जंगली श्वापदांशी ‘त्यांची’ दोस्ती आहे.. जंगलबुकमधल्या मोगलीसारखी. पण शेरखान त्यांचा वैरी नाही, तर जंगलच्या या राजाला टिपायला दडून बसलेले ‘हिंस्र’ शिकारी त्यांचे वैरी आहेत. वाघांच्या संरक्षणासाठी ‘त्या’ घनदाट जंगलातल्या पायवाटा तुडवत असतात..दिवसाच नाही, तर रात्रीसुद्धा! स्वतचा जीव धोक्यात घालून जंगलाचं रक्षण करत असतात. ‘त्या’ – महाराष्ट्रातील विशेष व्याघ्र संरक्षण दलात कार्यरत तरुण मुली. ५ जूनच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पेंचच्या अभयारण्यात फिरून घेतलेल्या ‘त्यांच्या’ जंगलबुकातील नोंदींचा हा वेध.
‘ऐ जाते हुए लम्हो, जरा ठहरो जरा ठहरो..’ बॉर्डर चित्रपटातलं हे गाणं आठवलं की देशाच्या सुरक्षेसाठी धावणारे ते सैनिक, त्यांची ती धडपड असा पूर्ण पट डोळय़ांपुढे उभा राहतो. जीव धोक्यात घालून देशाच्या सीमेवर एकीकडे हे जवान शत्रूंशी लढत असतात. त्याच वेळी दुसरीकडे जंगल, वन्यजीव आणि पर्यावरणाच्या सुरक्षेसाठीही ‘ती’ पावले दररोज १५ ते २० किलोमीटरची पायपीट जंगलात करीत असतात. शिकारी कधी, कुठून, कसा निशाणा साधतील ठाऊक नाही, पण शिकाऱ्यांचा डाव उलटून पाडणं त्यांना चांगलंच ठाऊक आहे. एव्हाना त्यात ‘त्या’तरबेज झाल्या आहेत.
4
पर्यावरणाची मदार ही जशी जंगलावर अवलंबून आहे, तशीच त्या जंगलाच्या आणि पर्यायाने त्यातील वन्यजीवांच्या सुरक्षेची मदार वनखात्यावर आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल तैनात असतानाही अधिक जोखमीच्या कामात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान धावतात. तसेच जंगलाच्या सुरक्षेसाठी वनरक्षक असतानाही शिकाऱ्यांपासून जंगल आणि वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे जवान धावतात. या सुरक्षेत अलीकडच्या काळात तरुणाईची भूमिका तेवढीच मोलाची ठरली आहे. राज्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पात राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दल कार्यरत असून यात तरुणांचा सहभाग तेवढाच मोलाचा आहे. ९० जणांच्या दलातील ३० टक्के संख्या तरुण मुलींची आहे. या मुलींचे काम, त्यांचा दिनक्रम, त्यातला विरंगुळा सर्व जंगलाशी जोडला गेला आहे, हे त्यांच्याशी गप्पा मारताना जाणवले.
वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दल (एसटीपीएफ) तयार करण्यात आले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल(सीआरपीएफ)च्या धर्तीवर हे दल तयार करण्यात आले, तेव्हा पुरुषच नव्हे तर ३० टक्के महिलांचा त्यात सहभाग होता. खूप साऱ्या शारीरिक चाचण्या पार पाडून निवडीनंतर पुन्हा सहा महिन्याचे कठीण प्रशिक्षण इथे भरती होताना मुलींना घ्यावे लागते. इथे पुरुष आणि स्त्री अशा भेदाला वावच नाही. जेवढी पावले पुरुष सहकारी चालतात, तेवढीच या तरुण मुलींनाही चालावी लागतात. जंगलात जेवढय़ा खोलवर जवान जातात, तेवढेच त्यांनाही जावे लागते. मुळात खडतर प्रशिक्षणातून तावूनसुलाखून निघाल्यानंतर ही वाट त्यांच्यासाठी बिकट नसते, पण जंगलच्या लाइफस्टाइलशी जुळवून घेताना सर्वात मोठे आव्हान असते ते शिकाऱ्यांचे! वन्यजीवांच्या शिकारीसाठी लपलेला शिकारी कुठून, कसा नेम साधेल याचा अंदाज नाही. शिकाऱ्यांच्या बहेलिया टोळीने संपूर्ण भारतातील जंगलातच धुडगूस घातला आहे आणि सुरुवातीला मध्य प्रदेश तर गेल्या काही वर्षांत त्यांनी महाराष्ट्रातील जंगलला ‘टार्गेट’ केलं आहे. चेहऱ्यावरून साधीभोळी दिसणारी शिकाऱ्यांची ही जमात तेवढीच आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज! जंगलात शिरणं, वाघाला हेरणं आणि त्यावर निशाणा साधनं हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. अशा बहुरूपी शिकाऱ्यांशी सामना करताना राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलातली ही ‘दुर्गाशक्ती’देखील आता तेवढीच तयार झालीय. त्यातील काही पेंचला भेटल्या. प्रिया तागडे, प्रीती परतेकी, रुपाली बांते, कविता यादव, सपना मेश्राम, आरती फुले, आरती भाकरे, वर्षां दखणे, राणी ठोंबरे, कल्याणी रहिले, रोशनी ढोरे, अंजली तिवारी, ज्योती चोखांद्रे या सर्व तरुणी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आल्या आहेत. जंगलच्या जीवनाला त्या आता चांगल्या सरावल्या आहेत.
2
मध्य प्रदेश – महाराष्ट्राच्या सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या शिकाऱ्यांना तेथेच रोखण्यासाठी त्या सीमेवर जाऊन गस्त घालणे खरे तर कठीणच, पण ही आव्हाने पेलण्यास त्या समर्थ आहेत. हातातल्या एका काठीच्या भरवशावर राज्यातल्या जंगलांचे वैभव शाबूत राखण्यासाठी त्या सज्ज आहेत. त्यामुळे शिकारी असो वा गावकरी.. जंगल का कानून तोडणाऱ्यांचा आणि समोर येईल त्या आव्हानांचा सामना करायला त्या तयार असतात.
सकाळी सहा वाजता जंगलात गस्तीसाठी निघालेल्या या दुर्गाशक्तीला परतायला सायंकाळी पाच वाजतात. ही गस्त दिवसाची नव्हे तर आठवडय़ातून दोनदा रात्रीही जंगलात घालावी लागते. वन्यजीवांच्या जंगलातील हालचालींना सायंकाळी अंधार पडल्यानंतरच वेग येतो आणि शिकाऱ्यांच्या कारवायांनाही याच वेळी गती येते. अशा वेळी जबाबदारी ओळखून आणि जोखीम पत्करून जंगलात घुसणं महत्त्वाचं.
पेंच व्याघ्र प्रकल्पातल्या राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलाला जंगल भ्रमंतीच नव्हे तर मच्छीमारांपासून जंगलाच्या संरक्षणाचीही मोठी जबाबदारी आहे. पेंच नदीवर तोतलाडोह धरण आहे आणि गेल्या कित्येक वर्षांपासून येथील अवैध मासेमारीचा परिणाम जंगलाच्या सुरक्षेवर झाला आहे. पेंचमधल्या व्याघ्र संरक्षण दलातील या तरुणींना सुरुवातीची असाइनमेंटच या मच्छीमारांवर लक्ष ठेवण्याची मिलाली. बोटीतून तोतलाडोह जलाशयात गस्त घालावी लागली. अवैध मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या बोटी आणि त्या पाठीमागे असणारी माणसं पकडून या दुर्गाशक्तीने त्यांची ताकद दाखवून दिली. प्रिया, प्रीती, रुपाली, सपना, वर्षां, आरती, ज्योती, राणी अंजली आदी तरुणी त्या मच्छिमारांविरोधात्ील मोहिमेची अजून आठवण सांगतात..
बोटीतून गस्त हे सर्वाधिक धोकादायक काम. कारण मच्छीमार गोफणीतून गोटे फेकण्यात आणि गावठी बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात चांगलेच तरबेज आहेत. त्यांचा मारा चुकवत त्यांना विरोध करावा लागतो. या कामात कित्येकींनी मच्छीमारांच्या या माऱ्याचा सामनाही केला आहे. जीव धोक्यात घालून जंगलातल्या वन्यप्राण्यांचे आणि पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या या तरुणींना म्हणूनच सलाम!
दिवसभराच्या गस्तीतून थकलेली ही तरुणाई जेव्हा जंगलातल्याच आपल्या निवासात परत येते, तेव्हा करमणुकीसाठी काहीही नसतं. कुटुंबीयांपासून कोसो दूर असताना जंगलातून त्यांच्याशी संवादही साधता येत नाही. मोबाईल असतो खिशात, पण नावापुरता. कारण त्यासाठी लागणारं ‘नेटवर्क’ कुठलं एवढय़ा जंगलात मिळायला! कधी तरी जंगलात चुकून नेटवर्क मिळालंच तर घरच्यांशी संवाद होतो, पण रेंज कधी जाईल याची शाश्वती नसते. मग मोबाईलचा उपयोग काय तर गाणी ऐकायला. कधी ‘डाऊनलोड’ करून ठेवलेला चित्रपट पाहायचा. तेही नकोसं झालं तर कधी फुटबॉल तर कधी व्हॉलीबॉल खेळायचं.
5
वनरक्षक पदासाठी म्हणून अर्ज भरला तेव्हा आपल्या वाटय़ाला येईल हे त्यांनाही ठाऊक नव्हतं. निवड झाली आणि विशेष व्याघ्र संरक्षण दलात वर्णी लागली. जंगलातला तो पहिला प्रवास अजूनही अनेकींना लख्ख आठवतो. जंगलात आतपर्यंत चालतच होतो.. खूप वेळ चाललो.. वाटलं हे जंगल काही संपतच नाहीये. जंगली श्वापदांची भीती मनात.. पण त्यांचंच रक्षण करण्याची तर आपली जबाबदारी.. मनाला समजावत केलेला तो पहिला प्रवास थोडा जड गेला आणि आता तेच जंगल आपलंसं वाटायला लागलं. जंगलातनं वाट शोधता यायला लागली.. प्रत्येक जण सांगते. जंगलात गस्त घालताना वाघाशी पहिल्यांदा सामना झाला आणि अख्खी रात्र तो वाघ डोळय़ांपुढे येत राहिला. आयुष्यात पहिल्यांदा अवघ्या काही फूट अंतरावरून भल्यामोठय़ा जंगली वाघाचं दर्शन झालं तेव्हा मिळेल ती पळवाट शोधली. आता मात्र त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर असल्याने पळवाट शोधावी लागत नाही. उलट वाघ आणि इतर वन्यजीवांचा आता लळा लागलाय.. त्या सांगतात.

.. अखेर तिला पुन्हा पिंजऱ्यात घेतलं
पेंच व्याघ्रप्रकल्पातील खुल्या पिंजऱ्यात ठेवलेल्या वाघिणीला ‘रेडिओ कॉलर’ लावून जंगलात सोडण्याचा प्रयोग राबवण्यात आला, तेव्हा तब्बल महिनाभर याच तरुणींनी ती वाघीण जंगलात कोणत्या परिसरात फिरते आहे, शिकार करते आहे का, सहा वष्रे पिंजऱ्यात राहिल्यानंतर मोकळ्या अधिवासात ती नीट रुळली ना यावर देखरेख ठेवली. वाघिणीचा मागोवा घेत राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलातील या ‘वाघिणी’ तिच्या सोबतसोबत फिरत राहिल्या. पिंजऱ्यातल्या वाघिणीला जंगलात तिचा अधिवास निर्माण करण्यास अवघड गेलं. वाघिणीला जंगलात परत सोडण्याचा प्रयोग फसला आणि तिला पुन्हा पिंजऱ्यात घ्यावं लागलं. याची खंत या तरुणींना आजही आहे.

pune police warning goons after Salman Khan House Firing Case
सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, पुण्यातल्या ‘भाईं’ची झाडाझडती
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा

आणि मृत्यूच्या दाढेतून परतलो..

पेंचमधल्या व्याघ्र संरक्षण दलातील तरुणींना केवळ वाघाचे शिकारीच नाही, तर उपद्रव करून जंगलाचे पर्यावरण बिघडवणाऱ्या गावकऱ्यांचाही सामना करावा लागतो. त्यातल्या काही अनुभवांचा थरार त्यांच्या बोलण्यातून आजही जाणवतो. ‘उन्हाळय़ाचे दिवस होते.. आम्ही १५-२० मुली जंगलात गस्तीसाठी गेलो तेव्हा काही गावकरी बायका मोहफुलांसाठी जंगलात शिरल्या होत्या. त्यांना पकडले आणि तंबी देऊन सोडले, पण त्यांना सोडणे फारच महागाचे ठरले. कारण त्यांना केलेल्या अटकेचा बदला त्यांना घ्यायचा होता. मच्छीमारांशी संगनमत करून त्यांनी काही डाव रचला होता. आमच्या सहकाऱ्याचे वाहन फसले तेव्हा ते सोडवण्यासाठी आम्ही जाणार तोच त्या ठिकाणी गावातली ही मंडळी दबा धरून बसलेली होती. दरम्यान, एका दुसऱ्या सहकाऱ्याने याची माहिती दिली आणि मृत्यूच्या दाढेत जाऊन आम्ही परतलो..’