नाटकाविषयीचं व्हिवा वॉल
व्हिवाच्या ७ फेब्रुवारीच्या अंकात ‘तिसरी घंटा’ हे नाटकांविषयी व्हिवा वॉल वाचण्यात आलं. माझ्या आवडत्या नाटकाविषयी मलाही शेअर करायला आवडेल. जयवंत दळवींचं ‘सारे प्रवासी घडीचे’ हे माझं आवडतं नाटक आहे. तशी बरीच नाटकं पाहताना मी स्वतला त्या नाटकात कोणत्या ना कोणत्या भूमिकेत पाहतो. दळवींचं ‘सारे प्रवासी घडीचे’ हे नाटक जरी त्या काळी लिहिलं असलं तरी आधुनिक काळातही आपलं वाटतं. हे नाटक पाहण्यात आलं तेव्हा सगळे कलाकार त्या नवीन होते. तरीही त्यांनी त्यान मानानं खूपच उत्तम काम केलंय, असं मला वाटतं. ते सगळे हे नाटक छान एंजॉय करताहेत असं वाटलं.
– राजेंद्र जाधव.

सोशल साइट्स जबाबदारीने वापरायला हव्या
‘व्हिवा वॉल’ हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर करून सोशल मीडियाचा वापर आणि गैरवापर यावर चर्चा घडवून आणली पाहिजे. सध्या प्रत्येकाच्या जीवनाचा सोशल नेटवर्किंग साइट हा भाग झालाय. पण सोशल नेटवर्किंग साइटचा वाईट वापर करणारेही आहेत. त्याचा परिणाम मुझफ्फरनगरमधल्या दंगलीच्या स्वरूपात दिसला. तो सारा अपप्रचार सोशल साइट्सवरूनच करण्यात आला होता. सोशल साइटवरून एखाद्या समाजाला टारगेट करणं, एखाद्या व्यक्तीबद्दल, नेत्याबद्दल वाईट लिहिणं यामुळे एखाद्या समाजाविषयी चुकीच्या भावना वाढीस लागू शकतात. हे सगळं देशाच्या एकतेला खूप हानीकारक आहे. हे सगळं आपण थांबवलं पाहिजे. अशा प्रकारच्या एकतर्फी पेजेसना लाइक न करणं, फॉलो न करणं हे देशाच्या हिताच्या दृष्टीनं आवश्यक आहे. आपण कमेंट करताना जबाबदारीनं केली पाहिजे. फोटो, व्हिडीओ अपलोड करतानाही खबरदारी घेतली पाहिजे.
– सिद्धार्थ गायकवाड, दिल्ली.

म्युझिक बँडचा विषय छान
‘व्हिवा’च्या ७ फेब्रुवारीच्या अंकात आलेला ‘बँड’इट हा विषय खूप भावला. म्युझिक बँडविषयी आणि त्यातील तरुणाईविषयी नेहा टिपणीस आणि अनुश्री फडणीस यांनी दिलेली माहिती माझ्यासाठी नवी होती.
– आरजे अमेय

मीतच्या कामाला सलाम !
‘मुक्या प्राण्यांचा मीत’ हा लेख वाचला. मुक्या जनावरांवर प्रेम करणारा आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मीत आशरचं खरंच कौतुक आहे. त्याच्या कामाला सलाम ! अशा कामाची समाजाला गरज आहे.
– पी.पी.