14 December 2019

News Flash

सो कुल : किल् लिंग!

रितुपर्णोबद्दल लिहीत होते तेव्हाच माझ्या डोक्यात हा विषय घोळत होता. शरीरात लिंग इवल्युशा जागेत असतं. सर्वसाधारणपणे माणसाचं वजन साठ किलो धरलं- तर त्यात लिंगाचं वजन

| June 21, 2013 12:04 pm

रितुपर्णोबद्दल लिहीत होते तेव्हाच माझ्या डोक्यात हा विषय घोळत होता. शरीरात लिंग इवल्युशा जागेत असतं. सर्वसाधारणपणे माणसाचं वजन साठ किलो धरलं- तर त्यात लिंगाचं वजन कितीसं असेल? ते सोडून उरलेल्या बाकी शरीराचं- माणूसपणाचं काय? लिंगभेद आणि चर्चा बास झाल्या आता.
अजूनही ‘गे’ व्यक्ती टवाळीचा विषय असतात. अ‍ॅवॉर्ड नाईटसारख्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये एखादं अतिरंजित ‘गे’ पात्रं पाहिलं की मला जरासुद्धा हसू येत नाही. बायकांच्या मठ्ठ सौंदर्याबद्दलचे आणि ‘गे’ असण्याचे थिल्लर विनोद आता थांबवायलाच हवेत. अपंगत्वाचे थांबवले ना आपण? मला खरं म्हणजे खूप र्वष ‘गे’ ही संकल्पनाच कळली नव्हती. ‘गे’ म्हणजे काय? शरीर वेगळं असतं का? ठेवण वेगळी असते का? तृतीयपंथी म्हणजे ‘गे’ नव्हेत का? सिग्नलला उभं राहून टाळ्या वाजवत पैसे मागणाऱ्या हिजडय़ांविषयी आपल्याला तिटकारा वाटतो. आपल्या वेगळेपणाचं बीभत्स प्रदर्शन आणि त्यातली आक्रमकता नको वाटते. पण या वेगळेपणामुळे स्वत:ला अपूर्ण न मानता कित्येकजण आपल्या बाय डिफॉल्ट- निसर्गानं देऊ केलेल्या प्राक्तनाशी दिलजमाई करतात की.. ते जागरूक नागरिक असतात. शांतपणे जगत असतात.
समलिंगी माणूसच कसा आवडू शकतो एखाद्याला किंवा एखादीला? कारण फक्त पुरुषच समलिंगी नात्यात असतात असं नाही. आता स्त्रियांमध्येही आपलं समलिंगी नातं मान्य करण्याचं धाडस यायला लागलंय. पहिल्यांदा जेव्हा माझ्या एका सुप्रसिद्ध मैत्रिणीनी माझ्यावर लाइन मारली, तेव्हा माझ्यापर्यंत त्या लायनीतली मेख पोचलीच नव्हती. माझं कौतुक करत होती ..म्हणून मला ती खूप चांगली वाटली होती. मग काही दिवसांनी तिनी जरा जास्त थेटपणे सुचवल्यावर माझ्या पायाखालची वाळूच सरकली. पाप ऐकल्यासारखं वाटलं. तू मला असं काही विचारूच कशी शकतेस- असं वाटेपर्यंत माझा दुखावलेपणा उफाळून आला. मैत्रिणीचा रागराग आला. पण तो विषय त्या क्षणी कायमचा संपला. परत कधीही त्या गोष्टीची आठवण होणार नाही- अशी सभ्यता दाखवली मैत्रिणीनं- आजतागायत.
कालांतरानी कळत गेलं की, हे माणसांचे चॉइस असतात. एकतर शारीरिक भिन्नतेतून उपजतच आलेले किंवा दुसरं म्हणजे निर्णय स्वातंत्र्याचा हक्क म्हणून स्वेच्छेनी निवडलेले. या निवडीला ‘असले प्रकार’ म्हणणं मी जाणीवपूर्वक टाळते, कारण एकांतात, बंद दाराआड, इतरांना उपद्रव न देता- माणसं जे काही करतात तो त्यांचा हक्क आहे. आपसातला प्रश्न आहे. स्वानंदाचा भाग आहे. मी ‘अग्निवर्षां’ सिनेमाच्या शूटिंगसाठी हंपीमध्ये होते. तिथे उत्खननात सापडलेल्या स्थापत्य कलांमध्ये, भग्न राजवाडय़ांच्या अवशेषांमध्ये पूर्वापार असलेले अनेक सुराग सापडतात. तिथला गाइड त्या वास्तूंची माहिती देताना स्वच्छपणे सांगत होता.. राजे लढाईसाठी मोहिमेवर गेल्यानंतर राण्या एकटय़ा असल्या की हिजडे त्यांना सोबत करत, रक्षणही करत. जनाना स्नानासाठी गुलाब पाकळ्यांनी आच्छादलेल्या तलावात उतरला की त्यांना अत्तर, चंदन, तेल लावण्यासाठी/ स्तुतीसाठी काही समलिंगी आवड असलेल्या स्त्रिया बॉडीगार्डसारख्या मागे असत. तेव्हाचा कदाचित शारीरिक सुखाकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वाभाविक होता.
पापभीरू पांढरपेशा समाजात समलिंगी संबंधांचा बाऊ झाला. त्यात लपवाछपवी आली. स्वत:ला नीट समजून घेण्याआधी लग्नबंधनात अडकल्यामुळे जोडीदारांची फसवणक झाली. समाजमान्यतेसाठी ठरावीक प्रकारे वागणं आलं. हे संबंध मान्य करण्याची धमक नसल्यानं गवगवा झाला. ज्यांना ही संकल्पनाच समजली नाही त्यांनी निंदेचं शस्त्र काढलं. त्यामुळे जे साचेबद्धपणे जोडीदार निवडून, मुलाबाळांना जन्म देऊन फोटोफ्रेमला साजेसा संसार मांडतात ते ‘बरोबर’ आणि बाकीचे ‘तसले धंदे करणारे’ अशी भावना बळावायला लागली. गुपचूप एखादी गोष्ट केली तर ती राजमान्य- पण उघडपणे बोलली- तर ते पाप- हा गोंधळ आता संपवायला पाहिजे.
मी जेव्हा अमोल पालेकरांचा ‘दायरा’ हा सिनेमा केला, तेव्हा या विषयाबद्दल बरंच कळत गेलं मला. यात निर्मल पांडेनी- जन्मानी पुरुष पण मनानी स्त्री असलेल्या- ‘ट्रान्सवेस्टाईट’ व्यक्तीचं काम केलं होतं. निर्मल माझा मित्र. उंचापुरा, तगडा, मर्दानी. सतत मुली/ बायका त्याच्यामागे लागलेल्या असत. त्याला मी शूटिंगच्या पहिल्या दिवशी साडीमध्ये पाहिलं आणि हक्काबक्का झाले. अतिशय तरलपणे आणि सूचकतेनं अमोलदांनी ही गोष्ट हाताळली आहे. फार बरं झालं हा सिनेमा माझ्या वाटय़ाला आला. मला हे माहिती नसलेलं विश्व समजत गेलं. त्यानंतर कायम मला या वेगळ्या माणसांबद्दल एकाच वेळी दिलगिरी, अनुकंपा आणि कौतुक वाटत आलं आहे. जन्माला येताना चॉइस असता तर सगळ्यांनीच सर्वगुणसंपन्नतेचा वर मागून घेतला असता. पण न मागता मिळालेल्या या वेगळेपणाला अभिशाप न मानता वरदान मानून अनेकजण आयुष्याचं सोनं करतात. ‘दायरा’ची उपओळ होती- द स्क्वेअर सर्कल. वर्तुळ चौकोनी कसं काय असू शकेल? पण काही आयुष्यांचं असतं. त्याबद्दल कुचाळक्या करण्यापेक्षा, गट पाडण्यापेक्षा स्वत:चं आकलन सुधारूया.
जे माझं सचिनमुळे विस्तारलं. सचिन कुंडलकर या माझ्या परमप्रिय मित्राचं ‘कोबाल्ट ब्लू’ हे पुस्तक वाचलंय तुम्ही? या पुस्तकानं मला जन्मभराचं शहाणं केलं. इतकं गलबलून आलं होतं मला वाचताना. पंचविशी-तिशी ओलांडून आपल्या ठोस व्यक्तिमत्त्वापर्यंत अराइव्ह होण्याआधी आपण प्रत्येकजण मूल असतो, बाल्य असतो, शाळेत जातो. स्वत:च्या अनुभवांना, जडणघडणीला पाहून बिचकतो.. भिऊन जातो. पण आपल्याला आपल्या घडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाशी जुळवून घ्यावं लागतं- तसंच सगळ्यात आधी शरीराशी जुळवून घ्यावं लागतं. ते करताना काही जणांची किती ओढाताण होते. लहान असताना मुस्कटदाबी होते, घुसमट होते. काही जणांच्याच मनाची आणि शरीराची.. असं का?
सचिनचं ‘कोबाल्ट ब्लू’ आता पेंग्विन प्रकाशनानी इंग्रजीत प्रकाशित केलंय. मला माझीच कॉलर ताठ झाल्यासारखं वाटतंय. सचिन हा माझ्या आयुष्यात मला भेटलेल्या अत्यंत मृदू, शिस्तप्रिय, सुसंस्कृत आणि तीव्र प्रेमळ माणसांपैकी एक आहे. जीवश्चकंठश्च आहे. त्याची स्वत:ला स्वीकारण्याची ताकद आणि धाडस- हे कधीच त्याच्या जगण्याचा/ सिनेमांचा इश्यू झालेले नाहीत. निकोप, सुंदर जगणं घडवताना सचिनची आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे त्याच्या आई-बाबांनी दाखवलेला समजूतदारपणा फार फार कौतुकास्पद आहे. काका आणि काकू.. सचिनपेक्षा कणभर जास्तच आदर मला तुम्हा दोघांबद्दल आहे.

First Published on June 21, 2013 12:04 pm

Web Title: understanding lesbians gay and bisexual persons
Just Now!
X