यश मिळवल्यानंतर माणसं ठोकळेबाज प्रतिक्रिया देतात. ‘डेकोरम’ला साजेसंच असतं ते, पण त्यामुळे खरा माणूस मागेच राहतो. परवा एका मोठ्ठय़ा परीक्षेचा रिझल्ट लागला. पहिल्या प्रयत्नात परीक्षेचं कोडं सोडवणाऱ्या त्याने ‘खरी’ प्रतिक्रिया दिली. व्हायरल झालेला तो काय म्हणाला, त्याचं यश पाहताना आपलं अपयश कसं उघडय़ावर आलं? वाचा सविस्तर..

मंडळी, एखादी नॅशनल लेव्हलची आणि त्यातही स्पर्धा परीक्षा कॅ्रक केल्यानंतर माणूस काय म्हणतो? देशाची सेवा करेन, माझ्या शिक्षणाचा गरिबांना उपयोग होईल अशी पॉलिसी तयार करेन, सामाजिक सुधारणांना प्राधान्य देईन, स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी झटेन.. अशा स्वरूपाची उत्तरं हिट होतात. चॅनेलवाल्यांना चघळायला आणि पेढा भरवतानाच्या फुटेजसह दाखवायला बरी पडतात. परवा ‘यूपीएससी’चा रिझल्ट जाहीर झाला. (निकाल लागला मुद्दामच लिहिलं नाही) २१ वर्षांच्या अन्सार अहमद शेखनं पहिल्या प्रयत्नांतच ‘यूपीएससी’चं शिवधनुष्य पेललं. त्याचं गाव – जालन्याजवळचं शेलगाव. वडील रिक्षा चालवतात. सर्वसाधारण कुटुंब. ग्रामीण पाश्र्वभूमी आणि बेतास बेत सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती म्हटल्यावर आजचा दिवस अन्सारवर साजरा करायचा असं प्रसारमाध्यमांनी पक्कं केलं. एक्सक्लुसिव्हच्या मोडमध्ये कुणी त्याच्या कानात इअरफोन्सचे प्लग रोवले. तो बोलतोय ते टिपण्यासाठी एअरप्लेन मोडवरचे एक्सपेनसिव्ह हँडसेट्स, ब्रँडनेम ठळकपणे दर्शवणारे चॅनेल्सचे बूम या सगळ्या गदारोळात तो एक वाक्य म्हणाला- ‘मी शेख आहे, शुभम नाही. हे सगळ्या जगाला आता खुलेपणाने सांगू शकेन.’ देश, तो चालवणारी माणसं, सरकारी सिस्टीम, राजपत्रित अधिकारी, त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, रुबाब, दरारा, यूपीएससीच्या इंटरव्ह्य़ूचं चॅलेंज या सगळ्या पल्याडचं वाक्य. साधं, सोपं आणि थेट.
मुस्लीम कुटुंबातला अन्सार दहावी पूर्ण केल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात आला. अ‍ॅडमिशन झाली, आता राहायची सोय बघायला हवी. मित्रांसोबत पेइंग गेस्ट, कॉट सिस्टीमसाठी भरती होण्यासाठी वाऱ्या करताना नाव विचारलं जाई. पैसे, अटी सगळं ओके होत असे पण नाव सांगितल्यावर नकार मिळे. नकारामागचं कारण कळण्याएवढं वयही नव्हतं त्याचं. राहायची सोय व्हायला हवी काहीतरी. कोणत्या नावांना सकारात्मक रिस्पॉन्स मिळतो हे त्यानं ताडलं. पुढच्या खेपेस नाव विचारल्यावर तो ‘शुभम’ म्हणाला. शुभम म्हणजे अगदी गंधवळणी, आध्यात्मिक वगैरे. साहजिकच राहण्याचा मार्ग मोकळा झाला. पाच वर्षांत फग्र्युसन कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्स ग्रॅज्युएशन करून बाहेर पडला. आणि ते करता करता यूपीएससीचा अभ्यास सुरू होता. अनेक गुणी मुलं ‘पौगंडावस्था ते गृहस्थाश्रम’ टप्पा यूपीएससी प्रिपरेशन उपक्रमासाठी देतात. पण परीक्षा क्रॅक होत नाही. कारण ती टफच असते आणि नशिबाची साथही लागते. शुभमने प्रीलिम, मेन्स आणि इंटरव्ह्य़ू असं सगळं वन टेक ओके पार केलं. जवळपास चमत्कारच! असं ऐतिहासिक काही मिळवल्यानंतर माणूस तरंगतो, एक्साइट होतो. पण शुभमला जोखडातून सुटायचं होतं. उसन्या नावाची झूल टाकून देऊन खऱ्याखुऱ्या नावानिशी समाजासमोर यायचं होतं.
मुलींच्या शिक्षणासाठी काम करताना चिखलफेक झेलूनही कार्य अविरत सुरू ठेवणाऱ्या सावित्रीबाई फुलेंच्या नावाने पुण्यात विद्यापीठ आहे. आदरणीय व्यक्तीचं नाव दिलं की मोकाटपणे काही करता येतं हे वारंवार सिद्ध होतंच आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून मिरवणाऱ्या पुण्यनगरीत गुन्ह्य़ांचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. अमली पदार्थाचे व्यवहार, देहविक्रय या गोष्टीही तेजीत आहेत. घरटी नव्हे माणशी गाडय़ांमुळे हवा आणि ध्वनिप्रदूषणात पुणे देशात अव्वल शहरांमध्ये आहे. ६९ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही शहरात परिपूर्ण आणि सर्वसमावेशक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. स्टेटस सिम्बॉल झालेला मेट्रो प्रकल्पही बासनात गुंडाळल्यागत आहे. नदीच्या पात्रात हाऊसिंग कॉम्प्लेक्स उभे राहात आहेत. अतरंगी पाटय़ा आजही ट्रेंण्डिंग होतात. कन्हैया दादांच्या भाषणाला मोप गर्दी जमते. जालना ते पुणे असं ‘भारत टू इंडिया’ संक्रमण झाल्यावर जात, धर्म, पंथ,वंश, रंग यांचा पीळ कमी होईल असं शुभमला वाटलं होतं. पण अन्सार शेख नावामुळे त्याला प्रोग्रेसिव्ह पुण्याचा थॉटप्रोसेस पॅटर्न समजला. पुण्यात जे अन्सारच्या बाबतीत घडलं ते भारतातल्या कुठल्याही मेट्रो सिटीत घडू शकतं. मात्र त्याच वेळी ‘माय नेम इज खान, अ‍ॅण्ड आय अ‍ॅम नॉट अ टेररिस्ट’ अशी (सॉर्ट ऑफ एक्सप्लनेटरी) वाक्यं का उच्चारावी लागतात याचा शोध अन्सारला घ्यावाच लागेल. समाजात एकरूप होऊन मिसळण्याऐवजी जगणं स्वतंत्र बेट का व्हावं याची उत्तरंही अन्सारला मिळू लागतील. थिअरी एक्झामपेक्षा वास्तव जगण्याची यूपीएससी किती खडतर आहे याची एक झलक अन्सारने अनुभवली आहे. यूपीएससी पहिल्या प्रयत्नात क्रॅक करणाऱ्या तरण्याबांड मुलाला स्वत:च्या बेसिक ओळखीसाठी मुक्त झाल्याचं वाटणं व्यवस्था म्हणून आपल्या सगळ्यांचंच अपयश आहे. भावी शुभम ऊर्फ अन्सारसाठी शुभस्य शीघ्रम म्हणत शतखंडित अर्थात फॅ्रगमेंट्समधून बाहेर पडू या!