13 July 2020

News Flash

प्रेमाचा बदाम सेटिंगचा एक्का

आपसूक जुळलेलंही प्रेमच, पण सेटिंग लावून, आढेवेढे घेत, नाना क्लृप्त्या लढवत ‘सेटिंगबहाद्दरांच्या’ मदतीने केलेलं प्रेम काही औरच..

(संग्रहित छायाचित्र)

नीलेश अडसूळ

शाळेच्या पायरीपासून ते कॉलेजच्या टेरेसपर्यंत अशी एकही जागा नाही जिथे प्रेमाचे गुलाब फुलले नाहीत. कारण हीच खरी वास्तू असते जिथे प्रेमाची आग अंतरंगात पेट घेते. काहींची पेटतही नाही, पण अशांनी नाराज व्हायचं नसतं. कारण अशांच्या आगीला हवा घालणारेही इथेच भेटत असतात. ‘भावा, आवडली का?.. हो रे, पण ती काही भाव देत नाही. अरे मी असताना काय गम, अशी सेटिंग लावतो की, डायरेक्ट शुभमंगल सावधान..’ असे दुजोरा देणारे सेटिंगबहाद्दर प्रत्येकाच्या आयुष्यात आलेले असतात. आपसूक जुळलेलंही प्रेमच, पण सेटिंग लावून, आढेवेढे घेत, नाना क्लृप्त्या लढवत ‘सेटिंगबहाद्दरांच्या’ मदतीने केलेलं प्रेम काही औरच..

सेटिंगशिवाय जुळलं ते

प्रेम हो काय

ब्रह्मदेवाआधी धरावे

त्या लव्हगुरूचे पाय..

साधारण अशी सेटिंग लावणारी मुलंच असतात. म्हणजे मुलीही असतात, पण अगदी बोटावर मोजण्या इतक्या. हे सेटिंगवीर भारीच डेरिंगबाज, म्हणजे थेट जाऊन मुलींशी बोलणं, त्यांना विश्वासात घेणं वगैरे यांच्या ‘दाये हात का खेल’. शाळेत, कॉलेजमध्ये यांना भलतीच इज्जत असते. म्हणजे गावातून पाटलाचं पोर चालत जावं असा त्यांचा दरारा असतो. कारण यांच्याशी दुश्मनी घेणार कोण?, भविष्यात आवडलीच कुणी तर सूत जुळवणारे हात यांचेच असतात. म्हणून त्यांना प्रेमवीरांनी संत पदावर नेऊन बसवलंय. या महात्म्याला ‘लव्हगुरू’ असं म्हणतात.

या सेटिंगचे किस्सेही तसेच भन्नाट असतात, त्यातलेच काही तुमचे-माझे अनुभव. आमच्याकडेही असा एक लव्हगुरू होता, पुष्कर त्याचं नाव. सेटिंग लावण्यासाठी त्याच्याकडे वेटिंग असायची. त्याच रांगेत आम्हीही उभे. माझ्या मित्राचं, अक्षयचं काही जुळता जुळेना मग आम्हीही त्याचा धावा केला. त्याने आश्वासन दिल्यानुसार दोन दिवसांतच संबंधित मुलीची माहिती काढली. अगदी ती शाळेत कशी येते, कशी जाते, कुठे राहते, बाजारात कधी जाते, सोबत कोण असतं ते अगदी आवडत्या रंगांपासून, पदार्थापर्यंत सर्व कुंडली त्याने आमच्या समोर मांडली. तिचा येण्याजाण्याचा मार्ग बागेतून जाणारा होता. मग या पठ्ठय़ानं तिच्या आवडीचं ‘किटकॅट’ चॉकलेट अक्षयच्या हातात देऊन त्याला चौकातल्या पुतळ्यासारखा बागेत उभा केला. ‘आय लव्ह यू’, ‘माझ्यासोबत, सत्यनारायणाच्या पूजेला बसशील का?’, अशी दोन-चार वाक्यंही पाठ करवून घेतली. मी आणि पुष्कर मात्र बागेत दूरवर असलेल्या झाडांच्या मागे लपलो. आता शाळा सुटून अर्धा तास होत आला होता, पण ती काही येईना. इथे अक्षयची अवस्था म्हणजे टांगती तलवार. त्यातच ती समोरून येताना दिसली. त्याने आम्हाला इशारा केला. आता तो तिला विचारणार तितक्यात, सगळं फिस्कटलं. त्या दिवशी नेमकी ती, अक्षयच्या वर्गशिक्षकांच्या मुलीबरोबर घरी चालली होती. हे पाहून अक्षय असा पळत सुटला की थेट घर गाठलं. त्यांनतर तो शाळेतही तब्बल आठ दिवसांनी उगवला.

असाच एक किस्सा कॉलेजमधलाही आठवतो, गौरव नावाचा अवलिया असेच सेटिंग लावायचे कंत्राट घ्यायचा. हाच मुळात कृष्णासारखा लोभस असल्याने अनेकींनी याच्या शब्दावर विश्वास ठेवून प्रेमयज्ञात उडी घेतली होती. कॉलेजमधल्या नाटकाच्या टोळीमध्येही याचा आवाज असायचा. कॉलेजच्या पहिल्याच वर्षांत नाटक करण्यासाठी आलेल्या मुलांची ही गोष्ट. कॉलेजमधला मुक्तसंचार, मुलींबाबतचं आकर्षण, सारं काही नवंनवं. त्यातच कुणाचा बाण कुठे जातोय हे पहिल्या दोन-चार आठवडय़ांतच गौरवच्या चांगलंच लक्षात यायचं. एकदा असाच एक मुलगा त्याच्याकडे आला, गौरव अरे ते.. ते म्हणताच पुढचा स्वाध्याय यानेच वाचून दाखवला. पोरगं लाल होईपर्यंत लाजलं. मग काय, तालमी सुरू झाल्या. नाटकाच्याही आणि प्रेमाच्याही. गौरव मुद्दाम त्या दोघांना एकत्र बसवायचा. त्यात त्यांचीही हरकत नसायची. मग ‘इम्प्रोवायजेशन’ या कार्यशाळेचा बहाणा करत गौरवने त्यांना मुद्दाम ‘तुझं माझं, घर आपलं’ हे स्किट करायला सांगितलं आणि भूमिका दिली नवरा-बायकोची. या स्किटचे अध्याय आठवडाभर सुरू होते. मग सहज अभिनय कसा करायचा, एकमेकांच्या प्रेमात कसं बुडून जायचं याचे सल्लेही गौरवने वरवर दोघांना दिले. येताजाता थट्टामस्करी तर असायचीच. आणि आश्चर्य ते काय, बघता बघता खरंच जुळलं की या दोघांचं.

असे सांगावे तितके अनुभव कमीच आहेत, पण हे लव्हगुरू फक्त जुळवतच नाहीत तर ‘ब्रेकअप’ करायच्याही युक्त्या यांच्याकडे असतात. आता ब्रेकअपचे किस्से काही विस्ताराने यायला नकोत, पण एका बहाद्दराने तर कमाल केली, एका मुलीचं एका मुलावर प्रेम असतानाही त्याने केवळ आपल्या मित्रासाठी त्या मुलीचं रीतसर ‘ब्रेकअप’ घडवून आणलं आणि आपल्या मित्राशी जुळवून दिलं. एखाद्या व्यक्तीच्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी प्रेमाच्या किंवा द्वेषाच्या भावना कशा निर्माण करायच्या हे यांना पक्कं ठाऊक असतं.

हा झाला गमतीचा भाग, पण हल्ली गर्लफ्रेंड असणं-नसणं हे अगदी प्रतिष्ठेचं झालं आहे. म्हणजे ‘साला, तुझ्याकडे एक आयटम नाही किंवा तू एक छावा पटवू शकली नाही’  या वाक्याचं तरुणांना भलतंच दडपण असतं. त्यात एक नवीन वाक्य सध्या तरुणांमध्ये चर्चेत आहे, काहीही झालं, कु णी चुकलं तर एवढंच म्हणायचं ‘तू असा आहेस ना, म्हणून सिंगल आहेस’. वास्तवात याचा प्रेमाशी काहीही संबंध नसतो. पण ‘प्रेम म्हणजे सबकुछ’ असा एका समज सध्या रूढ झाला आहे आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी नाहक प्रयत्न आणि पर्यायाने सेटिंग ही आलीच.

प्रेमाची आणि जातीची सांगड आजही घातली जाते, याच कौटुंबिक र्निबधांमुळे कितीतरी मुलं मनातलं प्रेम मनातच ठेवतात. अशाच एका वेगळ्या सेटिंगवाल्याचा किस्सा. शाळेत असताना प्रेम काय आहे हे कुणालाच माहिती नसतं. सगळंच कसं अजाणतं, अल्लड आणि बालिशपणात झालेलं. पण ‘लग्न हे आपल्याच जातीच्या व्यक्तीशी केलं जातं’, हे घरात कुठेतरी ऐकलेलं असतं. साधारण पूर्वी मराठी शाळांच्या ‘हजेरी कॅटलॉग’मध्ये मुलांच्या जातीचा, पत्त्याचा आणि पालकांचा तपशील असायचा आणि कॅटलॉग मॉनिटरच्या हातात. त्यामुळे वर्गात नेमकं कोण कोण कुठल्या जातीचं आणि कोण कुठे राहतं याची सारासार माहिती त्याला असायची. एका शाळेत याच मॉनिटरचं लव्हगुरूत रूपांतर होताना मी पाहिलंय. १५ वर्षांपूर्वीची ही सेटिंग. आपल्या जातीची पोरगी कोण हे पाहण्यासाठी तास संपला की पोरं त्याच्यामागे गर्दी करायची. त्यानेही अनेक वर्ष सढळ हाती सगळ्यांना मदत केली. पुढे त्याचं स्थान इतकं मानाचं झालं की वर्गातली सगळी गुपितं आणि कोण कुणाच्या प्रेमात आहे याचा खंडीभर डाटा त्याच्या हार्डडिस्कमध्ये जमा झाला होता. शाळा सुटल्यानंतर किमान दोन तास याचं सल्ला केंद्र शाळेबाहेर भरायचं. तेव्हा मुलं-मुली असं समोर येऊन बोलत नसत म्हणून दहावीच्या सेंडॉफनंतर याने अनेक मुलामुलींना टेबलाखालून एकमेकांचे (कॅटलॉगमधले) फोन नंबर दिले होते. त्यामुळे ज्यांचं शाळेतलं प्रेम आजही जिवंत आहे असे अनेकांचे आशीर्वाद आजही आहेत. पण हे सगळं करताना अनेक मित्रांकडून त्याचे ‘जावईलाड’ करतानाही मी पाहिले आहे.

यातला सगळ्यात गमतीचा प्रयत्न म्हणजे मित्राकडून आपलं कौतुक त्या मुलीपुढे करायला सांगणे. मग तो किती चांगला आहे हे पटवून देणे. यामध्ये अनेकदा तो सेटिंग लावणारा इतकं भरभरून बोलतो की हा नक्की आपल्याविषयीच बोलतोय का अशी शंका येते. चिडवण्या-चिडवण्यातूनही अनेक प्रेमं जुळली आहेत. मुद्दाम एखाद्यावर रोख धरून त्याला एखाद्या मुलीच्या किंवा मुलाच्या नावावरून चिडवायला सुरुवात करायची.  म्हणजे संबंधित व्यक्ती याचा विचार करू लागते. हे चिडवणारेही सेटिंगवीरच. सगळ्यात मोठा घोळ तेव्हा होतो जेव्हा सेटिंग लावणारेच प्रेमात अडकले जातात, एकदा मनीष आपल्या चेतन नामक जिवलग मित्राची सेटिंग लावायला गेला आणि चक्क त्या मुलीने यालाच वरलं. पुढे चेतन दु:खात गेला हा भाग वेगळा. पण दुसऱ्याला बेडीत बांधायला निघालेले स्वत:च तुरुंगवासी होऊन बसल्याच्या अनेक घटना आहेत.

असे एक ना अनेक, असंख्य किस्से निघतील. नाक्यावर, काटय़ावर, जाहीर, लपलेले, लपवलेले. अगदी पन्नास वर्षांपूर्वीच्या आजी – आजोबांचाही त्यात सहभाग असेल आणि आता आता शाळेत जाणारा मुलगाही सांगू शकतो की आता कशी सेटिंग लावली जाते. सेटिंग कधीही, कुणीही, कशीही लावावी. पण आपण मात्र या लव्हगुरूंपासून कायम सावध राहायचं. कारण ‘ये जोडनाभी जानते है और तोडना भी’, लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत सर्व पॅकेज यांच्याकडे तिन्हीत्रिकाळ तयार असतं. आपण फक्त शब्द टाकायचा. पण काहीही असो, यांच्याशिवाय प्रेमाला मजा नाही हेही तितकंच खरं. ब्रह्मदेव लग्नाची गाठ मारतो असं म्हणतात खरं, पण तुमच्या- आमच्यासाठी यालाच ब्रह्मदेव मानून हात जोडले तर तेही वावगं ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 12:40 am

Web Title: valentine day article on love tips abn 97
Next Stories
1 सदा सर्वदा स्टार्टअप : तयारी एलेव्हेटर पीचची..
2 सिंगल सीट
3 संशोधनमात्रे : किनारा तुला पामराला..
Just Now!
X