07 July 2020

News Flash

लॉकडाऊन व्हिडीओ माहात्म्य!

डाउनलोड करण्याचे प्रमाण ६६ टक्क्यांनी वाढले

स्वप्निल घंगाळे

बरं आता तुम्ही हा लेख वाचायला घेतला आहे तर आज लॉकडाउनचा ६६ वा दिवस आहे हे तुमच्या लक्षात आलंय का? नसेल कदाचित पण या लेखामध्ये आपण या ६६ दिवसांत तरुणाईसाठी नेट विश्व कसं बदललं आणि खासकरून व्हिडीओला कसं महत्त्व आलं याचबद्दल बोलणार आहोत..

‘नाही नाही रे साडेसात लवकर होईल.. साडेअकरा काय वेड लागलंय का? झोपतात माझ्या घरचे सगळे..सगळ्यांना मिळून एक वेळ ठरवता येत नाही यार’.. सामान्यपणे कट्टय़ावर किंवा एखाद्या ठिकाणी भेटण्यासाठी वापरली जाणारी ही वाक्यं लॉकडाउनच्या काळातही सर्सास वापरली जातात. फक्त नियोजन असतं ते ग्रुप व्हिडीओ कॉलचं. बरोबर नाक्यावरच्या आणि चहाच्या टपरीवरच्या भेटी आता मागील दोन महिन्यांपासून व्हिडीओ कॉलवर होऊ लागल्या आहेत. म्हणजे अगदी दिवसभरात काही केलं नसेल तरी ‘५ मिनिटांमध्ये ५० बातम्या’प्रकारे एकमेकांना अपडेट देण्यापासून ते करोनासंदर्भातील चर्चापर्यंत अनेक गोष्टी नाक्याप्रमाणे आता व्हिडीओ कॉलवर रंगतात. अर्थात नाक्याप्रमाणे इथे मुद्दा आवडल्यावर टाळी देणं, नाही आवडल्यावर टपल्या मारणं असल्या खोडय़ा करता येत नाहीत. मात्र फिल्टर लावून स्क्रीनशॉट काढून असा कॉल झाल्याची सोशल मीडियावर डिजिटल दवंडी पिटवली जाते ती स्टेटस आणि स्टोरीच्या माध्यमातून.

बरं हे करण्यात केवळ परीक्षा रद्द झालेली कॉलेजमधील मुलं किंवा ऑफिसमधील मित्र-मैत्रिणी आहेत असं नाही हा. अगदी नाना—नानी पार्कमधील ग्रुपपासून ते लाफ्टर क्लबपर्यंत आणि मंदिरातील भजनी मंडळींपासून ते फॅमिली कॉल्सपर्यंत अनेक व्यासपीठांवरील लोक  सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांचे डिजिटल दर्शन घेत आहेत. अर्थात ‘ए जरा हा व्हिडीओ का दिसत नाहीये बघ’ किंवा ‘असं अस्पष्ट का दिसतंय’ अशा तोंडी प्रश्नांची उत्तरे आजी—आजोबा, आई—बाबा मुलांकडून समजून घेत आहेत. बरं यामध्ये तरुण त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी फ्लोलेसली आणि एफर्टलेसली कॉल करतात असं नाही. अनेकांच्या कॅमेऱ्याची सेिंटंग होईपर्यंत कॉल संपतो. तर अनेकांना व्हिडीओ कॉलमध्ये एखाद्याच्या घरच्या छताचा पंखा दिसला नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं इतक्या नियमितपणे साचेबद्ध पद्धतीने कॅमेरा अँगल चुकण्याच्या गोष्टी वारंवार घडतात. ‘आम्ही आठवडय़ातून एकदा ठरवून एकमेकांशी व्हिडीओ कॉलवर गप्पा मारतो. त्यातही कॅमेरा वाकडा तिकडा पकडून गोंधळ उडवणाऱ्यामुळे अशा व्हिडीओ कॉल्समध्ये अधिक मजा येते’, असं प्राची गोडसे सांगते.

* नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइमसारख्या ओटीटी सेवांचा रोज वापर करणारे १२२ टक्क्यांनी वाढले

* स्काइप, हँगआऊट, झूमसारख्या सेवांचा वापर मार्च आणि एप्रिलमध्ये वाढला

* स्वीगीवरील दैनंदिन युजर्सचा आकडा ४८ टक्क्यांनी घसरला

* झोमॅटोवरील युजर्सचा आकडा ५२ टक्क्यांनी घसरला.

* ऑनलाइन लर्निगची मागणी वाढली

(कालागॅटो  प्रायव्हेट लिमिटेडच्या अहवालानुसार)

तरुणांच्या बाबातीत व्हिडीओचा आणखी एक वाढलेला वापर म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म. अनेक चित्रपट, मालिका, माहितीपटांचा मुलांनी पार फडशा पाडला आहे. ग्रुपवर कोणता चित्रपट चांगला आहे याबद्दल सल्ले घ्यायचे आणि चित्रपट पाहायचे असा अनेकांचा दिनक्रम आहे. तर वर्क फ्रॉम होम असणारे लोक  वीकेण्ड या कामासाठी सत्कारणी लावताना दिसत आहेत.

केवळ कौटुंबिकच नाही तर ऑफिसच्या अनेक मीटिंग या व्हिडीओ कॉलवरूनच होत आहेत. यामध्ये मग अगदी कॉलदरम्यान कोणाच्या तरी घरच्या स्क्रीनमध्ये डोकावून जाणे, ऑडिओ चालू तर व्हिडीओ बंद आणि व्हिडीओ सुरू तर ऑडिओ बंद असे न कळणारे टेक्निकल ग्लीच किंवा मध्येच पक्ष्यांचे आवाज येणे असे अनेक भन्नाट किस्से घडताना दिसत आहेत. व्हिडीओ कॉलवरील गंमत जंमत सांगणारे अनेक व्हिडीओ मागील दोन महिन्यांत सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले आहेत. बरं या वाढत्या व्हिडीओ कॉलच्या मागणीमुळे अनेक कंपन्यांनी आपल्या सेवांची कात टाकून वाहत्या गंगेत हात धुण्याच्या उद्देशाने बरेच मोठे बदल केले आहेत. त्यामध्ये अगदी झूमपासून, गूगलपर्यंत आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून चॅट रूम व्हिडीओ कॉलमध्ये ५० जणांना एकाचवेळी बोलण्यापर्यंतचे अनेक भन्नाट फिचर्स अपडेट करून युझर्सला आपली सेवा वापरण्यासाठी कंपन्या आकर्षित करताना दिसत आहेत.

* इंटरनेटचा वापर ४० टक्क्यांनी वाढला

* डाउनलोड करण्याचे प्रमाण ६६ टक्क्यांनी वाढले

* अपलोड करण्याचे प्रमाण प्रतिमहिना ३७ टक्क्यांनी वाढले

(एसीटी फायबरनेटच्या अहवालानुसार)

एकीकडे व्हिडीओ कॉलची लाट आलेली असतानाच दुसरीकडे ‘उदंड झाली वेबिनार’ म्हणावं अशी वेळ आली आहे. अगदी गडकिल्लय़ांपासून ते आर्थिक विश्लेषण आणि झूम्बा डान्स सेशन्सपासून ते सेलिब्रिटी गप्पांपर्यंत अनेक नव्या गोष्टी प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येत आहेत. मात्र सुरुवातीला छान वाटणारा या गोष्टींबद्दलचा उत्साह हळूहळू कमी होताना दिसत आहे. तरी या वेबिनार्सच्या माध्यमातून शिकणारे आणि शिकवणारेही बरेच असल्याचे या कालावधीमध्ये दिसून आलं आहे.

अनेक सेलिब्रिटीही फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमातून लाइव्ह व्हिडीओच्या माध्यमातून चॅट शो किंवा गप्पांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. अगदी विराट कोहली, एबी डिव्हिलियर्ससारख्या खेळाडूंपासून ते मराठी कलाकारांपर्यंत अनेकजण या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडीओचे पारंपरिक आणि जगमान्य माध्यम असणाऱ्या यूटय़ूबलाही चांगलीच मागणी आहे. खासकरून महिला वर्गाकडून वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी यूटय़ूबचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. टाळेबंदीच्या काळातील हे वाढते व्हिडिओ महात्म्य पुढे काय रूप घेते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

 

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2020 2:05 am

Web Title: video importance in lockdown zws 70
Next Stories
1 क्षितिजावरचे वारे : ड्रॅगनच्या पाठीवर
2 वर्तमानाशी जोडणारा इतिहासमंच
3 हॅशटॅग #करोनाकट
Just Now!
X