दिवाळीसारखा उत्सव साजरा करायला पारंपरिक कपडेच  हवेत. त्यावर दागिनेही तसेच लागणार.  पण मग  त्या सगळ्या अवताराला ‘काकूबाई लूक’ तर येणार नाही ना, याची चिंता वाटते ना ! दिवाळीत स्टायलिश पण तितकाच ट्रॅडिशनल लूक कसा करता येईल? कुठल्या साडीवर कोणते दागिने घालाल?
दिवाळी हा वर्षांतला असा सण आहे, ज्याची वाट प्रत्येकजण आतुरतेने पाहत असतो.  गृहिणीला तिचे पाककलेचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळते, नोकरदार वर्ग बोनसची वाट पाहत असतो, धंदेवाईक नवीन वर्षांच्या स्वागतासाठी सज्ज असतो तर बच्चेकंपनी गिफ्ट्सची वाट बघत असतात. असा वर्षांतला हा एकमेव सण आहे. गावातल्या आजी- आजोबांच्या गाठोडीतल्या पुराणातल्या खास गोष्टी ते रांगोळीतल्या सप्तरंगांपर्यंत दिवाळीतला प्रत्येक क्षण सगळ्यांसाठी स्पेशल असतो. मग या दिवसांत तरुणींचं फॅशनचं डिपार्टमेंट कसं मागे राहील. मुलगी कितीही मॉडर्न म्हणवत असेल स्वतला तरी या दिवसांमध्ये तिलाही खास पारंपरिक साडी किंवा ड्रेस घालायचा मोह आवारत नाही आणि आवरूही नये. दिवाळीच्या दिवसांमध्ये पारंपरिक साडी किंवा ड्रेसचा तोरा काही औरच असतो. पारंपरिक ज्वेलरी आपण एकदा तरी घालावी असं प्रत्येकीला वाटत. पण मुळात या पारंपरिक लुकमध्ये आपण काकूबाई तर दिसणार नाही ना ही भीती पण सतावत असते. त्यामुळे नकोच तो ट्रॅडिशनल लुक आणि नको ती साडी असा विचार आपण करतो. पण असं न करता या दिवाळीत स्टायलिश पण तितकाच ट्रॅडिशनल लुक कसा करता येईल याबाबत आज आपण बोलू या.

नेकलेस
* नेकलेस निवडताना तुमच्या साडीचा किंवा ड्रेसचा बेस कलर कोणता आहे ते पडताळून घ्या. ज्वेलरीचा बाज सिल्वर किंवा गोल्डन हा त्यानुसार निवडा. म्हणजे सोनेरी जरीच्या साडीवर चांदीचे दागिने घालण्यापेक्षा सोन्याचेच उठून दिसतील. याउलट जरदोसी किंवा चंदेरी जरीचा काठ असेल तर इतर पर्यायांचा विचार करू शकताय
* गोल्डन बेसच्या साडीवर कुंदनचा नेकलेस घालता येऊ शकतो. ठुशी, चोकरसारखे गळ्याला गच्च बसणारे नेकलेस साडीवर छान दिसतात.
* मोत्याचा नेकलेस सिल्कच्या साडीवर घालणे टाळा. कॉटनच्या साडीवर मोत्याचा नेकलेस खुलून दिसतो.
* नेकलेस निवडताना मोत्यांचा योग्य रंग निवडणे महत्त्वाचे असते. पिवळे मोती डार्क रंगांवर आणि सफेद मोती फिकट रंगांबरोबर खुलून दिसतात.   
* सिल्वर बेसच्या अनारकलीजवर सिल्वर प्लेटिंगचा हिऱ्याचा नेकलेस घालू शकता किंवा प्लॅटिनमचे दागिने घालू शकता.
* जर तुम्ही डिप बॅक असलेला ड्रेस निवडणार असाल तर नाजूकसा नेकलेस निवडा. परंतु नेकलेसच्या मागच्या बाजूला छानपकी लटकन लावा. प्रामुख्याने जर मोत्याचे पारंपरिक दागिने घालत असाल तर मागे लटकणाऱ्या गोंडय़ाला छान लटकन तुम्हाला लावता येतील. त्यामुळे तुमच्या पेहरावाला बोल्डनेस मिळेल आणि गोंडा लपवायची पंचाईत पण होणार नाही.

बांगड्या
* हातभार बांगडय़ा घालण्याऐवजी स्टेटमेंट कडय़ांना सध्या जास्त पसंती दिली जाते.
* साडीवर मोत्याचे किंवा ठुशी, कोल्हापुरी साजसारखे पारंपरिक नेकलेस घातल्यास तोडे घालू शकता.
* अनारकलीज्वर ज्वेल्ड घडय़ाळ घालून बांगडय़ांना रजा देऊ शकता.
या सर्वासोबतच बाजूबंद, अंगठय़ा, ब्रोच असे दागिन्यांचे प्रकारही वापरायला काही हरकत नाही. फक्त मिक्स मॅचचा मंत्र लक्षात असू द्यात. दागिन्यांची निवड करताना एक दागिना फोकसमध्ये असू द्यात आणि इतर दागिने त्याला जोड म्हणून घाला. सर्वच दागिने भरजडित घालण्याच्या हट्टात कोणत्याही दागिन्यावर पूर्ण फोकस जाणार नाही. त्यामुळे असं करणं टाळाच.

इअरिरग्ज
* सहसा आपण नेकलेसबरोबर असलेले इअरिरग्स घालण्यात समाधान मानतो. परंतु यावेळी दिवाळीत या प्रथेला फाटा देऊ शकता. नेकलेस आणि इअरिरग्स असा पूर्ण सेट घेण्याऐवजी थोडं मिक्स मॅच ट्राय करा. त्यामुळे लिमिटेड ज्वेलरीमध्येदेखील तुम्हाला व्हरायटी मिळवता येईल.
* साडीवर स्टडेड इअरिरग्स घालू शकता. या इअरिरग्सच्या मागच्या बाजूस मोत्यांची वेल लावल्यास तुमच्या लुकला छान उठाव येईल. अनारकली किंवा सलवार सूट घातल्यास लॉँग इअरिरग्स घालून नेकलेसला रजा देऊ शकता.
* जर तुम्ही कुंदन किंवा मोत्यांचा भरगच्च हार घालणार असाल तर लांब इअरिरग्स ऐवजी छोटेसे  टॉप्स घाला.
* सध्या गोलाकार स्टडेड इअरिरग्सचा ट्रेन्ड आहे. ही इअरिरग्स सर्व प्रकारच्या चेहरापट्टीवर खुलून दिसतात. फक्त ज्यांचा चेहरा गोलाकार आहे त्यांनी स्वेअर स्टडेड इअरिरग्स निवडाव्यात. जेणेकरून त्यांचा चेहरा फुगीर दिसणार नाही.

हेअर अ‍ॅक्सेसरीज
* सध्या हेअर अ‍ॅक्सेसरीला मोठी डिमांड आहे. साडी किंवा ड्रेसवर केस मोकळे सोडण्याऐवजी मस्त फ्रेंच रोल बांधल्यास यात तुम्ही वेगवेगळ्या हेअर अ‍ॅक्सेसरीज् घालू शकता.
* हेअर अ‍ॅक्सेसरीवर स्मार्ट ऑप्शन म्हणजे तुमच्याकडील नाजूकशी मोत्यांची सर केसात लावू शकता.
* हेअर अ‍ॅक्सेसरीचा विषय निघाल्यावर मांगटिक्काला पर्याय नाही. छोटासा मांगटिक्का किंवा बिंदी साडीला मस्त लुक देईल.

कमरपट्टा
* कमरपट्टा हा सध्या ट्रेंडमध्ये आहे. पिनअप केलेल्या पदरावर कमरपट्टा छान दिसतो.
* अनारकलीवरदेखील ओढणी वरून कमरपट्टा घातल्यास जरा हटके लुक मिळेल.

छाया : अनिकेत आरोटे
मॉडेल : श्रुतिका बोडके