|| राधिका कुंटे

भाषाशास्त्राची गोडी लागल्यावर त्यातल्या समाज, संस्कृती आणि बदललेल्या परिस्थितीचा माणसाच्या भाषेवर परिणाम होतो का? हा संपदा देशपांडेच्या एम.फिल.च्या प्रबंधाचा विषय आहे. त्याविषयी जाणून घेऊ या.

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

संपदा मूळची बडोद्याची राहणारी. तिने ‘द महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा’मधून बी. ए. (इंग्रजी साहित्य) केलं. त्याआधी तिने अकरावी-बारावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता, पण रसायनशास्त्र तिला फारसं रुचलं नाही. वेळीच आवड ओळखून तिने कलाशाखेत प्रवेश घेतला. तिच्या या आणि पुढच्या सगळ्या निर्णयांना पालकांचा खंबीर पाठिंबा मिळाला. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाला असताना तिला भाषाशास्त्राची गोडी वाटायला लागली.  ती ‘सोशिओलिंग्विस्टिक्स’वर काम करते आहे. यात सामाजिक आणि सांस्कृतिक कंगोऱ्यांचा भाषेवर काय परिणाम होतो हे निरीक्षण केलं जातं. उदाहरणार्थ – जात, वय, शैक्षणिक पाश्र्वाभूमी, विविध भाषिक माणसांशी संपर्कात आल्यावर भाषा बदलू शकते. तिने चतुर्थी विभक्ती प्रत्ययाची बहुकार्यक्षमता यावर संशोधन केलं आहे. सोशिओलिंग्विस्टिक्समध्ये तिला रस वाटला तो बी.ए.च्या वर्षात असताना. तेजगढमधल्या ‘ट्रायबल अकादमी’तील राठवा जमातीच्या बोलीभाषिकांशी संवाद साधायची पहिलीवहिली संधी तिला मिळाली. भाषाशास्त्राच्या विदा संकलनाची तोंडओळख करून देणारं ते फिल्डवर्क भावल्याने बी.ए.नंतर भाषाशास्त्रात एम.ए. करायचं ठरवलं. भारतातल्या हा अभ्यासविषय असणाऱ्या विद्यापीठांत अर्ज करायचं तिच्या मनात होतं. मग ‘महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी’मधल्या प्राध्यापकांकडून‘डेक्कन कॉलेज ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट’बद्दल कळलं. घरून परवानगी मिळाल्यावर पुण्यात शिक्षणासाठी यायचा निर्णय अतिशय योग्य ठरला. इथला भाषाशास्त्र विभाग, विविध संधी आणि त्या त्या विषयाचं ज्ञान द्यायची प्राध्यापकांची हातोटी खूप चांगली आहे.

चौथ्या सेमिस्टरमध्ये तिने मार्गदर्शक आणि भाषाशास्त्राच्या विभागप्रमुख प्रा. सोनल कुलकर्णी-जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अ स्टडी ऑफ एव्हिडेन्शिअलिटी इन गुजराती’ हा प्रबंध सादर केला. ती सांगते की, एव्हिडेन्शिअलिटी (संभाव्य घटना) अशा प्रत्येक भाषेत एक गट असतो, पण तो वेगळा असा गट म्हणून इंडो-आर्यन भाषाकुलात सापडत नाही, अशी नोंद भाषावैज्ञानिक एलेना बशीर यांनी त्यांच्या संशोधनात केली आहे. त्याच आधारावरील या प्रबंधात इंडो-आर्यन भाषांमधल्या मराठी, हिंदी, गुजराथी, कोकणी या चार भाषांचा तुलनात्मक अभ्यास केला होता. म्हणजे एखाद्या वाक्यात जी माहिती मिळते आहे, ती माहिती बोलणाऱ्याला कशी मिळाली,  ते त्या वाक्यात कुठेतरी जाणवतं. उदाहरणार्थ – ‘मी असं ऐकलं की, काल ती पुण्याला गेली होती’. या वाक्यात ऐकीव माहिती आहे. तसंच ‘पाऊस पडला असावा’ या वाक्यात ‘इन्फे रेन्स (तर्काने)  मिळालेली माहिती आहे. त्याचाच पुढचा भाग होता ‘सिमॅण्टिक्स’. म्हणजे शब्दार्थासंबंधीची माहिती किंवा अर्थविज्ञान. माझं आताचं काम हे सोशिओलिंग्विस्टिक्स आणि सिमॅण्टिक्स या दोन्हीला धरून आहे. ‘राज्य मराठी विकास संस्था’ आणि ‘डेक्कन’च्या भाषाविज्ञान विभागाच्या ‘सव्र्हे ऑफ द डायलेक्ट्स ऑफ द मराठी लँग्वेज’ या संयुक्त प्रकल्पात गेली दोन वर्षं आणि सात महिने मी डेक्कन महाविद्यालयात प्रकल्प साहाय्यक म्हणून काम करते आहे. त्यातल्याच विदेमधल्या चार जिल्ह्यांवर माझा एम.फिल.चा प्रबंध आहे. प्रबंधाचा विषय आहे, ‘मल्टिफंक्शनलिटी ऑफ डेटिव्ह मार्कर इन डायलेक्ट्स ऑफ मराठी : अ सिमॅण्टिक पस्र्पेक्टिव्ह’. कुठल्याही भाषेच्या व्याकरणात विविध विभक्ती आणि त्यांचे प्रत्यय असतात आणि त्या त्या विभक्तीचं नेमून दिलेलं कार्य असतं आणि काही नवीन कार्य वापरानुसार नव्याने येतं. उदाहरणार्थ- ‘मी त्याला पुस्तक दिलं’ या वाक्यात ‘तो’ हा पुस्तक मिळणारा आहे. किंवा ‘त्याला थंडी वाजते आहे’. या वाक्यात ‘तो’ हा थंडी अनुभवणारा आहे. याव्यतिरिक्त आणखी काही माहिती हाती लागेल हे मी बघते आहे. उदाहरणार्थ- ‘तो अभ्यासाला बसला’.  इथे कारण कळतं की ‘तो अभ्यासाला बसला आहे’.  किंवा ‘मी पुण्याला गेले’ या वाक्यात ‘पुणे’ हे ‘गोल किंवा एण्ड पॉइंट’ आहे ही माहिती कळते. किंवा ‘तो पुण्याला शिकतो’ यात ‘तो’ पुण्यात एका महाविद्यालयात शिकतो हे कळतं. ‘ला’, ‘च्या’ अशा वाक्यांत वापरल्या जाणाऱ्या चतुर्थी विभक्ती प्रत्ययांच्या वेगवेगळ्या कार्यंचा अभ्यास मी करते आहे, असं ती सांगते.

एम.ए. झाल्यानंतर ती दोन महिने हैद्राबादला होती. तिथे ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’मध्ये तिने केलेल्या इंटर्नशिपमुळे एक चांगला अनुभव गाठीशी जमा झाला. तिथे अनुसारका (कॉम्युटिशनल लिंग्विस्ट्क्स- मशीन ट्रान्सलेशन) या प्रकल्पाअंतर्गत तिने काम केलं. एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला कळतात आणि तसा त्यांचा वापर आपण करतो, पण मशीनला ते कळत नाही. ते हिंदी भाषेतले शब्दार्थ कोडरला सांगायचं काम ती करायची. त्यानंतर तिने बडोद्याला ‘आयबीएम-३५ सीएससी वडोदरा’च्या प्रकल्पासाठी काम केलं. दरवर्षी विविध देशांतून अनेक तज्ज्ञांची एक परिषद भरते. तिथे चार आठवडे भाषांतरकार आणि दुभाषा (गुजराथी-मराठी भाषा) म्हणून काम करायची संधी मिळाली. संपदा म्हणते की,‘मला फिल्डवर्क करायला आवडेल असं मार्गदर्शकांना सांगून ठेवलं होतं. त्यांच्यासोबत मी मुरुडला ३ दिवसांच्या फिल्डवर्कमध्ये ऑब्झव्र्हर म्हणून सहभागी झाले आणि त्यानंतर माझं पक्कं ठरलं की याच विषयात काम करायचं. त्याच दरम्यान या कामाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. मार्गदर्शक आणि घरच्यांसोबत विचारविनिमय करून या कामासाठी अर्ज केला. मुलाखत झाली. याआधी कधी कामानिमित्त गावाला वगैरे गेले नव्हते. त्यामुळे ते माझ्यासाठी थोडं कठीण होतं. बाकी सहकारी महाराष्ट्रातलेच होते, त्यामुळे त्यांना स्थानिकांशी संवाद साधणं अधिक सोपं गेलं. माझ्या भाषेच्या लहेजामुळे प्रारंभी थोडासा फरक पडत होता. अजून काही जिल्ह्यांमध्ये फिल्डवर्क करायचं उरलं आहे’.

तिने एम. फिल.च्या अभ्यासासाठी चार प्रातिनिधिक जिल्हे निवडले आणि एक मानक जिल्हा ठेवला. तिला लागणारे बहुतांशी संदर्भ महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध झाले. काही ई- रिसोर्सेसचा उपयोग होतो. मार्गदर्शकांचा बहुमोल सल्ला आणि सहकारी, सहाध्यायांची मतं, विविध दृष्टिकोन, मदत हेही तितकंच महत्त्वाचं ठरतं. अशा अनेक गोष्टींमुळे प्रोत्साहन मिळत राहतं, असं ती म्हणते. या क्षेत्रात पेशन्स खूप महत्त्वाचे. संशोधक खूप उत्साहात विषय निवडून कामाला सुरुवात करतो, पण कधीतरी त्यात मरगळ येऊ शकते. नेहमीच हवे ते निष्कर्ष चटकन मिळतात असं नाही. अशा वेळी नाउमेद होऊन चालत नाही. विषय अभ्यासताना विविध दृष्टिकोन, मतं येऊ शकतात हे स्वीकारून, त्याचा अभ्यास करून पुढे सरकायला हवं. विविध कार्यशाळा, परिसंवाद, परिषदा, उपक्रमांना हजेरी लावल्याने ओळखी होतात, संवाद वाढतो आणि अर्थातच आपल्या ज्ञानात भर पडते, हे ती आवर्जून सांगते. संपदाला डेक्कनमधल्या दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या परिसंवादांमुळे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भाषावैज्ञानिकांना ऐकायची, बोलायची संधी मिळाली; तो आनंद औरच होता. तिने म्हैसूरच्या सीआयआयएलच्या परिषदांमध्ये पेपर सादरीकरण केलं आहे. ग्रीसमधल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ क्रिट’मध्ये समर स्कूलमध्ये ती गेली होती. तिथे भाषाशास्त्रातल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या तज्ज्ञांकडून तिला शिकायला मिळालं.

दरम्यान ती एम.फिल. झाली आहे. त्या प्रबंधासाठीच्या अभ्यासातले ५ जिल्हे, त्यातला डेटिव्ह मार्करचं (चतुर्थी प्रत्यय) कार्य वेगवेगळ्या भागांमध्ये तेवढंच असतं असं नाही. तसंच असतं असंही नाही. मग प्रत्येक भागांतल्या बोलींमधले डेटिव्ह मार्कर शोधणं हा या अभ्यासाचा एक भाग आहे.

१. महाराष्ट्रातल्या निवडक जिल्ह्यांमध्ये चतुर्थी विभक्ती प्रत्ययाचे वेगवेगळे शब्द आणि उच्चारशास्त्रीय वैकल्पिक रूपं, उदाहरणार्थ – ‘ला’ (प्रमाण), ‘ले’ (नागपूर आणि धुळे), ‘स’ (कोल्हापूर), ‘क’ (दक्षिण कोल्हापूर आणि कोकण भाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) आणि इतर कोणती रूपं आहेत का ते शोधणं. उदाहरणार्थ – गावाला, गावाले, गावास, गावाक.

२. हे चतुर्थी विभक्ती प्रत्यय निवडक जिल्ह्यांच्या बोलींमध्ये कोणते शब्दार्थ सुचविण्याचं कार्य सूचित करतात उदाहरणार्थ-

अ) मी त्याला पुस्तक दिलं.

ब) तो अभ्यासाला बसला आता.

इथं उदाहरण अ)मध्ये या शब्दातील ‘ला’ हा प्रत्यय प्राप्तकत्र्याचे कार्य सूचित करतो. उदाहरण ब) मध्ये हेतूचं कार्य सूचित करतो. चतुर्थी विभक्ती प्रत्ययाची काही प्रमाण कार्य असतात आणि काही अप्रमाण कार्य सूचित करायला त्यांचा उपयोग होतो. म्हणजेच एखादी शब्दाची जाती स्वत:च्या असलेल्या प्रमाण कार्याव्यतिरिक्त दुसरं अप्रमाण कार्य सूचित करते किंवा ते सूचित करायला भाषेत त्यांचा उपयोग केला जातो. याला बहुकार्यक्षमता असं म्हणतात. माझ्या संशोधनाचं मूळ उद्दिष्ट हे चतुर्थी विभक्ती प्रत्ययांची बहुकार्यक्षमता मराठीत काय आहे आणि ती निवडक जिल्ह्यांच्या बोलींमध्ये आपल्याला कशी आढळते हे शोधणं आहे. तसंच प्रत्येक शब्दार्थ सुचवण्याचं कार्य एकमेकांपासून संकल्पनाविषयक अवकाशात किती जवळ किंवा लांब आहे ते शोधणं आणि ते मांडण्यासाठी अर्थाच्या नकाशांचा वापर करणं हे आहे, असं ती सांगते.

पुढे पीएचडीसाठी अर्ज करायचा तिचा विचार असून बऱ्याच विषयांचा विचार सुरू आहे. पुनर्वसन होणाऱ्या लोकांची भाषिक देवाणघेवाण, त्यामुळे होणारे भाषेतले बदल हा विषय कधीतरी नक्की अभ्यासायचा आहेच. संपदाच्या मते, संशोधन क्षेत्रात टिकून राहणं हे वाटतं तितकं सोपं काम नाही. कारण सतत एकाच विषयावर काम करणं, त्याचा ध्यास धरणं, ही गोष्ट कधीकधी नीरस ठरू शकते. ही भावना अधूनमधून डोकं वर काढत असते. हे काय करतो आहोत आपण?, असा प्रश्न पडला होता. बोली, त्यातले बदल, फरक हे सगळं नोंदवून ठेवणं गरजेचं आहे, हे व्यावहारिक दृष्टीने माहिती असतं. तरीही काही वेळा असं होतं की काही ठिकाणी गेल्यावर ही नोंद महत्त्वाची आहे का की समोरच्या माणसांच्या किमान गरजाही पूर्ण होत नसताना ती परिस्थिती पाहून या नोंदीसाठीचे प्रश्न विचारावेत तरी कसे?, हा प्रश्न अस्वस्थ करतो. त्यामुळे स्वत:ला अनेकदा कोसलंही जातं, असंही ती मोकळेपणाने सांगते. संपदाने या अभ्यासाच्या आधीच्या काळात गुजरातमधल्या राजगावातल्या भिलि भाषेचा अभ्यास केला होता. सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत त्यांचं पुनर्वसन झालं होतं. तेव्हाही तिला मनोमन हेच वाटलं होतं की, आपण त्यांना प्रश्न विचारून जणू गुन्हा करतोय की काय? कधीकधी कामामध्ये आलेला तोचतोचपणाही रोज समान क्षमतेने काम करण्यात अडथळा ठरतो. अशा वेळी आपले छंद जोपासणं गरजेचं ठरतं. तिला वाचायला प्रचंड आवडतं. त्यामुळे अभ्यास विषयाखेरीज अन्य गोष्टी ती वाचते. गप्पिष्ट असल्याने मित्रमंडळींशी चिक्कार गप्पा रंगतात. कधीतरी स्केचिंग करते. गाणं शिकली असली तरी रियाजाला वेळ न मिळाल्याने ते थोडं मागं पडलं आहे. संपदाला तिच्या मनाजोगतं संशोधन करण्यासाठी खूप शुभेच्छा.

viva@expressindia.com