khabuइराणी रेस्तराँ म्हटल्यावर एक ठरावीक सेटअप डोळय़ांसमोर येतो. ‘कूलार अ‍ॅण्ड कं.’ अगदी तस्संच आहे. पुराना जमान्याची याद देणारं.. इथं इतर इराणी रेस्तराँप्रमाणे खिमा पाव, ऑम्लेट पाव, बनमस्का-चाय आदी गोष्टी तर उत्तम मिळतातच, पण त्याचबरोबर ‘कूलार’ची खासियत म्हणजे इथली आयरिश कॉफी!
पूर्वीचं मुंबई शहर म्हणजे कसं एकदम चकाचक होतं. सगळय़ा गोष्टी घासूनपुसून जागच्या जागी ठेवल्यासारखं. त्या मुंबईला काहीसा ओबडधोबड, पण आपलासा चेहरा होता.. आत्तासारखा गुळगुळीत नव्हता तो! अठरापगड लोक खरोखरच त्या अठरा पगडय़ांखाली आपली डोकी सांभाळत आणि डोक्याला डोकी लागणार नाहीत, याची काळजी घेत वावरायचे. बग्गी, ट्राम वगैरे टेचात धावायच्या, तो काळ! आता तुम्हाला  प्रश्न पडला असेल, खाबूमोशायचा भेजा आज सटकला की काय? उगाचच मेंदूच्या एका डिपार्टमेंटमध्ये बंद असलेल्या आठवणींच्या फायली चाळतोय!
पण यार हो, विषय तसाच आहे. विषय आहे एकेकाळी मुंबईची संस्कृती असलेल्या, मुंबईतील साहित्य, नाटय़, सांस्कृतिक, राजकीय आदी सर्वच क्षेत्रांच्या केंद्रस्थानी असलेल्या इराणी रेस्तराँचा! माटुंगा भागात दाक्षिणात्य हॉटेलांच्या लाटेतही प्रलयातील पिंपळपानावरील त्या लहानग्या जिवाप्रमाणे टिकून राहिलेल्या एका इराणी रेस्तराँमध्ये जायचा योग खाबूमोशायच्या वाटय़ाला नुकताच आला. किंग्ज सर्कलच्या एका टोकाला, म्हणजे आताच्या महेश्वरी उद्यानच्या एका टोकाला, यूडीसीटीच्या रस्त्याला लागून ‘कूलार अ‍ॅण्ड कंपनी’ नावाचा एक इराणी आपला तंबू ठोकून आहे.
या रेस्तराँची ठेवण थेट स्वातंत्र्यपूर्व काळातील इराणी रेस्तराँसारखीच आहे. भिंतींवर हॉलिवूडमधील जुन्या चित्रपटांच्या अ‍ॅड्स, कोका कोलाच्या जुन्या अ‍ॅड्स आदी गोष्टी दिसतात. इथं इतर कोणत्याही इराण्याकडे मिळणारा बनमस्का, ब्रूनमस्का, चहा, खिमा-पाव, ऑम्लेट-पाव आदी ऐवज मिळतोच. पण ‘कूलार अ‍ॅण्ड कंपनी’मध्ये आयरिश कॉफी मिळते, असं खाबूमोशायला समजलं होतं.
खाबूमोशायनं आयरिश कॉफी ऑर्डर केली. आयरिश कॉफी म्हणजे काय, हे सांगणं आवश्यक आहे. एका ग्लासमध्ये गरम पाणी भरून ते काही काळ तसंच ठेवतात. पाणी ओतून टाकतात. त्यामुळे ग्लास गरम राहतो. त्यात काळी कॉफी ओततात. या कॉफीमध्ये ब्राऊन शुगर घालून मग ती पूर्ण विरघळेपर्यंत ढवळायची. त्यानंतर थोडी व्हिस्की टाकून त्यावर क्रीम घालायचं! कॉफी सव्‍‌र्ह करताना कॉफीचा कडकपणा आणि कडवटपणा कमी करण्यासाठी ग्लासला कडेला साखरेचे कणही लावलेले असतात.
ही रेसिपी माहिती असल्यानं खाबूमोशाय कॉफीच्या कडक झटक्यासाठी तयारच होता. कॉफीचा पहिला घोट घेतल्यानंतरच एक कडवट लोट घशातून खाली उतरला. खाबूमोशायची सगळी गात्रं ताजीतवानी झाली. आयरिश कॉफी आवडते किंवा नाही, ही प्रत्येकाची वैयक्तिक आवड असू शकते. पण एकदा तरी यासाठी ‘कूलार अ‍ॅण्ड कंपनी’मध्ये यायलाच हवं. कॉफीनं हिरमोड केला, तरी खिमा-पाव, बनमस्का-चहा आदी गोष्टी मूड ठीक करायला उपलब्ध आहेतच!
 खाबूमोशाय –  khabumoshay.viva @gmail.com