पहिला पाऊस.. त्यात भिजायचं निमित्त नि त्यावेळी चिखलात खेळता खेळता खेळला जाणारा फूटबॉल.. असं चित्र दिसायचं पण आता मैदानाऐवजी टीव्हीलाच चिकटून राहायचे दिवस आहेत. सध्या समस्त फूटबॉलप्रेमींना सगळीकडं फूटबॉलच दिसू लागलाय. मान्य आहे की दिवस पावसाचे आहेत, पण त्याहीपेक्षा अधिक ते फूटबॉलचे आहेत. वॉलपेपर्सपासून ते टॅट्यूजपर्यंत सब जगह ‘फूटबॉल’ एकदम छा सा गा हैं.  
 गुरुवारपासून सुरु झालेल्या ‘फिफा वर्ल्डकप’चे समस्त तरुणाईला कधीपासून वेध लागले होते. यात मुलगे-मुली असा काहीही भेदाभेद अज्जिबात नाही. कारण मुलीही फूटबॉल खेळण्यात नि तो रस घेऊन पाहाण्यात आघाडीवर आहेत. एके काळची क्रिकेटवाल्यांची दादागिरी फूटबॉल खेळणाऱ्यांनी मोडित काढल्येय. आता आपल्याकडं फूटबॉल खूपच फॉलो केला जातोय. केवळ युरोपियनच नव्हे तर भारतीय फूटबॉलही फॉलो होतोय. यंदा कोणता संघ जिंकणार, यावर सॉल्लिड वादावादी सुरू आहे. त्या त्या संघांचं वैशिष्ट्यं, त्यांचा सगळा इतिहास-भूगोल या फूटबॉलप्रेमींना तोंडपाठ असतो. काही शानदार विजयी गोलची परोपरीनं आठवण काढली जाते. यंदाच्या स्पध्रेत ब्राझील आणि जर्मनी हे अव्वल संघ गणले जाताहेत. ब्राझील घरच्या मदानावर आघाडी मारेल असं काहींना वाटतंय. अनेकांना जर्मनीचा संघ जिंकावासा वाटतोय. त्यांच्यात गुणवत्ता प्रचंड आहे. पण हा संघ सेमी फायनलपुढं जात नाही. काय होईल नक्की फिफामध्ये? याबद्दलचं मत काही फूटबॉलप्रेमींनी ‘व्हिवा’शी शेअर केलंय.  

निनाद भोसले
फुटबॉल मला लहानपणापासून आवडतो. या कठीण खेळात वेळ ही खूप महत्वाची असते. बॉलला हात न लावता केवळ पायाचा वापर करुन समोरच्याला चकवून गोल करणं, हे साधं काम नाही. म्हणून मला फुटबॉल खेळायला नि बघायला खूप आवडतो. ख्रिस्तियानो रोनाल्डो हा माझा आवडता खेळाडू आहे. ब्राझील हा माझा आवडता संघ आहे. कारण ब्राझीलचं टीमवर्क खूप चांगलं आहे. दानी अल्वेस, थीआगो सिल्वा, मार्सेलोसारखे डिफेंडर्स आहेत. तसेच ऑस्कर, गुस्तावसारखे मिडफिल्डर आहेत नि नेयमार, हल्कसारखे महान खेळाडू आहेत. ब्राझील वर्ल्डकप जिंकेल यात शंकाच नाही.

प्रसाद भडंग
मला जर्मनीचा संघ खूप आवडतो. स्टीव्हन जेरार्ड, लुइस सुआरेझ हे माझे आवडते खेळाडू आहेत. माझ्या मते ब्राझीलचा संघ जिंकेल. कारण त्यांची फळी अगदी मजबूत आहे. जर्मनी व हाँलंडचे संघही चांगले आहेत. पण ब्राझील घरच्या मदानावर खेळणार असल्यानं खूपच फरक पडेल. या टुर्नामेंटमधलं बेल्जियम हे एक सरप्राईज पॅकेज आहे. जणू डार्क हॉर्स..

गुंजन त्रिपाठी
माझा आवडता खेळाडू आहे रामोस सर्जिओ. कारण तो माझा आवडता संघ स्पेनचा बेस्ट सेंट्रल डिफेंडर आहे. स्पेनच्या संघामध्ये हा विश्वचषक जिंकण्याचं सामथ्र्य आहे. कारण त्यांचा डिफेन्स खूप स्टाँग आहे. नि त्याच्या अँटॅकिंगमध्येही स्ट्रॅटेजी असते. या स्ट्रँटेजीमुळं समोरच्यांचा डिफेन्स नेस्तनाबूत होऊन जातो. शिवाय त्यांच्याकडं दिएगो कोस्टा, डेव्हिड व्हिआ नि आंद्रेस इनिस्टा, टोरेससारखे क्लास अँटँकिंग फ्लेअर्स आहेत आणि पाच टॉप किपर्सपकी आयकर कॅसिआ नि डेव्हिड डी गिआ हेही त्यांच्याकडं आहेत.

वेदांत मनोरे
मी गेली सहा र्वष कल्याणच्या फिनिक्स फूटबॉल क्लबतर्फे खेळतोय. फूटबॉल म्हणजे माझ्यासाठी अवर्णनीय आनंद. माझा आवडता खेळाडू फॅब्रिगास आहे. स्पेन हा माझा आवडता संघ आहे. माझ्या मते अर्जेटिनाचा संघ विजयी होईल. कारण त्यांची फॉरवर्ड लाईन खूपच आक्रमक आहे. त्यात लिओनेल मेस्सी, अग्वेरो, डी मारिया असे मोठे खेळाडू आहेत. अंतिम चुरस अर्जेटिना नि ब्राझिलमध्ये व्हावी, असं मला वाटतंय. मेस्सीकडून अपेक्षा खूप आहेत. वर्ल्डकपमध्ये गोललाईन टेक्नॉलॉजीची इंट्रोडक्शन व्हावी, असं वाटतं. २०१७ मध्ये होणारया अंडर सेव्हटिन वर्ल्डकपचं आयोजन आपल्याकडं होणार असून त्याचा आपल्या टीमला पुष्कळ फायदा होईल. पुढं २०२२ च्या वर्ल्डकपमध्ये भारताची टीम खेळेल, असं मला वाटतं.

डॉ. मधुरा घाटोळ
मी फुटबॉल खेळत नसले तरी फुटबॉल जगतातल्या घडामोडी एखाद्या ड्रामासारख्या पाहते. माझं फूटबॉल वेड हे नुसतं रात्री जागून ईपीएल, ला लीग, सीएल मॅचेस बघण्यापुरतं मर्यादित नसून कॉलेजमध्ये स्पोर्टस् सेक्रेटरी असताना मॅचेस अरेंज करणं आणि त्यात रेफ्री म्हणून काम करण्यापर्यंत जातं. स्पेनचा संघ माझा आवडता आहे. हा संघ आपल्या भांबावून सोडणाऱ्या पासिंगमुळं ओळखला जातो. आंद्रेस इनिएस्टा या आवडत्या खेळाडूचे अचूक पासेस, चपळता आणि खिलाडूवृत्तीमुळं मला त्यांच्याबद्द्ल आदर वाटतो. होम ग्राऊंडवर दानी अल्वेस, मार्सलिोसारख्या खेळाडूंसोबत ब्राझील जोरदार टक्कर देईल असं वाटतं. नॉयर, म्युलर, श्वाईनश्टायगर आदी दिग्गज खेळाडूंमुळं जर्मनदेखील बलाढ्य संघ म्हटला जाताय. उत्तम टॅकिलग, अ‍ॅटॅक नि फास्टपास करणारा त्यांचा संघ आहे. अर्जेटिना, बेल्जिअम, पोर्तुगाल नि नेदरलँडसमध्येही चुरशीची लढत होईल. माझी उत्कंठा अगदी शिगेला पोहचलेय.

प्रियांका सिंग
मला लहानपणापासूनच फुटबॉल खेळायची आवड आहे. आधी मी फक्त सोसायटीतच खेळत होते.  पण तसं खेळता खेळता हा खेळ मला खूपच आवडला नि मी तो अधिकच समरसून खेळायला लागले. शाळा-कॉलेजतर्फेही खेळू लागले. माझं नाव होऊ लागलं. सध्या मी वांद्ऱ्याच्या सी व्’ाू क्लबतर्फे खेळतेय. माझा आवडता खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. आवडता संघ ब्राझील आहे. जिंकणारा संघ स्पेन असेल. कारण तो खूप स्ट्रॉंग आहे. त्यातले जावी मार्टनेझिं, गेरार्डसह सगळेच खेळाडू छान खेळतात. ते गेल्या वर्षीचे चँम्पियन्स होते. यंदा इंग्लंडचा संघही स्ट्रॉंग आहे, त्यात बरेच यंगस्टर्स आलेत. त्यामुळं तेही यायचे चान्सेस आहेत.

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com  सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.