News Flash

ट्रान्स पे डान्स

‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले..’ केवळ प्रेमात पडल्यावर नाही तर ‘ट्रान्स’ ऐकतानासुद्धा हीच अनुभूती येते. काही मिनिटं एकही शब्द नाही, फक्त वाद्यांचे नाद कानात घुमत

| August 29, 2014 01:04 am

‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले..’ केवळ प्रेमात पडल्यावर नाही तर ‘ट्रान्स’ ऐकतानासुद्धा हीच अनुभूती येते. काही मिनिटं एकही शब्द नाही, फक्त वाद्यांचे नाद कानात घुमत असतात..पाय थिरकत असतात..मन प्रफुल्लित होऊन गेलेलं असतं. एकाही शब्दावाचून आपण शब्दांच्या आणि स्वत:च्याही पलीकडे जाऊन पोहोचलेले असतो. ही कमाल वाद्यांची असेल, वाजवणाऱ्याची असेल, रसिकतेची असेल किंवा संगीतप्रेमाचीसुद्धा! गणेशोत्सव म्हणजे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय. ढोलताशाच्या गजरात गणपती बाप्पाचा आगमन सोहळा वाजतगाजत होतोच आणि त्याला साथ लाभते ती नृत्याची. नृत्य हा व्यक्त होण्याचा एक मार्ग आहे. फक्त आगमन सोहळ्यातच नाही तर विसर्जन मिरवणुकीतही त्याचाच प्रत्यय येतो. ‘ट्रान्स गणेशा’च्या माध्यमातून हाच प्रयत्न केला जातो. ट्रान्स गणेशा म्हणजे जिथे गणपती विसर्जनाच्या वेळी ट्रान्स म्युझिकच्या तालावर प्रत्येक जण ठेका धरत असतो. महालक्ष्मी बाल संघ, महालक्ष्मी मंदिराचा गणेश विसर्जन सोहळा यासाठीच आगळावेगळा ठरतो. मोठय़ा साऊंड सिस्टीमच्या साहाय्याने ट्रान्स म्युझिकच्या इलेक्ट्रॉनिक बीट्सच्या तालावर लाडक्या गणपती बाप्पाला कण्टेम्पररी स्टाइलने निरोप दिला जातो. सर्वाना विविधतेतून एकत्र आणण्यासाठीचा केलेला हा प्रयत्न आहे.

ट्रान्स हा इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिकचा प्रकार जगभर फेमस आहे नि आता आपल्या देशातही फेमस झालाय. ही संगीतशैली ९०च्या दशकात जर्मनीमध्ये विकसित झाली. या संगीताची लय १२५ ते १६० बीट्स प्रतिमिनिट इतकी असते. ट्रान्स म्युझिकमध्ये सिंथेसायझर, कीबोर्ड, ड्रम मशीन, सिक्वेन्सर, सॅम्प्लर या वाद्यांचा वापर होतो. पुनरावृत्ती, ध्वनिमाधुर्य आणि सांगीतिक स्वरूप यांच्या बांधणीतूनच म्युझिकल ट्रॅकची निर्मिती होत असते. ट्रान्स म्युझिकला स्वत:चे असे वैशिष्टय़ असले तरी त्यात टेक्नो, हाऊस, पॉप, चिल आऊट, क्लासिकल आणि फिल्म इलेक्ट्रॉनिक म्युझिक समाविष्ट होते.
अनेक ट्रेण्ड येतात आणि जातात, पण काही ट्रेण्ड खूपच फेमस होतात. सध्याच्या घडीला ट्रान्स त्यापकीच एक! सध्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पिढीत बरेच ट्रान्सलव्हर्स आणि ट्रान्सफॉलोअर्स आहेत. अर्मिन वॅन बुरेन, टिस्तो, ख्रिस्तोफर लॉरेन, अलेक्स गोल्ड, निकी रोमेरो हे लोकप्रिय डी. जे. आर्टस्टि आहेत. यांचे फॅन्स त्यांच्यावर इतके भाळलेले आहेत की त्यांचे फोटो फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर डिस्प्ले पिक्चर म्हणून ठेवतात. ट्रान्सच्या फेसबुक पेजवर लाइक्सची संख्या लाखाच्या घरात आहे. या पेजवर आणि व्हॉट्सअ‍ॅपवरसुद्धा ट्रान्स म्युझिकचे शेअिरग चालूच असते. काही जणांच्या िरगटोनवरसुद्धा ट्रान्सच वाजत असते. इतकेच काय लग्नाच्या वरातीत निकी रोमेरोचे ट्रान्स ऐकले तेव्हा ट्रान्सप्रेमाची दादच द्यावीशी वाटली. निकी रोमेरोचा फॅन असलेला विक्रांत चौगुले सांगतो, ‘ट्रान्स ऐकल्यावर खूप छान वाटते. शीण नाहीसा होतो. कट्टय़ावर मित्रमंडळी जमल्यावर आम्ही ट्रान्स ऐकतो व एकत्र आनंद घेतो.’ अपोलो, अ‍ॅनिमल, सटायटेनियम, स्पेसमॅन हे मोस्ट फेवरेट ट्रान्स असल्याचे त्याने सांगितले. तर कौस्तुभ साने म्हणाला, ‘ट्रान्स म्हणजे ओन्ली डान्स! महादेवा, सनट्राइब, अर्मिन वॅन बुरेनच ट्रान्स ऐकतो. ते ऐकल्यावर खूपच भारी वाटते.’ पब, डी.जे. पार्टीज, म्युझिकल फेस्टिव्हलमध्ये ट्रान्स हमखास असते. ट्रान्समय वातावरणात जणू सगळ्यांना संमोहित केलेले असते आणि देहभान विसरलेले असतात. त्या वातावरणाची िझगच जणू चढलेली असते.
हे ट्रान्सप्रेमी एकाच वेळी मोठय़ा संख्येने जमतात ते ‘सनबर्न’ फेस्टिव्हलला. या फेस्टची क्रेझ तरुणांमध्ये दिसून येते. सनबर्न हा आशियातील सर्वात मोठा आणि भारतातील प्रमुख इलेक्ट्रॉनिक म्युझिक बॅण्ड होिस्टग फेस्टिव्हल मानला जातो. २००७ मध्ये गोव्यात सुरू झालेला हा फेस्ट आता भारतातील प्रमुख शहरांतसुद्धा होऊ लागला आहे. सनबर्नचा अनुभव घेतलेला विपिन हंकारे सांगतो, ‘ते वातावरणच वेगळे असते. वातावरणाचा आपण एक भागच बनून जातो. पण डी.जे.ने ट्रान्समध्ये बॉलीवूड वाजवले की बोअर होते. सनबर्नला न्यूक्लिया डीजे फाडू होता. मित्रांसोबत खूप एन्जॉय केलं.’ पाश्चिमात्य पेहराव, खानपान यासोबत आता कला संगीत या गोष्टींनी भारतीयांना वेड लावलंय. तरुणाई त्यात एकरूप होतेय. आनंदाने आत्मसात करतेय हे विशेष!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:04 am

Web Title: trance formations of dance
Next Stories
1 खाबुगिरी : सात्त्विक ‘आस्वाद’!
2 क्लिक : गायत्री उमर्ये,
3 व्हिवा दिवा : श्रद्धा नांदूर
Just Now!
X