आपण त्याला कितीही ‘इडियट’ म्हणत असलो तरी तो ‘बॉक्स’ बंद पडल्यावर आपल्याला करमेनासं होतं. दहा वेळा सेट-टॉप बॉक्सवाल्यांना केलेली फोनाफोनी नि बॉक्सच नादुस्त झाल्यास रिपेअरवाल्याच्या काढलेल्या नाकदुऱ्या अनेकांना आठवत असतील. आपल्या आवडीची ‘ती’ पाहायला न मिळाल्यानं कसंनुसे झालेले चेहरे सोशल साइटवरही टाकवत नाहीत.. तरी बरं, की हल्ली आधुनिक तंत्रज्ञानामुळे सगळं सोप्पं झालंय. आपण ‘तिच्या’ वेळेत घरी नसलो तर ‘तिला’ रेकॉर्ड करून ठेवायला सांगायचं किंवा तेही न जमल्यास मग ‘यू टय़ूब’वर पाहायचं. पण ‘तिच्या’ त्या ठरलेल्या त्याच त्या वेळी ब्रेक्सची गोळी चघळत ‘ती’ बघण्यातली मज्जा काही औरच असते.. येस्स.. आपण बोलतो आहोत, आपल्या आवडत्या मालिकांविषयी.
 तरुणाईला आपल्याकडे वळवायचं ही गोष्ट वाटते तेवढी सोप्पी नाहीये. त्यामुळे त्यांच्याशी नातं जोडू पाहणारे ‘रिश्ता वहीं, सोच नयी’ अशा कॅचलाइन्स क्रिएट करीत अनुषंगिक कार्यक्रम सादर होताहेत. ‘सारेगमप’ आणि ‘कोण होईल मराठी करोडपती’ यांच्या नवीन पर्वाची सुरुवात झाल्येय. ‘अस्मिता’ मालिकेद्वारे महिला गुप्तहेराची गोष्ट सांगितली जाणारेय. सध्या ‘रंगरसिया’ची लव्हस्टोरी, ‘कॉमेडी नाइटस् विथ कपिल’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘होणार सून मी या घरची’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘दुर्वा’, ‘लक्ष्य’ या मालिका आवडीनं पाहिल्या जाताहेत. ‘जोधा अकबर’, ‘महाराणा प्रताप’, ‘झाशी की रानी’ या ऐतिहासिक पात्रांशी निगडित मालिका पाहणारेही बरेच जण आहेत. ‘केबीसी’ची जादू बऱ्यापकी आहे. विविध रियालिटी शोजच्या भडिमारात तरुणाईला फारसा रस नाहीये. इंग्लिश वहिन्यांनीवरील ‘बिग बँग थिअरी’, ‘हाऊ आय मेट युवर मदर’, ‘बोस्टन लीगल’, ‘कँसल’ आदी मालिका यूथमध्ये लोकप्रिय आहेत. त्याखेरीज ‘डिस्कव्हरी’, ‘अ‍ॅनिमल प्लॅनेट’, ‘नॅशनल जिओग्राफिक’ आदी माहितीपूर्ण वाहिन्या पाहणारी मोजकीच का होईना, पण मंडळी आहेत. जवळपास अडीचशे चॅनल्स असणाऱ्या या इडियट बॉक्सवरच्या मालिकांमधला भरकटलेपणा टाळा, वास्तवादी चित्रण करा, मालिकेचे भाग कमी करा, आम्हाला गृहीत धरू नका असं अनेकांना वाटतंय. तर काही मालिकांतले संवाद चांगले आहेत, अभिनय सरस आहे, पण मालिका पुढं सरकावी अशी अपेक्षाही काहींनी व्यक्त केल्येय. नावीन्याचं आकर्षण नि मनोरंजनाचा तडका अशा मिक्स अ‍ॅण्ड मॅचची मागणीही काही जणांकडून होत्येय. आपल्या आवडत्या मालिकांविषयीचं मत काहींनी ‘व्हिवा वॉल’शी शेअर केलंय.  

अनिता साहू
‘स्टार प्लस’वरची ‘वीरा’ ही अत्यंत आवडती मालिका आहे. एका भावानं आपल्या बहिणीचं आईसारख्याच मायेनं कसं पालनपोषण केलं, त्याची ही गोष्ट. एका गावात घडणारी ही कथा, त्यामुळे त्या भाषेचा तसा लहेजा आणि गावचा फिल देणाऱ्या छोटय़ा छोटय़ा गोष्टींमुळे ही मालिका इंटरेिस्टग वाटते. छोटी वीरा नि तिचा भाऊ हे दोघे दिसायला छोटे आहेत, पण अ‍ॅिक्टगमध्ये भारी आहेत. या बच्चेकंपनीसाठी ही मालिका मी बघायला लागलेय.

वैभवी कुलकर्णी
‘होणार सून मी या घरची’ ही ‘झी मराठी’वरची माझी आवडती मालिका आहे. जान्हवीचा अत्यंत साधेपणा, समाधानी वृत्ती आणि संयमीपणा मला आवडतो. त्याचा माझ्या एजग्रुपच्या मुलींवर थोडासा सकारात्मक प्रभाव पडतो. तसंच आईआज्जीचा करारीपणाही मला भावतो.

सचित जोशी
‘स्टार वर्ल्ड’वरची ‘बोस्टन लीगल’ ही वकिली पेशाशी निगडित मालिका पाहायला मला आवडते. त्या त्या केसचा चौफेर अंगानं अभ्यास कसा करावा, अग्र्युमेंटस् कशी करावीत, आदी अनेक मुद्दे यामुळे कळतात. एकदम खिळवून ठेवणारी नि अतिशय प्रवाही मालिका आहे ही. त्यातल्या वकिलांची सडेतोड बोलण्याची हातोटी, आपली बाजू योग्य तऱ्हेनं मांडण्याची त्यांची पद्धत हे सगळं मस्तच आहे. या मालिकेचं टाग्रेट ऑडियन्स तरुणाईच असल्यानं बोअर व्हायचे चान्सेस नाहीत.   

प्रांजली प्रभुणे
मला ‘झाँसी की रानी’ ही मालिका आवडते. आधी ती ‘झी टीव्ही’वर लागायची आणि आता ती ‘दंगल’ या वाहिनीवर लागत्येय. झाशीच्या राणीची अचूक निर्णय घेण्याची क्षमता, समोर आलेल्या संकटांना धीरानं नि आत्मविश्वासानं सामोरं जायची वृत्ती, तिचं अतुलनीय शौर्य-धर्य असे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे मला भावतात.

अनघा प्रभू
‘झी मराठी’वरची ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ ही मालिका मला आवडते. त्यात बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह दाखवल्यात. त्या दोघांतलं प्रेम नि त्यांचा मेळ छान वाटतो. आजकालच्या विभक्त कुटुंबांच्या पाश्र्वभूमीवर ईशाचं एकत्र कुटुंब पाहून खूप बरं वाटतं. ओमच्या घरात त्यानं सगळ्यांना सामावून घेणं नि समजून घेणं चांगलं दाखवलंय. एकूणच यातल्या बऱ्याच गोष्टी या शिकण्यासारख्या नि घेण्यासारख्या आहेत.

क्षितीश चोबे
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही ‘सब टीव्ही’वरील माझी आवडती मालिका आहे. ही मालिका लेखक तारक मेहता यांच्या ‘चित्रलेखा’ या मासिकामधील ‘दुनिया ने ऊँढा चश्मा’ यावरून आकारली आहेत. जबरदस्त धमाल आणणाऱ्या या मालिकेतून सगळ्यांनाच एक चांगला संदेश मिळतो. सर्वधर्मसमभावाचा धडा नकळतपणे गिरवायला शिकवणारी ही मालिका यंदा पाच वर्षांची झाल्येय. ही लहानथोरांचं निखळ मनोरंजन करणारी एक मालिका आहे.

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.