सध्या निवडणुकांच्या चर्चा सगळीकडेच सुरू आहेत. कोणता पक्ष कोणाला तिकीट देतो याकडे सगळ्यांचंच लक्ष असतं. पण काही सेलिब्रिटीज पक्षात येतात आणि त्यांना लगेच उमेदवारी दिली जाते. हे योग्य नव्हे. कारण लोकांचे प्रश्न, त्यांच्या गरजा कशा हँडल करायच्या याची त्यांना माहिती नसते. तरीही ते त्या पक्षाचे प्रतिनिधित्व करताना दिसतात. पक्षप्रमुखांनी योग्य आणि जबाबदार व्यक्तींना उमेदवारी दिली पाहिजे. त्याचबरोबर योग्य त्या उमेदवाराला आपण मतदार म्हणून मत दिलं पाहिजे. मतदानाचा हक्क म्हणूनच सर्वानी बजावण्याची गरज आहे. त्यातूनच आपण योग्य उमेदवार निवडू शकतो. आवडते हीरो, हीरोईन बाजूला ठेवून जबाबदार व्यक्तीला निवडून द्यायला हवं. सगळ्या तरुणांनी त्यासाठी एकत्र व्हायला हवं.
– पल्लवी पाटणकर

मला मतदान करायचंय, कारण..
मतदानाचा अधिकार येत्या २४ एप्रिलला मी दुसऱ्यांदा बजावणार आहे. माझा पहिला अनुभव २०१२ सालचा.. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी मतदान केलं होतं.
मला वाटतं, मतदानाच्या या अधिकारामुळेच कॉमन मॅनचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन होतो. म्हणून मतदानाचा हक्क सर्वानी बजावलाच पाहिजे. मतदानामुळे आपल्याला राजकीय प्रवाहात प्रत्यक्षपणे हातभार लावायची संधी मिळते. प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्यक्ष सहभागामुळेच एक सशक्त, प्रामाणिक राजकीय व्यवस्था तयार होण्यास मदत होते.
मजबूत राजकीय व्यवस्था आणि कुशल राजकारणी जन्मत: घडत नाहीत. ते घडवले जातात. म्हणूनच मतदाराचं प्रत्येक मत महत्त्वाचं असतं. माझ्या एका मतानं काय फरक पडतो, असा विचार न करता तुमच्या एकेका मताचा संचय होऊनच विविधतेत एकता असणाऱ्या भारताला पुन्हा प्रगतिपथावर आणू शकेल अशी सशक्त राजकीय व्यवस्था आणि प्रामाणिक राजकारणी तयार होऊ शकतील. मित्रांनो, एक एप्रिलला तुम्हाला कुणी मूर्ख बनवलं तर त्याची व्याप्ती एका दिवसापुरतीच मर्यादित राहील. पण जर तुम्ही मतदानाच्या दिवशी स्वत:ला मूर्ख बनवले तर त्याचे परिणाम तुम्हाला पाच र्वष भोगावे लागतील.
Don’t expect the change. Be the change.
– प्रफुल शिर्के

व्हिवा पुरवणीतील सदरं कशी वाटतात, लेखातील विचार पटतात का, पुरवणी कशी वाटते, ते आम्हाला सांगा. त्याबरोबर या पुरवणीत आणखी काय वाचायला आवडेल तेही शेअर करा. आमच्या या मेल आयडीवर व्हिवा पोस्ट असं सब्जेक्ट लाइनमध्ये लिहून तुमच्या सजेशन्स पाठवा. oksatta@gmail.com