03 June 2020

News Flash

सोशल न्यूज डायजेस्ट

सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडिओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या?

| April 10, 2015 01:08 am

vn18सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडिओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

फेकू डे
‘एप्रिल फूल’ म्हणून ओळखला जाणारा एप्रिलचा पहिला दिवस यंदा नेटकरांनी ‘फेकू डे’ या नावानं साजरा केलाय. विविध आश्वासनांची केवळ बोलकी खैरात करणाऱ्या नेतेमंडळींच्या वागण्याचा वीट आल्याने ही ‘फेकू डे’ची कल्पना निघाली असावी. #FekuDay, #APrilFoolsDay अशा हॅशटॅगसह नेटिझन्सनी फेसबुक, ट्विटर आदी साइट्सवर आपला वैताग बोलका केलाय. ‘अच्छे दिन का एप्रिल फूल’पासून ते दिल्लीतल्या मोफत वायफाय घोषणेपर्यंत विविध घोषणांवर या वेळी टिप्पणी केली गेली. त्याखेरीज ‘एप्रिल फूल बनाया’ हे ‘फूल्स डे स्पेशल’ गाणे सोशल मीडियावर वाजत राहिले आणि पुन्हा एकदा आलिया भटवरून विनोदपेरणी होत राहिली. ‘आलिया भट एप्रिल फूल मागायला फ्लॉवर शॉपीत गेली’पर्यंतच्या मेसेजेसनी नेटकरांच्या स्माइलीज्ना जरा कामाला लावले होते.
‘यूटय़ूब’वर याच निमित्ताने एक व्हिडीओ अपलोड केला गेला. आयआयटी मुंबईच्या मूड इंडिगो टीमने हा व्हिडीओ टाकला होता. तो इतरही सोशल साइट्सवर व्हायरल झालाय. अवघ्या दोन दिवसांत त्याला ७,६५,९०६ व्ह्य़ूज मिळालेत. पण या व्हिडीओतून केवळ टीपी केला गेला नसून त्यात स्वच्छतेचा समाजोपयोगी संदेशही देण्यात आलाय. कसा ते पाहण्यासाठी ही लिंक- https://www.youtube.com/watch?v=hM8fM43Bej0

छुपा कॅमेरा
चेंजिंग रूम्समधल्या कॅमेऱ्यापासून सावधान, असे मेसेजेस किंवा व्हिडीओज अधूनमधून फॉरवर्ड होत असतात, पण सध्या ‘असा शोधा छुपा कॅमेरा’ हे व्हिडीओज नि मेसेजेस व्हायरल झालेत, कारण गोव्यातल्या ‘फॅब इंडिया’च्या शोरूममधील चेंजिंग रूममध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी छुपा कॅमेरा पकडलाय. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. चेंजिंग रूमच्या दिशेने कॅमेरा लावलेला दिसत होता. या प्रकरणाचा तपास चालू असतानाच कोल्हापूरमध्येही एका कर्मचाऱ्याने महिलेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करायचा प्रयत्न केला होता. या प्रकरणांचे सोशल साइटवर पडसाद उमटले असून #स्मृती इराणी, #फॅब इंडिया असे ट्रेण्डिंग चर्चेत होते.

रैना की शादी और आयपीएल धमाका
वर्ल्ड कपनंतरही #सुरेश रैना नि #दिल्ली हे ट्रेण्डिंग वरचढ राहिलेय, त्याला कारणही तसेच आहे. सुरेश रैनाच्या लग्नाचे फंक्शन दिल्लीत झालेय. रैनाची अर्धागिनी झालेली प्रियंका ही तेजपाल चौधरींची मुलगी असून सध्या ती अ‍ॅमस्टरडॅममध्ये बँकिंगमध्ये करिअर करत्येय. रैनाची आणि प्रियंकाची आई चांगल्या मैत्रिणी असून त्यांचे वडील मुरादानगर शस्त्रास्त्रांच्या कारखान्यात जॉब करत होते. आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन, भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टनकूल महेंद्रसिंह धोनी नि साक्षी धोनी, विराट कोहली नि अनुष्का शर्मा, वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, ईशांत शर्मा, ड्वेन ब्राव्हो, स्टिफन फ्लेमिंगसह चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी रैनाला शुभेच्छा दिल्या. वर्ल्ड कपपाठोपाठ थोडी चर्चा होतेय ती ‘आयपीएल’ची. त्यातल्या टीम्स, प्लेअर्सपासून ते मॅचेसपर्यंतच्या सगळ्या गोष्टींवर क्रिकेटफॅन्सची बारीक नजर आहे. त्यामुळे आपुन का सुपरस्टार, लव्ह द केकेआर जर्सी असे ट्रेण्ड दिसताहेत. टीमच्या थीम साँगपासून ते आपल्या आवडत्या खेळाडूंच्या गुणगानापर्यंत सगळे काही सध्या ट्विट, पोस्ट करून शेअर केले जातेय.

जय हनुमान, चंद्रग्रहण
हनुमान जयंतीच्या दिवशी #हनुमानजयंती या देवनागरीतल्या हॅशटॅगसह #hanumanjayanti  हा ट्रेण्ड वरचढ दिसत होता. त्यानिमित्ताने मारुतीचे विविध भावमुद्रांमधले फोटो, त्याचे श्लोक-स्तोत्र, प्रार्थना ट्विट होत होत्या. पोस्ट होत होत्या. हनुमान जयंतीचे निमित्त साधून सोनी टीव्हीवरच्या संकटमोचन महाबली हनुमान या मे महिन्यात सुरू होणाऱ्या मालिकेची घोषणा करण्यात आल्येय. याच दिवशी झालेल्या खंडग्रास चंद्रग्रहणामुळे खगोलप्रेमींचे डोळे संध्याकाळपासून आकाशाकडे लागले होते. ग्रहणादरम्यानच्या चंद्राच्या विविध कला, त्यामागची शास्त्रीय कारणे नि त्याबद्दलचे समज-गैरसमज यांची चर्चा सोशल साइट्सवर रंगली होती.
 
माय चॉइस
दीपिका पदुकोणचा गेल्या आठवडय़ात रीलिज झालेल्या माय चॉइस ची चर्चा अजून सोशल मीडियावर सुरू आहे. सेलेब्रिटी काय म्हणताहेत, दीपिकाला सपोर्ट कुणाचा वगैरे गोष्टी शेअर होताहेत. आर जे आणि व्हीजे म्हणून काम करणारा मंत्रा यानं मेन्स व्हर्जन ऑफ माय चॉइस तयार केलाय. या विडंबनाला नेटकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

रणवीरच ‘ऑपरेटिव्ह ट्विट्स’
सोशल नेटवर्किंग साइट्सचे वेड आपल्याप्रमाणेच सेलेब्रेटीजनाही लागलेले आहे नि त्यासाठी कायपण करायची त्यांची तयारी असते, हे सिद्ध केलेय अ‍ॅक्टर रणवीरसिंगच्या ‘ऑपरेटिव्ह ट्विटस’नी. एरवीही आपल्या बेधडकपणा नि स्टाईलस्टेटमेंटसाठी प्रसिद्ध असणाऱ्या रणवीरसिंगने त्याचं ऑपरेशन होताना ‘लाइव्ह ट्विट्स’ करून आपला मॅडनेस सिद्ध केलाय. ‘बाजीराव-मस्तानी’च्या शूटिंगदरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. फिजिओथेरपीचे उपचार फारसे प्रभावी न ठरल्याने त्याचे ऑपरेशन करण्याचे ठरले. त्याला भूल देईपर्यंत त्याचे ट्विट्स करणे चालू होते. पहिल्या ‘ट्विट’मध्ये त्याने त्याचा एक फोटो शेअर करून लिहिले होते, ‘लाइव्ह फ्रॉम ऑपरेशन थिएटर’ मग ‘मला इंजेक्शन दिले जातेय’, असे ट्विट त्याने केले. त्यानंतर मात्र त्याने ट्विट केलेले नाहीये. त्याला तीन आठवडे सक्तीची विश्रांती घ्यायला लागणारेय. दरम्यान, ट्विटरवर #ऑलदबेस्टरणवीरसिंग हा ट्रेण्ड वरचढ होता. त्याच्या चाहत्यांनी त्याला लवकरात लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा ट्विट केल्यात.

अँटी करप्शन अ‍ॅप
भ्रष्टाचाऱ्यांना पकडून देणारे अ‍ॅप अस्तित्वात आले तर.. आता ही कवीकल्पना प्रत्यक्षात यायची शक्यता निर्माण झाल्येय. आता भ्रष्टाचाराच्या विरोधात एक पाऊल पुढे टाकत दिल्ली सरकारने ‘अँटी करप्शन अ‍ॅप’ तयार करायचे ठरवलेय. या अ‍ॅपचा उपयोग करून ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्डिग सहजगत्या करता येणारेय. हे अ‍ॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करता येणारेय. या अ‍ॅपवर केले जाणारे व्हिडीओ ऑडिओ रेकॉर्डिग थेट सव्‍‌र्हरवर एकत्रित केले जाणारेय. अरविंद केजरीवालांनी भ्रष्टाचार थांबवण्यासाठी स्टिंग ऑपरेशन करण्याचा सल्ला यापूर्वीही जनतेला दिलाय.  

मेक धिस व्हायरल
आंबे, फणस व टपोरी जांभळे, करवंदे बाजारात यायला सुरुवात झाली आहे. यंदा या फळांच्या बिया कचऱ्यात न टाकता स्वच्छ धुऊन ठेवा. पावसाळ्यात आसपासचे बोडके डोंगर या बियांची वाट बघत आहेत. विचार करा, प्रत्येकाने टाकलेल्या बियांपैकी किमान एक बी रुजली तर किती झाडे निर्माण होतील? आपल्या मुलांसाठी भविष्याची तरतूद म्हणून जर आपण बँकेत पैसे ठेवतो तर ही फळे त्यांना मिळण्यासाठी आपण प्रयत्न केलेच पाहिजेत. आपला उपक्रम इतरांनाही सांगा.
viva.loksatta@gmail.com                                        

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2015 1:08 am

Web Title: top social media news 5
Next Stories
1 सोशल व्हिडीओ खपतात राव!
2 तुमचा चॉइस काय?
3 लेट्स गो पार्टी
Just Now!
X