर ती मॉडेल आहे असं कोणीही म्हणणार नाही. सामान्य चेहरा असलेली कियारा २०० मॉडेल्समधून सिलेक्ट झाली.  सामान्य चेहरा असूनही तिची एकूण हुशारी, बोलणं-चालणं या सगळ्या कसोटय़ांवर परखून तिची निवड करण्यात आली आहे. कॅ ट वॉक करताना तिचा अ‍ॅटिय़टय़ुड सगळ्यात जास्त भावला, असं सिलेक्शन कमिटीचं मत होतं. कियारा असेल किंवा एमटीव्हीच्या ‘मॉडेल हंट’ स्पर्धेत उपविजेती ठरलेली जानती हजारिका ही आसामी तरूणी असेल हे चेहरे मॉडेलिंगच्या बदलत्या प्रवाहांची बोलकी उदाहरणं आहेत. फक्त सुंदर दिसणारे, परफेक्टा बांधा-चेहऱ्याची ठेवण असलेलेच मॉडेल बनू शकतात अशी गरजच उरलेली नाही. अनेकदा मुलींना स्वत:च्या दिसण्याबद्दल नून्यगंड असतो. अनेकदा गुणवत्ता असूनही भीतीपोटी तरूणी मॉडेलिंगच्या क्षेत्रात यायला बिचकतात, पण आता मुलींनी स्वत:च्या शरीराबद्दल, चेहऱ्याबद्दल न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. सौदर्याच्या व्याख्या या दिवसागिणक बदलत चालल्या असून दिसण्यापलिकडे अनेक गुण विचारात घेतले जातात. त्यामुळे स्वत:चे गुणावगुण ओळखून, ताकद जोखून फॅशन विश्वात येऊ इच्छिणाऱ्या तरूणींनी स्वत:ला बदलायला हवं आहे.

पाश्चात्य देशांमध्ये मॉडेलिंगच्या या रुढ चौकटी कधीच मोडून पडल्या आहेत. तिथे आशिया, आफ्रिकी अशा वेगवेगळ्या खंडातील वेगवेगळ्या चेहऱ्यांना, व्यक्तिमत्वांना मॉडेलिंगच्या प्रवाहात त्यांनी आधीच सामील करून घेतलंय. आपल्याकडे हा बदल व्हायला अंमळ उशीरच झाला आहे. पण उशीराने का होईना बदल घडतायेत हेही नसे थोडके!

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teen vogue magazine bhumika arora pooja mor changing in indian modelling
First published on: 06-10-2017 at 00:37 IST