08 March 2021

News Flash

लर्न अ‍ॅण्ड अर्न : यशस्वी (वि)भव

वकिलीचा अभ्यास करता करता अभिनयाचा छंद जोपासणाऱ्या युवा कलाकार विभव बोरकर याच्याविषयी.. ‘त्याचा’ चित्रपट संपल्यावर एक ऑटिस्टिक मुलाच्या आई भेटल्या. ‘त्याला’ पाहून त्या गहिवरून म्हणाल्या...

| November 29, 2013 01:05 am

वकिलीचा अभ्यास करता करता अभिनयाचा छंद जोपासणाऱ्या युवा कलाकार विभव बोरकर याच्याविषयी..
‘त्याचा’ चित्रपट संपल्यावर एक ऑटिस्टिक मुलाच्या आई भेटल्या. ‘त्याला’ पाहून त्या गहिवरून म्हणाल्या की, ‘तुझं काम इतकं गोड आहे. तुझ्याकडं बघून मला वाटतंय माझा मुलगाही यशस्वी होईल.’ ही ‘तो’ नि ‘त्याच्या’ टीमसाठी सगळ्यात मोठी कौतुकाची पावती होती. त्यांच्या या उद्गारांतच या चित्रपटाचा हेतू पूर्ण झाला, असं ‘त्याला’ वाटतंय. हा युवा कलाकार आहे विभव बोरकर!
विभवनं केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या ठाण्यातील ‘बिलाबोंग हाय इंटरनॅशनल स्कूल’मधून ए लेव्हल (बारावी) केलेय. सध्या तो ‘डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज’मध्ये एलएलबीच्या सेकंड इयरला आहे. पुढं त्याला मार्केटिंगमध्ये एमबीए करायचंय. त्याच्या आईबाबांना कलाक्षेत्राची आवड नि जाण आहे. त्यांच्या नाटकांच्या तालमी तो लहानपणापासून बघतोय. त्यामुळं आपणही असं काही तरी करावं, असं त्याला वाटलं. मग बालनाटय़ात काम सुरू केल्यावर त्याला मुख्य भूमिका मिळाल्या. सहावीत असताना त्यानं ‘कायद्याचं बोला’ या चित्रपटात उमेश कामतच्या छोटय़ा भावाची भूमिका केली होती. त्याच्या शाळेनं कायमच त्याला प्रोत्साहन दिलं. शाळेत तो बास्केटबॉल खेळायचा. धावण्याच्या स्पध्रेत त्याला ९ सुवर्णपदकं मिळाली होती. पुढं अभ्यासाच्या व्यवधानात खेळ मागं पडला नि बारावीनंतर तो अभिनयाकडं वळला.
त्याच्या बारावीच्या परीक्षेनंतर त्यानं अ‍ॅिक्टगचा कोर्स केला. त्याआधी त्यानं अभिनयाचं काही संस्थांतून प्रशिक्षण घेतलं होतं. विभव सांगतो की, ‘आपल्याकडं साधारणपणं बालनाटय़-नाटकाच्या अंगानं प्रशिक्षण दिलं जातं. त्यापेक्षा निराळं म्हणून मी अनुपम खेर यांच्या ‘अ‍ॅक्टर्स प्रिप्रेअर्स’ संस्थेत अ‍ॅिक्टगमध्ये डिप्लोमा केला. तिथं चित्रपटांच्या अनुषंगानं खूप काही शिकायला मिळालं. तिथं माझा दुसराच दिवस होता नि आम्हाला उत्स्फूर्तपणं संवाद म्हणायला सांगितले होते. स्वत:चं असं वेगळं काही म्हणायला सांगितलं होतं. तुम्ही डायलॉग म्हणायचे नाहीत तर स्वत:ची भाषा डेव्हलप करायची. म्हणजे सायलेंटपण नाही नि भाषाही नाही. तुम्ही स्वत:चं काही तरी वेगळं दोन मिनिटांत सादर करा, अशी त्यांची अट होती. पहिलं सादरीकरण मलाच करायला सांगितलं गेलं. मी सादरीकरण करतानाच स्वत: अनुपम खेर तिथं आले. मला थोडं टेन्शन आलं होतं. माझं सादरीकरण बघून ते म्हणाले, ‘‘बेटा, आप में पोटेंशिअल है। बहोत आगे जाओगे।’’ त्यांचे ते शब्द माझ्यासाठी प्रेरणादायी ठरल्येत.’
या कोर्सनंतर महिन्याभरातच त्याला ‘माय डीयर यश’ हा चित्रपट मिळाला. हा कोर्स करेन, त्यानंतर चित्रपट मिळेल नि त्यात ऑटिस्टिक मुलाची भूमिका असेल, हे त्याला अपेक्षित नव्हतं. देवकृपेनं सगळं जुळून आलं. हा वर्षभराचा काळ त्याच्यासाठी खूपच वेगळा होता. ‘यश’च्या भूमिकेसाठी बऱ्याच ऑडिशन्स घेतल्या गेल्या होत्या. त्याची ऑडिशन फर्स्ट टेक फायनल झाली. ही भूमिका कठीण आहे नि मुलगा नवीन आहे, हे उमजून ‘यश’च्या टीमनं विभवला खूप समजून नि सांभाळून घेतलं.
एक किस्सा त्याला आवर्जून सांगावासा वाटतो. तो सांगतो की, ‘उमेशसर नि माझे बरेच सीन एकत्र होते. त्यापकी एकात मी त्यांना, माझी आई नि मत्रीण यांना गोष्ट सांगतोय असा सीन होता. माझा संवाद खूप मोठा होता नि तो वनटेक व्हावा, अशी सरांची अपेक्षा होती. त्यासाठी आम्ही खूप रिहर्सल्स करत होतो. प्रत्यक्ष सीन करायच्या वेळी मी खूप नव्‍‌र्हस झालो होतो. कारण माझा क्लोजअप होता नि समोर फक्त कॅमेरा होता. माझं टेन्शन उमेशसरांना कळलं. ते म्हणाले की, ‘मी तुझ्यासमोर बसतो नि रिअ‍ॅक्ट करतो म्हणजे तुला पुढचं आठवेल.’ विशेष म्हणजे त्यांचं पॅकअप झालं असूनही ते थांबले. तो सीन ओके झाल्यावरच निघाले. पुढं तो सीन आवडल्याचं अनेकांनी सांगितलं. ‘तुमच्यामुळं हे झालं’, असं त्यांना सांगितल्यावर ते त्यांचं श्रेय घेत नाहीत. नवीन कलाकारांना असा सपोर्ट मिळणं अतिशय गरजेचं असतं. हा चित्रपट प्रदíशत झाल्यावर मी पुण्यात रविवारच्या शोला गेलो होतो. तो हाऊसफुल्ल शो संपल्यावर मी बाहेर आलो नि प्रेक्षकांनी मला गराडाच घातला. भराभर माझे फोटोग्राफ नि ऑटोग्राफ घेतले गेले. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही.
ही वेगळी भूमिका स्वीकारताना त्यानं त्याकडं एक आव्हान नि संधी म्हणून बघितलं. प्लेबॉयचा रोल आपण कायम भोवताली बघत असल्यानं ते आत्मसात करणं कठीण नसावं, असं त्याला वाटतं. त्यानं विचार केला की, मिळतंय ते काम संधी म्हणून स्वीकारावं. त्यासाठी मेहनत करावी. त्यातून खूप काही शिकायला मिळालं. ‘यश’च्या भूमिकेसाठी त्याला शेखरसरांनी मार्गदर्शन केलं. ओळखीच्या ऑटिस्टिक मुलाशीही संवाद साधत त्या अनुषंगानं छोटय़ा छोटय़ा गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न त्यानं केला.
पुढं एखाद्या ब्रॅण्डसाठी बोलावणं आलं तर तो मॉडेिलग करणारेय. ऑडिशन द्यायची त्याची तयारी आहे. तेवढंच अभ्यासालाही महत्त्व द्यावंसं त्याला वाटतं. त्याच्या कॉलेजनं त्याला खूप सपोर्ट दिलाय. सेटवर तो पुस्तकं घेऊन जायचा. त्याचे बाबा वकील असल्यानं त्यांचंही मार्गदर्शन मिळालं. ट्रॅफिक पोलीस नि आरटीओतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय लघुपट स्पध्रेत त्यांच्या लघुपटाला सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार मिळाला. दिग्दर्शनाचा हा त्याचा पहिलाच अनुभव होता. ‘रस्तेसुरक्षा’ या विषयावरील या ६ मिनिटांच्या कथेत भावनिक ओलावा होता. शूटिंगदरम्यान पोलिसांनी त्यांना पकडलं होतं पण कारण कळताच सोडूनही दिलं.
विभवला दोन चित्रपटांच्या ऑफर्स असून ते पुढल्या वर्षी फ्लोअरवर येतील. त्यातील भूमिकेच्या तयारीसाठी तो जिममध्ये जातोय. बास्केटबॉल, टेनिस खेळायची आवड असली तरी त्यासाठी वेळ मिळत नाहीये. शाळेपासूनची धावण्याची सवय ‘यश’मध्ये उपयोगी पडली असून आता पुढच्या चित्रपटातही स्पोर्टस् असणारेय. या चित्रपटातील मुख्य भूमिकेव्यतिरिक्त तो दुसरा-तिसरा असिस्टंट म्हणूनही काम करणारेय. सेटवर राहून किती तरी गोष्टी शिकून घेता येतील. त्या दिशेनं काही तरी प्रयत्न करायला पाहिजेत, असं त्याला वाटतंय. त्याला अभिनय नि दिग्दर्शन या दोन्ही गोष्टी आवडतात. रणवीर कपूरचा अभिनय नि नीरज पांडेंचं दिग्दर्शन आवडतं. विभव म्हणतो की, ‘मी अभ्यासात एव्हरेज असलो तरी पण इतर गोष्टींत मी स्वत:ला सिद्ध केलंय. त्यामुळं घरच्यांना माझा अभिमान वाटतो. ‘हे विभवचे आई-बाबा’ अशी ओळख होते तेव्हा मला खूप भरून येतं.. मी काहीतरी अचिव्ह केल्यासारखं वाटतं.. अजून खूप मोठा पल्ला गाठायचाय, ही खूणगाठ मी मनाशी बांधतो. शेखरसरांनी मला ‘यश’साठी संधी दिल्यामुळं आजचं हे ‘यश’ मी अनुभवतोय. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. यापुढं मिळणाऱ्या संधीचं सोनं करायचा मी प्रयत्न करेन..!’
त्यासाठी विभवला ऑल द बेस्ट.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 1:05 am

Web Title: vibhav borker in learn and earn
Next Stories
1 मलिका – ए – किचन
2 रेझर ट्रीटमेंट.. सटासट!
3 विष्णूज् मेन्यू कार्ड : पेरूच्या राज्यात
Just Now!
X