हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.
येत्या शनिवारी गुरुपौर्णिमा आहे. काही पारंपरिक सण आपल्या ‘डे’जच्या गर्दीत विसरले जातात. त्यापैकीच हा एक सण. पण तरुण पिढीचे काही प्रतिनिधी आजही गुरूला आदरांजली वाहण्यासाठी या सणाची वाट पाहत असतात. अशातल्याच काहींनी त्यांच्या भावना आमच्याशी शेअर केल्या.
आषाढी पौर्णिमेला ‘गुरुपौर्णिमा’ म्हणतात. आपल्या संस्कृतीत गुरूचं फार मोठं स्थान आहे. गुरूंना परमेश्वर, परब्रह्म मानलं जातं. आपल्याला विद्यादान करणाऱ्या गुरूंप्रति आदरपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी गुरूंसमोर कृतज्ञतेनं नतमस्तक होऊन गुरुपूजा केली जाते. आपण जे शिकलो, त्याचं आत्मचिंतन केलं जातं. आजच्या क्लिकसरशी पुढय़ात कोसळणाऱ्या माहितीच्या जमान्यातही गुरूंचं स्थान ध्रुवाप्रमाणं अढळ राहिलंय. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर गुरू आपल्याला मार्गदर्शन करतात. गुरुपौर्णिमेला कला क्षेत्रात अत्यंत महत्त्व आहे.
गुरूंच्या समोर प्रत्यक्ष बसून ज्ञान श्रवण करणं, त्यावर मनन-चिंतन करून ते समजावून घेणं, ही एरवीची ज्ञान मिळवण्याची पद्धत. मात्र संगीत आणि नृत्यामध्ये शिकलेल्या त्या कलेचा रियाज गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावा लागतो, तेव्हा तो भाग शिष्याकडून चांगल्या प्रकारे सादर होऊ शकतो. समस्त गुरुजनांना उद्याच्या ‘गुरुपौर्णिमे’निमित्त नमस्कार आणि शिष्य परिवारास शुभेच्छा!

मयूरी राजवाडे
मी एस. एन. डी. टी.मधून टी. वाय. बी. ए. शास्त्रीय संगीतात केलंय. गेली तीन र्वष मी किशोरी जानोरीकरांकडं गाण्याचं शिक्षण घेते आहे. त्या भेंडीबाजार घराण्याच्या नामवंत गायकांपकी एक आहेत. गेली पंधरा र्वष मी मनीषा साठे यांच्याकडं कथकही शिकत असून त्यात एम.ए. झाल्येय. आजच्या इंटरनेट नि यूटय़ूबच्या जमान्यात कोणत्याही रागदारीचं-मफिलीचं रेकॉìडग शोधणं सोप्पं झालंय. पण गुरूंकडून मिळणारं मौखिक स्वरूपातील ज्ञान नेटच्या माध्यमातून कधीच मिळणार नाही. गाताना प्रत्येक स्वर लावण्याची स्वत:ची खुबी असते. प्रत्येक स्वर कसा लावायचा हे गुरूंकडून शिकलं तरच योग्य ठरेल. एखादी मफिल चालू असताना गायकाची बठक, चेहऱ्यावरील हावभाव कसे असावेत, साथीदारांशी संवाद कसा साधावा हे फक्तगुरूच सांगू शकतो.

ऋचा कुलकर्णी
माझ्या नृत्यकलेच्या गुरू सई परांजपे नि त्यांच्या गुरू सुचेता चापेकर यांचं स्थान माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. गेली दहा र्वष मी भरतनाट्य़म शिकत्येय. नृत्, नृत्य नि नाटय़ाचा अनोखा मिलाप म्हणजे नृत्यकला. कला अंगीकारण्यासाठी त्या कलेचा सातत्यपूर्ण सराव फार महत्त्वाचा असतो. त्यासाठी शिस्त, परिश्रम, चिकाटी, कष्ट करायची जिद्द मनात असावी लागते. हेच बीज माझ्या गुरूंनी माझ्या मनात रुजवून, ते फुलवलं. माझ्या गुरू कायमच नावीन्यपूर्ण कल्पनांच्या सादरीकरणात आम्हा शिष्यांना सामावून घेतात. त्यातूनच जुन्या शैलींना नव्या स्वरूपात सादर करून त्या शैलीचा जीर्णोद्धार करून त्याला सामान्यांपर्यंत पोहचवायचं असतं, हा बोध आम्हाला होतो.

निनाद दैठणकर
आमच्या घरी पहिल्यापासून संगीताची गोडी आहे. गेली आठ र्वष मी माझे वडील नि गुरू डॉ. धनंजय दैठणकर यांच्याकडं संतूरचं शिक्षण घेतोय. संतूरवर सध्या मी वेगवेगळे प्रयोग करतोय. संतूर हे अतिशय मेलोडिअस नि मेडिटेटिव्ह वाद्य आहे. माझे बाबा पं. शिवकुमार शर्मा यांच्याकडून शिकले, त्याच शास्त्रोक्त पद्धतीचं शिक्षण ते देताहेत. सुरुवातीला संतूर मांडीवर घेऊन बसणं ही कठीण गोष्ट वाटते. पुढं त्यातले अलंकार, पलटे नि हात तयार व्हायला वर्षभर लागतं. एकेक राग त्याच्या सगळ्या गुणवैशिष्टय़ांनुसार शिकवला जातो. संगीतात कुठंही शॉर्टकट नाही. गुरूंनी शिकवल्यावर ते आत्मसात करून प्रत्यक्षात उतरवायला वेळ लागतो. अभिजात संगीत शिकण्यासाठी या प्रोसेसमधून जावंच लागतं. रियाज करताना स्वत:चे इनपुटस् देऊन ते इम्प्रुव्ह करता येतं. मेहनत करून शिकताना एक प्रकारे तावूनसुखावून निघाल्यासारखं वाटतं.

गंधार मुजुमदार
गेली दहा र्वष मी तबल्याचं शिक्षण घेतोय. सुरुवातीस स्वप्निल भाटे आणि आता विश्वनाथ शिरोडकर यांच्याकडं हे शिक्षण सुरू आहे. तबलाच शिकावा, हे सुरुवातीस ठरवलं नव्हतं, पण नंतर त्यात रस वाटत गेल्यानं आणि त्यातील गाभा कळल्यामुळं तबला शिकणं पुढं चालूच ठेवलं. सध्या शास्त्रीय संगीतातील रस कमी होत चालला आहे, असं दिसतं. याला जबाबदार आपणच आहोत. शास्त्रीय संगीताची आवड लहानपणापासूनच लागली पाहिजे तरच ते पुढं वृिद्धगत होईल (अर्थात काही अपवाद असतात). आवाजाची दैवी देणगी असलेले काही जण रियालिटी शोजमधून पुढं येताहेत. पण त्यांनी त्यांची साधना सातत्यानं चालू ठेवायला हवी. आपल्याला सातत्यानं मौलिक मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंबद्दल कितीही सांगितलं तरी कमीच आहे.  कला आणि माणूस यांच्यातील दुवा म्हणजे गुरू. गुरूंशिवाय कुठलीही गोष्ट साध्य करणं अशक्य आहे.

साधना दाते
मी लहानपणापासून कथक शिकते आहे. मधल्या काळात सुगम संगीत शिक्षण आणि अभ्यासामुळं कथक शिकणं मागं पडलं होतं. पण डान्सची पॅशन कायम होती. आता गेली सहा र्वष निवेदिता रानडे यांच्याकडं शिकत्येय. गुरूंकडून प्रत्यक्ष ज्ञान मिळणं, हे खूपच महत्त्वाचं असतं. टेक्नॉलॉजीमुळं केवळ तंत्र कळतं, कलेचा आत्मा गुरूंकडूनच जाणून घ्यावा लागतो. म्हणूनच टेक्नॉलॉजीकडून मिळणारं ज्ञान नि गुरूंकडून मिळणाऱ्या ज्ञानात खूप फरक असतो. गुरूंना शंका विचारून त्यांच्याशी थेट संवाद साधता येतो. त्यातून प्रॅक्टिकल नॉलेज जास्त मिळतं. आपल्या नि गुरूंच्या आयडियाज् मिक्स होऊन खूप छान कलाकृती तयार होऊ शकते. प्रत्यक्ष शिकताना आपल्याही क्रिएटिव्हिटीला वाव मिळतो.

तिलोत्तमा सूर्यवंशी
गेल्या आठ वर्षांपासून मी सतार शिकतेय. सुरुवातीला रसिक हजारे यांच्याकडं आणि आता उस्ताद सिराज खान यांच्याकडं सतारीचं शिक्षण घेतेय. सतार शिकण्याची प्रेरणा मला वडिलांकडून मिळाली. ते स्वत: तबलावादक आहेत. त्यांची इच्छा होती की, मी सतार शिकावी. आजच्या या स्पर्धात्मक जगात संगीतासारख्या क्षेत्रातही विद्यार्थिवर्गाचा संयम कमी पडतोय. तो झटपट शिक्षण घेऊन चटकन प्रसिद्धी मिळवण्यासाठी धडपड करू लागलाय. संगीताची उपासना करताना आपल्या प्राचीन गुरुशिष्य परंपरेला जोपासणं महत्त्वाचं आहे. संयम हेच कलेचं अध्यात्म आहे. गुरू योग्य संस्कार नि ज्ञानाद्वारे आपल्याला घडवतात. गुरुसान्निध्यामुळं एक प्रकारची जणू ऊर्जा शिष्यास मिळते. संगीत कलेतून परमानंदाची अनुभूती येते आणि हीच जीवनाची परिपूर्ती होय.