|| वेदवती चिपळूणकर

एकदा पक्क्या झालेल्या मैत्रीला प्रयत्नपूर्वक जपावंही लागतं आणि वेळही द्यावा लागतो हे अनेकदा तरुणाईला कळतच नाही किंवा कळलं तरी जमत नाही. जपायला सोप्या आणि तरीही कायम फायद्याच्या वाटणाऱ्या व्हर्च्युअल मैत्रीला अशा वेळी प्राधान्य दिलं जातं. या व्हर्च्युअल मैत्रीचं प्रमाण वाढल्याचं निरीक्षण ‘स्नॅपचॅट’ने काही महिन्यांपूर्वी केलेल्या सव्‍‌र्हेमधून मांडण्यात आलं होतं.

‘अगं माझा एक मित्र आहे, त्याच्याशी काहीही बोलू शकतो आपण!’, ‘कोणता मित्र? आपल्याला कधी भेटला नाही का?’, ‘अगं इन्स्टाग्रामवर फॉलो करतो आम्ही एकमेकांना आणि मग फेसबुक मेसेंजरवरपण गप्पा मारतो’. ‘अगं पण ओळखतेस का तू त्याला? ओळखते की! कित्येक महिने झाले आम्ही गप्पा मारतोय.. असे संवाद आजच्या पिढीसाठी नवीन नाहीत. आजवर जिवाभावाचं मानलं गेलेलं असं मैत्रीचं नातंही आजच्या काळात समोर दिसणाऱ्या, भेटणाऱ्यांपेक्षा आभासी विश्वात जोडल्या जाणाऱ्यांशी सहज बांधलं जातं आहे. पण, या व्हर्च्युअल मैत्रीच्या काही मर्यादा आहेत का?..

समोरचा माणूस नेमका कसा आहे यासाठी त्याला भेटणं, त्याच्याशी प्रत्यक्ष बोलणं, त्याला समजून घेणं वगैरे गोष्टींवर आजच्या तरुणाईचा फारसा विश्वास नाही. एकाच वेळी ही पिढी अति चिकित्साही करते आणि दुसऱ्या बाजूला पटकन विश्वासही ठेवते. आताच्या तरुणाईच्या लेखी या व्हर्च्युअल फ्रेंडशिपला स्वत:चं विशिष्ट स्थान आहे आणि तितकंच जास्त महत्त्वही आहे.

प्रत्यक्षात भेटणारे, रोजच्या वावरण्यातले, लहानपणापासूनचे, कॉलेजमधले, शाळेपासूनचे इत्यादी अनेक प्रकारचे मित्रमैत्रिणी आपण जपलेले असतात. त्यांच्याशी विश्वासाने अनेक गोष्टींचं शेअरिंग होतं, अनेक सिक्रेट्स त्यांच्याकडे सुरक्षित असतात. अनेक प्रयत्नांनी जपलेली ही मैत्री हळूहळू घट्ट होत जाते. मात्र एकदा पक्क्या झालेल्या गोष्टीला प्रयत्नपूर्वक जपावंही लागतं आणि वेळही द्यावा लागतो हे अनेकदा तरुणाईला कळतच नाही किंवा कळलं तरी जमत नाही. जपायला सोप्या आणि तरीही कायम फायद्याच्या वाटणाऱ्या व्हर्च्युअल मैत्रीला अशा वेळी प्राधान्य दिलं जातं. या व्हर्च्युअल मैत्रीचं प्रमाण वाढल्याचं निरीक्षण ‘स्नॅपचॅट’ने काही महिन्यांपूर्वी केलेल्या सव्‍‌र्हेमधून मांडण्यात आलं होतं.

‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ या सामाजिक चळवळीचे प्रोजेक्ट डायरेक्टर उन्मेष जोशी व्हर्च्युअल फ्रेंडशिपबद्दल म्हणतात, ‘व्हर्च्युअल संवादाला मर्यादा असतात. अनेकदा या संवादातून निर्माण झालेल्या मैत्रीचं रूपांतर प्रेमातही होतं. मात्र त्यात खरेपणा किती असतो हे पडताळून बघितलं जात नाही. त्यामुळे जेव्हा या मैत्रीतून किंवा रिलेशनशिपमधून काही वाईट घडतं तेव्हा सगळ्या डिजिटल फूटप्रिंट्सचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. या माध्यमाच्या मर्यादांमुळे सत्यता पडताळणी शक्य होत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हर्च्युअल मैत्रीतले मित्रमैत्रिणी खऱ्या आयुष्यात गरजेला उपयोगीही पडू शकत नाहीत, मदतीला येऊ  शकत नाहीत. प्रत्यक्ष संवादातला आपलेपणा, ओलावा न समजल्याने मुलं चॅटिंगमध्येच अधिक व्यक्त होतात. वैयक्तिकरीत्या समजून घेण्याची गरज आणि त्याचं महत्त्व मुलांना कळलं तर या फोफावत चाललेल्या वेडाला आळा बसू शकेल’. व्हर्च्युअल मैत्रीतला सगळ्यात मोठा धोका म्हणजे डिजिटल फूटप्रिंट्स! डिजिटल जगात केलेली कोणतीही गोष्ट लपून राहत नाही किंवा पूर्णत: पुसूनही टाकता येत नाही. त्यामुळे कोणालाही पाठवलेले फोटोज, व्हिडीओ, अगदी मेसेजसुद्धा डिलिट केले तरीही परत मिळवता येतात आणि त्याचा गैरवापर होऊ  शकतो. त्यामुळे व्हर्च्युअल मैत्रीत शेअरिंग कितीही सोपं वाटलं तरीही ते प्रत्यक्षात अत्यंत धोकादायक ठरू शकतं, हे वास्तव आहे.

स्नॅपचॅटच्या सव्‍‌र्हेनुसार मात्र फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त होण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली आहे. एकमेकांची भाषाही न समजणारे व्हर्च्युअल मित्रमैत्रिणी अशा दृश्य माध्यमातून वारंवार व्यक्त होताना दिसतात, असं ‘स्नॅपचॅट’चं निरीक्षण आहे. ही गोष्ट कितीही गोड आणि छान वाटली तरी त्यात धोकाही तितकाच आहे. प्रत्यक्षातली मैत्री कमी करून व्हर्च्युअल मैत्रीवर अधिक विश्वास असणाऱ्या या पिढीची नक्की मानसिकता काय आहे याबद्दल मानसोपचारतज्ज्ञ वैशाली देशमुख यांनी ‘व्हिवा’शी बोलताना प्रकाश टाकला. त्यांच्या मते व्हर्च्युअल मैत्रीमध्ये समोरची व्यक्ती नेमकी काय प्रतिक्रिया देते हे प्रत्यक्ष दिसत नसतं. त्यामुळे प्रत्येक जण आपल्याला सोईस्कर अशा पद्धतीने गप्पा मारू शकतो. समोरासमोर बोलायला एरवी घाबरणारे किंवा बिचकणारे मुलंमुलीही सोशल मीडियावर भरपूर गप्पा मारतात. ‘पालकांनीही लहानपणापासूनच या बाबतीत मुलांकडे लक्ष द्यायला हवं म्हणजे तरुणपणी मुलांवर लक्ष ठेवावं लागणार नाही. मुलांशी होणारा घरातला संवाद कमी असेल तर व्हर्च्युअल जगात मनाने अडकून पडण्याच्या शक्यता वाढतात. एकदा बोलायला सुरुवात केली की त्याची मर्यादा मुलांना लक्षात येत नाही आणि हळूहळू मुलं त्याची अ‍ॅडिक्ट होत जातात. व्हच्र्युअली एखाद्याकडून मिळणारी कॉम्प्लिमेन्ट, कम्फर्ट या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या वाटतात की प्रत्यक्षात ती समोरची व्यक्ती आपल्याला पुरेसं ओळखतही नाही या गोष्टीची जाणीवच होत नाही’, असं वैशाली देशमुख यांनी सांगितलं. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून गुंतागुंतीच्या असणाऱ्या व्हर्च्युअल जगातला तरुणाईच्या आयुष्यातला वाढता सहभाग नेमका कोणत्या दिशेने जाणार आहे याचा पॅटर्न प्रत्यक्ष मानसशास्त्रालाही ओळखता आलेला नाही.

व्हर्च्युअल मैत्रीला केवळ नकारात्मकच बाजू आहेत असं नाही. मात्र त्याच्या सकारात्मक बाजू समोर येण्यासाठी अत्यंत सावधपणे व्हर्च्युअल जगात वावरावं लागतं. प्रत्यक्षातल्या मैत्रीला द्यावा लागणारा वेळ आणि संयम या दोन्ही गोष्टी आताच्या तरुणाईकडे कमी आहेत. त्यामुळे साहजिकच ऑनलाइन मिळणाऱ्या इतर गोष्टींप्रमाणेच मैत्रीही तिथेच शोधली गेली. गरज वाटेल तेव्हा गप्पा मारता येणारे आणि खोटय़ा का होईना, पण कॉम्प्लिमेंट देणारे ऑनलाइन मित्रमैत्रिणी सोयीचे वाटायला लागले. वेळेला त्यांच्यासाठीही धावून जायची जबाबदारी नाही आणि आपल्याला वेळ असेल तेव्हा गप्पा मारण्याची मोकळीकही मिळते. अशा आखूडशिंगी बहुदुधी मैत्रीला तरुणाईने जवळ केलं तर त्यात नवल नाही. फक्त कोणाशी किती खाजगी बोलायचं, कोणत्या गोष्टी शेअर करायच्या नाहीत, समोरच्याच्या कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचं, खरं मानायचं आणि कोणत्या गोष्टी उडवून लावायच्या यात अत्यंत हुशारी आणि सावधपणानेच निर्णय घ्यावे लागतात. संपूर्ण डोळे झाकून विश्वास टाकणारी मैत्री या सोशल मीडियावरून होऊ  शकत नाही, विचार न करता मन मोकळं करण्यासाठीचं व्हर्च्युअल मैत्री हे माध्यम नाही आणि प्रत्यक्षातल्या संवादाची रिकामी जागा भरून काढण्यासाठी आभासी मैत्री हा पर्याय नाही, याचं भान मनाशी बाळगणं गरजेचं आहे!

केवळ ‘हॅपी फ्रेंडशिप डे’ अशा शुभेच्छा दिल्या, कार्ड्स पाठवली, व्हिडीओज फॉरवर्ड केले म्हणजे मैत्री सिद्ध होत नाही. त्यासाठी मनापासून मोकळं बोलता येईल आणि त्याचा कुठेही गैरवापर होणार नाही, सिक्रेट्स जाहीर होणार नाहीत, हा विश्वास सगळ्यात महत्त्वाचा !

साहाय्य : गायत्री हसबनीस

viva@expressindia.com