मिटले अंतर..
२५ जुलैच्या ‘व्हिवा’मध्ये सोशल नेटवर्किंग, व्हॉट्सअ‍ॅपबद्दल वाचून थोडा विचार केला. गेली सात वर्षे मी लंडनमध्ये आहे. प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी असल्यामुळे प्रत्येक वेळी कॉल करणं जमतंच असं नाही. मग फ्रेंड्स असोत किंवा रिलेटिव्हज. अशा वेळी हातातल्या मोबाइलवर उपलब्ध असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सुविधांविषयी खरंच बरं वाटतं. वेळ मिळेल तेव्हा आप्तस्वकीयांशी चॅटिंग करता येतं आणि वेळोवेळी फोटो आणि व्हिडीओसुद्धा शेअर करता येतात. व्हॉट्सअ‍ॅपमुळे खरोखर दूर असूनसुद्धा जवळ असल्याचा फील येतो.
– शीतल बारापात्रे, लंडन

रॅगिंगचा मुकाबला
डॉ. वैशाली देशमुख यांचा रॅगिंगविषयीच्या प्रश्नानिमित्ताने लिहिलेला लेख (व्हिवा, १ ऑगस्ट) वाचला. खूपच छान लिहिला आहे. हा सर्व मुलांना धीर व दिलासा देणारा  आहे. अशा मुलांचे समुपदेशन कॉलेजमध्ये जाण्याच्या आधी जर करता आले तर बरे. आम्ही अशा मुलांना नेहमी ग्रुपमध्ये राहण्यास सांगतो. ‘युनायटेड वुई स्टँड’ असे  समजावतो. ग्रुपमधील कुणाला कोणी त्रास द्यावयास लागला, तर पळून न जाता सर्वानी  एकत्र मुकाबला करावा असे समजावतो. आपल्या मोबाइलमध्ये पोलीस, मदत केंद्र आदींचे अ‍ॅप डाऊनलोड करून ठेवायला हवेत. या अ‍ॅप्सचा मुक्त वापर करावा, असे आम्ही सांगतो. डॉ. वैशाली यांचा हा लेख संग्रहणीय आहे व सर्व महाविद्यालयांमध्ये  नोटीस बोर्डवर लावावा, असेही सुचवावेसे वाटते.
– डॉ. सुधीर शिधये, इंदौर

संस्कृतप्रेमी तरुणांचं कौतुक
‘लोकसत्ता’ व्हिवाच्या ८ ऑगस्टच्या अंकात आलेले ‘अमृताची बोली’, ‘संस्कृताचे प्रयोग’ व ‘संस्कृत रॉकस्टार’ हे तीनही लेख अप्रतीम! आजच्या जमान्यामध्ये हे संस्कृतप्रेम अविश्वसनीय वाटावे असे आहे. संस्कृत पाठांतर करणारे अनेक आहेत, पण संस्कृतमध्ये भाषांतर करू शकणाऱ्या या आजच्या तरुणाईबद्दल वाचून अतिशय आनंद झाला. संस्कृत नाटक लिहिणं, ते सादर करणं ही खरं तर ‘कमाल’ गोष्ट आहे. या सर्वाचे व्यक्तिगत कौतुक करायला आवडले असते. ही शाबासकीची थाप त्यांच्यापर्यंत पोहोचवता येणे शक्य असेल तर जरूर जरूर पोहोचवावी ही विनंती.
– सुरेश विष्णू आगाशे

संस्कृतप्रेमींना शुभेच्छा!
भक्ती तांबे यांनी लिहिलेला (व्हिवा, ८ ऑगस्ट) जयदीप वैद्य या संगीतकाराच्या संस्कृतप्रेमाविषयीचा लेख वाचून फार आनंद झाला. संस्कृतप्रेमी जयदीप वैद्य यांना शुभेच्छा! तो सादर केल्याबद्दल आपल्याला धन्यवाद!
श्रीनिवास जोशी, डोंबिवली

@व्हिवा पोस्ट : व्हिवा पुरवणीतील सदरं कशी वाटतात, लेखातील विचार पटतात का, पुरवणी कशी वाटते, ते आम्हाला सांगा. त्याबरोबर या पुरवणीत आणखी काय वाचायला आवडेल तेही शेअर करा. आमच्या या मेल आयडीवर व्हिवा पोस्ट असं सब्जेक्ट लाइनमध्ये लिहून तुमच्या सजेशन्स पाठवा. viva.loksatta@gmail.com