मन.. म्हटलं तर मनाचा काय ठावठिकाणा. उगाच नाही अजूनही अनेकांना मनाचं कोडं सुटलेलं आणि उगाच नाही पूर्वीपासून मन चंगा तो कटौती में गंगा असं म्हटलेलं. एरवी आपण चार शिंका आल्या तरी डॉक्टरांकडं धाव घेतो. पण शारीरिक दुखणं असतं तसंच मनही दुखावू शकतं. मानसिक आजार होऊ  शकतात, हेच मुळी अनेकदा पटकन लक्षात येत नाही अनेकांच्या. कारण एकतर ते शारीरिक आजारांसारखे दिसत नाहीत आणि समजा तसं काही वाटलं तरी अजूनही त्याबद्दल अनेक चुकीच्या समजुती आपल्याकडं दिसतात. मानसिक आरोग्य म्हणजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या बऱ्या किंवा वाईट अनुभवांना खंबीरपणं सामोरं जाणं. कुटुंबासहित समाजातील इतरांशी चांगला संवाद साधून त्यांना समजून घेता येणं. संवेदनशील असणं हे चांगलंच आहे. मात्र घडलेल्या घटनेनुसार आपल्या व्यक्त होण्यात समतोल असणं गरजेचं ठरतं. ते प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर मानसिक आरोग्य बिघडलंय असं समजावं.
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट प्रज्ञा माने सांगतात की, मानसिक आरोग्य चांगलं नाही, याचं पहिलं लक्षण म्हणजे खाणं. मग ते खाणं जास्ती खाणं असतं किंवा कमी खाणं असतं. बऱ्याचदा अतिखाण्याच्या प्रवृत्तीमध्ये जंकफूड आणि कोल्ड्रिंक्स वगैरेंचा समावेश होतो. काही वेळा भूकच नाही किंवा चवच लागत नाही, या सबबी देत खाणं सोडून दिलं जातं. दुसरं लक्षण म्हणजे झोप. खरंतर पाठ टेकल्या टेकल्या झोप लागली पाहिजे. पण मानसिक आरोग्य ढासळतं, तेव्हा झोप नीट लागत नाही. सतत डोक्यात काही ना काही विचार चालूच राहतात. काही वेळा माणसं आपल्या समस्येपासून पळ काढण्यासाठी झोपेचा सहारा घेतात. अशा वेळी अति झोप लागते. या दोन मुख्य लक्षणांखेरीज बाकीच्या गोष्टींची लक्षणं त्या मानसिक आजारानुसार वेगवेगळी असतात. आपल्या माइंड-बॉडी ऑर्केस्ट्राची योग्य लय साधली गेली पाहिजे. आपण फिजिकली अ‍ॅक्टिव्ह असू, तेवढं आपलं मन अलर्ट असतं आणि मन अलर्ट असेल तितकंच फिजिकली अ‍ॅक्टिव्ह राहतो. त्यामुळे दोघांचीही काळजी घेणं आवश्यक आहे.

मानसिक आरोग्य चांगलं राहाण्यासाठीचे उपाय –

दीर्घ श्वसन – खूप लोकांना श्वास नीट घेता येत नाही. त्याचा त्यांच्या स्ट्रेस लेव्हलवर परिणाम होतो. हल्ली भीती, काळजी, एक्साइटमेंट वाटण्याचं प्रमाण वाढतंय. या चिंताग्रस्तपणामुळे श्वसन नीट होत नाही. दीर्घ श्वसनाचं तंत्र शिकून आत्मसात केलं जाऊ शकतं. दिवसातून किमान तीन वेळ दीर्घ श्वसन केलं, तरी पुष्कळसा ताण कमी होतो.
योगासन – ताडासनासारखी काही आसनं खूप परिणामकारी ठरतात. ताडासन हे सगळ्यात सोप्पं आसन आहे. वज्रासनाचीही मदत होऊ  शकते.

व्यक्त व्हा – आपल्या भावनांचा निचरा योग्य प्रकारे होईल, असं व्यक्त व्हावं. उदाहरणार्थ डायरी लिहिणं. आपल्याला भावनाविवश वाटतं तेव्हा ते भाव डायरीत जरून लिहा. लिहिल्यावर मनातला कोलाहल शांतवेल. चित्र, नृत्य, नाटय़, संगीतादी कोणत्या ना कोणत्या कलेच्या माध्यमातून स्वत:ला व्यक्त केलंत की, मनाचं सामथ्र्य वाढण्यास नक्कीच मदत होईल.

मंडल पेंटिंग – ‘मंडळा’ किंवा ‘मंडल’ हे धार्मिक आणि आध्यात्मिक चिन्ह मानलं जातं. बुद्धविहारात असणाऱ्या या चिन्हांवर खूप संशोधन होऊन एक थेरपी अस्तित्वात आली. या चित्र प्रकारातली चित्रं रंगवायला दिली जातात. ती पेन्सिलच्या रंगांनी रंगवायची. ती रंगवल्यावर आश्चर्य वाटावं असं समाधान मनाला मिळतं. मनाची एकाग्रता वाढते. मन शांतावतं. ऑटिझमसारख्या आजारामध्ये ते उपयुक्त ठरतं. रोजच्या आयुष्यातही हे टेक्निक वापरता येऊ  शकेल.

सोशल मीडियाचा परिणाम
सोशल मीडियाचा वापर सुरू झाल्यावर त्याचा परिणाम चांगला होता. सकारात्मक होता. एरवी व्यक्त न होणारे अनेकजण शेअर करायला शिकले. व्यक्त व्हायला शिकले. त्याला एक प्रकारचा डिफेन्स मेकॅनिझम म्हणता येईल. एन्झायटी कमी करण्यासाठी अशा प्रकारचे डिफेन्स मेकॅनिझम वापरले जातात. पण त्याचा अतिवापर केल्याने वापरणाऱ्याची विचारक्षमता ढासळू शकते. त्यामुळे काही मानसिक आजार बळावू शकतात. उदाहरणार्थ सेल्फी मोड, स्टेटस् लाइकर या कृतींचं प्रमाण आजार वाटावं इतकं वाढतंय. हे एक प्रकारचं आधुनिक तंत्राचं झपाटलेपण म्हणावं लागेल. यावर उपाय म्हणजे आपलं टाइमटेबल आखून ते शिस्तीनं पाळायलाच हवं. दिवसातला ठरावीकच वेळ सोशल मीडियाला द्यावी. डेटापॅक लगेच न भरणं वगैरे गोष्टी करता येतील. फक्त सेल्फ कंट्रोल हवा.