08 July 2020

News Flash

चॅनेल Y: ‘जाहिरात’दारी..

चौसष्ट कलांनंतर मानली जाणारी पासष्टावी कला म्हणजे अ‍ॅडव्हर्टायझिंग.

जाहिरात ही पासष्टावी कला मानली जाते. या कलेचा कस लागतो ऑनलाइन माध्यमात. कारण ऑनलाइन प्रेक्षकाइतका चंचल प्रेक्षक इतर कुठल्याच माध्यमात सापडत नाही. यूटय़ूबवरच्या जाहिरातबाजीचा आढावा घेणारी ‘अॅड’ सफर..

जाहिरात ही केवळ टीव्हीवर दाखवायची किंवा पेपरात छापायची गोष्ट आहे असं समजण्याचे दिवस कधीच मागे पडले. चौसष्ट कलांनंतर मानली जाणारी पासष्टावी कला म्हणजे अ‍ॅडव्हर्टायझिंग. ही कला आता वाढत्या ऑनलाइन प्रेक्षकांसाठी तिथेही पावलोपावली (क्लिकोक्लिकी) झळकायला लागली आहे. ऑनलाइन माध्यमाचं वैशिष्टय़ हे की, इथे तुम्हाला कालमर्यादा जाणवणारी नाही. टीव्हीवर दाखवायची जाहिरात असते साधारण २० सेकंदांची. पण यूटय़ूबवरची जाहिरात पाच सेकंदांपासून ते पाच मिनिटांपर्यंतही असू शकते. मोठय़ा जाहिरातींमध्ये प्रेक्षकाला १०-१५ सेकंदांनंतर जाहिरात ‘स्किप’ करण्याचा पर्याय असतो. तरी काही जाहिराती इतक्या विलक्षण असतात, की त्यांना स्किप करण्याऐवजी आपण त्यातच जास्त गुंततो. या पासष्टाव्या कलेचा कस या माध्यमात लागतो. कारण ऑनलाइन प्रेक्षकाइतका चंचल प्रेक्षक इतर कुठल्याच माध्यमात सापडत नाही. त्याला धरून ठेवण्याचं कसब काही यूटय़ूब जाहिरातींनी केलं आहे. प्रेक्षकांच्या मनाला सहज हात घालणाऱ्या या जाहिराती अधिक प्रभावीपणे या नवमाध्यमातून मांडल्या जातात.
13

गेल्या काही महिन्यांत अशा अनेक यूटय़ूब जाहिराती गाजल्या. व्हायरल झाल्या आणि या जाहिरातींची चर्चा इतर अनेक माध्यमांतून केली गेली. ‘गुगल’ने टुगेदर ऑनलाइन असं म्हणत आई आणि मुलीच्या नात्याची, एकमेकींविषयीची भावनिक ओढ दाखवणारी हृदयस्पर्शी जाहिरात अशीच लक्षात राहणारी.. कोणत्याही गोष्टीची सुरुवात कायम लक्षात राहते. मग तो मुलीच्या शाळेचा पहिला दिवस असो किंवा आईचा ऑनलाइन विश्वातला पहिला दिवस! दोघींचं एकमेकींच्या पाठीशी उभं राहणं मनाला भावतं.
जाहिरातीचा हा खेळ टीव्हीसारखा काही सेकंदांत संपत नाही तर प्रेक्षक त्यात गुंतून जाईपर्यंत काही मिनिटं तो आपल्याला आकर्षित करत राहतो. सर्फ एक्सेलच्या जाहिरातीतला छोटा अथर्व फुटबॉल टीममध्ये सिलेक्शन झाल्याचं खोट सांगून आईकडून नवे बूट घेतो, पण जेव्हा त्याचं खोटं आईसमोर येतं आणि त्यामागचं कारण समजतं तेव्हा ती त्याला रागवण्याऐवजी त्याच्यातल्या माणुसकीला दाद देते. त्याची दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा बघून तो ‘रेडी फॉर लाइफ’ असल्याचं सांगते.
यूटय़ूबवरच्या ब्रिटिश एअरवेजच्या जाहिरातीदेखील लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाहीत. ‘टायटन’च्या ‘रागा कलेक्शन’ची जाहिरात ही संकुचित वृत्तीला छेद देणारी. जाहिरातीमधून स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याच्या कारणांकडे नेहमी चुकीच्या व त्यांच्या क्षमतेपेक्षा केवळ ‘स्त्री आहे म्हणून.’ असा सूर आळवला जातो त्यावर सुयोग्य टिप्पणी केली गेली. केवळ वेगवेगळ्या उत्पादनांच्या नव्हे, तर महिला सबलीकरण, स्त्री भ्रूणहत्या, हुंडा प्रथा, स्वच्छता अशा वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर केल्या जाणाऱ्या जाहिराती या आताच्या काळात टीव्हीपेक्षा अधिक इंटरनेटवर ‘ट्रेण्डिंग’ आहेत. यूटय़ूबचा सजगपणे वापर करणारा युथ हा अशा अ‍ॅड्सना मिळणारा अपेक्षित प्रेक्षकवर्ग आहे.
यूटय़ूबवर केल्या जाणाऱ्या जाहिराती कशा तयार होतात, त्यातून कसा व किती फायदा होतो, त्याचे नियम काय आहेत, जाहिरात कोण देऊ शकतं, त्याच्यासाठी काय खर्च येतो, अशा एक ना अनेक गोष्टींची सविस्तर माहिती यूटय़ूबने सर्वाना उपलब्ध करून दिलेली आहे. ‘वेब अ‍ॅड्स’ या संकल्पनेच्या ‘अथ’पासून ‘इति’पर्यंत सगळी माहिती यूटय़ूबने खुल्या हाताने नेटकरांना दिलेली आहे. स्वत:ची वेब अ‍ॅड तयार करण्यासाठी ‘गाइड’ आणि ‘केस स्टडीज’ सुद्धा यूटय़ूबने पुरवल्या आहेत.
‘जो दिखता है, वही बिकता है..’ अशा न्यायाने प्रत्येकाला स्वत:च्या कलेची, उत्पादनांची, मेहनतीची जाहिरात करणं आजच्या जीवनशैलीत आवश्यक झालं आहे. ‘जाहिरात’बाजी करणं ही आता फक्त मोठय़ा कंपन्यांचीच मक्तेदारी राहिलेली नसून घरगुती उद्योग करणाऱ्या किंवा स्टार्टअप करणाऱ्या तरुणांपासून ते ‘सेकण्ड इनिंग्स’मध्ये नवीन काही करू पाहणाऱ्या आजी-आजोबांसाठीसुद्धा स्वत:च्या कामाची जाहिरात करणं काही ‘क्लिक्स’ दूर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2016 1:06 am

Web Title: viral advertising on social media
टॅग Social Media
Next Stories
1 द चॉकलेट क्रिटिक : देशी स्वादांचा ‘बारकोड’
2 खाऊच्या शोधकथा : सॉस आणि केचअप
3 फाइन डाइन : सूप आणि एग कोर्स
Just Now!
X