आसिफ बागवान

किशोरवयीन मुलांवर समाजमाध्यमांचा मोठा प्रभाव आहे. अनेकदा पालक ओरडतील या भीतीने मुले त्यांच्या नकळत सोशल मीडियावर सक्रिय राहतात. अशा वेळी त्यांच्या सुरक्षिततेला अधिक धोका संभवतो. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणणे, हा उपाय ठरू शकत नाही.

सोशल मीडिया हे सध्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. इजिप्तमधील नागरी उठावापासून ते देशोदेशीच्या राजकीय स्थित्यंतरांपर्यंत अनेक ऐतिहासिक घडामोडींमध्ये सोशल मीडियाची भूमिका निर्णायक राहिली आहे. नवनवीन माहिती वा ज्ञान देणारं, सर्वसामान्यांना व्यक्त होण्यासाठी मुक्त व्यासपीठ देणारं आणि मित्रमंडळींना सदैव संपर्कात ठेवणारं म्हणून या माध्यमाचं कौतुक आहेच; पण या माध्यमाचा अतिरेक ही सध्या चिंतेची बाब बनली आहे. या ना त्या प्लॅटफॉर्मद्वारे सोशल मीडियावर सतत ‘ऑनलाइन’ राहणं किंवा लोकल ते ग्लोबलपर्यंतच्या कोणत्याही मुद्दय़ावर व्यक्त होणं ही जणू काही अपरिहार्यताच आहे, अशा पद्धतीने या माध्यमात वावरणारे असंख्य आहेत. या सततच्या संचाराचे विपरीत परिणाम अनेकदा समोर येत असतात. मात्र, त्यातही या अतिरेकाचे सर्वाधिक बळी ठरतात ती किशोरवयीन मुले.

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारा एक अहवाल अमेरिकन मेडिकल असोसिएशनद्वारे प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘जामा सायकॅट्री’ या मासिकाने प्रकाशित केला. या अहवालानुसार, दररोज अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या किशोरवयीनांच्या मानसिक आरोग्याला धोका संभवतो. दररोज तीन तासांहून अधिक वेळ सोशल मीडिया वापरणाऱ्यांना मानसिक आजार होण्याची शक्यता ६० टक्के अधिक असते, असेही हा अहवाल सांगतो.

खरे तर अशा प्रकारच्या संशोधन, सर्वेक्षण, पाहणीचे अहवाल सातत्याने प्रकाशित होत असतात. त्यातील काही सोशल मीडिया धोकादायक नसल्याचे सांगतात, तर काही अशा प्रकारची आकडेवारी सांगून सोशल मीडिया वाईट असल्याचे दाखले देतात. यातल्या कोणत्या अहवालावर विश्वास ठेवावा आणि कोणता अहवाल सत्य मानावा, हा प्रश्नच आहे. परंतु किशोरवयीन मुला-मुलींमध्ये वाढत असलेल्या सोशल मीडियाच्या वेडाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वयानुसार नैसर्गिक परिपक्वता येण्याआधीच हातात आलेल्या स्मार्टफोनचा कसा वापर करावा, याचे ज्ञान नसल्याने अनेक मुले सोशल मीडियातील अपप्रवृत्तींच्या जाळय़ात सहज सापडतात. सोशल मीडियावर बनावट अकाऊंटच्या साह्याने मैत्री करून अशा मुलामुलींचा गैरफायदा घेण्याचे प्रकार सातत्याने समोर येत असतात. तसे तर असे भामटे सातत्याने सोशल मीडियावर सावज शोधत असतात. मात्र, किशोरवयीन मुले-मुली त्यांच्या सापळय़ात अडकण्याची शक्यता अधिक असते. या मुलामुलींना मैत्रीच्या जाळय़ात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळणे किंवा प्रेमसंबंध निर्माण करून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करणे, असे प्रकार होण्याचा धोका असतो. समाजमाध्यमांवर वापरली जाणारी भाषा, त्यावरून प्रसारित केला जाणारा मजकूर या गोष्टींचाही किशोरवयीनांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

पण सोशल मीडियाच्या संपर्कात आलेल्या तरुणाईला याच गोष्टीचा धोका आहे असे नाही. किंबहुना त्याहूनही मोठा धोका सोशल मीडियावरून शेअर केल्या जाणाऱ्या गोष्टींचा आहे. आपल्या मित्रमंडळींसाठी शेअर केलेल्या एखाद्या व्यक्तिगत छायाचित्राचा गैरवापर केला जाऊ शकतो, याची समज अनेक मुलामुलींना नसते. अनेकदा सोशल मीडियावर वलयात राहण्यासाठी स्वत:ची उत्तेजक छायाचित्रे शेअर केली जातात. पहिल्यांदा शेअर केलेल्या छायाचित्राला ‘उदंड’ प्रतिसाद मिळाल्यानंतर अशा प्रकारच्या छायाचित्रांमुळे प्रसिद्धी मिळते, असे समीकरण गृहीत धरून ती प्रसारित करण्याकडे कल वाढत जातो. ही गोष्टही चिंताजनक ठरू शकते.

सध्याची तरुणाई किंवा किशोरवयीन पिढी डिजिटल तंत्रज्ञानाशी समरस झाली आहे. त्यामुळे त्यांना सोशल मीडियापासून दूर ठेवणे हा काही उपाय नाही. अनेक पालक आपल्या मुलांना सोशल मीडियाचा सदस्य होण्यास प्रतिबंध करतात. त्यामुळे आपले मूल सुरक्षित राहील, अशी त्यांची कल्पना असते; परंतु हा प्रकार आणखी घातक ठरू शकतो. पालकांकडून निर्बंध आल्यानंतर ही मुले वेगवेगळय़ा मार्गानी सोशल मीडियाच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे खोटय़ा नावाने फेसबुकचे अकाऊंट करून सक्रिय राहणे, आईवडिलांच्या स्मार्टफोनमधून त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून कंटेंट तपासणे असे प्रकार ही मुले करू शकतात. यातून त्यांची सुरक्षितता आणखी धोक्यात येऊ शकते. सोशल मीडियावर ठरावीक वयानंतरच सदस्यत्व बनण्याची परवानगी द्यावी, असा आग्रहदेखील धरला जातो. मात्र, तो परिणामकारक ठरू शकत नाही. सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर वयाची पडताळणी करणे शक्य नाही. त्यामुळे १२ वर्षांचा एखादा मुलगा १८ वर्षांचा असल्याचे दाखवून सोशल मीडियावर सक्रिय होतोच.

अशा परिस्थितीत पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधून त्यांना सोशल मीडियाबद्दल जागरूक करणे, हा सर्वात चांगला उपाय आहे. मुलांनी सोशल मीडियाचा वापर सुरू करण्यापूर्वीच त्यांना या विश्वाची कल्पना देणे आवश्यक आहे. त्यातील फायदे-तोटे मुलांना सांगण्याची गरज आहे. एवढेच नव्हे, तर पालकांनीच पुढाकार घेऊन मुलांना सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे कसा वापर करता येईल, याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. मुले सोशल मीडियाचा वापर करू लागल्यानंतर त्यांच्या वागणुकीत किंवा संवाद करण्याच्या पद्धतीत काही बदल झालाय का, याचे निरीक्षणही पालकांनी करणे आवश्यक आहे. मुले सोशल मीडियावर काय पाहतात, कोणाशी चॅटिंग करतात, काय बोलतात यावर पालकांनी नजर ठेवली पाहिजे. मात्र, हे करत असताना मुलांना सातत्याने विश्वासात घेणे किंवा त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा करणे आवश्यक आहे.

सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या कंटेंटवर कुणाचेही नियंत्रण नसते. मात्र, आपण ठरवल्यास या माध्यमाचा विधायक वापर करता येऊ शकतो. विशेषत: या माध्यमाद्वारे मुलांना ताज्या घडामोडींचे ज्ञान मिळू शकते. त्यांच्या आवडीच्या विषयावरील पेजेस किंवा चर्चापीठांमध्ये सहभागी होऊन ती त्या विषयाबद्दल अधिक माहिती मिळवू शकतील. आपल्या ठरावीक मित्रमंडळींमध्ये गुंतून न पडता वेगवेगळय़ा समाजांतील, भिन्न भाषेच्या व्यक्तींशी त्यांची मैत्री होऊ शकेल. अशा प्रकारे या मुलांच्या जडणघडणीत सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मात्र, हे करण्यासाठी पालक आणि मुले यांच्यातला ‘सोशल कनेक्ट’ वाढणे आवश्यक आहे.

viva@expressindia.com