मितेश रतिश जोशी

सर्वच स्तरांवर अतिशय नियोजनपूर्वक चालणाऱ्या दिवाळी सणाचा उत्साह जरी करोनामुळे कमी जाणवत असला तरी यंदाच्या वर्षी नवनवीन व भन्नाट कलाकृतींसह तरुणाईने बाजारपेठेत आपलं वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वानाच आतुरता असते तो सण म्हणजे दिवाळी. फटाक्यांची आतषबाजी, नवीन पोशाखात सुहृद आणि मित्रमंडळींच्या गाठीभेटी घेत, शुभेच्छांचे आदानप्रदान करत दिवाळी पहाटसारख्या संगीत मैफलींना हजेरी लावून होणाऱ्या दिवाळसणाच्या नांदीचा कित्येक वर्षांचा हा शिरस्ता यंदा करोनामुळे मोडला जाणार आहे. करोनामुळे दरवर्षीचे कार्यक्रम व गाठीभेटी होणार नसल्या तरी उत्साह मात्र कुठेही कमी झालेला जाणवत नाही. अनेक तरुणांनी टाळेबंदीचा फायदा घेत दिवाळीत आवश्यक असलेल्या वस्तूंमध्ये कल्पकता आणली आहे. याचंच एक उदाहरण म्हणजे पुण्याची धनश्री पाठक ही तरुणी. ‘धनाज पैठणी’ या ब्रॅण्डअंतर्गत धनश्री पैठणीपासून वेगवेगळ्या वस्तू बनवून विकते. आपल्या ग्राहकांना दिवाळीसाठी काय वेगळे देता येईल याचा विचार करत असताना धनश्रीने पैठणी कंदील, पैठणी रांगोळी व पैठणी तोरण या संकल्पनांवर काम केले. कंदील, रांगोळी व तोरण हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. रांगोळी व तोरणाशिवाय कोणत्याच शुभप्रसंगांना सुरुवात होत नाही. अशा या वस्तूंचा पारंपरिक ठेवा जपत त्याला आधुनिकतेचा साज देण्यासाठी धनश्रीने टाळेबंदीचा पुरेपूर फायदा उचलला. तिची पैठणी तोरण ही कल्पना याआधीच यशस्वी झाली होती, त्यामुळे दिवाळीसाठी तिने टाळेबंदीतच तोरणांची तयारी सुरू केली होती. दिवाळीच्या निमित्ताने तिने ३०० पैठणी तोरणं विकली आहेत. पैठणी रांगोळी व पैठणी कंदील या संकल्पनेवर काम करायला धनश्रीला थोडासा वेळ लागला, त्यामुळे तोरणाइतके त्यांचे उत्पादन होऊ शकले नाही. मात्र तिच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेची दखल निश्चितच घेतली गेली. धनश्रीच्या कंदील व तोरणांना महाराष्ट्रासह गोवा, दिल्ली, बंगळूरुया राज्यांबरोबरच दुबई व ऑस्ट्रेलियातूनही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

दिवाळीच्या दिवसांत सायंकाळी सहानंतर फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषणाचा स्तर सामान्य स्तरापेक्षा सुमारे ४५ ते ५० टक्क्यांनी वाढतो. प्रकाश फेकणाऱ्या फटाक्यांमुळे पक्ष्यांच्या डोळ्यांवर अत्यंत विपरीत परिणाम होतो. अतितीव्र प्रकाशामुळे पक्ष्यांना आंधळेपणा येतो. यंदा हवा आणि ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी, तसेच करोनाबाधित रुग्णांना होणारा संभाव्य त्रास टाळण्यासाठी फटाके फोडण्यावर व खरेदी-विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. फटाक्यांमुळे पर्यावरणाला त्रास होतो, पण फटाक्यांनीच जर पर्यावरण संतुलनाला साथ दिली तर? नवल वाटेल पण हो ! हे आता शक्य झाले आहे. आपल्या नेहमीच्या वाजणाऱ्या फटाक्यांनी नाही तर ‘बीज फटाक्यांमुळे’. मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या छिंदवाडा जिल्ह्य़ातील ‘ग्राम आर्ट’ नावाची संस्था खूप मोठय़ा प्रमाणावर काम करते आहे. या भागात सेंद्रिय शेती होते. संस्थेचा खंदा कार्यकर्ता तन्मय जोशी या बीज फटाक्यांची माहिती देताना सांगतो, फटाके पर्यावरणाला हानी पोहोचवतात हे सर्वानाच माहिती आहे, पण याला एक अनोखा पर्याय निर्माण करायला हवा असे जेव्हा मनात आले तेव्हा आम्ही सर्व फटाक्यांचा अभ्यास केला. प्रत्येक फटाक्याच्या वैशिष्टय़ानुसार आम्ही त्यात वेगवेगळ्या बिया भरल्या आहेत. जसं सुतळी बॉम्बमध्ये अंबाडीचे बी आहे. ज्याच्या झाडापासून आपण सूतळ काढू शकतो. डांबरी माळेत मायक्रोग्रीन बिया आहेत. यातून पालक, माठ, घोळ, मोहरी, मेथी, राजगिरा लावता येईल. अनारमध्ये गोल्डन शॉवर, बहावाच्या बिया आहेत. लक्ष्मी बारमध्ये आपटा बिया आहेत जेणेकरून लोकांना दसऱ्याच्या सोन्याची चिंता राहणार नाही. भुईचक्रात कांद्याचे बी आहे, तर केपामध्ये धणे आहेत. रॉकेटमध्ये काकडीचे बी आहे. हे सगळे फटाके बनवण्यासाठी आम्ही वेस्ट पेपरचा वापर केला आहे. कुं डीत फटाके रुजवून त्याचे रोप तयार करून नंतर जमिनीत लावता येईल, अशी योजना असल्याचे तो सांगतो. ‘ग्राम आर्ट’ संस्थेने केवळ बीज फटाकेच नाही तर यंदा ‘बीज मिठाई’ही बाजारात आणली आहे. दिवाळी आणि गोडधोडाचं समीकरण साधून बनवलेल्या बीज मिठाई अतिशय हुबेहूब बनवल्या आहेत. दिवाळीसाठी दहा हजार पाचशे बीज फटाक्यांची निर्मिती तर अठरा हजार बीज मिठाईची निर्मिती करण्यात आली. या अनोख्या संकल्पनेतून ‘बारुद नहीं बीज चाहिए’ हा विचार मांडण्यात आला असल्याचेही तो नमूद करतो.

दिवाळी आणि कंदील या जोडगोळीला तोड नाही. यंदा चिनी वस्तूंवर घातलेल्या बहिष्कारामुळे पारंपरिक कंदिलात कलात्मक विविधता आणण्याचा तरुणाईने पुरेपूर  प्रयत्न केला आहे. टाळेबंदीच्या काळात कोल्हापूरच्या विराम चव्हाण व मधुरा कदम यांनी मिळून कंदिलात एक ‘खण’खणीतपणा आणला आहे. पारंपरिक कंदिलाला कुठेही धक्का न बसवता सुबक खणाचे कंदील बनवण्याचे काम विराम व मधुराने या वर्षी हाती घेतले होती. विराम सांगतो, खण कंदिलाचा विचार माझ्या डोक्यात गणपतीपासूनच पिंगा घालत होता. खण आणि कोल्हापूर यांचं एक अतूट नातं आहे. खणाचे नाना प्रकार पश्चिम महाराष्ट्रात बघायला मिळतात. त्यात खण व कंदील हे महाराष्ट्रीय संस्कृतीचा एक मोठा भाग आहेत. या दोन्ही गोष्टी एकत्र आणण्यासाठी मी गणेशोत्सवापासूनच मेहनत घेतली. सुरुवातीला चुका झाल्या, पण अखेर मी यशस्वी झालो. मला व मधुराला आमच्या या कामात बिल्डिंगमधल्या बच्चेकंपनीनेही साथ दिली. विराम व मधुराने जवळजवळ १५० कंदील विकले आहेत. या सुबक कंदिलांची किंमत फक्त ३६० रुपये असून या कंदिलावर प्रत्येक चौरसात अंबाबाईचा मळवट, गणपती, सरस्वती,चंद्रकोर, विठोबाचा बुक्का असे वेगवेगळे पेंटिंगसुद्धा केले आहे.

दिवाळी हा दिव्यांचा सण. कलात्मक मातीच्या पणत्यांना मेणाच्या दिव्यांनी तसेच पंचगव्य दिव्यांनी चांगलीच टक्कर दिली आहे. त्यात आता भर पडते आहे ती नारळाच्या करवंटय़ापासून बनवलेल्या पणत्यांची. ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’चे केतन कदम, ऋतुजा गावकर व गौरव गजिंकर या त्रिकुटाने एकत्र येत पणत्यांच्या विश्वात नारळाच्या करवंटय़ांपासून बनवलेल्या पणत्यांची भर घातली आहे. या पणत्यांची कल्पना सुचली पर्यावरणप्रेमी ऋतुजाला. टाळेबंदीच्या कठीण काळात बरेच जण आपापली वाट शोधत होते, त्याच वेळी ऋतुजा व तिच्या साथीदारांना त्यांची वाट सापडली. ऋतुजा सांगते, रिसायकलचं बिगूल आपल्या देशात खूप आधीपासूनच वाजतं आहे. मग अशा वेळी दिवाळीच्या काळात पणत्यांच्या राज्यात काही तरी पर्यावरणपूरक नावीन्यता आणूयात या विचारांनी आम्ही करवंटय़ांवर प्रयोग करून बघितला. तो यशस्वी झाल्यावरच आम्ही तिघांनी खरेदीविक्रीचा विचार केला.आम्हा तिघांचा ‘कार्वड लिफ’ नावाचा ब्रॅण्ड आहे. ज्याद्वारे आम्ही सध्या तरी या पणत्या विकत आहोत. या पणत्या तुम्ही इतर मातीच्या पणत्यांप्रमाणेच वर्षांनुवर्षे वापरू शकता. या पणत्यांसाठी लागणाऱ्या करवंटय़ा आम्ही आमच्या घरातल्या व इडली डोसा विकणाऱ्या अण्णांच्या हॉटेलमधून घेऊन वापरतो. त्यासाठी वेगळा कोणताही खर्च करत नाही, असेही ती सांगते. इंटेरियरच्या शेवटच्या वर्षांच्या निकालाच्या प्रतीक्षेत असणारे गौरव, ऋतुजा व केतन यांनी आतापर्यंत १५० पणत्या विकल्या आहेत. त्यांचं पणत्यांचं काम हे दिवाळीनंतरही चालूच राहणार आहे.

दिवाळी व जत्रेच्या निमित्ताने देवळातील दगडी दीपमाळ उजळून निघते. या अशा पारंपरिक दीपमाळ आता तुम्ही घरात आणून एक चैतन्य निर्माण करू शकता. ही सोय निर्माण केली आहे डोंबिवलीच्या प्रसन्न चुरी या म्युरल आर्टिस्टने. दगडासारखे हुबेहूब भासणारे हे दिवे खऱ्या दगडाचे नसून लाईट वेट काँक्रीट बॉक्सपासून तयार करण्यात आले आहेत. हे दिवे तयार करताना प्रसन्न कोणतेही मशीन वापरत नाही. पूर्णपणे हाताने हे दिवे बनवले जातात. एक दीपमाळ बनवायला साधारण तीन ते चार दिवस जातात. प्रसन्न केवळ दीपमाळच नाही तर कासवाच्या आकाराचे दिवे, पाण्यात तरंगणारे दिवे, राजेशाही दिवेही तयार करतो. दिवे, पणत्या, कं दील, रांगोळी, तोरणं या सगळ्याच पारंपरिक वस्तू. या पारंपरिकतेला कल्पकतेचा साज चढवत आर्थिक आणि मानसिक समाधानाचा आनंद कमावणाऱ्या या तरुणाईने ही दिवाळी खऱ्या अर्थाने उजळून टाकली आहे.