News Flash

तत्त्वज्ञान आणि वसुमतीचं ‘अद्वैत’

दिल्लीच्या वेद-वेदांताध्ययनशोध संस्थेने राष्ट्रीय स्तरावरच्या आयोजलेल्या शोधनिबंध सत्रांमध्ये भारतभरातून पाच रिसर्च स्कॉलर्स निवडले गेले.

संशोधनमात्रे : राधिका कुंटे

तत्त्वज्ञानाची गोडी, संस्कृतप्रेमी, मराठी, हिंदी आणि इंग्रजीतील लिखाण- सादरीकरणावर प्रभुत्व, वक्तृत्व गुण, संगीत आणि अविरत संशोधनाचा ध्यास घेतलेल्या वसुमती करंदीकरच्या संशोधनाविषयी जाणून घेऊ या.

वसुमती करंदीकरच्या घरी पहिल्यापासून संस्कृत भाषेचं वातावरण होतं. ‘७२ तासांत संस्कृत शिका’ या उपक्रमाचे मूळ संस्थापक गणेश वासुदेव करंदीकर हे तिचे आजोबा. तिच्या बाबांनी तिला पाळणागीतांमध्ये ‘मेघदूत’ म्हटलं होतं. तिचे बाबा दंतवैद्यक आहेत. त्यांनी मराठी साहित्यात पीएचडी केली असून त्यांना संस्कृतचीही आवड आहे. वसुमतीने आठवीतच संस्कृतमध्ये करिअर करायचं ठरवलं. त्यासाठी आई-बाबा आणि दादाने तिला कायमच प्रोत्साहन दिलं. कणकवलीत बारावीपर्यंतचं शिक्षण झाल्यावर तिने रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातून पुढचं शिक्षण घेतलं. संस्कृत पदवीच्या शिक्षणासाठी डॉ. कल्पना आठल्ये यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं. त्यांच्याकडून संस्कृतमधल्या विविध उपक्रम आणि स्पर्धांविषयी माहिती कळली. तिच्या घरच्यांच्या विचारसरणीवर आद्य शं?कराचार्यांचा प्रभाव फार आहे. त्यामुळे अद्वैत तत्त्वज्ञान आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास या गोष्टी तिच्या मनावर बिंबवल्या गेल्या. तत्त्वज्ञान विषय आवडीचा होताच, तो महाविद्यालयीन काळात अधिक जोपासला गेला. या काळात ती मूळ संस्कृत साहित्याचं वाचन करू लागली. आद्य शंकराचार्यांवरील टीकांचा अभ्यास करून त्यावर स्वत:चं मत तयार करू लागली.

वसुमतीने एसपी महाविद्यालयातील राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेत पहिल्यांदा शोधनिबंध वाचला. पहिली दोन वर्षं नाही; पण तिसऱ्या वर्षी तिला पारितोषिक मिळालं. तो विषय होता- ‘अपराधक्षमापन स्तोत्रे : एक अभ्यास’. कलाशाखेच्या तृतीय वर्षात तिने प्रथम राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादर करायला सुरुवात केली. अगदी पहिला राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादर करताना छान अनुभव आला होता. महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व करताना तिला फार समाधान वाटत होतं. नागपूरला २०१७ मध्ये ‘कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठा’त राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादात ‘वैदिक गणित : स्वरूप व विशेष’ या शोधनिबंधाचं तिने वाचन केलं. तेव्हा ‘कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठा’चे दर्शनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मधुसूदन पेन्ना हे अध्यक्ष होते. त्या वेळी गणित किंवा कोणत्याही शास्त्रावरचा शोधनिबंध परिषदेत वाचण्यात आला नव्हता. त्यामुळे प्रा. पेन्ना यांनी तिच्या शोधनिबंधाचा उल्लेख करून त्या शोधनिबंधातील काही मुद्दे अधोरेखित केले. तेव्हा तिला फार आनंद झाला होता. नंतर झालेल्या प्रत्यक्ष भेटीत त्यांनी तिला हा निबंध एमफीलसाठी घेता येईल, असं सांगितलं. आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती पीएचडी करते आहे. वैदिक गणित या शोधनिबंधासाठी तिने आधी वैदिक गणित स्वत: समजून घेतलं आणि नंतर शोधनिबंधाच्या निमित्ताने केलेल्या प्रयोगात ३० विद्यार्थ्यांना वैदिक गणित शिकवलं. वैदिक गणिताची केवळ १९ सूत्रं आहेत. त्यांच्या आधारे कोणतंही गणित तुम्ही जलद सोडवू शकता. एरवी गणित सोडवायला एखाद्याला मिनिट लागतं तर वैदिक गणितानुसार ते ३०-३५ सेकंदांत सोडवता येतं. वैदिक गणित हे नित्य गणितापेक्षा अधिक उपयुक्त आणि जलद आहे, हा निष्कर्ष तिने प्रयोगांती काढला.

मुंबई विद्यापीठात एम.ए. संस्कृत शिकण्यासाठी ती मुंबईला आली. हॉस्टेलवर राहणं, कॅम्पसमधलं अभ्यासाचं वातावरण या गोष्टी तिनं रत्नागिरीतल्या महाविद्यालयाप्रमाणेच मुंबईतही अनुभवल्या. करिअरनिश्चिती करताना बाहेरगावी राहावं लागेल, ही कल्पना असल्याने त्या दृष्टीने तिची आणि घरच्यांची मानसिक तयारी झाली होती. ती सांगते की, ‘मुंबईत आल्यावर मला खूप संधी मिळाली. अनेकांशी ओळखी झाल्या. दरम्यान, माझ्या काही शोधनिबंधांचं वाचन आंतरराष्ट्रीय स्तरावरही केलं. ‘योगदर्शन आणि बौद्धदर्शन : तुलनात्मक अभ्यास’ (oga and Baudha Darshan : A comparative study) या शोधनिबंधाचं वाचन वसुमतीने ‘लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठा’त आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत २०१९ मध्ये केलं. या संशोधनासाठी त्रिपिटकांचा नव्याने अभ्यास, या दोघांच्या कालनिश्चितीपासून सुरुवात करून योगदर्शन आणि बौद्धदर्शन यांचा तुलनात्मक अभ्यास करून साम्य आणि भेदांचं शोधनात्मक विश्लेषण केलं. साधारण आठ महिन्यांचा कालावधी तिला या शोधनिबंधासाठी लागला. या परिषदेचा अनुभव चांगला होता. मात्र अनेक संशोधकांचा समावेश असल्याने संशोधनपर चर्चा वगैरे झाली नव्हती. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच शोधनिबंध वाचनाचा अनुभव मिळाला. शोधनिबंध लिहिताना प्रथम भूमिका मांडणं, उद्दिष्ट, अभ्यासाची पद्धती, संशोधनाची क्रमवार मांडणी, निष्कर्ष, परिशिष्ट, संदर्भ हे सगळे टप्पे लिहिणं आवश्यक असतं. तरच तो परिपूर्ण शोधनिबंध होतो.

काही वेळा चार महिने अभ्यास केलेला निबंध अवघ्या १० मिनिटांत मांडायचा असतो. त्यात वाचताना काही वेळा वेळेअभावी ‘फॉरवर्ड’ म्हटलं जातं. कधी थेट निष्कर्षच वाचायला सांगितला जातो. दिल्लीच्या वेद-वेदांताध्ययनशोध संस्थेने राष्ट्रीय स्तरावरच्या आयोजलेल्या शोधनिबंध सत्रांमध्ये भारतभरातून पाच रिसर्च स्कॉलर्स निवडले गेले. त्यांच्याखेरीज विविध विद्यापीठांतील प्राध्यापकांचा सहभाग होता. त्यात रिसर्च स्कॉलर म्हणून वसुमतीला सहभागी व्हायची संधी मिळाली. त्या चर्चासत्राची थीम होती- ‘माध्वचार्यांचं साहित्य’. तिचा विषय ‘माध्वदर्शन – एक अध्ययन’ हा होता. हिंदीतला हा ४४ पानांचा  शोधनिबंध सादर करायला ऐन वेळी फक्त १५ मिनिटे मिळाली होती. तिच्यावर अद्वैताचा पगडा आहे. तिचे संशोधनाचे विषय अद्वैत तत्त्वज्ञानाशी निगडित आहेत. त्यामुळे हा विषय तिच्यासाठी नवीन होता. ते तत्त्वज्ञान तिला फारसं पटतही नव्हतं. पण अद्वैत कळण्यासाठी द्वैतही कळायला हवं, असं तिला वाटलं. या परिषदेचं उद्घाटन ‘कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठा’चे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी केलं. तिच्या परिसंवादाचे अध्यक्ष ‘उत्तराखंड संस्कृत विश्वविद्यालया’चे माजी कुलगुरू प्रा. पीयूषकांत दीक्षित यांनी त्यांच्या भाषणात तिच्या शोधनिबंधाची आवर्जून दखल घेतली. हे चर्चासत्र यूट्यूबवरही लाइव्ह प्रसारित झालं.

एम. ए. भाग दोनला असताना लघुशोधप्रबंध सादर करावा लागतो. त्यासाठी तिने विषय घेतला होता- ‘अथर्ववेदातील सूक्तांचे दार्शनिक अध्ययन’. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे मराठीमधील हे पहिलंच संशोधन आहे. याआधी या विषयावर हिंदी (२०००) आणि इंग्रजी (१९८५) साली संशोधन झालं होतं. पूर्णत: हे संशोधन अथर्ववेदातील सूक्तांवरती आहे. त्यात असणारे दार्शनिक म्हणजेच तत्त्वज्ञानाचा अंश, परंपरा, बीजं यांचा संशोधनात्मक अभ्यास केला. या लघुप्रबंधाच्या अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठातील साहाय्यक प्राध्यापक आणि तिच्या मार्गदर्शक डॉ. शकुंतला गावडे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. शिवाय पुणे विद्यापीठातील डॉ. निर्मला कुलकर्णी यांचा वेदांच्या संदर्भातील अभ्यासात मदतीचा हात मिळाला. या अभ्यासविषयाची भूमिका मांडताना तिने लिहिलं की, ‘अथर्ववेदातील तत्त्वज्ञान शोधणं हा माझ्या वैयक्तिक आनंदाचा विषय आहे’. तिने दिवसातले ७-८ तास केवळ या लघुप्रबंधासाठीच काढले होते. उरलेल्या वेळात कामासाठीचं लिखाण सुरू होतं. ती काही दैनिकांमध्ये स्तंभलेखन आणि काही मासिकांमध्ये लेखन करते आहे. हे लेखन काही वेळा प्रासंगिक असलं तरी तिचा मुख्य लेखनविषय संस्कृत आहे. वसुमती सांगते की, ‘संशोधन करताना एकेका वहीत वाचलेल्या पुस्तकांची सविस्तर नोंद घ्यायची चांगली सवय मला डॉ. कल्पना आठल्ये यांनी लावली. प्रबंधासाठी द्यायच्या संदर्भांसाठी ती फारच उपयुक्त ठरली. त्यातच आवश्यक त्या नोंदी करायच्या ज्या पुढेही उपयोगी पडतात. मी ई ग्रंथालय फार कमी वापरलं. कारण आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय स्तरांवरच्या प्रबंधांच्या संदर्भांसाठी पुस्तकं, प्रत्यक्ष व्यक्तींच्या मुलाखती अधिक ग्राह्य धरल्या जातात. सुदैवाने मला पुस्तकं आणि व्यक्ती हे दोन्ही स्रोत चांगल्या तºहेने उपलब्ध झाले. आंतरजालाच्या कमी वापरामुळे संशोधनात लक्ष विचलित होण्याचा प्रकार कमी वेळा झाला. एम ए भाग दोनच्या या लघुशोधनिबंधात मला १०० पैकी ९३ गुण मिळाले होते.’

एमए भाग २ च्या तिच्या मार्गदर्शक डॉ. शकुंतला गावडे या मराठी तत्त्वज्ञान परिषदेच्या समन्वयक आहेत. त्यांनी तिचं नाव विश्वकोशातील नोंदीसाठी सुचवलं होतं. सुरुवातीला तिला तत्त्वज्ञ ‘प्लेटो’वर लिहायला सांगितलं गेलं. ती नोंद समीक्षकांना आवडली. मग ‘रा’ या इजिप्शियन देवतेवरची नोंद सांगितली. त्यानंतर आता अन्य इजिप्शियन देवतांच्या नोंदींचं काम सुरू आहे. तिला मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात कथालेखन स्पर्धेत रौप्यपदक मिळालं आहे. महाविद्यालयीन काळात कोमसाप आणि नाट्य परिषदेच्या चर्चासत्रांमध्ये ती सहभागी झाली होती. तिला तिच्या दादामुळे बुद्धिबळाची गोडी लागली. इतकी की ती कधीही बुद्धिबळ खेळू शकते. शालेय जीवनात ती राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी झाली होती. नंतर अभ्यासाच्या नादात बुद्धिबळ थोडं मागे पडलं. रत्नागिरीत महाविद्यालयात असताना ती पुन्हा बुद्धिबळ खेळायला लागली. तेव्हा मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात तिला बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं होतं. तिला शास्त्रीय संगीत खूप आवडतं. सध्या ती निषाद बाक्रे यांच्या सुरंजन ट्रस्टमध्ये शास्त्रीय संगीत शिकते आहे.

पीएचडी करायची हे तिचं पक्कं ठरलंच होतं. तिने नागपूरच्या ‘कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठा’त पीएचडीसाठी डिसेंबरमध्ये प्रवेश घेतला आहे. सध्या तिचे ऑनलाइन क्लासेस सुरू झाले आहेत. ती संस्कृत दर्शनशास्त्रामध्ये पीएचडी करते आहे. त्यासाठी अंदाजे साडेतीन वर्षांचा कालावधी लागणार असून हा प्रबंध ती संस्कृतमध्ये लिहिणार आहे. तिला संशोधक म्हणूनच पुढे करिअर करायचं आहे. सतत संशोधन करत राहणं किंवा शोध घेणं तिला आवडतं. पीएचडीनंतर पोस्ट डॉक्टरेट करायचं असून विविध स्तरांवरील संशोधन प्रकल्पांत सहभागी व्हायला आवडेल, असं ती सांगते. शुभास्ते पन्थान: सन्तु…!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 12:07 am

Web Title: the sweetness of philosophy sanskrit loving marathi hindi writing in english eloquence on presentation akp 94
Next Stories
1 आहे मनोहर तरी..
2 नवं दशक नव्या दिशा : जल-वायूवरची सफर
3 वस्त्रान्वेषी : नाद शिरोभूषणांचा..
Just Now!
X