26 January 2021

News Flash

पॉझिटिव्हली ऑनलाइन

ऑनलाइन शिक्षणाचे परिणाम विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांवरही झालेत

वेदवती चिपळूणकर

गेल्या वर्षी ‘पॉझिटिव्ह’या शब्दामधून अनुभवाला आलेली निगेटिव्हिटी झटकू न नव्या वर्षांचे स्वागत तरुणाईने आनंदाने आणि तितक्याच सावधतेने केले आहे. नव्या वर्षांत तरुणाईच्या जीवनात आणि नानाविध क्षेत्रांत अनेक बदल झाले आहेत, किंबहुना गेल्या वर्षीच झालेल्या या बदलांकडे आता चांगल्या आणि खऱ्या अर्थाने पॉझिटिव्हली पाहण्याची ही संधी आहे. शिक्षण, तंत्रज्ञान, फॅशन, भटकंती अशा त्यांच्या आयुष्याशी निगडित सगळ्याच बाबींमध्ये झालेले बदल नेमके  काय आहेत आणि त्याबाबत तरुणाई किती पॉझिटिव्ह आहे याचा वेध आजच्या या खास ‘व्हिवा’मधून घेतला आहे.

२०२० हे वर्ष करोना आणि लॉकडाऊन अनुभवण्यात, चर्चा करण्यात, उपाय शोधण्यात, स्वत:ला सवयी लावण्यात आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यात गेलं. त्यात इतर अनेक घटनाही घडल्या, मात्र जगभरातल्या जवळजवळ सगळ्या घटनांचा केंद्रबिंदू करोना हाच होता. वर्षभरात अनेक भावनांचा रोलरकोस्टर सगळ्यांनीच अनुभवला. ‘आपलं कसं होणार’ इथपासून ‘होतायत की घरात बसूनही सगळी कामं’ इथपर्यंतचा इमोशनल आणि प्रॅक्टिकल प्रवास आपण केला. या सगळ्यात तरुणाईच्या दृष्टीने महत्त्वाची चिंता होती ती त्यांच्या मागे पडत चाललेल्या शिक्षणाची. सुरुवातीच्या काळात अभ्यास, परीक्षा, सबमिशन्स, क्लासेस अशा कशाबद्दलच काहीच क्लॅरिटी नसताना सगळेच डोक्याला हात लावून बसले होते. मात्र लॉकडाऊनला काही मर्यादाच दिसत नसल्याचं पाहून शिक्षण क्षेत्राने स्वत:मध्ये हळूहळू बदल करून घेतले आणि लहानांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांचं शिक्षण ऑनलाइन सुरू झालं. करोनाने जगाचं कितीही नुकसान केलेलं असलं तरी गेलं वर्ष संपताना मात्र आपल्याला मिळालेल्या नवीन गोष्टींकडे सकारात्मक नजरेने बघणं हेच या नव्या वर्षांत आणि भविष्यात फायद्याचं आहे.

सुरुवातीला नवीन पद्धतीची आपल्याला कटकट वाटली, ऑनलाइन शिकण्यात आपलं लक्ष लागेना, एकाग्रता मिळेना, शिक्षकांना शंका विचारता येईनात आणि परिणामी अभ्यासही मनापासून होईना. कोणालाही न भेटता—बोलता सुरू असलेलं कॉलेज, स्क्रीनवर बघून करायच्या असाइनमेंट्स, लायब्ररीऐवजी पीडीएफवर वाचायची पुस्तकं आणि नोट्स या सगळ्याला आपण साहजिकच कंटाळलो. मात्र सुरुवातीला या सगळ्यामुळे आपली होणारी चिडचिड आता जरा सौम्य झाली आहे. थोडीफार का होईना आपल्याला या नवीन शिक्षणपद्धतीची सवय झाली आहे. शिक्षकही हळूहळू आता या पद्धतीला सरावले आहेत.

‘ऑनलाइन शिक्षणाचे परिणाम विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांवरही झालेत. विद्यार्थीच नाही तर शिक्षकही अनेक गोष्टी शिकले आहेत. दुर्गम भागातल्या मुलांनाही मोबाइलवर शिकता यायला लागलं, माहिती शोधता यायला लागली आणि याचा परिणाम म्हणून शिक्षकांनाही खूप जास्त अभ्यास करणं गरजेचं होऊन बसलेलं आहे’, असं एच.पी.टी. आर्ट्स आणि आर.वाय.के . सायन्स कॉलेजच्या उप प्राचार्या डॉ. वृंदा भार्गवे सांगतात. ‘या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे आणि शिक्षण घेण्याच्या बदललेल्या पद्धतीमुळे तरुणाई अनेक गोष्टी शिकली. सुरुवातीला टाइमपास करण्यात आणि केक्स करण्यात त्यांनी वेळ घालवला, मात्र हळूहळू त्यांची गाडी रुळावर आली. तंत्रज्ञानातल्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या एरवी कदाचित त्यांनी वापरूनही बघितल्या नसत्या त्या त्यांनी आत्मसात केल्या. इंटरनेटचा वापर अनेक उपयुक्त कारणांसाठी होऊ शकतो हेही तरुणाईला अगदी जवळून अनुभवता आलं. तरुणाईसाठी ही बदललेली पद्धत फक्त अकॅडमिक शिक्षणाची नव्हे तर जीवन शिक्षणाची नवी संधी ठरली’, असं त्या म्हणतात.

याच लॉकडाऊनच्या काळातच नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा प्रस्तावही पारित झाला आणि त्यातले बदल हळूहळू लागू केले जाणार असल्याची बातमी आपल्याला मिळाली. या नवीन शैक्षणिक धोरणात ऑनलाइन शिक्षणपद्धती आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यावर स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. आताची आपली लॉकडाऊनची परिस्थिती काहीशी या नवीन शैक्षणिक धोरणाशी आपली ओळख करून द्यायला कारणीभूत ठरली असं म्हणायला हरकत नाही. या धोरणाच्या समितीवर असणाऱ्या एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कु लगुरू डॉ. वसुधा कामत यांनी सांगितलं, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधल्या सेक्शनमध्ये ऑनलाइन शिक्षणप्रणाली वापरण्यासाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर दिला आहे.

तसंच या क्षेत्रात अधिक संशोधन होण्याची गरज, तंत्रज्ञानाचा  वापर करण्यासाठी लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरची उपलब्धता अशा अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. ऑनलाइन अध्यापन—अध्ययनाप्रमाणेच ऑनलाइन मूल्यमापनही समजून घेणं जरुरीचं आहे. स्मरणशक्तीवर आधारित मूल्यमापन न होता एकविसाव्या शतकासाठी आवश्यक अशा बौद्धिक आणि कायिक कौशल्यांचं मूल्यमापन करण्यासाठी विविध तंत्र वापरण्याविषयी या धोरणाने सांगितलं आहे. सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक मूल्यमापन करण्याबद्दलही यात आग्रहाने सुचवलं आहे’. शिक्षणतज्ज्ञांचं मत लक्षात घेत ऑनलाइन शिक्षणाचे स्वरूप समजावून घेत त्याचा आपल्या जडणघडणीसाठी फायदा कसा करून घेता येईल, यावर तरुणाईने अधिक जोर दिला पाहिजे.

आपली पुन्हा मोकळ्यात शिक्षण घेण्याची इच्छा आणि आपण नव्याने अवगत केलेलं तंत्रज्ञान यांची सांगड घालून भविष्यातली शिक्षणपद्धती घडेल असंच नवीन शैक्षणिक धोरणाने म्हटलं आहे. नवीन वर्षांपासून काही बदल होतील तर काही बदल हळूहळू होतील. मात्र ऑनलाइन पद्धतीशी मिळतंजुळतं घेण्यासाठी करोना आणि लॉकडाऊनने आपल्याकडून रंगीत तालीम थोडी लवकर करून घेतली इतकंच! viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 2:51 am

Web Title: the impact of the internet in youths online positive influence on youth zws 70
Next Stories
1 फाइव्ह जी आणि बरंच काही..
2 पुनश्च भटकंती!
3 फॅशनच्या जुळती तारा..
Just Now!
X