हा ऽ हा ऽ ही ऽ ही ऽ हू ऽ हू ऽ ही ऽ ही ऽ हे ऽ हे ऽ है ऽ हैऽऽऽऽ फ्रेण्डस्, ही काही ‘ह’ची बाराखडी नाहीये, हे तुम्हीही ओळखलं असेलच. हा आहे आपल्या कट्टय़ावर उडालेला ‘हाहाकार.’ हा ‘हाहाकार’ जाम धम्माल- मस्तीमुळं निर्माण झालाय. फालतूतल्या फालतू पीजेवरही पोटभर हसण्याच्या रिवाजामुळं शाबूत राहिलाय. किंबहुना हसण्याचा जन्मसिद्ध हक्क बजावण्याचा मान कट्टय़ावरच्या ‘हसमुखराय अ‍ॅण्ड कंपनी’कडं जातो. येस बॉस ! सही पहचाना ! ये हैं कट्टा! कॉलेजचा, सोसायटीतला किंवा पार्कातला कट्टा. कट्टा तो मंगताही हैं.
कट्टा ही भारी चीज आपल्याला केव्हा आपलंसं करते, ते कळतंही नाही. लहानपणी खेळायला म्हणून गेलो की सोसायटीच्या किंवा शाळेच्या पटांगणात आपण ठराविक ठिकाणी जमतो. वाढत्या वयानुसार बदलते खेळ नि सोबत रंगणाऱ्या गप्पा कधीच्याच रुटिन होऊन जातात. पुढचा कॉलेजचा कट्टा तर सतत खुणावणारा. आपलं जग अधिक समृद्ध करणारा. थोडंसं नादावणं, खूपसं शहाणपण आणि न बोलता बरंच काही देऊन जाणारा.
रुटिन लाइफमध्ये कट्टय़ावर भेटणं ही अँक्टिव्हिटी गृहीत धरलेलीच असते. घरातला मेंबर कट्टय़ावर गेला म्हणजे त्याला घरचे गृहीत धरतच नाहीत. कारण कट्टय़ाची जादू लई भारी असते बाबा ! तिथं गेलेला लवकर परत येत नाही, असं म्हणतात. कसं असतं मंडळी, कट्टय़ावर जायचे वेध लागले म्हणजे आपण आपले राहात नाही. मित्रांशी काय बोलायचं, मत्रिणीवर कसं रुसायचं, कोणता ड्रेस घालायचा, ‘तो’ किंवा ‘ती’ला कसं इम्प्रेस करायचं असे कितीतरी विचार डोक्यात चालूच असतात. त्याच नादात आईनं सांगितल्याच्या एक्झॅक्टली उलटी कामं आपण करून ठेवतो. बाबांनी सांगितलेली कामं साईडिंगला ठेवतो निआजी-आजोबांचे सामान आणायची लिस्ट हरवून टाकतो. घरी आल्यावर त्यासाठीचा ओरडा वाट बघत असतोच..
तर हाका, शिटय़ा किंवा ढीगभर मिस्ड कॉल्सना ओ देत आपण धापा टाकत कट्टय़ावर पोहचतो. बघतो तर कट्टा रिकामा. सगळेजण गेले कुठं, असा विचारही मनात न आणता आपण कट्टय़ावर आरामात टेकतो. तसे सगळे गायबचंद मेंबर्स पटापट जमतात नि मग.. खरं सांगू का राव, पुढची सगळी धमाल आपली आपणच अनुभवायची असते. त्या अतरंगीपणाचं वर्णन नाही करता येणार. ‘रोज भेटून एवढं काय बोलतात, काय माहीत,’ अशी घरच्यांची शेरेबाजी इथं जमल्यावर विसरून जायला होते. प्रत्येक कट्टय़ाच्या भाषेतलं हाय-हॅलो होतं नि मग चटरपटर करायला सुरुवात होते. हे कट्टय़ावरचं भेटणं सुट्टीतलं असलं तर विचारूच नका. कट्टा आणखीन बहारदार होतो.
कॉलेजमधली लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स, प्रेझेंटेशन्स, प्रोजेक्टस् या सगळ्या झंझटींपासून दूर होऊन सध्या दिवाळीची सुट्टी एन्जॉय करणं सुरू आहे. सुट्टीतही कट्टय़ांना अजिबात एकटेपणा वाटत नाही. कारण आपले दोस्त कट्टय़ाला एकटं सोडतात कुठं ? तर दिवाळीच्या माहोलाचा असर अजून सरलेला नसतो. त्यामुळं कुणी आणलेल्या फराळाचा केव्हाच चट्टामट्टा उडतो. एखाद्याच्या स्मार्टफोनचं कौतुक होतं नि ‘मेरा नंबर कब आएगा,’ असा बारीकसा प्रश्नही डोक्यात येऊन जातो. ‘येऊन जातो,’ असं म्हणण्याचं कारण आपलं क्रूझचं बुकिंग केव्हाच झालेलं असतं. ‘रामाचं रामफळ, सीतेचं सीताफळ, लक्ष्मणाचं कोनफळ,’ असलं नामी कोडं घालून एका बहिणीनं कोनफळी रंगाची अमूक ब्रॅण्डची लिपस्टिक हवी, असा लावलेला लग्गा आणि त्यासाठी चार मार्केटस् धुंडाळणारा भाऊ, अशी सुरस गोष्ट त्याच भावच्या तोंडून ऐकायला मिळते. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर ती कोनफळी रंगाची लिपस्टिक शोधून काढल्याचा विजयी भाव असतो.
गप्पांना ब्रेक लागतो तो कटिंग नि समोश्यांची प्लेट समोर आल्यावर. नंतरच्या गप्पांमध्ये ओबामा, जिंताओंपासून ते कॉलेजमधल्या विद्यार्थी नेत्यापर्यंत सगळेजण हजेरी लावून जातात. जोडीला ‘जब तक हैं जान’ की ‘सन ऑफ सरदार’ अशी जुगलबंदीही रंगते. ढेरसारं गॉसििपगही होतं. चिडवाचिडवीला उत येतो. कधी सुट्टीनंतरच्या कॉलेज फेस्टचं प्लॅिनग तर कधी फेस्टेव्हलसाठी पोस्टर्स रंगवणं, कधी क्विझची तयारी तर कधी फॅशन शोसाठीच्या रिहर्सल्स. काही वेळा पटकन आऊटिंगचं प्लॅनिंग होऊन मंडळी झटपट घराबाहेर पडतातदेखील. काहींच्या ग्रुपचं झकास फोटोसेशन रंगतं. ते फोटो एफबीवर झळकतात. कुणी मात्र पार्टटाइम जॉबच्या किंवा इंटर्नशिपच्या वेळात अडकतात. त्यांना मिस केलं जातं.
दोस्तहो, ग्रुपच्या सगळ्या अँक्टिव्हिटीजचा कट्टा साक्षीदार असतोच. रिझल्टचं टेन्शन असो किंवा घरातल्या जबाबदाऱ्या, आवडत्या माणसाचा होकार असो किंवा करिअरची गाडी वळणावर येणं, मत्रीतले रुसवे-फुगवे असोत किंवा चॉकलेटी आठवणी असोत या सगळ्यात आपला ग्रुप नि ओघानं कट्टाही आपल्या नेहमीच बरोबर असतो. या सुसंवादामुळं आपलं मन मोकळं होतं. आधार वाटतो. कट्टा, मत्री आणि दे धम्माल हे अफलातून कॉम्बिनेशन कायमच हवंहवंसं वाटतं.