विनय नारकर viva@expressindia.com

मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।

Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
Rajnath singh
“मासे खा, डुक्कर, हत्ती खा नाहीतर घोडा खा, पण…?” तेजस्वी यादवांच्या व्हीडिओवर राजनाथ सिंहांचा टोला
simple tips and yoga to reduce PCOS problem
स्त्रियांनो, ‘PCOS’ चा त्रास कसा कराल कमी? आराम मिळण्यासाठी समजून घ्या तज्ज्ञांनी सुचविलेली ही पाच आसने
infants with spina bifida surgery possible in the mother s womb
आईच्या गर्भातच होणार बाळावर शस्त्रक्रिया; स्पायना बीफिडाग्रस्त मुलांना मिळणार दिलासा

बापरखुमादेवीवरीं विठ्ठली अर्पिला ॥

ज्ञानेश्वरांनी भक्तिमोगऱ्याने विणलेला शेला त्यांच्या प्रिय विठ्ठलांस अर्पण केला. महाराष्ट्रातील रसिकही गेली शेकडो वर्षे रेशमाने विणलेला शेला आपल्या प्रियजनांना भेट करत असतात.

सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला॥

कवी ग्रेसनी वर्णिल्याप्रमाणे शेला कायम आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण करून देत राहतो. एक तेराव्या शतकातील कवी व एक विसाव्या शतकातील कवी, दोघांनाही भुरळ घालणारी एक प्रतिमा, ‘शेला’. मराठी स्त्री – पुरुषांनी ज्या वस्त्र प्रकारावर भरभरून प्रेम केले असे वस्त्र ‘शेला’. एवढेच नव्हे तर इंदिरा संतांच्या पहिल्या स्वतंत्र काव्यसंग्रहाचे नाव काय, तर शेला.. त्यातील पहिली कविता म्हणजे ‘शेला’. इंदिराबाईंच्या मनालाही या प्रतिमेची किती ओढ वाटत असेल हेच यातून दिसून येते. त्यांनी या कवितेत ‘शेल्या’च्या आधारे निर्माण केलेली प्रतिमासृष्टी पाहा.

चारुदत्त हा कोण कोठुनी, अंगावरला फेकित शेला

वसंतसेना वसुंधरेने, झेलून तो हृदयाशी धरला

तसेच, गदिमांच्या प्रसिद्ध ‘कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम’  या गीतातही कबीर ‘शेला’च विणतो आहे. मराठी मनाच्या भावविश्वात शेल्याचे हे असे स्थान आहे. आज हा वस्त्र प्रकार नाहीसा झाला आहे असं नाही म्हणता येणार, पण त्यांचं रूप मात्र बदललं आहे. कदाचित त्याचमुळे शेल्याचं हळवं स्थानही डगमगतंय. तरीही शेल्याबद्दलच्या कविसंरक्षित आठवणी मात्र आपल्या मनांत रुंजी घालत राहतात.

शेला हे एकमेव असे वस्त्र असावे की जे स्त्री व पुरुष दोघे वापरू शकतात. पुरुषांच्या पेहरावाचे दोन महत्त्वाचे घटक शिरोभूषण आणि धोतर याबद्दल आपण जाणून घेतले. पुरुषांच्या पेहरावाचा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘शेला’. परंतु शेला ही फक्त पुरुषांची मक्तेदारी राहिली नाही. शेल्याच्या वापराने स्त्रियांच्या पेहरावाला एक वेगळाच डौल आणि पुरुषांच्या पेहरावाला एक रुबाब येत असे. धर्मशास्त्राप्रमाणे ‘द्विवस्त्र’ असणे गरजेचे होते, हे आपण आधीच्या लेखात पाहिले. या दोन वस्त्रांपैकी एक म्हणजे ‘उत्तरीय’, शरीराच्या वरच्या भागासाठी असलेले वस्त्र. भारतीय पुरुष अंगरखे, सदरे वापरू लागल्यानंतर उत्तरीय हे बऱ्याच अंशी शोभेचेच वस्त्र राहिले. शेला हे एक प्रकारे उत्तरीयाचेच विकसित स्वरूप म्हणता येईल.

छत्रपती शिवाजींच्या काळात शेला हा विलासी वस्त्र म्हणता येण्यासारखा विकसित झाला नव्हता. पेशव्यांच्या काळात मात्र शेल्याने विलासी वस्त्राच्या रूपात खूप प्रगती केली. हे शेले बहुतांश वेळेस पैठणचेच असायचे. पुरुषांच्या पेहरावाचे पैठणला बनणारे प्रकार म्हणजे.. पगडी, शेला आणि पीतांबर. पेशवेकाळात ज्याप्रमाणे पैठणी बहरली, त्याचप्रमाणे शेलाही बराच नावारूपाला आला. आधी साधे जरी पदर असलेले शेले पैठणीसारखे वेलबुट्टीचे पदर मिरवू लागले. पैठणीत विणल्या जाणाऱ्या बहुतांश नक्षी शेल्यामध्येही विणल्या जाऊ लागल्या. अगदी आसावली काठांसारखे अवघड काठही शेल्यामध्ये विणले जाऊ लागले. आसावली काठाचा शेला सर्वात किमती शेल्यांपैकी होता. पेशव्यांच्या जीवनशैलीमध्ये शेले किंवा दुपट्टे यांचे विशेष स्थान होते. पेशव्यांच्या पत्रव्यवहारावरून याविषयी माहिती मिळते. माधवराव पेशव्यांनी नाना फडणविसांना लिहलेले पत्र याप्रमाणे आहे, ‘विनंति उपरी, सोवळ्यांत पांघरण्यास दुपट्टे धुवट लांब सात हात व रुंद तीन हात याप्रमाणे येकपटी, मधी शिवण नाही. असे बारीक चांगले मुलाईम दोन्ही पदरास मात्र गोल जर तीन बुटे रुंद, काठास जर नसावी अशा तऱ्हेचे पांच सात चंदेरीचे अगर जैनाबादी याप्रमाणे अगर शहागडी अथवा पैठणी यांत जे मिळतील ते, परंतु बारीक व मुलाईम याप्रमाणे पाठवून देणे’. (पे. द. ३२)

याशिवाय आणखी एक पत्र आहे. ‘चि. रा. नारायणराव याच करिता पोशाखास पैठणी दुपट्टे तीन हात रुंद, व पांच हात लांब याप्रमाणे, पदरास जर आसवली अथवा नारळी पदराची अथवा साधी आठ बोटे, सहा बोटे व किनारा जाफरखानी घडीदार, अथवा आसवली अगर नकसी. याप्रमाणे सणगे २ लाल, २ बनोस, २ गुलाबाची दोन हिरवी, दोन केशरी एकूण दहा दुपट्टे लिहल्याप्रमाणे जामदारखान्यांत असल्यास पाठविणे. नसल्यास नवे खरेदी करून पाठविणे’. (पे. द. ३२, १७६८) यावरून दुपट्टा हाही शेल्यासारखाच एक प्रकार असावा हे लक्षात येते. वापरानुसार शेल्याचे काही प्रकार होत. एक तर शेला इतका मोठा असायचा की शाल आणि शेला हे दोन्ही हेतू साध्य व्हावेत. दुसरा प्रकार होता जो खास दरबारात जाण्यासाठी मंडळी वापरत असत आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे अगदी भरजरी शेले, फक्त राजपरिवार, सरदार किंवा श्रेष्ठीच वापरू शकत असत. धार्मिक कार्यक्रमातही शेले नेसले जात. पुरुंषांच्या कमरेलाही शेला बांधण्याची पद्धत होती. भालदार आणि चोपदार, तसेच अन्य काही दरबारी सेवकही कमरेला शेला बांधत असत. राजदरबारात शेला देऊन सरदारांना सन्मानित केले गेले असता, लागलीच तो शेला कमरेला बांधण्याचा प्रघात होता. कमरेभोवती बांधल्या जाणाऱ्या एका विशिष्ट शेल्यास ‘बस्ता’ असेही म्हणत.

शेल्याप्रमाणेच शालजोडी हे महावस्त्र प्रतिष्ठेचे समजले जात असे. शालजोडी म्हणजे लोकरीची दुहेरी शाल. या जोडीतल्या एकेरी वस्त्रास, ‘फर्द’ म्हणत. शालजोडीला ‘दुशाला’ असेही म्हटले जात असे. शाहीर परशरामाच्या एका लावणीत,  ‘शालू रंगलाल वर पिवळी दुशाला’. आणि ‘विनायकाच्या कविता’मधील एका कवितेत  ‘मृदुशय्येवर जी पहुडावी ओढुनि तलम दुशाला’, अशा ओळी आल्या आहेत. शालजोडी उच्चभ्रू लोकात फार प्रिय होती. पण सर्वच जण शालजोडी वापरतील असे नव्हते. दरबारी मानकरी, शास्त्री, पंडित, विद्वान हे बहुत करून शालजोडी वापरत असत. या प्रामुख्याने काश्मीरमध्ये विणल्या जात व दिल्लीच्या बाजारातून महाराष्ट्रात येत. १७४५ साली पेशव्यांनी दोनशे शालजोडय़ा मागवल्याचा उल्लेख सापडतो. शालजोडी देणे हा एक मोठा बहुमान असे. हिंदूंना पांढरी शालजोडी व मुस्लिमांना हिरवी शालजोडी देण्याचा रिवाज होता. या शालजोडीमुळे मराठीला एक लोकप्रिय वाक्प्रचार मिळाला. आडून किंवा उपरोधिकपणे बोलणे किंवा टोमणा मारणे या अर्थी ‘शालजोडीतून मारणे’ किंवा ‘शालजोडीतला देणे’, असे वाक्प्रचार रूढ झाले आहेत. याशिवाय एक म्हणही आहे, ‘शालजोडीला रकटय़ाचे ठिगळ’. विजोडपणा दाखवण्यासाठी ही म्हण वापरली जाते.

शाहीर परशरामाच्या एका लावणीत, विसंगत वागण्याचा दाखला देताना, ‘द्यावी बहुरूप्याला शालजोडी। नीच हीन जातीचा जोडी ॥’ असे म्हटले आहे. कोकणातील एका ओवीत म्हटलंय, ‘माझ्या चुडियाचं सोनं बरफीची वडी, बापाजीराय पारख्यांना शालजोडी’. ग्रामीण भागात विवाहप्रसंगी गायली जाणारी बरीच पारंपरिक गाणी असतात. त्यापैकी हे एक गाणं..

‘आधी मूळचिठ्ठी घुंगराची गाडी

देवगुणी राज शालजोडी ती वराडी’

एका ओवीतही शालजोडीचा उल्लेख आला आहे,

‘सारव्या गोतामंदी नंदबाईची आवईड

माझ्या पती पाटची शालजोड’

अशाच आणखी ओव्यांमधून शालींचे स्वरूप, जसे यांचे काठ, या कुठे विणल्या जात याविषयीही माहिती मिळते.

‘लालीलाल अंगावर शाल रूईफुल काठ जी’

‘जांभळ्यात घोडीची नेटकी चाल

जिथं पाऊल पडलं तिथं कोलापुरी शाल’

शाहीर कृष्णदास त्याच्या, ‘बाजीराव महाराज अर्जी ऐकतो बायकांची’ या लावणीमध्ये म्हणतो, ‘भरजरी दिला पोशाख दिली शालजोडी कलाबतुची’.

अभिजन स्त्रिया विशेष प्रसंगी तर काही समाजामध्ये घरातून बाहेर पडताना स्त्रिया आवर्जून शेले किंवा शालजोडी नेसत असत. शेल्यामुळे एक डौलदार रूप येतच असे, शिवाय चोळी आणि लुगडय़ामधले शरीरही झाकले जात असे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात संगीत नाटकांची लोकप्रियता वाढत होती. ही बहुधा पौराणिक कथांवर असत. त्यातील स्त्री पात्रे बहुतेकदा शेला नेसत, त्यामुळेही शेले वापरण्याची फॅशन खूपच रंगली.

एका वीरक्षेत्री लावणीत म्हटले आहे, ‘दुसरे दिवशी भडक शालू लाल, पैठणचा भर गोल, अंगावर गुलेनार घेई शाल’.

तसेच, परशरामाच्या एका लावणीत म्हटले आहे, ‘उदी शाल आंत साज भरजरी तंग काचोळी तडाडी’.

शालीबद्दल एक सुंदर पौराणिक कथाही आहे. मरकडेय मुनींनी त्यांच्या भावनाऋषी या पुत्रास, वस्त्रनिर्मितीच्या साधनांचा शोध घेण्यास वैकुंठात विष्णूकडे पाठविले. त्यानुसार विष्णूकडे त्यांनी प्रार्थना केली असता, विष्णूने भावनाऋषीस मार्गदर्शन केले आणि आपल्या नाभीकमलातून, पद्मनाल म्हणजे देठ देऊन, त्यापासून तंतू काढून वस्त्रनिर्मिती करण्यास सांगितले. त्यानुसार भावनाऋषींनी हातमाग बनवून त्यावर पद्मतंतूपासून शाल विणली. ती पाहून विष्णू प्रसन्न झाले व त्यांना ‘पद्मशाली’ हे नाव दिले. एक प्रकारे ‘शाल’ हे आद्यवस्त्र आहे.       क्रमश: