28 February 2021

News Flash

वस्त्रांवेषी : व स्त्र प्र था

‘पेशवाईची वस्त्रे’ हा आपल्याला परिचित शब्द प्रयोग असला तरी ती वस्त्रे कोणती हे सहसा माहिती नसते.

||  विनय नारकर

आपल्याकडे ‘वस्त्र देणे’ असा शब्दप्रयोग आहे. याचा अर्थ ‘अधिकार देणे’ असा होतो. एखाद्या व्यक्तीची विशिष्ट अधिकारपदावर नियुक्ती झाली की, त्या पदानुसार त्यास विशिष्ट वस्त्रे दिली जात. या रिवाजावरून ‘वस्त्र देणे’ हा शब्द प्रयोग रूढ झाला. छत्रपतींनी बाजीरावांना ‘पेशवाईची वस्त्रे’ दिली, हे सर्वसामान्यपणे आपणाला माहिती असते. शिवकाळातही विविध अधिकार प्रदान करताना, त्या व्यक्तीला आपल्या पदानुसार योग्य वस्त्रे दिली जात असत.

आपल्या समाजात वस्त्रसंस्कृतीची जी जडणघडण होत गेली आहे,  त्यामध्ये विविध वस्त्र प्रथांची मोलाची भूमिका आहे. वस्त्र हा आपल्या समाजाचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे नाना प्रकारच्या वस्त्र प्रथा जन्मल्या, रुजल्या… काही प्रथांमध्ये प्रतीक म्हणून तर काही प्रथांमध्ये प्रत्यक्षपणे ‘वस्त्र’ हा केंद्रबिंदू राहिला आहे. वस्त्रांच्या देवाण-घेवाणीवरून बऱ्याच प्रथा निर्माण झाल्या आहेत. ‘पदर’ या संकल्पनेने मराठी भाषेत किती मोलाची भर घातली हे आपण आधीच्या लेखांमध्ये पाहिले होते. त्याचप्रमाणे विविध वस्त्र प्रथांच्या अनुषंगाने आपली भाषा कशी समृद्ध झाली हे जाणून घेणेही उद्बोधक आहे.

आपल्याकडे ‘वस्त्र देणे’ असा शब्दप्रयोग आहे. याचा अर्थ ‘अधिकार देणे’ असा होतो. एखाद्या व्यक्तीची विशिष्ट अधिकारपदावर नियुक्ती झाली की, त्या पदानुसार त्यास विशिष्ट वस्त्रे दिली जात. या रिवाजावरून ‘वस्त्र देणे’ हा शब्द प्रयोग रूढ झाला. छत्रपतींनी बाजीरावांना ‘पेशवाईची वस्त्रे’ दिली, हे सर्वसामान्यपणे आपणाला माहिती असते. शिवकाळातही विविध अधिकार प्रदान करताना, त्या व्यक्तीला आपल्या पदानुसार योग्य वस्त्रे दिली जात असत.  शिवकाळात मुख्य प्रधानास व सेनापतीस ‘बादली वस्त्रे’ व शिरपेच, मोत्यांचे तुरे, कंठ्या, चौकडे, अमात्यांना बादली वस्त्रे, ढाल, तलवार, पंडित पदासाठी बादली वस्त्रे, पोशाख, कंठा, चौकडा, तुरा शिरपेच… साधारणपणे अशा प्रकारे वस्त्रे देऊन पदभार दिला जात असे. इथे बऱ्याचदा उल्लेख आलेले ‘बादली वस्त्र’ हे सोने-चांदीची जर असलेले एक प्रकारचे उंची वस्त्र होते. बाळाजी आवजी यांस जेव्हा चिटणीसपदाची वस्त्रे दिली गेली तेव्हा त्यामध्ये मंदिल, दुमजला दुपेटा, झगा, विजार, कंठी, शिरपेच, चौकडा या गोष्टींचा समावेश होता.

‘पेशवाईची वस्त्रे’ हा आपल्याला परिचित शब्द प्रयोग असला तरी ती वस्त्रे कोणती हे सहसा माहिती नसते. छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावांना जी ‘पेशवाईची वस्त्रे’ दिली, त्यात भरजरी मंदिल, मोतीचूर झगा, बादली चादर, जामेवार, पटका, विजार अशी सहा सणगे असलेली पंतप्रधानपदाची वस्त्रे होती. ‘सणगे’ म्हणजे उंची वस्त्रं. अधिकार पदे देण्यासाठी वस्त्रांचा वापर करणे हा आपल्या वस्त्र संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. या अंगाने या संबंधी आणखी काही शब्दप्रयोग रूढ झाले. अधिकार देणे, यासाठी ‘वस्त्र  देणे’ जसं आहे, तसं एखाद्यास कामावरून काढून टाकणे, यास ‘तगिरीचे वस्त्र देणे’असा शब्दप्रयोग तयार झाला. त्याशिवाय, पदच्युत करणे याला ‘काळी वस्त्र देणे’ आणि ‘वस्त्रांतर होणे’ असे शब्दप्रयोगही योजिले जातात.

पेशवाई काळात ‘प्रसाद वस्त्र देणे’ असाही एक रिवाज होता. पेशवे किंवा सरदार मंडळी जेव्हा देवदर्शनासाठी जात, तेव्हा देवस्थानातर्फे त्यांना ‘प्रसाद वस्त्रे’ दिली जात. हा एक महत्त्वाचा रिवाज होता. पेशवे दप्तरामध्ये कोणत्या देवस्थानाने पेशव्यांना कोणती वस्त्रे दिली याचे तपशील व त्यांच्या किमती पहायला मिळतात. गुरूने जर प्रसाद म्हणून वस्त्र दिले, तर त्यास ‘पाखर’ असे म्हटले जाते. विविध प्रसंगी सन्मानासाठी वस्त्रं प्रदान करणे ही तर आजतागायत सुरू असलेली परंपरा… विविध प्रसंगांसाठी विशिष्ट वस्त्रे दिली जात. पेशवाई काळात आहेर देण्यासाठीही काही संकेत होते. साडेतीन सणग्यांचा आहेर रूढ होता. साडेतीन सणगे, म्हणजे साडेतीन वस्त्रे. ती म्हणजे विजार, झगा, शिरपाव व अर्धे किनखापाचे वस्त्र. उच्चपदस्थ नोकरांना चार वस्त्रे दिली जात, ती म्हणजे पागोटे किंवा मंदिल, दुपेटा, सबंध किनखाप व महमदी. पायजम्याकरिता महमदी हे वस्रा रूढ होते. याहीपेक्षा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना या चार वस्त्रांसोबत पटक्याची भर घालून पाच वस्त्रे दिली जात.

सर्व वस्त्रांमध्ये शिरोभूषण म्हणजे मस्तकावरचे वस्त्र हे महत्त्वाचे. त्यामुळे एखाद्याचा सन्मान करण्यासाठी शेला आणि पागोटे देणे हा रिवाज तर पूर्वापार चालत आला आहे. आजही हा रिवाज आपण पाहतो,  मात्र यातला ‘शेला’ गायब झाला आहे. त्या रिवाजाचं आजचं (अभद्र) स्वरूप म्हणजे ‘टॉवेल टोपी’. पागोट्या संबंधित काही संकेत आणि रिवाज समाजात रूढ होते. एकमेकांची पगडी बदलून लोक ‘पगडी भाई’ किंवा ‘पगडी बंधू’ बनायचे. एकमेकांची पगडी बदलून झालेले मित्र एकमेकांच्या रक्षणाची जबाबदारी घेत असत. पगडी बदलणे ही एक इमानाची शपथ असे. ‘भाऊसाहेबांची बखर’ मध्येही असा उल्लेख आला आहे, ‘हिंदुस्थानातील स्वधर्म की, पगडी भाई झाल्यावर पोटचें द्यावे पण पाठचे देऊं नये, त्यास रक्षावे’. पगडी किंवा पागोटे हे प्रतिष्ठेचे प्रतीक, हे सन्मानार्थ डोईवर बांधले जाई, शरण जायचे असेल तर बगलेत घेऊन जावे, ज्याला शरण जायचे त्याच्या पायाशी ठेवावे. आनंदाच्या क्षणी वा मैफिलींमध्ये पागोटी उधळली जायची. पुत्रजन्माच्या वेळी पिवळे पागोटे बांधण्याचाही संकेत होता. पागोट्यावरून तयार झालेल्या म्हणींनी आपले भाषावैभवही बरेच वाढले आहे.

लग्नसमारंभांमध्ये साहजिकपणेच वस्त्रांच्या देवाणघेवाणी वरून तयार होणाऱ्या प्रथा बऱ्याच निर्माण झाल्या. वराच्या आईस, वधूच्या आईस, वधूस किंवा इतर नातेवाईकांना सन्मानित करण्यासाठी वस्त्रांच्याच भेटी दिल्या जात. त्यावरून वधूला लग्नाच्या आदल्या दिवशी दिली जाणारी ‘तेलसाडी’, लग्नात दिला जाणारा ‘साडा’, लग्नानंतर दिली जाणारी ‘तळी’,  वधूच्या आईस दिले जाणारे ‘पाठपलाणे’ किंवा ‘वळीगोणी’, सुनमुख पाहताना दिली जाणारी ‘पोटझांकणी’  आणि रूखवताच्या वेळचे ‘सोवळे सोडणे, वराच्या आईस देण्यात येणारे ‘मायवाण’ किंवा पैठणी किंवा उंची वस्त्र देण्याचा संकेत असणारे ‘लग्नसाडा’, वधू मांडीवर येऊन बसते तेव्हा वरमातेस दिले जाणारे ‘मांडीचेपणे’ आजी किंवा आत्या या महत्त्वाच्या नात्यांना दिले जाणारे ‘अजेचीरवाण’ आणि ‘आतेगवर’ अशा प्रथा निर्माण झाल्या.

स्त्रियांच्या वस्त्रांसंबंधी, विशेषत: साडी, लुगडी नेसण्या, देण्याबद्दल तर अनेक संकेत व प्रथा आहेत. निरनिराळ्या जाती – समाजानुसार यांच्यामध्ये प्रचंड वैविध्य आहे. मुलगी वयात यायच्या आधी नेसला जाणारा, पदर नसलेला परवंटा, मुलगी वयात आल्यावर तिला मामाकडून मिळणारी ‘बाळी’ ही साडी, लग्नातली पिवळी ‘अष्टपुत्री’, लग्नात वराकडून मिळणारी साडी, सुनमुख पाहताना सासूकडून मिळणारी साडी, पहिल्या संक्रातीची काळी चीरचोळी, गर्भवती झाल्यावर आईकडून  मिळणारी हिरवी साडी, मुलाच्या लग्नात विहिणीकडून मिळणारी साडी आणि सुवासिनीचे मरण आल्यावर घातली जाणारी माहेरची साडी… आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाचे प्रसंग वस्त्रानेच साजरी करणारी अशी आपली संस्कृती विलक्षण आहे.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 12:33 am

Web Title: textile culture in society akp 94
Next Stories
1 बीइंग पेट पेरेंट
2 रंग वर्षाचा!
3 संशोधनमात्रे : चतुर्थी विभक्तीचा कार्यक्षम ‘प्रत्यय’
Just Now!
X