|| संस्कृती शिंदे

अलीकडच्या काळात विदा अर्थात ‘डेटा’ हा जवळपास प्रत्येक क्षेत्रात परवलीचा शब्द झाला आहे. म्हणून ‘विदाविज्ञान’ अर्थात ‘डेटा सायन्स’ या ज्ञानशाखेला आणि त्यासंबंधीच्या अभ्यासक्रमाला महत्त्व येऊ  लागलं आहे. थोडी माहिती काढल्यावर विदाविज्ञान शाखेला येत्या काळात चांगली संधी मिळू शकेल, असं कळल्याने मी या विषयाचा अभ्यास करायचं ठरवलं. मुळात मी रुईया महाविद्यालयामधून बीएस्सी (स्टॅटिस्टिक्स) केलं आहे. खरं तर शेवटच्या वर्षांपर्यंत परदेशी जाऊन शिक्षण घ्यावं, असं काही ठरलं नव्हतं. मग विचार केला की, बाहेर राहिल्यास स्वत:च्या पायावर उभं राहता येईल. स्वावलंबी होता येईल. हा विचार घरी सांगितला. पालक म्हणून आईबाबांना थोडी काळजी वाटली होती, पण तरीही त्यांनी चांगला पाठिंबा दिला. आईचा चुलतभाऊ  माझा मामा ऑस्ट्रेलियात असल्यामुळे तिकडे जायचं ठरलं.

खरं तर मला ‘मास्टर्स ऑफ स्टॅटिस्टिक्स’ करायचं होतं. नंतर विदाविज्ञानाविषयी माहिती कळल्याने ऑस्ट्रेलियातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलॅण्ड’मध्ये ‘मास्टर्स इन डेटा सायन्स’ या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. मात्र परदेशात शिकायला जायचा निर्णय उशिरा ठरवल्यामुळे सगळी तयारी करायला थोडी घाई झाली. मी ‘एडव्हाईज’ या काऊ न्सेलिंग एजन्सीची प्रवेशप्रक्रियेसाठी मदत घेतली होती. जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात प्रवेश मिळाल्याचं कळलं आणि माझा अभ्यासक्रम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात सुरू होणार होता. त्यानंतर शैक्षणिक कर्ज, व्हिसा, तिकीट काढणं वगैरे व्यावहारिक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी कमी वेळ मिळाला आणि धावपळ झाली. आता इथे येऊन वर्ष झालं असलं तरीही पहिला दिवस आठवतोय अजून.. एकीकडे भारतातून निघताना आपण एकटं लांब जात आहोत, ही हुरहुर होती. तर दुसरीकडे नवीन गोष्टी शिकायला-पाहायला मिळणार म्हणून एक्साईटमेंट होती. विद्यापीठातील पहिला दिवस थोडासा गोंधळलेला होता. सगळ्या गोष्टी पटकन उमगल्या नव्हत्या. व्हॉलेंटिअर्सच्या मदतीने आणि रोजच्या वावरामुळे हळूहळू सगळ्या गोष्टींची माहिती होत गेली.

विद्यापीठाच्या दोन कॅम्पसपैकी आमची लेक्चर्स ‘सेंट लुशिया’ या ठिकाणी होतात. कॅम्पसचा मॅप असल्याने सुरुवातीच्या काळात त्याची खूप मदत झाली. बँकेत अकाऊंट उघडण्यासारख्या व्यावहारिक बाबींमध्ये मामाची मदत झाली. बस वगैरेंचे अ‍ॅप्स असल्याने त्या दृष्टीने वेळ, अंतर, स्टॉप आदींविषयी माहिती कळणं सोयीचं गेलं. काही विद्यार्थी अंतराच्या दृष्टीने विद्यापीठाच्या जवळच राहायची सोय बघतात. माझी मामाने भाडय़ाने घेतलेल्या घरात राहायची सोय झाली. आपल्याला भारतात कामाची सवय नसल्याने काम आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी करणं सुरुवातीच्या काळात थोडं कठीण गेलं. स्वयंपाक फार येत होता असं नाही, पण इथे आल्यावर तो करायला लागले आणि यायला लागला. मी एका रेस्तरॉंमध्ये रिसेप्शनिस्टचं पार्टटाइम काम करते आहे. इथले बहुतांशी विद्यार्थी शिकता शिकता पार्टटाइम काम करतातच. काम करणं या गोष्टीला महत्त्व दिलं जातं. उदाहरणार्थ – मी काम करते त्या रेस्तरॉच्या मालकांचा १४-१५ वर्षांचा मुलगा सबवेमध्ये काम करतो.

नोकरीसाठी केलेल्या अर्जात या विद्यापीठातर्फे दिल्या गेलेल्या गुण किंवा श्रेणीनुसार त्या त्या अभ्यासक्रमातील तितकी माहिती त्या व्यक्तीला आहेच, असं गृहीतच धरलं जातं. अभ्यासक्रमाच्या सुरुवातीच्या ओरिएंटेशन वीकमध्ये अभ्यासक्रमाची माहिती, विषयांची निवड, असोसिएशन्सची तोंडओळख झाली. नंतर विद्यापीठाची माहिती दिली गेली. विद्यापीठ दाखवण्यासाठी टूर काढण्यात आली. माझ्या अभ्यासक्रमाला अगदी ४०-४५ वर्षांच्या लोकांनी विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला आहे. इंडस्ट्रीतील १५-२० वर्षांचा अनुभव असूनही ते नवीन गोष्टी शिकायला आले आहेत. प्रॅक्टिकल माहिती देण्यावर अधिक भर दिला जातो. शक्य तेवढय़ा अपडेटेड गोष्टींवर प्रश्न विचारले जातात किंवा काही गोष्टी शिकवल्या जातात. तयार नोट्स हाती दिल्या जात नाहीत तर विद्यार्थ्यांनी माहिती मिळवून नोट्स काढण्यावर भर दिला जातो. असाईनमेंट, प्रोजेक्ट, रिपोर्ट ऑनलाइन सबमिट करावे लागतात. मध्यंतरी आम्ही ग्रुप प्रोजेक्ट केलं होतं. तेव्हा पहिलं प्रेझेंटेशन केलं होतं आणि मग रिपोर्ट सबमिट केला होता. मिळालेल्या मार्कासोबत कमेंटही लिहिलेली होती. मात्र थेट कुणाचं कौतुक होताना फारसं दिसत नाही. मात्र विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन लगेच केलं जातं. शिवाय मार्गदर्शनासाठी अकॅडमिक एडव्हाईजर असतात.

विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा खूप वापर होतो. ग्रंथालयात संगणकाचा वापर सर्रास होतो. अधिकांशी विद्यार्थी ग्रंथालयातच असतात. काही वेळा ग्रुपने अभ्यास केला जातो. एकमेकांच्या शंकांचं निरसन केलं जातं. ग्रंथालयात काही छोटय़ा रूम असतात. त्यांची आगाऊ  नोंदणी करून (बुक करून) तिथे एकटं बसून अभ्यास करायला प्राधान्य दिलं जातं. दिवसातले तीन-चार तास आणि आठवडय़ातले तीन दिवस ही रूम मिळते. या रूमसाठीची नोंदणी खूपच लवकर केली जाते आणि ती पटकन भरतेही. काही रूम ग्रुपस्टडीसाठी उपलब्ध असतात. आमच्या ग्रुपमध्ये चीन, ऑस्ट्रेलिया, सीरिया आदी देशांतील आणि विविध वयोगटातील विद्यार्थी आहेत. मोठय़ा वयाचे असले तरी या मित्रमंडळींचा अनुभव चांगला असतो, त्यांच्याकडून काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात; त्यामुळे वयातील तफावत तितकी जाणवत नाही. गणपतीत ग्रुपमधल्या एकाच्या घरी आग्रहाने जेवायला बोलावलं होतं. दिवाळीचं सेलिब्रेशन मात्र आमची परीक्षा असल्याने केलं नाही. आपले सगळे सणवार मराठी मंडळातर्फे साजरे केले जातात.

कॅम्पसमध्ये सतत काही ना काही इव्हेंटस् होतात. इथे ‘इंडियन असोसिएशन’सारख्या असोसिएशन्स आहेत. त्यांच्यातर्फेही अनेक इव्हेंट्सचं आयोजन केलं जातं. मात्र काही इव्हेंटच्या वेळी परीक्षा असल्याने तर कधी वेळेचं गणित न जमल्याने तर कधी जॉबमुळे मी फारशा इव्हेंटना उपस्थित राहिलेले नाही. योग क्लबच्या सतत अ‍ॅक्टिव्हिटीज सुरू असतात. त्यात मी सहभागी झाले होते. मात्र पुढे वर्गाची वेळ संध्याकाळची झाली आणि विद्यापीठातून घरी परतायला जवळपास तास लागत असल्याने त्यांना मी जाऊ  शकले नाही. शिवाय वीकएण्डला जॉब असतो. मग उरलेला वेळ अभ्यासात जातो. इथे फूडकोर्टची सोय आहे. काही ठिकाणी भारतीय पदार्थही मिळतात. दोन मामा आणि मोठी बहीण अशा कुटुंबासोबत राहात असल्याने मी खूप सुदैवी आहे. बहीण बऱ्याचदा स्वयंपाक वगैरे करते. आम्ही सगळी कामं वाटून घेतल्याने कुणाला कामाचा भार वाटत नाही. शिवाय एकमेकांचा अभ्यास-परीक्षा-काम यांच्या वेळा समजून घेऊन घरकाम केलं जातं. त्याउलट माझ्या काही मैत्रिणींसाठी हे सगळं एकटीने सांभाळणं, ही तारेवरची कसरत ठरते आहे.

सुरुवातीच्या काळात प्राध्यापकांचा अ‍ॅक्सेंट कळायला थोडा वेळ गेला. त्यातही सगळे प्राध्यापक ऑस्ट्रेलियातील नाहीत. तर रशिया, अमेरिका, चीन, ब्रिटन वगैरे देशांतलेही आहेत. त्यामुळे त्यांचे उच्चार बदलतात. नंतर त्यांचे उच्चार कळायला लागले आणि त्याची सवय झाली. अगदी त्यांच्या बोलण्यातले नेहमीचेच आणि ठरावीक शब्दही कळू लागले. पहिल्या सेमिस्टरमध्ये अभ्यासासह सगळं सेट व्हायला हवं, म्हणून मी जॉब केला नव्हता, पण बऱ्याचजणांनी जॉब करण्याचा सल्ला दिला. कारण त्या निमित्ताने खूप गोष्टी शिकायला मिळतात. अनेकजणांना भेटल्यामुळे माणसं कळतात. एकेक अनुभव आपल्याला शिकवत जातात. केवळ काही ग्रुपमध्येच राहिलं तर भाषा-संस्कृती-विचार कळण्याला थोडीशी मर्यादा येते. त्याउलट नोकरी केल्याने आपल्या विचारांच्या कक्षा थोडय़ा रुंदावतात. वेगळे आचार-विचार, भाषा-संस्कृती कळते. काम करताना काही लोक ‘कुठून आलीस’ वगैरे विचारतात. त्यांना भारताबद्दल कुतूहल वाटतं. ‘थँक्यू’ला हिंदीत काय म्हणतात, हे विचारलं होतं. कधी कधी क्रिकेटबद्दल गप्पा होतात. एका जोडप्याची मुलगी भारतात आली होती. त्यांनी कौतुकाने तिचे फोटो मला दाखवले होते. शिक्षण संपल्यावर इथे थोडी वर्षनोकरी करायचा विचार करते आहे. कारण शैक्षणिक कर्ज घेतलेलं आहे. त्यानंतर स्थायिक व्हायचं की भारतात परतायचं हा विचार करणार. चला, आता गप्पा पुरे. वेळ कमी आहे. विदाविज्ञानाच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी अभ्यास करायला लागते. बाय.

शब्दांकन : राधिका कुंटे