‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे..’ हे संतवचन आता प्रत्यक्षात आणायची वेळ कधीचीच येऊन ठेपल्येय. कारण काळाच्या ओघात निसर्ग निव्वळ ओरबाडला जातोय. त्याचं जतन नि संवर्धन व्हायला हवं, तेवढं होत नाहीये. हे पाहून काही युवा पर्यावरणस्नेही मंडळी पुढं सरसावताहेत. निसर्गाचं महत्त्व नि माहात्म्य विविध माध्यमांतून अतिशय आत्मीयतेनं लोकापर्यंत पोहचवण्याचा वसा या ‘हिरवाईच्या दूतां’नी घेतलाय. कालच्या म्हणजे ५ जूनच्या ‘पर्यावरण दिना’च्या निमित्तानं काहीजणांनी याच संदर्भात ‘व्हिवा’शी शेअर केलेले हे अनुभव.

इशा प्रधान-सावंत
दर सुट्टीत पालकांसोबत मी देशविदेशात प्रवास करायचे. त्यापकी आफ्रिकेतल्या वन्यजीवनानं मला भुरळ घातली होती. या प्रवासांदरम्यान निसर्गाची आवड रुजली ती कायमचीच. पुढं झूलॉजी विषयात पदवीधर होतानाच निसर्गप्रेमी मित्रमंडळीसोबत ट्रेक्स नि ट्रेल्स केले. बायोडायव्हर्सिटीमध्ये (जैववैविध्य) मास्टर करताना महाराष्ट्रातल्या जंगलांच्या अंतरंगात शिरताना नि नंतर मुंबईतली वनसंपदा न्याहाळताना जाणवलं ते आपल्याकडचं निसर्गवैभव.. या निसर्गाच्याच ओढीनं मी ‘बीएनएचएस’मध्ये रुजू झाले. मी कॉन्झव्‍‌र्हेशन सेंटरमध्ये एज्युकेशनल ऑफिसर आहे. वन्यजीवनाबद्दल लोकांच्या मनात जागृती नि प्रेम निर्माण करण्यासाठी आम्ही नेचर कॅम्पचं आयोजन करतो. त्यात सामान्यांसह उपेक्षित वर्गातील मुलं नि विशेष मुलांचाही समावेश असतो. एकदा विशेष मुलांना घेऊन मी नेचर ट्रेलला गेले होते. सुरुवातीला त्यांना जंगलाची भीती वाटली. मी त्यांना धीर देत स्पर्श, दृष्टी, आवाज या संवेदनांच्या साहाय्यानं जंगल अनुभवू दिलं.. त्यामुळं मुलं जंगलाशी एकरूप होऊ लागली. ती काही बोलली नाहीत, तरी त्यांना झालेला आनंद अवर्णनीय होता.. जो त्यांच्या संवेदनशील मनांपर्यंत पोहचला होता. विविध स्तरांतील नि वयोगटांतील लोकांचा आमच्या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. अधिकाधिक लोकांना पर्यावरणस्नेही करण्याचा आमचा मानस आहे. सध्या आम्ही मुंबईतल्या हिरवाईची ओळख लोकांना करून देतोय, आता मुंबईबाहेरही असे प्रोग्रॅम करायचा विचार चाललाय. या कामामुळं जंगलाच्या जतन-संवर्धनाचा अनुभव माझ्या गाठीशी जमा होतोय. पुढं बायोडायव्हर्सिटीमध्ये रीसर्च करायचा माझा विचार आहे.

एकता पांगे
निसर्गाची आवड मला लहानपणापासूनच होती. आई नि मी किचन-बाल्कनी गार्डिनग करायचो. मी राहात होते तीही हिरव्यागार परिसरातच. त्यामुळं हिरवाईत रमायची सवय पहिल्यापासूनच लागली. २६ जुलचा महापूर, दुष्काळाचं सावट.. निसर्गाच्या या प्रकोपामागची कारणं शोधायची जिज्ञासा होती. कारणं कळल्यावर त्यावरचा उपाय म्हणून मी निसर्गाकडंच वळले. झूलॉजीची पदवी नि सॉफ्टवेअर इंजिनीअिरगचं शिक्षण गाठीशी असूनही आयटीमधले ऑप्शन्स नाकारले आणि मी निसर्गासोबत राहण्याचा पर्याय निवडला. सध्या मी ‘इकोफोक्स’ या एनजीओत आणि ‘महाराष्ट्र नेचर पार्क’मध्ये असिस्टंट प्रोग्रॅम ऑफिसर म्हणून काम करत्येय. पर्यावरणस्नेही जीवनशैलीवर व्याख्यानं देते. फ्लॉवर शो, माथेरान महोत्सव, फोटोथॉनसारख्या इव्हेंट आयोजते. शालेय विद्यार्थ्यांसोबत नेचर ट्रेल्स करते. पर्यावरणविषयक उपक्रम नि स्पर्धाना परीक्षक म्हणून हजेरी लावते. सणवार पर्यावरणस्नेही पद्धतीनंच साजरे करते. आई नि दोन्ही संस्थांतील वरिष्ठांच्या सहकार्यामुळं मला हे सगळं करता येतंय. मला शालेय शिक्षकांना ट्रेन करून त्यांच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जागृती करायची आहे. एम.एस्सी. एन्व्हार्नमेंटच्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं काही प्रकल्प राबवण्याचा विचार चाललाय. लोकांमध्ये टेरेस-किचन-बाल्कनी गार्डिनगची आवड निर्माण करायची आहे.

चतन्य कीर
लहानपणी ट्रेकिंग करतानाच पक्षीनिरीक्षणाची गोडी लागली. पक्षी-प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करून काही आडाखे-अंदाज बांधता येऊ लागले. त्यासंबंधीचे लेख वृत्तपत्रांतून लिहितो. मी निसर्गमित्र म्हणून काम करतो. झाडं नि जंगलाविषयीचा अवेअरनेस वाढण्यासाठी काही प्रोग्रॅम्स करतो. पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करताना मोठय़ापेक्षा लहानांचा प्रतिसाद अधिक उत्स्फूर्त नि जोरकसपणं येतो. एका टिश्यू पेपरमागं किती झाडं बळी पडतात, हे कळल्यावर काही शाळकरी मुलांनी टिश्यू पेपर वापरणं सोडलं. जंगल सफाई अभियान राबवताना कचरा सफाईत लहानग्यांचाच पुढाकार असतो. ते जंगलाचा कोपरा न् कोपरा िपजून काढतात. मी ‘सर्प’ या सर्पमित्र संस्थेत काम करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही तरुणाई आणि मोठय़ांपर्यंत पोहचतो आहोत. मी वाकोल्याला मुंबईतील पहिली बर्ड गॅलरी तयार करणं, मोठा रेनवॉटर हार्वेिस्टग प्रकल्प आणि पक्षी-प्राण्यांची जैवविविधता जपण्याचं काम केलंय.
माझ्या ‘नेचर वॉक’ या एनजीओच्या माध्यमातून आम्ही शाळांमधून वृक्षदानाचा प्रकल्प राबवणार आहोत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या झाडाच्या वाढीचा रिपोर्ट तयार करायचा. ‘हिरव्या मित्रां’शी संवाद साधताना मुलांमध्ये आपसूकच निसर्गाची आवड रुजेल. मोठय़ा वयोगटातल्या मुलांना आम्ही पर्यावरणविषयक कायद्यांची माहितीही देतो. त्याखेरीज व्हर्टकिल गार्डन या संकल्पनेवर विचार चालू आहे.

सायली जोशी
निसर्गाविषयी मला पहिल्यापासूनच आवड होती. मी एन्व्हायरन्मेंटल सायन्समध्ये एसएससी केलंय. मी ‘बीएनएचएस’मध्ये एनव्हायरन्मेंटल इन्फम्रेशन सिस्टम सेंटरमध्ये इन्फम्रेशन ऑफिसर म्हणून काम करते. इथं पक्ष्यांशी संबंधित माहिती गोळा केली जाते. इथं मी बातम्यांचं एकत्रीकरण करते. पुस्तकं-मासिकांतील लेखांचे संदर्भ जमवते. वेबसाईटवर पक्ष्यांशी संबंधित नवीन प्रकल्प नि संशोधनाचं अपडेटस् करणं नि स्थलांतरित पक्ष्यांच्या ट्रँकिंगचं कामही चाललंय.मी रुजू झाल्यावर लगेचच माझी ‘फ्लेिमगो फेस्टिव्हल’साठी व्हॉलेंटिअर म्हणून निवड करण्यात आली. तेव्हा मी थोडीशी घाबरले होते. पण माझ्या सहकाऱ्यानी लोकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नोत्तरांची माझी बेसिक तयारी करून घेतली. लहान मुलांच्या एका गटाला मी फ्लेिमगोंविषयी काही माहिती देण्याआधीच ती मुलंच मला एकेका फ्लेिमगोची माहिती देऊ लागली. मग मी त्यांच्याच नजरेतून ते सारे फ्लेिमगो बघितले.. अतिशय सुंदर अनुभव होता तो.. सध्या मी वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती करून घेतेय. त्यातले काही फक्त बघितले होते, काहींची फक्त मराठी नावं माहीत होती.. त्या संदर्भातलं माझं नॉलेज वाढतंय. मी राहतेय त्या परिसरातल्या कचऱ्याचा योग्य विनियोग आणि पाणी शुद्धीकरण या प्रकल्पांचा विचार चालू आहे.

विरांता सकपाळ
नेचर ट्रेलच्या दरम्यान मी निसर्ग जवळून पाहिला. त्याचा बहर, त्यातलं सौंदर्य मला भावलं. प्राणी-पक्ष्यांचं निरीक्षण करणं मला आवडलं. मी ‘नेचर वॉक’मध्ये व्हॉलेंटिअर म्हणून काम करते. जंगलाविषयी नि भोवतालच्या पर्यावरणाविषयी लोकांना जागरूक करते. उदाहरणार्थ – उन्हाळ्याच्या काहिलीत पक्ष्यांसाठी चारा-पाणी ठेवावं, कोणत्या सीझनमध्ये वृक्षारोपण करावं, आदी अनेक गोष्टी मी समजावते. मुलांना झाडांची माहिती सोप्या शब्दांत समजावून झाडांची निगा कशी राखायला शिकवते. आमच्या या प्रयत्नांना संमिश्र यश मिळतंय. ‘बर्ड रेस्क्यू’चा कॉल आल्यावर आम्ही लगेचच तिथं धाव घेतो. मध्यंतरी एक कबूतर मांज्यात विचित्र प्रकारे अडकलं होतं. काही कारणानं फायर ब्रिगेडही उपलब्ध नव्हतं. आम्ही त्याला हिकमतीनं सोडवलं. घरी आणून चारापाणी दिलं. त्याच्या जखमेला औषधपाणी केलं. दुसऱ्या दिवशी त्याला मोकळं सोडलं.. त्याच्या मोकळेपणाचा क्षण मनात कोरला गेलाय..
आवडत्या निसर्गाला लेन्समध्ये टिपण्यासाठी मला फोटोग्राफी शिकायची आहे. चिमण्यांच्या कमी होण्याऱ्या संख्येबद्दल लोकांना जागरूक करायचंय. शाळेपासूनच मुलांना निसर्गाची गोडी लावली तर केवळ टेक्निकली नेचर फोटोंना लाइक न करता ती खऱ्याखुऱ्या निसर्गाच्या जवळ जाऊन त्याचं संवर्धन करतील. ही आवड जोपासण्यासाठी नेचर ट्रेल्ससारखे आणखी प्रोग्रॅम्स आखण्याचं काम करायचं आहे.

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.