‘रॉक’ला हिंदुस्थानी टच द्यायचा प्रयत्न करणाऱ्या ‘वाद्यस्य’विषयी.. पुण्याच्या एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये या म्युझिक बॅण्डची सुरुवात झालीय.
रॉक म्युझिक.. पाश्चिमात्य संस्कृतीचे आणखी एक पिल्लू. आपल्याकडेही हे पिल्लू भलतेच लोकप्रिय. पण त्याला थोडा हिंदुस्थानी टच देण्याचा प्रयत्न करतायत वाद्यस्य या बॅण्डची तरुण मुलं. ‘वाद्यस्य’ची सुरुवात २००८ मध्ये झाली. पुण्याच्या ‘एआयएसएसएमएस’ महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या काही मुलांची वाद्य वाजवण्याची आवड त्यांना एकत्र घेऊन आली आणि त्यातून या बॅण्डची निर्मिती झाली. बॅण्डची कल्पना विनीत िपगळे याची. इंजिनीअरिंग कॉलेज असल्यामुळे कॉलेजमध्ये काहीच गॅदिरग किंवा कोणत्याच प्रकारचा कल्चरल प्रोग्रॅम होत नव्हता. त्या वेळी विनीतने ही कल्पना मांडली आणि हळूहळू बॅण्ड तयार झाला. पण दुर्दैवाने २०१० मध्ये विनीतचा अपघात झाला आणि तो हे जग सोडून गेला. बॅण्डला या धक्क्यातून सावरणं खूप कठीण गेलं. काही काळ बॅण्डने परफॉर्म करणंच सोडून दिलं. नंतर गणेशने ड्रमरची जागा भरून काढली आणि बॅण्ड पुन्हा एकदा पूर्ण झाला. आता बॅण्डची सगळी प्रॅक्टिस गणेशच्या घरीच चालते. सिद्धेश सहस्रबुद्धे, निनाद खांडेकर (लीड गिटारिस्ट), सागर जाधव (व्होकल्स), गणेश व्यंकटेश्वरन (ड्रमर), दीपक उके (बेस गिटारिस्ट), अनुप सपकाळ (कीबोर्ड) हे सध्याच्या ‘वाद्यस्य’चे मेंबर्स.
या सहा मुलांपकी फक्त सागर गाणं शिकला आहे. सागर मूळचा सोलापूरचा. त्याला गाण्याचा वारसा त्याच्या आजोबांकडून मिळाला आहे. पण बॅण्डच्या गिटारिस्ट्सना रॉक जास्त आवडत असल्यामुळे त्यांचा ‘क्लासिकल’शी काही संबंध नव्हता. सागर रागांच्या भाषेत बोलायचा आणि सिद्धेश – निनाद कॉर्ड्सच्या भाषेत बोलायचे. एकमेकांची भाषा समजायला एवढी वर्षे जावी लागली. गणेशने ड्रमर दर्शन दोशीला वाजवताना पाहिले आणि त्याने ड्रमर व्हायचे ठरवले. दीपकच्या आईने त्याला वाढदिवसाला गिटार भेट दिली आणि त्याचा गिटारिस्ट म्हणून प्रवास सुरू झाला. बॅण्डचा कीबोर्ड प्लेअर अनुप सपकाळ कीबोर्ड तर वाजवतोच, पण त्याशिवाय माऊथ ऑर्गन आणि मेलॉडिका वाजवायलाही शिकतो आहे. सिद्धेश आणि निनादला रॉकने पुरते पछाडलेले आहे. त्यांना त्याशिवाय दुसरे काही दिसत नाही. सिद्धेश आणि निनाद सोडले तर बाकीचे सगळे आता नोकऱ्या करतात. ऑफिसमध्ये मन लावून काम केल्यामुळे बॅण्डच्या प्रॅक्टिससाठी आठवडाभर सुट्टी टाकली तर ती मिळते. पण सिद्धेश आणि निनाद इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षांला असल्यामुळे त्यांच्या परीक्षा बऱ्याचदा फरफॉर्मन्सेसच्यामध्ये येतात आणि ते रद्द करावे लागतात. दोन्ही लीड गिटारिस्टच नसतील तर परफॉर्म कसं करणार? ही एक खरंतर अडचण आहे.
सध्याच्या तरुण पिढीला ‘रॉक’ आवडतं. त्यांना क्लासिकलचा विसर पडू नये म्हणून वाद्यस्य रॉक आणि क्लासिकलचा समन्वय साधून गाणी सादर करतो. त्यांची दोन-तीन ट्रेडमार्क गाणीही आहेत. त्याशिवाय ‘इंट्रो राग’ आणि ‘पिया रे नन लागो’ ही दोन गाणी त्यांची स्वत: लिहिली आहेत आणि संगीतबद्धही केली आहेत.
कॉलेजने ‘वाद्यस्य’ला पहिली संधी दिली. आता दरवर्षी वाद्यस्य कॉलेजच्या कल्चरल फेस्टमध्ये परफॉर्म करतो. गेल्या वर्षीपर्यंत कॉलेजचेच विद्यार्थी म्हणून वाजवणाऱ्या बॅण्डला यंदा प्रोफेशनल बॅण्ड म्हणून कॉलेजनेच आमंत्रित केले आहे. पुण्यात टाटा डोकोमोतर्फे घेण्यात आलेल्या स्पध्रेमध्ये वाद्यस्य ‘मोस्ट पॉप्युलर बॅण्ड ऑफ पुणे’ म्हणून निवडला गेला. ७ डिसेंबरला त्यांनी प्रसिद्ध अशा ‘अग्नी बॅण्ड’साठी ओपिनग परफॉर्मन्स दिला.
म्युझिक या एका गोष्टीने झपाटलेल्या मुलांनी पसा कमावणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला नाही. त्यांना वाजवायला, गायला आवडतं म्हणून ते वाजवतात व त्यांना तशी संधीही मिळते आणि त्यांच्यासाठी सध्या हे पुरेसं आहे. आपल्या कौशल्याच्या माध्यमातून सेवाभावी संस्थांसाठी निधीही गोळा करून देतात आणि ही तर अजून फक्त सुरुवात आहे. दे आर रेडी टू रॉक यू.