सवयस्वरूप पंडितस्टीफन कुव्ही यांनी लिहिलेल्या ‘अतिपरिणामकारक लोकांच्या सात सवयी’ या पुस्तकानंतर त्यांनी जगातील प्रभावशाली व्यक्तींमधील साधम्र्यदर्शक आठवी सवय शोधून काढली. आणि त्या एकाच पण अत्यंत महत्त्वाच्या अशा सवयीवर त्यांनी ‘द एट्थ हॅबिट’ हे पुस्तक लिहिले आहे. अत्यंत मौल्यवान असे हे पुस्तक.. मौल्यवान अशासाठी कारण हे पुस्तक थेट आपल्या ‘आतल्या आवाजाबाबत’ भाष्य करते. आपला आतला आवाज म्हणजे नेमके काय, तो कसा शोधावा (किंवा खरे तर ऐकावा!), त्याची अभिव्यक्ती नेमकी कशी करावी, अशा प्रश्नांची उत्तरे लेखकाने या पुस्तकात दिली आहेत.
एकूण १५ प्रकरणांमध्ये हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. आपली नेमकी वेदना, समस्या आणि त्यावरील उपाय अशा प्रस्तावनावजा लेखाद्वारे कुव्ही यांनी ग्रामीण बँकेचे जनक आणि नोबेल पारितोषिक विजेते डॉ. मोहम्मद युनूस यांची गोष्ट सांगितली आहे. ‘ज्ञानाधिष्ठित कामगारांच्या’ दुनियेत मूल्यनिर्मिती कशी करावी याचे मूलमंत्र यामध्ये नमूद करण्यात आले आहेत. आपल्या आतल्या आवाजाचा शोध लागण्यासाठी निवडीचे स्वातंत्र्य आणि नैसर्गिक न्यायाची तत्त्वे यांची कशी मदत होते हे सांगण्यात आले आहे. तर, त्या आवाजाची अभिव्यक्ती करतेवेळी शारीरिक ऊर्जेचे शिस्तीत, मानसिक ऊर्जेचे दूरदृष्टीत, भावनिक ऊर्जेचे ‘पॅशन’मध्ये आणि आंतरिक ऊर्जेचे विवेकात रूपांतरण कसे करावे याचेही मार्गदर्शन लेखकाने केले आहे.
फक्त आपल्याला आपला आतला आवाज कळला म्हणजे काम संपले असे नाही, असेही कुव्ही सांगतात. नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी आपण इतरांनाही त्यांचा ‘आतला आवाज’ शोधण्यासाठी मदत केली पाहिजे, असे सांगत लेखक म्हणतात की, प्रभाव असलेला आवाज, विश्वासपात्र आवाज, सामंजस्य पसरविणारा आवाज असे ‘आवाजा’चेही काही प्रकार असतात. या प्रकारांचे आणि त्यांच्या यशस्वी वापराचे तंत्र या पुस्तकात देण्यात आले आहे.
आपल्या आतल्या आवाजाच्या जाणिवेने, जागृतीने आणि प्रतिसादाने आपल्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी प्राप्त होत जाते. विचारात स्पष्टता येते, कृतींना बांधीलकीची जोड लाभते, अधिकाराला उत्तरदायित्वाचे भान येते आणि उद्दिष्टांना कृती कार्यक्रमांची संगत लाभते. यातूनच व्यक्तिमत्त्वाची विश्वासार्हता वाढत जाते. आपल्या आतल्या आवाजाचा वापर इतरेजनांच्या सेवेसाठी करावा, असेही लेखक सुचवितात. हे पुस्तक वाचताना पदोपदी महात्मा गांधी, त्यांची आंदोलने निवडीची पद्धती, त्यांचा आतला आवाज, जनसामान्यांनाही चळवळीत सहभागी करून घेण्याची ताकद अशा भारतीय इतिहासातील बाबींचे संदर्भ आठवत राहतात.
थोडेसे तात्त्विक, ‘थिअरेटिकल’ असलेले आणि काही वेळा अतिगद्य वाटणारे हे पुस्तक आहे, हे आधीच मान्य करायला हवे. पण, आपल्या आयुष्यातील घडामोडी तपासल्या असता, अनुभव ताडले असता आणि विशेषत: अपयशाचा कालखंड लक्षात घेतल्यास आपल्याला आपला आतला आवाज तळमळीने काही सांगू इच्छित होता, मात्र आपण त्याकडे लक्ष दिले नाही हे जाणवते. आणि हेच लेखकाचे यश आहे. एकीकडे महनीय व्यक्तिमत्त्वांच्या गुणांमधील साधम्र्य मांडतानाच सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनातील अनुभवाची जोड देणे, समस्या मांडणे आणि त्यावरील उपाय समजेल अशा पद्धतीने नमूद करणे हे आव्हानात्मक काम आहे. ते स्टीफन महोदयांनी उत्तमपणे साधले आहे.
पुस्तक – द एट्थ हॅबिट
लेखक – स्टीफन कुव्ही
मूल्य – सुमारे ३५० रुपये