|| वेदवती चिपळूणकर

अपयशातून खचणारी मने आजूबाजूला आपण पाहतो, पण सर्वसामान्यांसारखी जी करिअरची स्वप्नं पाहतो त्यात अपयश आल्यानंतर काही तरी सर्जनशील मार्ग शोधायचा आणि त्यात भरीव काम करून दाखवायचं हे धाडस करणारी तरुणाई फार कमी वेळा दिसते. त्यातही शेतीत उतरून नवनिर्मितीचा ध्यास घ्यायचा, त्यात प्रयोग करायचे आणि उत्पादन मिळवायचं, हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारे विजयराव पवारसारखे तरुण इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
TCS Recruitment 2024
TCSमध्ये होणार पदवीधर उमेदवारांची भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख अन् प्रक्रिया

त्याने अ‍ॅग्रिकल्चरमध्ये बीएस्सी केलं आणि त्याच्यासोबतच्या इतर मुलं आणि सीनिअर्सप्रमाणे शासकीय सेवेत जायचं ठरवलं. एमपीएससीची तयारी त्याने सुरू केली. जवळपास चार वर्ष तो एमपीएससीसाठी प्रयत्न करत होता. त्याच वेळी काही बँकिंगच्या परीक्षाही त्याने दिल्या होत्या. मात्र चार वर्षांनीही मेहनत फळाला येत नाही हे बघून त्याने ते प्रयत्न सोडून द्यायचे ठरवले आणि आपल्या शिक्षणाचा प्रत्यक्षात उपयोग करायचा निर्णय घेतला. शेतीत नवीन काही तरी करण्याचा त्याने चंगच बांधला आणि आता अनेक तरुणांसाठी तो प्रेरणास्रोत ठरलाय. पुणे जिल्ह्य़ातल्या इंदापूर तालुक्यात शेतीचे हे प्रयोग करणाऱ्या विजयराव पवार या तरुण शेतकऱ्याने एमबीएच्या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केलेलं आहे.

एमपीएससीची दोन वेळा मेन्सची परीक्षा देऊन, काही बँकिंगच्या परीक्षा देऊनही काही हाती लागत नाही म्हटल्यावर अनेक मुलं थेट डिप्रेशनमध्येच जातात. मात्र विजयराव याने स्वत:ला निराश न होऊ  देता नव्याने सुरुवात करायची ठरवली. घरचे वेगवेगळे व्यवसाय असूनही त्यात लक्ष न घालता शेतीची आवड म्हणून त्याने शेतीकडे वळायचं ठरवलं. मात्र शेतीकडे पाहण्याचा लोकांचा जो वेगळा दृष्टिकोन आहे, त्यातून त्याची सुटका झाली नाहीच. त्याबद्दल तो सांगतो, ‘‘एमपीएससीचे अटेम्पट्स देऊन पुन्हा शेतीकडे वळणार म्हणजे याला काहीच जमलं नाही म्हणून आता पुन्हा शेती करतोय, असाच लोकांचा समज लगेच तयार झाला. शासकीय सेवेच्या परीक्षा दिल्या म्हणजे तो मुलगा ऑफिसर होणारच हे साऱ्या गावाने गृहीतच धरलेलं असतं. त्यामुळे ते सोडून वेगळं काहीही करायचं म्हटलं की सगळेच जरा वेगळ्या नजरेने बघायला लागतात. काहीही न शिकलेली किंवा शिक्षणात गती नसणारी मुलं मोठी होऊन शेती करतात, असा एक सर्वसाधारण समज असतो, पण मी तर व्यवस्थित शेतीमध्ये पदवी घेऊन आलो होतो. त्यामुळे एवढं शिकूनही हा मुलगा शेती करणार का? असा कुत्सित समजही अनेकांचा होता. मात्र माझ्या घरचे याबाबतीत माझ्या पाठीशी होते. तुला जे आवडतंय ते कर, अशी मोकळीक त्यांनी दिलेली होती,’’ असं विजयराव सांगतो. मात्र शेती करणाऱ्या मुलाच्या समस्या इथेच संपत नाहीत, तर अनेकदा इथूनच सुरू होतात, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. विजयरावच्याही वाटय़ाला ते अनुभव आले. ‘‘शेती तर मी सुरू केली, पण दोन-तीन वर्षांनी जेव्हा लग्न करायचा विषय आला तेव्हाही हा प्रश्न होताच, की शेतकऱ्याला मुलगी कोण देईल! त्यातही सुशिक्षित मुलगा, एमपीएससी सोडून आलेला आणि आता शेतीकडे वळला आहे. दुसरी शंका सगळ्यांना होती, ती म्हणजे शेतीतून असं किती उत्पन्न मिळणार आणि हवामानावर अवलंबून असलेल्या शेतीत कमावण्याची गॅरंटी काय! या सगळ्या समज-गैरसमजांना तोंड देत मी मला आवडेल तेच केलं,’’ असं तो ठामपणे सांगतो.

घरची पारंपरिक शेती होती, मात्र पारंपरिक शेती ही फार परावलंबी असल्याने विजयरावने ‘कंट्रोल्ड फार्मिग’ करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या पदवीच्या शिक्षणात त्याला याबद्दलचं सर्व ज्ञान मिळालेलं होतं. तरीही त्याने प्रात्यक्षिक अनुभव घेण्यासाठी सहा महिन्यांचा या विषयातला डिप्लोमाही केला आणि मग कामाला सुरुवात केली. कोणालाच अनुभव नसलेल्या या क्षेत्रात त्याला अनेक अडचणी आल्या ज्यांना त्याने स्वत:च पडत-धडपडत तोंड दिलं. तो म्हणतो, ‘‘शेती खूप मोठी आहे. त्यातल्या एक एकरात पॉलिहाऊस करायचं ठरवलं होतं. मात्र एक एकराच्या पॉलिहाऊससाठी जवळजवळ चाळीस ते बेचाळीस लाखांची गुंतवणूक करावी लागणार होती. घरातल्यांनी या वेळी कर्जासाठी खूप मदत केली आणि आम्ही ती गुंतवणूक केली. त्यात होणाऱ्या रंगीत सिमला मिरच्यांचं पीक तर तयार झालं, मात्र त्याची बाजारपेठ कोणती याबद्दल मला कल्पना नव्हती. त्यामुळे पहिल्यांदा मी साध्या पुणे मार्केटमध्ये माझा माल घेऊन गेलो. तिथे त्याला काहीच फारसा उठाव मिळाला नाही.’’ केवळ उत्पादनाचं नाही तर वितरणाचंही ज्ञान तितकंच महत्त्वाचं असतं हे लक्षात आलेल्या विजयरावला नंतर ही माहिती मिळाली, की मुळात या प्रकारच्या भाज्यांचे ग्राहक हे बहुतकरून फाइव्ह स्टार हॉटेलवाले असतात. त्यामुळे पुणे मार्केटमध्ये त्याची भाजी कोणी घेणार नाही. ‘‘हॉटेलवाल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी फोन आणि मेलवर संपर्क करून एजंटमार्फत या भाज्यांची विक्री होते हे समजलं. त्यानंतर हळूहळू हे एजंट शोधून, कधी थेट ग्राहकांशी संपर्क वाढवून व्यापार करायला मी शिकलो. ज्या एक्झॉटिक भाज्या असतात त्या हळूहळू करत बऱ्याचशा भाज्या मी पॉलिहाऊसमध्ये घ्यायला सुरुवात केली,’’ असं त्याने सांगितलं.

लहानपणापासून अण्णा हजारेंच्या सामाजिक कार्याचा प्रभाव असल्यामुळे विजयरावला आपली शेती केवळ आपल्यापुरती मर्यादित ठेवायची नाही. त्याच्या दृष्टीने शेतीतून फायदा कसा करून घ्यायचा हे प्रत्येक शेतकऱ्याला कळायला हवं. त्यासाठी सगळ्यांसाठी काही तरी करायची त्याची इच्छा आहे. तो सांगतो, ‘‘दरवर्षी एमपीएससीच्या समजा पाचशे पोस्ट्स निघत असतील तर त्यासाठी किमान लाखभर मुलं परीक्षा देतात. त्यामुळे ज्यांना पोस्ट मिळते ते पाचशे सोडता बाकी सर्व समाजाच्या दृष्टीने अपयशी असतात. असे दोन-तीन प्रयत्न झाले, की मुलं डिप्रेसच होतात आणि काय करायचं हे त्यांना कळत नाही. मग कुठे तरी पोटापाण्यापुरती फुटकळ नोकरी करत राहतात. मात्र शेतीकडे वळण्याचा पर्याय फार कमी लोक स्वीकारताना दिसतात. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीतील उत्पन्न कमी होत चाललंय म्हणून जीडीपी कमी होतोय, असं सगळेच सांगतात. मग तरुणांनी शेतीत येऊन ते उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला तर काय हरकत आहे? एमपीएससीची पोस्ट घेऊन जेवढं जनकल्याण करणार तितकंच किंबहुना थोडं जास्तच चांगलं काम आपल्या हातून इथे शेतीत होणार आहे,’’ असं विजयराव तळमळीने, तितक्याच ठाम विश्वासाने सांगतो. शेतकरी म्हणून आपण जीडीपीत तर भर घालणारच आणि शेतीसारख्या व्यवसायाला उंचीवर नेऊन ठेवण्याचेही प्रयत्न आपल्या हातून होत राहतील. शेतीतून काही तरी निर्माण केल्याचं समाधानही मिळतं. त्यामुळे डिप्रेस होण्यापेक्षा निर्माणाचा आनंद घ्यायला हरकत नाही, असे स्वानुभवातून आलेले बोल तो ऐकवतो.

विजयरावला शेतकऱ्यांचं संघटन करून सर्वाना एकत्रित पुढे नेण्याची इच्छा आहे. शेतीबद्दल ज्ञान असलेल्या आणि प्रत्यक्षातही ते करण्याची क्षमता असलेल्या तरुणांनी या क्षेत्रात यावं अशी त्याची इच्छा आहे. शेतीला पुन्हा तिचा दर्जा प्राप्त करून द्यावा आणि एक व्यवसाय म्हणून यात यशस्वी होता येतं हे सर्वांपर्यंत पोहोचवावं, असं विजयराव पवार याचं स्वप्न आहे.

अशा वेळा येतात जेव्हा आपण करतोय ते चूक की बरोबर, हा प्रश्न पडतो. मात्र अशा वेळी आपण आपल्या आवडीचं काही तरी करतोय याच्या समाधानापुढे बाकी सगळ्या अडचणी फिक्या पडतात. तेव्हा स्वत:ला हेच समजवायचं असतं की, आपल्याला हे आवडतंय आणि आपल्याला हेच करायचंय. आपण स्वत:च्या बरोबरीने समाजाच्याही चांगल्याचा विचार नक्की करायचा, मात्र तेच इतर आपल्याला हसतात तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करायला शिकायचं.

– विजयराव पवार