05 August 2020

News Flash

‘अदृश्य’ स्वप्नांना लाभले पंख

एका फेसबुक मित्राच्या वॉलवर पोस्ट दिसली, ‘माझ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक. उर्वी भले शाब्बास’.

(संग्रहित छायाचित्र)

राधिका कुंटे

तिने काही स्वप्नं पाहिली. त्यापैकी एका स्वप्नाच्या पूर्ततेसाठी स्वत:ला झोकून दिलं. तिचं एक स्वप्न सत्यात उतरलं. मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळाल्याने तिच्या स्वप्नांना पंख लाभले आणि तिच्या डोळ्यांत नवीन स्वप्नांची बीजं अंकुरली. ही स्वप्नवंती आहे उर्वी जंगम.

एका फेसबुक मित्राच्या वॉलवर पोस्ट दिसली, ‘माझ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक. उर्वी भले शाब्बास’. पुढे तिच्या मुलाखतीचा दुवा दिला होता. तो दुवा बघता बघता मनोमन इतर काही दुवे जुळले आणि उर्वी जंगमशी झालेला ई-संवाद, दूरध्वनीवरील संवाद आठवला. काही दिवसांपूर्वीच तिने पीएच.डी. सबमिट के ल्याचा ईमेल लिहिला होता. ‘आणि उर्वी पीएच.डी. झाली’. लगेचच हा आनंद तिने टीम ‘व्हिवा’शी शेअर केला. व्हिवामधल्या ‘अर्न अ‍ॅण्ड लर्न’ (२०१३) आणि ‘विदेशिनी’ (२०१६) या सदरांमध्ये उर्वीने स्वत:विषयी लिहिलं होतं आणि आता पुन्हा तीन वर्षांनी अंधत्वावर मात करत जिद्दीने पीएच.डी. पूर्ण करणाऱ्या उर्वीशी बोलण्याचा योग जुळून आला.

उर्वीशी बोलताना तिचा यापूर्वी ऐकलेला संवादी स्वर आणि आशावादी दृष्टिकोन पुन्हा जाणवला. साहजिकच संवादाचा जुना पूल लगेच नव्याने सांधला गेला. शालेय शिक्षण झाल्यावर तिने पुण्याच्या ‘फग्र्युसन महाविद्यालया’मध्ये अकरावी-बारावीसाठी जर्मन भाषा निवडली. पुढे मुंबईच्या ‘मॅक्सम्युलर भवन’मध्ये जर्मन भाषेच्या सात लेव्हल्स पूर्ण केल्या. गोरेगावच्या ‘पाटकर वर्दे महाविद्यालया’तून इंग्लिश लिटरेचर आणि इतिहास घेऊन बी.ए. झाली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून जर्मन स्टडीजमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. अर्थात हा शैक्षणिक प्रवास इथे चार ओळींत लिहून पूर्ण झाला तरी प्रत्यक्षात तो साध्य करताना उर्वीला अनेक अडीअडचणी आणि संघर्षांला सामोरं जावं लागलं. मात्र आई-बाबा सतत तिच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यातून मार्ग शोधायला तिला प्रोत्साहित करत राहिले. त्यामुळे ती चारचौघांसारखी रोजच्या जगात वावरू लागली.

पदव्युत्तर शिक्षणानंतर निबंध लेखनामुळे तिला ४ महिने जर्मनीला जायची संधी मिळाली. ‘ऐबरहार्ट कार्ल्स ओनिवेरझिटेट टय़ूबिंगन युनिव्हर्सिटी’मध्ये ‘व्हेर्टवेल्टन’ अर्थात ‘वर्ल्ड ऑफ व्हॅल्यूज’ या प्रोजेक्टअंतर्गत निबंध लिहून पाठवायचा होता. जगभरातील १०० निबंधांतून १० जणांच्या निबंधांची निवड तेथील प्राध्यापक आणि शिष्यवृत्तीधारक करतात. हे निबंध प्रकाशित केले जातात. या दहा जणांत उर्वीची निवड करण्यात आली. उर्वी सांगते की, ‘जर्मन भाषेतल्या ‘माइन् व्हेर्ट’ अर्थात ‘माय व्हॅल्यूज’ या निबंधात मला महत्त्वाच्या वाटणाऱ्या मूल्य आणि संस्कारांविषयी लिहिलं होतं. अपंगत्वासंबंधी माझा दृष्टिकोन, हा मूळ मुद्दा नसला तरीही तो असणं गरजेचं होतं. शिवाय आशावाद, सौंदर्यदृष्टीविषयक विचार आदी अनेक मुद्दय़ांचाही त्यात समावेश होता.’ तिच्या पीएच.डी.च्या विषयाचं बीज तिला तिथे मिळालं. ती हे शहर कसं काय बघते, अनुभवते किंवा तिच्या सौंदर्यदृष्टीविषयी प्रश्न तिथल्या अनेकांच्या तोंडी होते. मुंबईत परतल्यावर जर्मन स्टडीच्या प्राध्यापक आणि पीएच.डी. मार्गदर्शक डॉ. विभा सुराणा यांच्याशी चर्चा केल्यावर या साऱ्या मुद्दय़ांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी ‘अ‍ॅस्थेटिक्स ऑफ नॉन-व्हिज्युअल – अदृश्य रसास्वाद’ हा विषय तिला निवडावासा वाटला.

उर्वी सांगते, ‘अंध व्यक्तींच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या प्रवासातल्या सौंदर्यशास्त्रविषयक जाणिवा उलगडतील, असे साहित्यप्रकार आपल्याकडे फारसे मिळाले नाहीत. त्यामुळे जर्मन भाषेतील साहित्य शोधण्याचा निर्णय घेतला. अशी पुस्तकं शोधणं हेही एक आव्हान होतं माझ्यासाठी. कारण ती भारतात कुठेही उपलब्ध नव्हती. ज्या जर्मन विद्यापीठांमध्ये ती ऑडिओबुक स्वरूपात उपलब्ध होती, तिथे प्रत्यक्ष जाऊन ऐकणं अपेक्षित होतं. त्यामुळे जर्मनीमध्ये जाणं गरजेचं ठरलं. दरम्यान, मी ‘ब्लाइंड ऑथर्स असोसिएशन’ (BAL) या साहित्यिक संस्थेची सभासद झाले. त्यांच्या उपक्रमांतर्गत मी जर्मनमध्ये थोडंफार लिखाण केलं. त्यांच्या वेबसाइटवरून काही माहिती आणि संपर्क  मला मिळाले. जर्मन आणि भारतीय सौंदर्यशास्त्राचा अभ्यास करायचं मी ठरवलं. भारतीय सौंदर्यशास्त्रात दृश्य अनुभवांबरोबर इतर इंद्रियानुभवदेखील सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी महत्त्वाचे असतात, असं मानलं गेलं आहे. म्हणजे दृश्य अनुभवांची कमतरता असली तरी इतर इंद्रियानुभव सौंदर्याचा रसास्वाद करण्यास सक्षम असतात आणि ते कुठेही कमी पडत नाहीत, असा उल्लेख आहे. उलट जर्मन तत्त्ववेत्ते कांट यांच्या मते दृश्यानुभव हा एकमेव अनुभव रसास्वाद घेण्यास सक्षम असून तो नसेल तर सौंदर्यास्वाद घेणं शक्य नाही. याबद्दल विचार करताना एक नवा सिद्धांत मांडावा, असा विचार पुढे आला. हे संशोधन प्रत्यक्षात आणण्यासाठी मला जर्मन अ‍ॅकॅडमिक एक्सचेंज सव्‍‌र्हिसेसची दोन वर्षांची शिष्यवृत्ती मिळाली.’

संशोधनाचा २०१४ मध्ये सुरू झालेला हा प्रवास खडतर होता तितकाच तो आनंददायीही होता. अदृश्यरसाच्या संकल्पनेला पैलू पडत गेले तेव्हा तिला खूप आनंद वाटायचा. मात्र ते कसं काय निभावता येईल, असंही तिला वाटलं. मुंबई विद्यापीठात पीएच.डी.साठी नावनोंदणी होणं, थोडं अभ्याससाहित्य जमवणं या गोष्टी झाल्या तरी मुख्य अभ्यास सुरू झाला तो जर्मनीत. तिथे टॉकिंग सॉफ्टवेअर, व्हॉइस आऊटपुट, स्कॅनर्स, ब्रेल प्रिंट्स, ऑडिओबुक्स आदी साहित्य उपलब्ध होतं. ग्योटिंगेन विद्यापीठातील तिच्या पीएच.डी. मार्गदर्शक डॉ. आंद्रिया बोगनर यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांनी काही सेमिनार्स, वर्कशॉपला जायला सुचवलं. उदाहरणार्थ- तिनं पहिल्यांदाच ऑडिओ-डिस्क्रिप्शन असलेलं नाटक त्यांच्यासोबत अनुभवलं. अशा सुविधांचा वापर करून कलेचा आस्वाद घेता येतो, हे यामुळे स्पष्ट झालं, असं ती म्हणते.

‘२०१६ पर्यंत साहित्याची जुळवाजुळव करणं सुरू होतं. लेखकांशी संपर्क साधणं, बोलणं, परवानगी घेणं वगैरे गोष्टी सुरू होत्या. रसाविषयीचा विचार, तुलना, निर्णयासाठी वर्ष लागलं. त्याच दरम्यान मी एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेसाठी अमेरिकेला गेले होते. तिथे एकटीनं जाणं, त्या पेपरचा अभ्यास करण्याचा एक अनुभव घेतला. तेव्हा अनेकांशी ओळख झाली. अनेक सजेशन मिळाले. तो एक टर्निग पॉइंट होता,’ असं उर्वी सांगते. जर्मन सौंदर्यशास्त्रावर मी वर्डमध्ये जवळपास ७०-८० पानं क्षणार्धात डीलीट केली. ते फार अवघड गेलं. २०१७ मध्ये जवळपास आठ महिने एकही शब्द सुचला नाही. काहीच न सुचल्याने घालमेल व्हायची. फ्रस्ट्रेशन यायचं. या टप्प्यावर आल्यावर ‘इकडे आड नि तिकडे विहीर’ असं झालं होतं. शेवटी ठरवलं की, विहिरीत बुडायचं नाही तर पोहायचं. तेव्हा मित्रमंडळींचं सततचं प्रोत्साहन, आई-बाबांनी दिलेलं प्रचंड मानसिक बळ, वाचनाची आवड यामुळे ताण कमी व्हायचा. प्राण्यांची आवड असल्याने माझ्याकडे हॅमस्टर होता. शिवाय मी अ‍ॅनिमल शेल्टरमध्येही अधूनमधून जायचे. या मुक्या मित्रांनीही मला खूप आधार दिला. कधी कधी कॅफेमध्ये किंवा फिरायला जायचे. माणसांना भेटल्यामुळे बरं वाटायचं आणि ओळखीही व्हायच्या. शिवाय नवीन पाककृतीही करून बघायचे, अशा शब्दांत उर्वीने आपला अनुभव सांगितला.

२०१८ मध्ये काही काळासाठी भारतात आल्यावर तिच्या संशोधनाची गाडी रुळांवर आली. दोन्ही मार्गदर्शकांसोबत भरपूर चर्चा करून शेवटी या प्रबंधाची निर्मिती झाली. त्याविषयी ती म्हणते, अदृश्यरस म्हणजे दृष्टीहीनतेमुळे इतर चार इंद्रियांचा वापर करून आस्वाद घेणं नसून ते एक वेगळ्या प्रकारचं कौशल्य आहे. हे कौशल्य विकसित करून आत्मसात करण्यासाठी तुमचे प्रगल्भ पूर्वानुभव, आठवणी हे घटक अतिशय महत्त्वाचे ठरतात आणि या अनुभवास आकार देण्याचं महत्त्वाचं कार्य ते करतात. पंचेंद्रियांपैकी दृष्टीहीनतेमुळे उरलेल्या चार इंद्रियांद्वारे मिळणाऱ्या अनुभवाची योग्य रीतीने सांगड घालून त्यास पूर्वानुभवाची जोड देऊन, तसंच कल्पनाशक्तीची भरारी घेऊन तो अनुभव वैयक्तिक पातळीवर अनुभवणं हे त्या प्रक्रियेचं वैशिष्टय़ आहे. आजवरच्या सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासात दृश्यानुभव हा अतिशय महत्त्वाचा घटक मानला गेल्याने ‘हाताने बघणं, कानाने बघणं’ या प्रकारच्या संज्ञा अपरिचित राहिल्या. दुर्दैवाने दृष्टीहीन व्यक्तीच्या इंद्रियांची क्षमता नेहमीच कमी लेखली गेली आहे. त्यामुळे एखाद्या अंध व्यक्तीची निरीक्षण क्षमता, सौंदर्य आकलन क्षमता नेहमीच डोळस व्यक्तीपेक्षा कमी लेखली गेली आहे. या प्रबंधात वरील विधानांतील उणिवा आणि त्रुटींचा सखोल अभ्यास करून या संदर्भातील नवीन संज्ञा आणि त्यांच्या व्याख्या, प्रमेय यांची सुसूत्र मांडणी करून एका नवीन अध्यायाची सुरुवात करण्यात आली असल्याचे ती सांगते. या प्रबंधात मांडलेल्या अदृश्यरस या संकल्पनेचा उपयोग, वापर केवळ दृष्टीहीन व्यक्तीपुरतीच सीमित न राहता तो सौंदर्यशास्त्राच्या सर्व अभ्यासकांसाठी नवं दालन उघडून देणारा आहे. हे या प्रबंधाचं वैशिष्टय़ आहे, असं ती सांगते.

हा प्रबंध मुंबई विद्यापीठात सादर केला. त्यानंतरच्या व्हायवामध्ये पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन न करता सलग अर्धा तास तिच्या बोलण्याच्या कसबाचं परीक्षकांनी कौतुक केलं. उर्वीच्या मते पीएच.डी. पदवी मिळणं, ही एक सुरुवात आहे. ही संकल्पना तिला जगभरातील अंध व्यक्तींपर्यंत पोहोचवायची आहे. त्यासाठी सेमिनार्स, वर्कशॉप्स घ्यायची आहेत. जर्मन भाषेतला हा प्रबंध साधारणपणे सहा महिन्यांनी प्रकाशित झाल्यानंतर  इंग्रजी, मराठी, हिंदी भाषांमध्येही तो आणायचा तिचा मानस आहे. २०१६ मध्ये तिने ग्योटिंगेन विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रम-इंटरकल्चरल जर्मन स्टडीजसाठी अर्ज केला होता. तो अभ्यासक्रम आता पूर्ण करण्यासाठी ती जर्मनीला जाणार आहे. उर्वीच्या स्वप्नांच्या बीजांनी भरभरून फळावं, फुलावं या ‘टीम व्हिवा’तर्फे शुभेच्छा!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2019 12:08 am

Web Title: urvi jangam phd in german studies abn 97
Next Stories
1 क्षण एक पुरे! : सूफी संगीताची पूजा
2 फिट-नट : नम्रता गायकवाड
3 जगाच्या पाटीवर : मैत्री ऊर्जाप्रणालींशी
Just Now!
X