17 January 2021

News Flash

मौज अनलॉक!

सध्या तरी आठवडाभरात वर्क फ्रॉम होम आणि ऑफिसची कामं होत असल्याने वीकेंडचे प्लॅनिंग हे सगळ्यांसाठी मस्ट आहे.

|| गायत्री हसबनीस

गेल्या आठ महिन्यात ‘वर्क फ्रॉम कल्चर’ अंगवळणी पडलं आहे. त्यामुळे अनलॉक काळात बंद पडलेल्या मॉर्निंग वॉकपासून पिकनिकपर्यंत सगळ्याच गोष्टी अनलॉक करण्यासाठी तरुणाई वेगाने सरसावली आहे.  मॉर्निंग वॉकला जाणं, संध्याकाळी एखादी रपेट मारणं, कॅफेजमध्ये जाणं, ट्रेकिंग, वीकेंड आउटिंग, रेस्टॉरंटमधले डिनरबेत, डेटिंग आणि मुख्यत्वे फिरायला जाण्यासाठी खास प्लॅनिंग करणं सध्या वेगाने सुरू झालं आहे. आता वर्षाखेरीच्या या महिन्यात ‘सेफ’ राहत फिरण्याची हौस पूर्ण करत न्यू नॉर्मल लाइफ जगण्याचे तरुणाईचे प्रयत्न सुरू आहेत.

‘सध्या घरात बसणं जमणारच नाही, या महिन्यात सुट्ट्या येतायेत. मस्त प्लॅनिंग सुरू आहे. आउट ऑफ टाउन जायचा विचार आहे. ऑनलाइनद्वारे सगळं प्लॅनिंग सुरू आहे’, परवाच एका मित्राशी फोनवर संवाद साधला तेव्हा आपले समवयस्क फिरायला किती उत्सुक आहेत हे उमगलं. गेल्या काही दिवसांपासून ताजेतवाने होण्यासाठी आणि सार्वजनिक आयुष्याशी पुन्हा एकदा एकरूप होण्याच्या प्रक्रियेत सगळेच आहेत. करोनाच्या साथीमुळे गेलं वर्षभर चक्क आपल्या सर्वांना पाच-सहा महिन्यांची सुट्टी मिळाली, पण आता ‘न्यू नॉर्मल लाइफ’ सुरू झाल्यापासून मात्र हळूहळू सर्वांनी आपलं रुटीन लाइफ सुरू केलं? आहे. त्यामुळे फिरण्यापासून ते नाटक पाहणं, सिनेमा पाहणं, लाँग ड्राइव्हला जाणं, कॅफेटेरियामध्ये जाणं, मित्र-मैत्रिणींच्या घरी जाणं, सायकलिंग करणं अशा अनेक गोष्टींचे बेत आखले जात आहेत.

वीकेंडचं प्लॅनिंग

सध्या तरी आठवडाभरात वर्क फ्रॉम होम आणि ऑफिसची कामं होत असल्याने वीकेंडचे प्लॅनिंग हे सगळ्यांसाठी मस्ट आहे. त्यामुळे अगदी दिवसभराचा, दोन दिवसांकरता किंवा नाइटआउटचा प्लॅन करणं हे सध्या जोरदार सुरू आहे. सोशल मीडियावर टाळेबंदीनंतरचे वीकेंड प्लॅन ट्रेण्डमध्ये आहेत. जे मुख्य शहरात राहतात त्यांच्यासाठी मरिन ड्राइव्ह, बांद्रा किंवा वरळी सीफेससारखे पर्याय खुले आहेत. नवी मुंबई भागात किंवा पुण्यासारख्या शहरात फिरण्यासाठी छोटी-मोठी ठिकाणं पुष्कळ आहेत, त्यामुळे वीकेंडला एक दिवस जरी मिळाला तरी फिरायला खूप वाव आहे. पुण्यात बरेच छोटे-मोठे कॅफेज आणि रेस्टॉरंटदेखील सुरू झाले आहेत. त्यामुळे पुण्यातील मंडळीही हौशीने फिरतायेत. मास्क घालून का होईना वीकेंडचे प्लॅनिंग हे लोकल स्तरावरच होताना दिसतंय. सध्या विविध ठिकाणी नाटकाचे शोजही सुरू झाले आहेत. तेव्हा घरीच आसनस्थ होऊन सिनेमा पाहण्याचा कंटाळा आलेल्या मंडळींसाठी नाटक पाहायला जाणं ही पर्वणी ठरतेय.

ट्रेकिंग

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कळसूबाई, कसारा, राजमाची अशी नेहमीची ट्रेकिं गची ठिकाणं गजबजू लागली आहेत. अनेकजण हेरिटेज म्हणजे जुनी लेणी-मंदिरं पाहण्यासाठी पसंती देत आहेत. तेव्हा महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांत ट्रेकिंगचे ग्रुप जात आहेत. कोणत्या ग्रुपसोबत जाताना कुठल्या ठिकाणी फिरायला बंदी केली आहे, याबद्दलही ट्रेकिंग ग्रुप्स माहिती देत असतात, परंतु आपणही व्यवस्थित माहिती करून घेणे आवश्यक ठरते. ट्रेकिं ग करताना खबरदारी घेतली जात आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि त्यासाठी कमी जणांच्या ग्रुपने ट्रेकिं गला जाण्यावर जोर दिला जात आहे. ट्रेकर्सची संख्या किती ठेवायची हे सध्या प्रत्येक ट्रेकिंग ग्रुप आपापल्या परीने ठरवत आहेत. अजूनही बरेच ग्रुप्स ट्रेकिंगसाठी मैदानात उतरले नाहीत, पण बरेच ग्रूप्स हे एक किंवा दोन आठवड्यांच्या अंतराने ट्रेकिंग घेऊन जात आहेत?.

छोट्या सहलींना प्राधान्य

पाच ते सहा दिवसांच्या छोट्या कालावधीसाठी फिरणारे युवक-युवतीही दिसत आहेत. यात प्रामुख्याने महाविद्यालयीन तरुणांचा समावेश आहे. एका सर्वेक्षणातून समोर आले आहे की टाळेबंदीनंतर १५ ते ३० वयोगटातील तरुण हे लोकल किंवा हिल डेस्टिनेशनला कमी खर्चात जाण्याचे बेत आखत आहेत. यात प्रामुख्याने वसई, अलिबाग, माथेरान, महाबळेश्वार आणि लोणावळा ही ठिकाणं आहेत. खर्चीक प्लॅन्स करणं टाळलं जात आहे, पण नैनिताल, हिमाचल, जम्मू आणि काश्मीर, देहरादून, दिल्ली, बंगलोर, सिक्कीमसारख्या ठिकाणी भटकं ती, सोलो ट्रॅव्हलिंग करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विमानाने प्रवास करण्यापेक्षा अशा ठिकाणी ट्रेनने प्रवास करणं अधिक प्रमाणात सुरू आहे. आउटिंगचं प्लॅनिंगही अधिक सुरक्षित ठेवण्याकडे सगळ्यांचा कल आहे. उदाहरणार्थ – योग्य ती स्वच्छता पाळून स्वत:चे जेवण स्वत:च करणे, अधिक इम्युनिटी बूस्टर ज्यूस किंवा ड्रिंक सोबत ठेवणे, प्रोटिंग बार आणि फळं अशा गोष्टीही आता सोबत घेऊन जाणं सुरू आहे. हॅण्ड सॅनिटाइझर, स्टीमर, वेट वाइप्स, ऑक्सिमीटर, मास्क हे सगळं जमेल तसं सोबत घेऊन ट्रॅव्हल करण्यावर तरुणाईचा भर आहे.

शॉपिंग

वेडिंग सीझनची लाट सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शॉपिंगला बऱ्यापैकी उधाण आले आहे. बरेच मल्टिप्लेक्स आणि मॉल्स शहरी भागात सुरू आहेत. त्यामुळे लाँग ड्राइव्हवरून किंवा बाहेरून फिरून आलेली मंडळीदेखील हमखास शॉपिंग करत आहेत. तसं पाहायला गेलं तर ऑनलाइन शॉपिंग हे गेले काही महिने सुरू होते, परंतु दिवाळीपासून प्रत्यक्ष ऑफलाइन शॉपिंग करण्यावर सगळ्यांचा भर दिसत आहे. ऑफिसला जाणाऱ्या मुलामुलींपासून बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज असलेल्यांपर्यंत सगळीकडे कपडे, दागिन्यांच्या खरेदीची धामधूम सुरू झालेली पाहायला मिळत आहे.

एकं दरीतच गेल्या आठ महिन्यांत ज्या ज्या गोष्टी लॉक झाल्या होत्या, त्या त्या अनलॉक करत न्यू नॉर्मल लाइफस्टाइलही अंगवळणी पडण्यासाठी तरुणाई जास्त प्रयत्न करताना दिसत आहे. जुने मौजेचे दिवस नव्या नियमांनी जगण्याची ही धडपड त्यांना पुन्हा तोच आनंद देऊन जाईल यात शंका नाही.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2020 1:08 am

Web Title: trekking fun unlock work from culture akp 94
Next Stories
1 सदा सर्वदा स्टार्टअप : मार्केटिंग माहात्म्य
2 ‘केश’रंगी रंगले!
3 सदा सर्वदा स्टार्टअप : मार्केटिंग माहात्म्य
Just Now!
X