आसिफ बागवान

समाजात वेळोवेळी घडणाऱ्या हिंसक किंवा हृदय विचलित करणाऱ्या घटनांचे व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर सातत्याने येत असतात. ते ‘सत्य’ व्हिडीओ पाहिल्यानंतर मोठय़ा संख्येने फॉरवर्डही केले जात असतात, पण असं करताना आपल्या नकळत कुणीतरी आपल्याभोवती आभासी जग उभं करतंय, याचं भानही आपल्याला राहात नाही. अशा ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’चा धोका वाढत चालला आहे.

सुरतमध्ये एका कोचिंग क्लासच्या इमारतीला लागलेल्या आगीनंतर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी इमारतीच्या वरच्या मजल्यावरून खाली उडय़ा मारल्या. यात काही विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले तर काहींना अपंगत्व आले. अवघ्या जगाने हे भयंकर दृश्य जसेच्या तसे पाहिले..

काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील अंकलेश्वर येथे उंच गणेशमूर्ती घेऊन जात असलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना मूर्तीला अडथळा ठरणाऱ्या विजेच्या तारा बांबूने ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात आठ जणांना विजेचा धक्का बसला. यात दोघे जागीच ठार झाले. जगाने हे दृश्यही जसेच्या तसे पाहिले..

ही फक्त दोन उदाहरणे. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या असंख्य घटनांचे आपण सारे ‘साक्षीदार’ आहोत. या घटना घडल्या तेव्हा आपण कदाचित तिथे नसूदेखील, पण त्या घटनांचे चित्रीकरण आपल्यापर्यंत जसेच्या तसे पोहोचले. टीव्हीवरील बातम्यांमध्ये किंवा वृत्तपत्रातील छायाचित्रांमध्ये ही दृश्यं दिसण्याच्याही आधी त्या घटनांचे आपल्या मोबइलमध्ये चित्रीकरण करण्यात आले. माध्यमांचे प्रतिनिधी, कॅमेरामन घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच तो प्रसंग व्हिडीओरूपात समाजमाध्यमांवरून प्रसारित करण्यात आला. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला तो व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाने हळहळ व्यक्त करतच तो ‘फॉरवर्ड’ही केला. पण हे सगळं करत असताना कुणाच्या मनात हा विचार आला का की, त्या घटना रेकॉर्ड करणाऱ्याला त्या क्षणी असं करणं सुचलं तरी कसं? सुरतमध्ये इमारतीला आग लागली तेव्हा रस्त्याच्या पलीकडे उभ्या राहिलेल्यांच्या हातातले मोबाइल आगीचं शूटिंग करण्यात व्यग्र होते. पण यातल्या कुणाला आपण चित्रीकरण करण्याऐवजी तेथे जाऊन प्रत्यक्ष मदत करावी, असं वाटलं नाही का? अंकलेश्वरमध्ये शॉक लागून निश्चेष्ट पडलेले तरुण पाहूनदेखील त्याचं व्हिडीओ रेकॉर्डिग करणाऱ्यांना ते काम इतकं महत्त्वाचं वाटत होतं?

हे असं या दोनच घटनांत घडलं, असं नाही. याही आधी असा अनुभव अनेकदा आला आहे. रस्त्यावर झालेल्या अपघातानंतर तेथे पडलेल्या जखमींना रुग्णालयात नेण्याऐवजी मोबाइलवरून त्या अपघाताचं चित्रीकरण करणारे नेहमीच दिसतात. कुणीतरी एखाद्या महिलेला मारहाण करत असताना त्याला रोखण्याऐवजी त्याचं चित्रीकरण केलं जातं. हे किती घृणास्पद? त्याहून अधिक संताप होतो, जेव्हा एखाद्या लहान मुलाला कुणीतरी बेदरकारपणे मारहाण करत असताना या प्रसंगाचं चित्रीकरण करणारा ते थांबवण्याचा साधा प्रयत्नही करत नाही. मग नंतर तोच व्हिडीओ ‘इस व्हिडीओ को इतना फैलाओ की, बच्चे को मारनेवाले को कडी से कडी सजा मिले’ अशा ओळीनिशी फॉरवर्ड केला जातो. ते फॉरवर्ड करणाऱ्यांना असं का नाही वाटत की, ज्या माणसाने मुलाला होणारी मारहाण न थांबवता हे चित्रीकरण केलं, त्यालाही शिक्षा व्हायला हवी? आपल्या डोळ्यांदेखत हे घडत असताना त्याचा व्हिडीओ काढण्याला प्राधान्य देणं ही कोणती मानसिकता?

एखाद्या ठिकाणी जमाव किंवा गुन्हेगारी टोळीकडून होत असलेल्या हिंसाचाराचं चित्रीकरण करणं एकवेळ समजून घेता येतं. अशा वेळी कुणी एक व्यक्ती तो हिंसाचार रोखू शकत नाही. त्यावेळची असहायता आणि मनात दाबलेला संताप यांना चित्रीकरणातून वाट मोकळी करून देण्यात येते. ते समर्थनीय आणि धाडसाचं आहे. पण अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माणसाला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याचे फोटो काढणं, हे माणुसकीचं लक्षण समजायचं? अनेकदा तर अशा प्रकारचे चित्रीकरण करताना वेगवेगळे अँगल, झूम यांचा वापर करून ‘कॅमेरामन’ आपल्या ‘कौशल्या’चे दर्शनही घडवत असतात.

बहुतांश वेळा अशा प्रकारच्या चित्रीकरणाचा हेतू तो व्हिडीओ समाजमाध्यमांवरून प्रसारित करणं हाच असल्याचं दिसून येतं. अशा व्हिडीओंना समाजमाध्यमांवरून लाइक, कमेंट, शेअर मुबलक मिळतात. तेव्हा जाणवतं की, आपण सारे ‘रिअ‍ॅलिटी’च्या खूप प्रेमात आहोत. दूरचित्रवाहिन्यांवर ‘रिअ‍ॅलिटी शो’ना लोकप्रियता मिळते, वृत्तवाहिन्यांवर तर ‘लाइव्ह’ म्हणून जे दाखवलं जातं, ते अगदी चवीने पाहिलं जातं. फेसबुकवर सीसीटीव्हीचित्रित व्हिडीओंना अकारणच पसंती मिळते. हे सगळं लक्षण आपण ‘रिअ‍ॅलिटी’ नावाच्या दाखवेगिरीच्या पाशात अडकल्याचं आहे.

पण या दाखवेगिरीच्या हव्यासापोटी आपण ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’कडे लोटले जातोय का? ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ या शब्दाचा तंत्रज्ञानातला अर्थ वेगळा आहे. एखाद्या उपकरणाच्या मदतीने आपल्याभोवती एक आभासी जग निर्माण करून त्यात वावरण्याची व्यवस्था हे तंत्रज्ञान करून देतं. अशा ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ची उपयुक्तता प्रामुख्याने गेमिंग किंवा एन्टरटेन्मेंट क्षेत्रात असली तरी, येत्या काळात ती अन्य क्षेत्रांतही कामी येऊ शकेल. पण ज्या ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ची आपण चर्चा करतोय, ती दाखवेगिरीपुरतीच आहे. असं सत्य जे आपल्याला पाहायचंय म्हणून दाखवलं जातं. आपल्याला जितकं पाहायचंय तितकंच दाखवलं जातं किंवा आपण जितकं पाहावं, असं वाटतं तितकंच दाखवलं जातं. हिंसाचार, अपघात, हाणामारी, आग, प्राणी हल्ले, नैसर्गिक आपत्ती, भांडणे, प्रक्षोभक वक्तव्य अशा विषयांशी संबंधित व्हिडीओच आपल्याला वारंवार मिळतात. त्याचं कारण आपण ते आवर्जून पाहतो म्हणून. असे व्हिडीओ पाहताना आपल्या भावना उचंबळून येतात. आपल्यातली संवेदनशीलता जागृत होते. पण मग असे चित्रीकरण करणाऱ्यांच्या संवेदनशीलतेचे काय, याचा विचार आपण कुणीही करत नाही.

या साऱ्याचा आपल्यावर काय परिणाम होतो, याचा विचार कधी केलाय? दररोज शेकडोंनी फॉरवर्ड होणारे असे व्हिडीओ पाहिल्यानंतर नकारात्मकतेची भावना आपोआप दृढ होत जाते. आपल्या भोवतीच्या प्रत्येक गोष्टीकडे आपण धूसर नजरेने पाहू लागतो. अपघात, हाणामारी, हिंसाचार यांचे व्हिडीओ डोळ्यांनाही सहन होत नाहीत तेव्हा स्वभावात एक चिडचिडेपणा निर्माण होतो. त्या त्राग्याला आपण आपल्या भोवतीच्या वास्तव जगातून मोकळी वाट करून देतो.  लोकलमध्ये शेजारी उभ्या असलेल्या सहप्रवाशाचा किंचित धक्का लागणंही आपल्याला सहन होत नाही. छोटय़ा छोटय़ा गोष्टींवर तीव्र संताप व्यक्त करणं, लगेच हमरीतुमरीवर येणं ही स्वभावाची लक्षणं बनतात. आपण या साऱ्यांचं मूळ वास्तव जगात शोधण्याचा प्रयत्न करतो. पण कित्येकदा याची उत्तरं ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’मध्ये दडलेली असतात.

मानवी स्वभावाच्या या बदलत्या पैलूंवर मानसशास्त्रज्ञ अधिक अधिकारवाणीने आणि अभ्यासपूर्ण बोलू शकतील. पण या सगळ्या क्रिया-प्रतिक्रिया तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या साधनांच्या माध्यमातून उमटत असल्याने त्यांची येथे दखल घेणं भाग पडतं. स्मार्टफोनच्या रूपात तंत्रज्ञानाने आपल्या हाती प्रचंड मोठी शक्ती दिली आहे. समाजमाध्यमांसारखं व्यासपीठ आपलं अभिव्यक्तिस्वातंत्र्याला बळ देणारं आहे. पण त्या शक्तीचा, बळाचा कुठे आणि कसा वापर करावा, याचं भान अजूनही अनेकांना आलेलं नाही. ती प्रगल्भता जेव्हा येईल, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने तंत्रस्नेही अर्थात टेकसॅव्ही बनू!

viva@expressindia.com