प्रियांका वाघुले

‘दूर्वा’, ‘अंजली’, ‘झेप स्वप्नांची’ या मालिकांमधून कुटुंब-प्रेम अशा भावनिक कथाविश्वात रमलेला अभिनेता हर्षद अतकरी आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपल्या शरीराचा, मनाचा आणि विचारांचा मेळ घालण्यासाठी व्यायामाला अतिशय महत्त्व देत असल्याचे आणि तो उत्तम प्रकारे करत असल्याचे सांगतो.

अगदी नियमित, न चुकता व्यायाम करत असल्याचे तो सांगतो. नियमित व्यायाम करणे ही शरीराची गरज असते. त्यामुळे आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढते, असे मत तो व्यक्त करतो. नियमित व्यायाम करत असताना अनेकदा वेळेअभावी हवा तसा आणि गरजे इतका व्यायाम करता येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा व्यायाम आटोपता घ्यावा लागतो. पण असे असले तरी व्यायाम करण्याचे तो टाळत नाही. जेव्हा आणि जसा वेळ मिळेल तसा तो व्यायामासाठी देत असल्याचे हर्षद सांगतो.

कमी वेळात जास्तीत जास्त व्यायाम प्रकार करणे तसे अवघड असते, अशा वेळी अनेकदा व्यायामासाठी पुरेसा वेळ देता येत नसला तरीही जिममध्ये स्कॉट्स आणि डेडलिफ्ट या दोन गोष्टी तो पूर्ण करतोच असं सांगतो. हे दोन्ही प्रकार महत्त्वाचे असल्याचे तो सांगतो. वेळ कमी असताना स्कॉट्स आणि डेडलिफ्टसाठी आवश्यक तेवढा वेळ देऊन उरलेल्या वेळेत इतर प्रकारांवर भर देत असल्याची माहिती हर्षदने दिली.

स्ट्रेन्थ ट्रेनिंगमध्ये स्कॉट्स आणि डेडलिफ्ट हे शरीरातील मोठय़ा भागांवर काम करणारे ठरतात. शरीरातील महत्त्वाच्या मोठय़ा भागांना जसं पाय, पाठ या व्यायाम प्रकारात सामावून घेतले जाते. ज्यामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव कार्यरत होतात. आणि त्यामुळे शारीरिक क्षमताही वाढते. म्हणून रोजच्या व्यायाम प्रकारात जिममध्ये स्कॉट्स आणि डेडलिफ्ट हे माझ्या प्रायोरिटी लिस्टमध्ये आहेत, असं तो म्हणतो. व्यायामाने केवळ फिटनेसच साधला जात नाही तर त्यामुळे आपली देहबोली, आपली वागणूक, ऐकण्या-बोलण्याची क्षमता यामध्येही सकारात्मक बदल होत असल्याचा आपला अनुभव असल्याचे हर्षद सांगतो. त्यामुळेच तरुणाईला फिटनेससाठी कठोर मेहनत घेण्याचा सल्लाही तो देतो.

viva@expressindia.com